Parbhani News : परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक कापणी प्रयोग सुरु आहेत. रविवारी (ता. १५) दैठणा मंडलातील इंदेवाडी (ता. परभणी) येथे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत सोयाबीन पीक कापणी प्रयोग घेण्यात आला. या ठिकाणच्या पीक कापणी प्रयोगाअंती सोयाबीनची उत्पादकता प्रतिहेक्टरी २.८ क्विटंल आल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
खरीप हंगामातील विविध पिकांची उत्पादकता काढण्यासाठी कृषी, महसूल, ग्रामविकास विभागातर्फे जिल्ह्यात अडीच हजारांवर पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात सोयाबीनचे ६१२ पीक कापणी प्रयोगाचे नियोजन आहे.
पंतप्रधान पीकविमा योजनेतील उत्पादनातील घट या जोखीमबाबी अंतर्गंत शेतकऱ्यांना पीकविमा परतावा देण्यासाठी पीक कापणी प्रयोगाव्दारे आढळून आलेली उत्पादकता गृहित धरली जाते.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
उंबरठा उत्पादनापेक्षा चालू वर्षीचे उत्पादन कमी आल्यास शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई दिली जाते. दैठणा मंडलातील सोयाबीनची गेल्या ७ वर्षातील सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ११.०६ क्विंटल आहे.
यंदाच्या जुलै ऑगस्ट मधील सलग २१ दिवसाच्या पावसाच्या खंडामुळे मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती या जोखीम बाबी अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणानुसार या मंडळातील सोयाबीनच्या उत्पादकतेत ५० टक्केहून अधिक घट येऊन प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता ३.७६ क्विंटल येईल असा अंदाज काढण्यात आला.
दैठणा महसूल मंडलातील असमाधानकारक पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात होणाऱ्या घटीचे प्रमाण निश्चित करण्यासाठी उद्धव बाबूराव चंदेल यांच्या शेतावर रविवारी (ता. १५) सोयाबीनचा पीक कापणी प्रयोग घेण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत सोयाबीनची कापणी, मळणी करुन वजनमाप केल्यानंतर सोयाबीची उत्पादकता प्रतिहेक्टरी २.८ क्विंटल आल्याचे स्पष्ट झाले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवी हरणे, तहसीलदार संदीप राजापुरे, तंत्रअधिकारी ( सांख्यिकी ) महादेव लोंढे, तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे, मंडळ कृषी अधिकारी कैलास गायकवाड, पिक विमा कंपनीचे तिनिधी संतोष बेंद्रे, सरपंच मोहन कच्छवे, उपसरपंच संदीप चंदेल, कृषी साहाय्यक व्हि. पी. हातोले, रोशन करेवार, हनुमान कच्छवे, भोसले शेतकरी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.