Seed linking  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Seed : कापूस बियाण्याच्या गोंधळात आता सोयाबीन लिंकिंगच्या तक्रारी

Seed Linking : पश्‍चिम विदर्भात खरिपात सोयाबीन व कपाशी ही दोन मुख्य पिके असून, यंदा या पिकांच्या बियाणे विक्रीत मोठा गोंधळ तयार झालेला आहे.

 गोपाल हागे

Akola News : पश्‍चिम विदर्भात खरिपात सोयाबीन व कपाशी ही दोन मुख्य पिके असून, यंदा या पिकांच्या बियाणे विक्रीत मोठा गोंधळ तयार झालेला आहे. कपाशीच्या विशिष्ट वाणासाठी अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून रांगा लागल्याचे राज्यभर गाजते आहे.

त्यातच आता सोयाबीनच्या एका नामांकित वाणासोबत शेतकऱ्यांना गरज नसलेले दुसरे वाण मस्तकी मारले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे केल्या आहेत. अकोल्यात तर ही सोयाबीन कंपनी काळ्या यादीत टाकावी अशी मागणीच जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेली आहे.

खरीप हंगाम तोंडावर आल्याने बियाणे विक्री हळूहळू वेग घेत आहे. शेतकऱ्यांनी आधी कपाशी बियाणे खरेदीसाठी गर्दी केली. मागणी असलेले वाण मिळत नसल्याने १६ मेपासून जिल्ह्यात दररोज रांगा लागत असल्याचे चित्र बनलेले आहे. त्यानंतर आता सोयाबीनच्या नामांकित वाणासाठी अशीच लूटमार होत आहे.

मध्य प्रदेशातील संबंधित कंपनीने नामांकित वाणासोबतच इतरही वाण वितरकांना पुरवलेले आहेत. वितरक हे वाण विक्रेत्यांना विक्रीसाठी देत आहेत. शेतकरी गरज असलेल्या वाणांची जेव्हा मागणी करतो तेव्हा त्याला एका वाणासोबत दुसरा वाण घेणार असाल तरच देऊ, अशी स्पष्ट अडवणुकीची भाषा वापरली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तशी निवेदनेही दिल्या जात आहेत.

शेगावात लिंकिंगची तक्रार

सोयाबीन बियाण्याच्या लिकिंगबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले, की शेतकऱ्यांनी रुची १००१ सोयाबीन वाणाची मागणी केली असता या वाणासोबत दुसरे वाण विकत घेण्याची सक्ती केली जात आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार न करता अनेक कृषिकेंद्र चालक व कंपन्यांचे दलाल निकृष्ट वाणाचा शेतकऱ्यांना खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.

शेतकऱ्यांना हवे असलेले वाण देण्यात यावे. लिंकिंगचा प्रकार बंद करून या बाबत चौकशी केली जावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा राजू पाटील शेळके, शशिकांत पुंडकर, संतोष खेरडे, निवृत्ती नांदोकार, पराग सोनोने, नंदू शर्मा, राजू शेळके, मनोहर बावसकार व इतरांनी शेगाव तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

संबंधित कंपनी काळ्या यादीत टाका

अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाणे लिंकिंग प्रकरणात संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी वाडेगाव (जि. अकोला) येथील शेतकरी तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे माजी सदस्य गणेश कंडारकर यांनी केली आहे. या बाबत त्यांनी सोमवारी (ता. २७) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले, की नामांकित सोयाबीन बियाणे कंपन्या शेतकऱ्यांची लूट करण्यास तयार झाल्या आहेत.

‘रुची’ कंपनीचे सोयाबीन बियाणे कृषी सेवा केंद्रावर घेण्यासाठी शेतकरी गेले असता ४२०० रुपयांची बॅग दिली जाते. मात्र या वाणासोबतच रुची २००१, रुची ५००१ व इतर सोयाबीनचे बियाणे खरेदी करावेच लागेल, असा आग्रह केल्या जात आहे.

अन्यथा, १००१ हे सोयाबीन बियाणे मिळणार नाही, असे कृषी सेवा केंद्राचे संचालक सांगत आहेत. ही एक प्रकारे शेतकऱ्यांची लूट आहे. खासगी कंपन्यांकडून होत असलेली लूट थांबविण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही कंडारकर यांनी केली आहे.

कंपनीकडून लिंकिंग नाही

संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीसोबत चर्चा केली असता, कंपनीने बियाणे पुरवठा करताना कुठलीही लिंकिंग केलेली नाही. वितरकांना कंपनीच्या नामांकित वाणांसोबत इतर दुसऱ्या वाणांचाही पुरवठा करण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांनी एक वाण घेताना दुसरे वाण घेतलेच पाहिजे, याची कुठेही सक्ती करण्याबाबत कंपनीची भूमिका नाही. कदाचित विक्रेता स्तरावरून हे प्रकार होत असावेत. त्यामुळे कृषी विभागाने कारवाई करावी, असे मत ‘रूची’ कंपनीच्या प्रतिनिधीने व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT