पुणे ः शेतकऱ्यांनी यंदा घरातील तसेच काही भागांमध्ये महागडे बियाणे विकत आणून राज्यात ४२ लाख हेक्टरवर सोयाबीनचा (Soybean Cultivation) पेरा केला आहे. मात्र, संततधार पावसामुळे सोयाबीन उत्पादक पट्ट्यात चिंतेचे काहूर उठले आहे.
भारतीय सोयाबीन संशोधक संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. बी. यू. दुपारे यांनी सांगितले की, ‘‘आमच्या संस्थेकडे महाराष्ट्रातील शेतकरी सतत संपर्क करून विविध समस्या सांगत आहेत. काही भागात अतिपावसामुळे अद्याप पेरा झालेलाच नाही. त्यामुळे अशा ठिकाणी आता शेतकऱ्यांना पर्यायी नफेशीर पिकाचा अवलंब करावा लागेल. कारण, जूनचा पहिला आठवडा ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सोयाबीनचा पेरा करणे उत्तम ठरते. त्यानंतर पेरा केल्यास हेक्टरी प्रतिदिवस किमान १० किलोने उत्पादन घटत जाते.’’
अतिपावसामुळे सोयाबीनची (Soybean Cultivation) पेरणी लांबणीवर पडली असल्यास शेतकऱ्यांनी घाबरू नये, असे सांगत डॉ. दुपारे यांनी पाच वर्षांपूर्वी आपत्कालीन स्थितीत शेतकऱ्यांनी अगदी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरा केला होता, असा दाखला दिला. ‘‘उशिरा पेरा करायचा असल्यास दोन ओळींमधील एरवीचे ४५ सेंटिमीटरचे अंतर कमी करून ३० सेंटिमीटरवर आणावे. तसेच, हेक्टरी बियाणे दर ६० ते ८० किलोऐवजी वाढवून ७५ ते १०० किलोपर्यंत न्यावा,’’ असा सल्ला डॉ. दुपारे यांनी दिला.
राज्यात अतिपावसामुळे सोयाबीनच्या पेरण्या (Soybean Cultivation) विस्कळित झाल्या असून पेरणी कालावधी मागेपुढे झालेला आहे. त्यामुळे यंदा कीड नियंत्रणावर (Pest Control) जास्त लक्ष द्यावे लागेल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
ठराविक कालावधीत पेरा न झाल्यामुळे पहिल्या टप्प्यातील पिकातील फवारणी केली तरी किडींना दुसऱ्या टप्प्यातील पिके मिळतात. त्यामुळे किडींचे जीवनचक्र खंडित होत नाही. यामुळे कीड नियंत्रणाच्याबाबत काळजी घ्यावी लागेल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
‘‘अतिपावसामुळे राज्यातील हजारो हेक्टरमधील सोयाबीनचा पेरा वाया जाण्याची शक्यता आहे. तसेच, पुढे पाऊस बंद होऊन अचानक ऊन पडले तरी पिकाला विविध समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी संकटाला सामोरे जाण्याची व आतापासूनच रब्बीच्या नियोजनावर भर देण्याची तयारी ठेवावी,’’ असेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
सोयाबीन पैदासकार डॉ. एस. के. धापके म्हणाले की, ‘‘सोयाबीन उत्पादक (Soybean Producer) यंदा विचित्र स्थिती सापडले आहेत. पहिल्या टप्प्यात पेरा झाला तेव्हा पावसाचा खंड पडल्याने अनेक भागात पीक वाया गेला. काही भागात दुबार पेरा झाला. तर काही गावांना संततधारेमुळे दुबार पेऱ्याची संधी मिळालीच नाही. आता सोयाबीन पेऱ्याची वेळ निघून गेलेली आहे.’’
सोयाबीनचा पेरा झाल्यानंतर ६-७ तासात पाऊस झाल्यास बियाण्याचे आवरण फाटते व अंकुरण होत नाही. मात्र, पाच दिवसात अंकुरण होऊन रोप जमिनीच्या वर आल्यानंतर कितीही पाऊस झाला तरी अडचण येत नाही. परंतु, शेतातील पाण्याचा निचरा होणे अत्यावश्यक आहे. ‘‘अतिपावसामुळे निचाऱ्या न झालेल्या शेतांमध्ये मुळकुज, खोडसडीच्या समस्या उद्भवतील. सध्या राज्यात कोणत्या भागात नेमक्या काय समस्या असू शकतात याविषयी अंदाज बांधणे कठीण आहे,’’ असे डॉ. धापके यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कृषी विभागाच्या अहवालानुसार, राज्यात आतापर्यंत १०० टक्क्यांहून अधिक म्हणजे ४२ लाख हेक्टरच्या पुढे सोयाबीनचा पेरा झाला आहे. अतिपावसामुळे उगवणीला अडचणी येत असून विविध जिल्ह्यांमध्ये पिकाची हानी होत असल्याचे अहवाल येत आहेत. ‘‘सोयाबीनची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचा निष्कर्ष आताच काढता येणार नाही. अनेक भागात पिकासाठी पोषक ठरतो आहे. मात्र, अजून आठवडाभर सतत पाऊस सुरू राहिल्यास सोयाबीन पिकासमोरील समस्या वाढू शकतात,’’ असे मत कृषी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.
नुकसान साडेतीन लाख हेक्टरच्या पुढे
राज्यातील अतिपावसामुळे खरीप पिकांचे (Kharip Crops) नुकसान आता साडेतीन लाख हेक्टरच्या पुढे गेले आहे. यात सोयाबीन पिकाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. कापूस, तूर, मुग, उडीद, भाजीपाला व फळपिकांचेही नुकसान होत आहे. पावसाने उघडीप न घेतल्यास पुढील आठवड्यापर्यंत खरीप पिकाच्या हानीचा आकडा १० लाख हेक्टरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.