Soybean MSP  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean MSP : सोयाबीन विकले जातेय आधारभूत किमतीच्याही खाली

Soybean Production : पावसाअभावी उशिरा पेरणी, ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड, पिकावर पडलेला पिवळा मोझॅक अशी विविध संकटे झेलत सोयाबीनचे पीक कापणीला आले.

Team Agrowon

Akola News : पावसाअभावी उशिरा पेरणी, ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड, पिकावर पडलेला पिवळा मोझॅक अशी विविध संकटे झेलत सोयाबीनचे पीक कापणीला आले. बऱ्याच शेतकऱ्यांनी काढणी करून सोयाबीन बाजारात विक्रीलाही काढले. मात्र सर्वच बाजार समित्यांमध्ये ४६०० रुपये या आधारभूत किमतीइतकाही दर मिळेनासा झालेला आहे.

दुसरीकडे आवक वाढतच असून शेतकऱ्यांना सध्या क्विंटलमागे सरासरी पाचशे ते सातशे रुपयांची झळ सोसावी लागते आहे. दर वाढीच्या दृष्टीने दुसरीकडे कुठलेही प्रयत्न शासनस्तरावरून होताना दिसत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करू लागले आहेत.

सध्या सर्वत्र सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे. यंदा उत्पादनात मोठी घट झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघत नसल्याचे गंभीर वास्तव आहे. यावर्षी तब्बल एक महिना उशिराने खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. पाऊसही जेमतेम व लहरी स्वरूपाचा पडला. यावर्षी परतीच्या पावसाने हुलकावणी दिली. सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम अर्ध्यावर आलेला आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बहुतांश भागात एकरी तीन ते चार क्विंटलपर्यंत उतारा येत आहे. यंदा सोयाबीनचा एकरी खर्च १८ ते २० हजारांदरम्यान पोहोचलेला आहे. पाच क्विंटल उत्पादन झालेल्या शेतकऱ्याला खर्चाची बरोबरी करणेही शक्य राहलेले नाही. बाजारात येणारे सोयाबीन यंदा चांगल्या दर्जाचे आहे. आर्द्रतासुद्धा फारशी नाही, असे असतानाही दर मात्र कमालीचे गडगडले आहेत.

या भागातील सर्वच प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक चार ते पाच हजार क्विंटलपर्यंत पोचली आहे. सोयाबीनला किमान दर ३९०० व कमाल ४४०० रुपयांदरम्यान मिळतो आहे. बहुतांश माल हा ४००० ते ४२०० दरम्यानच विकत आहे. यावर्षात सोयाबीनचा हमीदर शासनाने ४६०० रुपये जाहीर केलेला आहे. दर कुठल्याच बाजारात मिळत नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसतो आहे.

यंदाच्या दुष्काळी वर्षात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आधारभूत किमतीपेक्षाही कमी दर मिळतो आहे. पैशांची गरज असल्याने आतापर्यंत हजारो क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांना कमी दराने विकावे लागले. शासनाने सोयाबीन खरेदीसाठी हमीभाव खरेदी केंद्रे उघडावेत. तसेच ज्यांनी आतापर्यंत कमी दरात सोयाबीन विकून झाले त्यांना भावांतर दिला जावा.
- अशोक अमानकर, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस पक्ष, अकोला
अस्मानी संकटामुळे शेतकरी नैराश्यग्रस्त झाले आहे. सोयाबीनचे बाजारभाव ३९०० रुपयांपर्यंत खाली आले असून सरकारी हमी भावापेक्षाही खूप कमी झाले आहेत. प्रति क्विंटल ७०० ते १००० रुपये कमी दराने सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सरकारने बाजारातील सोयाबीनचे भाव ६५०० रुपयांवर कसे जातील यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी आयात निर्यात धोरणावर फेरविचार करावा. पीकविम्याची हक्काची रक्कम तातडीने देण्यात यावी.
- राहुल बोंद्रे, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी , बुलडाणा
यंदा सोयाबीन पीक उत्पादनाचा क्विंटलमागे खर्च ३४०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यात आता बाजारभाव जर हमीभावापेक्षाही कमी मिळत असेल तर सहा महिने कष्ट करून शेतकऱ्याच्या हातात केवळ सहा सातशे रुपयेच राहत आहेत.
- रमेश निकस, शेतकरी, जानेफळ, जि. बुलडाणा
सन २०१२ मध्ये उत्पादन खर्च कमी असतानाही सोयाबीन ४३०० रुपये विकत होतो. आता सोयाबीनचा खर्च एकरी २० हजार ७०० रुपयांपर्यंत झालेला आहे. चार ते पाच पोते उत्पादन होत असले तर खर्च व नफ्याचा ताळमेळ कोणत्या गणितात बसू शकतो. शेतकऱ्याची स्वतःची मेहनत, तो राबलेल्या दिवसांचा हिशेब यात नाही. शासनाने हस्तक्षेप करीत सोयाबीन दरवाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.
-डॉ. गजानन गिऱ्हे, शेतकरी, देऊळगाव माळी, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT