डॉ. व्यंकट मायंदे
Rural Startup Update : कृषी क्षेत्राचे सामाजिक दृष्टीने महत्त्व कायम असून, देशाच्या अन्नसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. भारताची लोकसंख्या तरुण असून, ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी याच क्षेत्रात आहेत.
शेतकरी उत्पादक कंपनी
भारत सरकारच्या योजनेतून शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे देशभर उभे केले जात आहे. ग्रामीण भागात उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा माल सामुदायिकरीत्या एकत्रित करून शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून प्रक्रिया तसेच बाजारपेठ शोधून विक्री यामुळे शेतीमालाला वाजवी मोबदला मिळण्यास मदत होते.
राज्यात अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यरत व पंजीकृत झाल्या असून, देशपातळीवर दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे.
त्यामध्ये ग्रामीण युवकांना शेतकऱ्यांना एकत्रित येऊन कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यास ती कंपनी कशी चालवायची व फायदेशीर करण्यासाठी लागणारे प्रशिक्षण मिळाल्यास उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये खूप चांगला व्यवसाय उभा राहू शकतो.
उत्पादक शेतकरी बहुतांशी वेळेला शोषित असतो, त्याचे कारण त्यांच्याकडे मालाची प्राथमिक प्रक्रिया तसेच साठवणूक क्षमता आणि देशातील व जगातील बाजारपेठेचे ज्ञान नसल्यामुळे त्याला खुल्या बाजारात व्यापाऱ्यांना माल विकणे एवढेच माहीत असते.
शेतकरी उत्पादक कंपनीच्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतीमाल या कंपनीला वाजवी भावामध्ये विकून त्याचा योग्य मोबदला मिळेल. त्याचबरोबर कंपनीच्या साठवणुकीची व्यवस्था, प्रक्रिया, प्रतवारी, ब्रॅण्डिंग व लेबलिंग करून बाजारात विक्री करण्याची संधी यामध्ये आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योग व रोजगारांच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, कंपनीमार्फत खरेदी-विक्री, प्रक्रिया, वाहतूक, स्थानिक व जागतिक बाजारपेठ या सर्वांचा अभ्यास करून त्यामध्ये कंपनीमध्ये अनेक तरुणांना रोजगाराची संधी प्राप्त होऊ शकते. परंतु त्यासाठी लागणारे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था शासकीय किंवा खासगी यंत्रणेमार्फत करावी लागेल. यासाठी बँकांनी सुद्धा पुढाकार घेऊन सकारात्मक दृष्टीने अशा प्रकारच्या कंपन्यांना चालना देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
शेती संलग्न व्यवसाय
शेती क्षेत्राशी संलग्न असे अनेक व्यवसाय आहेत. ट्रॅक्टर व अवजारे देखभाल दुरुस्ती, कृषी अवजारांची सेवा केंद्रे, हवामान अंदाज व शेती सल्ला केंद्रे, अशा प्रकारचे सेवा उद्योग चांगल्या प्रकारे युवक स्वतंत्रपणे किंवा समविचारी गट तयार करून करू शकतात.
शेतात काम करत असताना कार्यक्षमतेने यंत्राचा वापर याविषयीचे तंत्रज्ञान अवगत करून देण्यासाठी प्रशिक्षित युवक शेतीमध्ये यांत्रिकीकरण सेवा हा उद्योग करू शकतात.
वाहतूक व्यवसाय
शेतीमाल, फळे व भाज्या काढणीनंतर बाजारापर्यंत पोहोचवणे यासाठी वाहतूक व्यवसाय करण्याची संधी युवकांना मिळू शकते. नाशिवंत फळे व भाज्या शेतावरती स्वच्छ करून, प्रतवारी आणि पॅकेजिंग करून करून बाजारापर्यंत सुरक्षितपणे पाठवण्यासाठी कौशल्य असणाऱ्या युवकांना शेतीमाल वाहतूक व्यवसायामध्ये सुद्धा रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत.
शेतीमाल प्रक्रिया उद्योग
उत्पादनानंतर लहान लहान प्रक्रिया उद्योग करण्यासाठी ग्रामीण युवकांना फार मोठ्या संधी आहेत. सध्या जगभरामध्ये आणि देशांमध्ये प्रक्रिया केलेले अन्न सेवन करण्याकडे कल वाढलेला आहे. शहरी भागामध्ये काम करणारे तसेच सर्व क्षेत्रांतील लोकांची कार्यशक्ती वाढली असून वेळही कमी असतो.
