Agriculture Technology : ‘एसआरटी’ तंत्रज्ञानाने पाच पिकांचे उत्पादन

SRT Technology : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील टापरगाव येथील अतुल मोहिते हा युवा शेतकरी वडील रावसाहेब यांच्या मार्गदर्शनात पाच वर्षापासून शून्य मशागत शेती (एसआरटी) तंत्रज्ञानाद्वारे शेती करतो आहे.
SRT Technology
SRT TechnologyAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture : कर्जत (जि. रायगड) येथील प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी विकसित केलेले ‘सगुणा राइस टेक्नॉलॉजी’ (एसआरटी) राज्यभर प्रसिद्ध झाली आहे. रायगड, पुणे आदी जिल्ह्यांत या तंत्रज्ञानाने भाताची यशस्वी शेती केलेले अनेक शेतकरी पाहण्यास मिळतात. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी प्र. रा. चिपळूणकर यांनीही शून्य मशागत तंत्र व मातीची सुपीकता या विषयावर विविध प्रयोग केले आहेत. या दोन्ही तज्ज्ञ शेतकऱ्यांकडून राज्यातील अन्य शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाची प्रेरणा मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील टापरगाव येथील अतुल मोहिते हे त्यापैकीच एक युवा शेतकरी आहेत.

मोहिते यांचे ‘एसआरटी’ तंत्राचे प्रयोग

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) माध्यमातून रावसाहेब व अतुल या पितापुत्रांना एसआरटी तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. याच प्रकल्पातून त्यांना कर्जत येथे भडसावळे यांच्या सगुणा बागेत तीन दिवसांचे या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळाले. त्यानंतर २०१९ मध्ये अतुल यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली या तंत्रज्ञानाचा प्रयोग सुरू केला. अति पाऊस झाला की चिबडणाऱ्या एक एकर शेतात चार फूट रुंदीचे गादीवाफे (बेड) तयार केले. चार बाय एक फुटावर कपाशीची लागवड केली. गादीवाफ्यामुळे सरीतून पाण्याचा निचरा झाला. पीक उभळले नाही.

SRT Technology
Paddy SRT Technology : आदिवासी भागात रुजतेय ‘एसआरटी’ तंत्रज्ञान

कपाशीनंतर झेंडू

बेडवर घेतलेल्या कपाशीचा फायदा लक्षात आला. मग मुख्य बेडला फारसा धक्का व लावता अति पावसामुळे थोडे खचलेले बेड पॉवर टिलरच्या माध्यमातून व्यवस्थित केले. कपाशीची मुळे, काड्यांचे अवशेष जमिनीत तसेच ठेऊन त्यावर तणनाशक फवारले. त्यानंतर मंशागत न करता मुख्य बेडवर झेंडूची लागवड केली. झेंडूचे पीक चांगले बहरून आले. पहिले दोन-तीन तोडे चांगले मिळाले. प्रति किलो ४० रूपये दरही मिळाला. पण कोरोनोचे संकट त्या काळात आल्यामुळे झेंडूतून ३० ते ४० हजारांपुढे उत्पन्न मिळाले नाही. झेंडूचेही मुळांसह सर्व अवशेष तसेच ठेवत त्यावर तणनाशक फवाकले. पुन्हा जूनमध्ये कपाशी लागवडीची तयारी केली.

विविध पिकांचे प्रयोग

एका पिकाच्या काढणीनंतर मशागत न करता त्याच बेडवर पुढील पीक या पद्धतीने खरिपातील कपाशीनंतर रब्बी किंवा ‘लेट रब्बी’त मका, बाजरी, गहू अशी पिके अतुल यांनी घेतली आहेत. पीक फेरपालट हे तंत्र मी अवलंबिले असल्याचे अतुल सांगतात. बीटी कपाशीचे पहिल्या वर्षी एकरी सुमारे १० क्विंटल उत्पादन मिळाले. त्यानंतर पुढील तीन वर्षे अनुक्रमे ८ क्विंटल, १२ व १५ क्विंटल, तर मक्याचे एकरी २५ क्विंटल, बाजरीचे एकरी १५ क्विंटलच्या पुढे व गव्हाचे १५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे. अलीकडील काळात कपाशील प्रति क्विंटल सात हजारांपासून ते दहा हजारांपर्यंत, गव्हाला २५०० ते तीन हजार, मक्याला दोन हजार असे दर मिळाले आहेत.

