Cost Saving Farming Management:
शेतकरी नियोजन
कापूस, मका, तूर, आले
शेतकरी : रावसाहेब दगडू मोरे
गाव : बाभूळगाव, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर
शेती : ८ एकर
मी १९९१-९२ पासून शेती करत आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना होणारा खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसत नव्हता. पीक उत्पादन वाढ आणि जमिनीची सुपीकता जपण्यासाठी तंत्रज्ञान शोधत असताना मला सगुणा राईस तंत्रज्ञान (एसआरटी), विना नांगरणी शेती तंत्रज्ञानाबाबत माहिती मिळाली. टप्प्याटप्प्याने माझ्या शेतीमध्ये या तंत्रज्ञानाचा अवलंब करत गेलो. अलीकडे पूर्व मोसमी पाऊस सर्वदूर जोरात येतो, या काळात शेती मशागत कशी करावी, पेरणी कधी करावी ? या अडचणी जाणवू लागल्या आहेत. परंतु एसआरटी तंत्रज्ञानाचा अवलंब करत असल्याने माझी आठ एकर शेती सध्या पीक पेरणीसाठी तयार आहे.
प्रयोग म्हणून २०१८ च्या खरिपात सुरुवातीला एक एकर क्षेत्रावर एसआरटी तंत्रज्ञानाचा अवलंबकरत साडेचार रुंद गादीवाफा तयार करून टोमॅटो लागवड केली. २०१९ मध्ये ‘पोकरा’ च्या माध्यमातून मला एसआरटी तंत्रज्ञानाबाबत अधिक माहिती मिळत गेली.
२०१९ मध्ये एक एकर क्षेत्रात खरिपात साडेचार फूट रुंद गादीवाफ्यावर मका पीक घेतले, त्यानंतर रब्बीत गहू लागवड केली. २०२० मध्ये खरिपात दोन एकर क्षेत्रामध्ये गादीवाफ्यावर कापूस लागवड केली. गादीवाफ्यावर मक्याच्या दोन ओळी बसतात. या दोन ओळीतील अंतर एक फूट आणि दोन रोपामध्ये १० इंच अंतर असते. गादीवाफ्यावर कापसाची एक ओळ बसते, दोन रोपात पावणे दोन फूट अंतर ठेवले जाते. त्यावर्षी रब्बीत कोणतेही पीक घेतले नाही.
तो गादीवाफा तसाच ठेवून २०२१ मध्ये खरिपात पुन्हा दोन एकरावर मका आणि रब्बीत एक एकर हरभरा, एक एकर मका पीक घेतले. २०२२ मध्ये एसआरटी खालील क्षेत्रात दोन एकरात खरिपात मका, कापूस घेतला. रब्बीत हरभरा, मका पीक घेतले. त्याच वर्षी आणखी दोन एकर क्षेत्र एसआरटी पद्धतीने लागवडीखाली आणले. त्यामध्ये दोन एकरावर खरिपात आले पीक घेतले. रब्बीचे पीक न घेता उन्हाळ्यात त्या क्षेत्रावर मका पीक घेतले.
२०२३ मध्ये एसआरटी खाली आणखी अर्धा एकर क्षेत्र वाढविले. त्यावर्षी खरिपात अडीच एकरावर कापूस त्यानंतर त्या क्षेत्रावर हरभरा, मका पीक विभागून घेतले. २०२४ च्या हंगामात दोन एकरात खरिपात तुरीचे पीक घेऊन त्यानंतर रब्बी पीक न घेता त्या क्षेत्रात उन्हाळी मका पीक घेतले. यंदाच्या खरिपात अर्धा एकर तूर आणि दोन एकरावर आले पीक, दोन एकरावर कापूस लागवडीचे नियोजन पूर्ण झाले आहे.
एसआरटी पद्धतीमध्ये गादीवाफ्यावर पीक लागवड केल्याने पिकांची मुळे, कापणीनंतर खोडाचे अवशेष तसेच जमिनीत राहू दिल्याने ते तेथेच जागेवर कुजतात. त्याठिकाणी गांडुळांची संख्या वाढू लागली. जमीन भुसभुशीत झाली, सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढले. एसआरटी तंत्राचा अवलंब केल्याने गादीवाफे तयार केल्यानंतर मी शेतीत नांगरट, रोटाव्हेटर आणि खुरपणी करत नाही. मात्र तण नियंत्रणासाठी शिफारशीत तणनाशकांचा योग्य प्रमाणात योग्य वेळी वापर करतो. कापूस, मका, आले पिकाला खते ठिबक सिंचनाद्वारे आणि काही प्रमाणात वरखते पद्धतीने देतो. पीक जमिनीपासून ३ ते ४ इंच वरून कापून घेतो. कापूस व तूर या पिकासाठी श्रेडरचा वापर करून त्याची कुट्टी करून ते शेतात पसरवतो. यातून सेंद्रिय घटक जमिनीत मिसळले जातात.
उत्पादनात मिळाली वाढ
एसआरटी पद्धतीने शेतीची सुरुवात करताना नांगरून रोटाव्हेटरमारून साडेचार फुटाचा गादीवाफा तयार केला. त्या गादीवाफ्यावर दरवर्षी पीक फेरपालट करून लागवडीचे नियोजन सुरू केले. पिकाचे अवशेष जमिनीतच ठेवले जातात. त्यामुळे जमीन सुपीकता तसेच पीक उत्पादनात फरक दिसून आला. माझा जमिनीतील सेंद्रिय कर्ब एक टक्यांपर्यंत गेला आहे. जमीन सुपीकता वाढत आहे.
कापूस उत्पादनात एकरी सरासरी अकरा ते साडे अकरा क्विंटलचे सातत्य आहे. एसआरटी करण्यापूर्वी खरीप मका उत्पादन एकरी ३० ते ३२ क्विंटल असायचे ते आता ४० ते ४२ क्विंटल मिळते. रब्बीत मक्याचे एकरी ४० क्विंटल उत्पादन मिळायचे आता एसआरटीमुळे ५० ते ५५ क्विंटलपर्यंत गेले आहे.
हरभऱ्याचे एकरी पाच ते सहा क्विंटल उत्पादन मिळायचे, आता आठ ते साडेआठ क्विंटल मिळते. दरवर्षी मी दोन एकर गहू लागवड करतो. मला गव्हाचे पूर्वी एकरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन मिळायचे ते आता १८ ते २० क्विंटल मिळते. थोडक्यात जसजशी जमीन सुपीकता वाढेल, त्याप्रमाणात उत्पादनात आश्वासक वाढ मिळत आहे. खर्चामध्ये बचत होते.
एसआरटी तंत्राचा वापर केल्यापासून माझ्या शेतीतील नांगरणी, रोटाव्हेटर, सरी पाडणे, आणि किमान चार पाळ्या देणे याचा दरवर्षी एकूण एकरी आठ हजार रुपये मशागतीचा खर्च वाचतो. याशिवाय जमीन सुपीक झाल्याने रासायनिक खतांचा एकरी दोन बॅग वापर कमी झाला आहे.
रावसाहेब मोरे ७४९९४ ८२९२२
(शब्दांकन : विकास जाधव)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.