Soybean Market : उत्पादन; बाजारभावात घट, मजुरीत मोठी वाढ

Soybean Productivity : दुष्काळस्थितीने सोयाबीन उत्पादकतेत झालेली मोठी घट, पीक काढणी मजुरीतील दणदणीत वाढ आणि घसरत्या बाजार भावाने शेतकऱ्यांना यंदा कात्रीत पकडले आहे.
Soybean Harvesting
Soybean Harvesting Agrowon
Published on
Updated on

Pune News : दुष्काळस्थितीने सोयाबीन उत्पादकतेत झालेली मोठी घट, पीक काढणी मजुरीतील दणदणीत वाढ आणि घसरत्या बाजार भावाने शेतकऱ्यांना यंदा कात्रीत पकडले आहे. सोयाबीन उत्पादकांचे चोहोबाजूंनी नुकसान होत असताना शासन हमीभाव खरेदीचे नाव घ्यायलाही तयार नाही, मोठे आर्थिक संकट ओढवले असल्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

खरीप हंगामात सोयाबीन हे राज्यातील मुख्य पीक आहे. यंदा ५० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत ती १०४ टक्के असली, तरी पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ती १२३ टक्क्यांपर्यंत होती. अशातच दुष्काळस्थितीमुळे सोयाबीन पीक पाण्याअभावी करपले, वाढ खुंटली, रोग-किडींचे आक्रमण आदी कारणांनी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यातील बहुतांश भागांत अवघे २० ते ५० टक्केच सोयाबीन शेतकऱ्यांच्या हाती लागल्याची शक्यता आहे. सध्या राज्यभर सोयाबीन काढणी सुरू आहे. एकीकडे अडचणीतील सोयाबीन उत्पादकास पीक निघण्याची शाश्‍वती नसतानाच काढणी मजुरीत मात्र २०० ते ५०० रुपये वाढ झाली आहे. तर दुसरीकडे उत्पादन खर्चात वाढ असतानाच सध्या नव्या सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली आणि आसपास आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेतही सुमारे ६०० ते १३०० रुपयांपर्यंत दर खाली आहेत.

Soybean Harvesting
Soybean Harvesting : सोयाबीनची कापणी सुरू; मळणीनेही पकडला वेग

बाजारात नवीन सोयाबीनची आवकही वाढू लागली आहे. मात्र, सप्टेंबरमध्ये ४ हजार ७०० रुपयांवर असलेले सोयाबीनचे दर या महिन्यात आवक वाढतेय तसे खाली येत आहेत. सध्या क्विंटलला सरासरी दर किमान ३५००, सर्वसाधारण ४२००, कमाल ४६०० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. सोयाबीनला ४६०० रुपये हमीभाव आहे. त्यापेक्षा १०० ते ११०० रुपये कमी दर मिळत आहे.

‘‘सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याचे कुठलेही आदेश अद्याप शासनाकडून मिळालेले नाहीत,’’ अशी माहिती ‘पणन’च्या सूत्रांनी दिली. ‘‘पणन कायद्याची अंमलबजावणी बाजार समित्यांकडून होत नाही. हमीभावाच्या खाली लिलाव होतात. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे,’’ असे यवतमाळ जिल्ह्यातील वागद इजारा (ता. महागाव) येथील सोयाबीन उत्पादक मनीष जाधव यांनी सांगितले.

Soybean Harvesting
Soybean Harvesting : सोयाबीन काढणीला वेग; उत्पादन घटीची चिन्हे

उत्पादन घटीमुळे होणारे नुकसान वेगळेच

यंदा खरिपात सोयाबीन पेरण्या उशिरा झाल्या. पीक वाढीच्या अवस्थेत असताना पावसाचे दीर्घ खंड पडले. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली. तुटपुंज्या पावसावर कसेबसे वाढलेल्या सोयाबीन पिकांवर ‘यलो मोझॅक’चा मोठा प्रादुर्भाव झाला. परिणामी, आता सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट येत आहे. परिणामी, कमी दर, मजुरीदरातील वाढ यामुळे नुकसान सोसणारे शेतकरी उत्पादन घटीमुळे आर्थिक गर्तेत आणखीच अडकले आहेत.

सोयाबीनची एकरी काढणी दर स्थिती (रुपये)

ठिकाण---मागील वर्षी---यंदा

परभणी, हिंगोली---३५०० ते ४०००---४००० ते ६०००

विदर्भ---२२०० ते २३००---२८०० ते ३२००

खानदेश---३५००---३८०० ते ४०००

सोलापूर---३८००---४०००

सोयाबीनची प्रतिक्विंटल दर (किमान-कमाल) स्थिती

ठिकाण---गेल्यावर्षी---यंदा

मराठवाडा ---५३०० ते ५६००---३९०० ते ४७००

विदर्भ---४९००---३८०० ते ४६००

खानदेश---५०००---४००० ते ४४००

सोलापूर---५००० ते ५५००---४१०० ते ४५००

पावसाच्या खंडामुळे माल फुलांवर असतानाच गळाला. उत्पादन कमी झालंय. मागच्या वर्षी काढणीला एका मजुराला रोज २५० रुपये रोजगार होता. यंदा तो ३५० रुपये झालाय. एकरी काढणीचा दर ३००० रुपयांवरून यंदाचा दर ४२०० रुपये झालाय. आता जे पदरात पडतयं ते घ्यायचं. यंदाच्या वर्षातील आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
- रमेश राऊत, मांडाखळी, जि. परभणी.
यंदा विदारक स्थिती आहे. आधी अतिवृष्टी, नंतर पावसाचा दीर्घ खंड, रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात मोठी घट आहे. एकरात सरासरी १२ क्विंटल सोयाबीन व्हायचे. यंदा ते ४ क्विंटल झाले आहे. यंदा उत्पादन खर्च एकरी १७ हजार ४०० रुपये आला. तर उत्पन्न एकरी १७ हजार २० रुपये मिळाले. सांगा शेतकऱ्यांनी कसे जगायचे?
- मनीष जाधव, वागद इजारा, ता. महागाव, जि. यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com