अशा लोकांचा कल प्रक्रियायुक्त ‘रेडी टू कुक’ व ‘रेडी टू इट’ अशा प्रकारच्या अन्नाकडे वाढलेला आहे. अशा प्रकारचा उद्योग बहुराष्ट्रीय कंपन्या, तसेच काही देशांतील कंपन्या मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यांच्या तोडीला ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी तो माल उत्पादित होतो, त्याच ठिकाणी अशा प्रकारच्या अन्नप्रक्रिया उद्योगाचे जाळे निर्माण झाल्यास तेच अन्न चांगल्या प्रकारचे पॅकिंग करून ब्रॅण्डिंग करून बाजारात स्वस्त दरामध्ये ग्राहकाला मिळू शकेल.
हे करण्यासाठी ग्रामीण युवकांना याविषयीचे तंत्रज्ञान, व्यवस्थापन व आर्थिक नियोजन याविषयी प्रशिक्षित करून बँकिंग क्षेत्राच्या मदतीने लघू किंवा मध्यम उद्योग उभारण्याची संधी उपलब्ध आहेत. युवकांना शासकीय अथवा स्वयंसेवी संस्थांकडून प्रेरणा देऊन उद्योजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
ट्रेडिंग व मार्केटिंग
शेतीमालाचा व्यापार व विक्री यामध्ये अनेक संधी दडलेल्या आहेत. उदा. उत्पादक शेतकऱ्यांकडून शेतीमाल विकत घेऊन त्याची चांगल्या प्रकारे स्वच्छता, प्रतवारी, पॅकिंग व ग्रेडिंग करून एक ते पाच किलोच्या पॅकमध्ये घरपोच मिळेल अशा प्रकारच्या उद्योगाला फार मोठा वाव येत्या काळात आहे. असे प्रयोग अनेक सुशिक्षित युवकांनी ॲप तयार करून ऑनलाइन विक्री सुरू केलेली दिसते.
अशाच प्रकारचा उद्योग करण्याची संधी आणि यासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. ताजी फळे, ताजा भाजीपाला व्यवस्थितपणे प्रतवारी करून निवडून स्वच्छ करून चांगल्या पॅकिंगमध्ये शहरी ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था उद्योगाला आता वाव आहे. यामध्ये देखील रोजगाराच्या अनेक संधी दडलेल्या आहेत.
परंतु हा उद्योग यशस्वी होण्यासाठी लागणारे बॅकवर्ड व फॉरवर्ड लिंकेज याचा अभ्यास करून ग्राहकालाच जोडून व्यवसाय वाढ होऊ शकतो. त्यामध्ये उद्योग व रोजगारांच्या संधी दडलेल्या आहेत. शहरी भागामध्ये केवळ ट्रेडिंग करणाऱ्या कंपन्या, ऑनलाइन ऑर्डर व पुरवठा हे उद्योग करण्याची संधी आहे. यावर काही युवकांनी यशस्वी प्रयोग करून संधी शोधलेल्या आहेत. या संधीतून काही कंपन्या अल्प काळामध्ये चांगल्या प्रस्थापित होत असल्याचे दिसून येते.
स्टार्ट अप
या क्षेत्रामध्ये सेवा पुरवणे, ट्रेडिंग करणे, विक्री व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, तंत्रज्ञान निर्मिती, शेतीतील कार्यक्षमता वाढवणे, नवीन तंत्रज्ञानावर आधारित सेंसरचा वापर करून शेती कामाची सिंचनासह इतर सर्व घडामोडीची ऑटोमॅटिक उपक्रमाकडे जाण्यासाठी स्टार्ट अप सुरू झालेल्या आहेत.
या स्टार्टअपसाठी केंद्र सरकार, तसेच अशा उद्योगांना चालना देण्यासाठी खासगी ‘फंडिंग एजन्सी’च्या मार्फत चालना दिली जाते. मागील काही वर्षांत शेती क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या नवीन कंपन्या उभ्या करण्यात तरुणांचा कल वाढत आहे.
अचूक अभ्यास करून शेती प्रश्न सोडविण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शोधणे त्या माध्यमातून शेतीतील कार्यक्षमता व नफा वाढवण्यासाठी मदत करणे यातून या स्टार्टअप काम करत आहेत. या माध्यमातून ग्रामीण युवकांना स्वयंरोजगार तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
(लेखक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.