SRT Technology
SRT Technique : ‘एसआरटी कृषी रोबोट’ करणार तंत्रज्ञान प्रसार

‘एसआरटी’ खालील क्षेत्र वाढविले

मागील पाच वर्षांत एसआरटी पद्धतीने एकूण पाच पिके अतुल यांनी घेतली आहेत. यंदाच्या वर्षी कपाशीच्याच बेडवर मार्चमध्ये पाण्याची उपलब्धता असल्याने जोडओळ पद्धतीने उसाची चार बाय एक फूट अंतरावर लागवड केली आहे. सध्याच्या घडीला ऊस १४ ते १५ कांड्यावर पोहोचला आहे. एक एकरापासून सुरू केलेल्या एसआरटी तंत्राचा विस्तार आता पाच एकरांपर्यंत केला आहे. यंदा कपाशीची डिसेंबरमध्ये काढणी झाल्यानंतर पुन्हा ऊस लागवडीचे नियोजन आहे. अतुल यना टाकळी धरणाच्या पाण्याचा लाभ होतो.

तंत्रज्ञानाचे असे होताहेत फायदे

अतुल सांगतात, की एसआरटी, शून्य मशागत शेती पद्धतीचा स्वीकार केल्याने शेतीतील उत्पादन खर्च आणि मेहनत आणि वेळ यांत मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. दरवर्षी नांगरणी, रोटावेटर, आंतरमशागत, तीन खुरपण्या आदी कामांमध्ये दोन पिकांतून एकरी सुमारे १० हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत बचत झाली आहे. विशेष म्हणजे मजुरांची अनुपलब्धता हा प्रश्नही बहुतांशी मिटला आहे. रासायनिक खतांचा वापर पूर्वीप्रमाणेच आताही कायम आहे. परंतु शून्य मशागत तंत्र स्वीकारल्यापासून पिकांच्या अवशेषांचे खत सातत्याने जमिनीला मिळत असल्याने शेणखत वापरण्याची गरज भासलेली नाही. जमिनीचा पोत सुधारत असून ती भुसभुशीत झाली आहे. अति पाऊस झाला तरी पीक उभळत नाही. तसेच कमी पाऊस झाला तरी गरजेवेळी मातीतील ओलावा टिकून राहात आहे.

तंत्रज्ञानाचा होतोय प्रसार

आतापर्यंत जवळपास २१ जिल्ह्यांतील शेतकरी तसेच ‘एसआरटी’चे जनक चंद्रशेखर भडसावळे यांनीही अतुल यांच्या शेताला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे प्रयोग अभ्यासले आहेत. भात पीक वगळता खरीप, रब्बी पिकांमध्ये एसआरटी पद्धतीचा स्वीकार करणारा छत्रपती संभाजीनगर हा राज्यात बहुधा पहिलाच जिल्हा असावा. आपल्या जिल्ह्यातील अनेक शेतकरी या तंत्रज्ञानने शेती करीत असल्याचे अतुल यांनी सांगितले.

एखाद्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यानंतर त्यात सातत्य टिकून ठेवणे हा पाठ मोहिते पिता-पुत्रांकडून जरूर घेण्यासारखा आहे. केवळ एका पिकापुरते न थांबवात त्यांनी विविघ पिकांमध्ये प्रयोग करून या तंत्राचा विस्तार केला आहे. उत्पादन खर्चात बचत आणि उत्पादनात वाढ हे त्यांच्या यशाचे गमक आहे.
सुरेश बेडवाल, एसआरटी तंत्र समन्वयक, ‘पोकरा’ प्रकल्प (पहिला टप्पा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com