Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील जालना, बीड व छत्रपती संभाजी नगर या तीनही जिल्ह्यांत झालेल्या दमदार पावसामुळे खरिपाच्या पेरणीचे गती वाढली आहे. वापसा मिळाला की कपाशी सह इतर पिकाची पेरणी करण्यावर शेतकऱ्यांचा जोर दिसत असून बियाणे खते खरेदीसाठीही कृषी सेवा केंद्रांवर गर्दी वाढली आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत जवळपास २१ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामध्ये छत्रपती व संभाजीनगरमधील ६ लाख ८० हजार हेक्टरसह जालन्यातील ६ लाख ६७ हजार हेक्टर व बीडमधील ७ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
अलीकडच्या काही दिवसात झालेल्या दमदार व जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला गती दिली आहे. कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार जालना जिल्ह्यात मंगळवारपर्यंत जवळपास ७० हजार ९९ हेक्टरवर खरिपाची पेरणी उरकली होती. त्यामध्ये ६७,१८९ हेक्टरवर लागवड झालेल्या कपाशीसह १५०० हेक्टरवर पेरणी झालेल्या सोयाबीन, ६२३ हेक्टरवर पेरणी झालेल्या तूर व ३९७ हेक्टरवर पेरणी झालेल्या मूग पीक पेरणीचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदाच्या खरिपासाठी जवळपास ६ लाख ८० हजार हेक्टरक्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. या प्रस्तावित करण्यात आलेल्या क्षेत्रापैकी जवळपास १ लाख ३० हजार हेक्टरवर मका, उडीद, सोयाबीन पेरणी व कपाशी तसेच तूर पिकाची लागवड झाली. साधारणता ३०००० हेक्टरवर कपाशी, १० हजार हेक्टरवर तूर, ४५०० ते ५००० हेक्टरवर सोयाबीनची तर उर्वरित ६० ते ७० हजार हेक्टरवर मका इतर क्षेत्रावर बाजरी पिकाची पेरणी झाली.
सिल्लोड, सोयगाव, खुलताबाद, फुलंब्री आदी तालुक्यांत शेतकऱ्यांनी धूळपेरणीला तसेच अंदाज घेऊन कपाशी लागवडीला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. बीड जिल्ह्यात ७ लाख ६० हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित आहे. त्यापैकी ३० हजार ५०० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती.
यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला प्राधान्य दिल्याचे लक्षात घेता मोठ्या प्रमाणात नाही. परंतु पाच ते दहा टक्के कपाशीचे क्षेत्र घटून ते सोयाबीन तूर मका या पिकाने व्यापले जाईल, असे दिसते.प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात सोयाबीन हे महत्त्वाचे पीक असून उत्पादन वाढीसाठी बीबीएफ, पट्टा पद्धत, जोड ओळ पद्धतीने लागवड करण्यासाठी मोहीम घेतोय. बीजप्रक्रिया मोहीम घरचे बियाणे पेरण्यापूर्वी उगवण क्षमता तपासूनच पेरणीबाबत मोहीम राबविली आहे.गहिनीनाथ कापसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.