Pomegranate Update : महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवर असलेले सोलापूर हे ठिकाण म्हणजे दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाची बाजारपेठ समजली जाते. डाळिंब ही सोलापूर जिल्ह्याची मुख्य ओळख आहे. प्रामुख्याने सांगोला, मंगळवेढा, माढा, माळशिरस या तालुक्यांत त्याची लागवड सर्वाधिक आहे.
अन्य तालुक्यांतही कमी-अधिक फरकाने बागा दिसतातच. देशभरात सुमारे दोन लाख ६६ हजार हेक्टरवर डाळिंबाचे क्षेत्र आहे. त्यापैकी दीड लाख हेक्टर लागवड एकट्या महाराष्ट्रात असून, त्यात सोलापूर जिल्हा आघाडीवर आहे. सोलापूर जिल्ह्यात ही लागवड एक लाख हेक्टरवर असावी.
डाळिंबासाठी आवश्यक असलेले एकूणच पोषक वातावरण हे या मागचे मुख्य कारण आहे. अलीकडे किडी-रोगांच्या सततच्या समस्यांमुळे क्षेत्रवाढीवर काहीसा परिणाम झाला असला तरी उत्पादन, उत्पादकता आणि गुणवत्ता यात जिल्ह्याची आघाडी आहे.
आवक- मागणी यांतील तफावत
डाळिंबासाठी सोलापूर बाजार समिती प्रसिद्ध व शेतकऱ्यांसाठी हक्काची मानली जाते. एरवी दररोज दीड ते दोन टनांपासून ते अगदी १५ ते २० टनांपर्यंत किंवा त्या त्या हंगामानुसार ती कमी-अधिक राहते. मृग आणि हस्त बहरातील डाळिंबाला सर्वाधिक मार्केट मिळते.
या कालावधीत दराचे सगळे गणित आवकेवर अवलंबून असते. यंदाच्या वर्षी गेल्या काही महिन्यांत सततचा पाऊस आणि किडी-रोगांच्या समस्येमुळे डाळिंब उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे आवक कमी राहिली.
मागणी आणि आवक यातील तफावत वाढत राहिल्याने पाच-सहा महिन्यांपासून दर वधारलेले राहिले आहेत.
शेतकऱ्यांसाठी हक्काची बाजारपेठ
सोलापूर बाजार समितीत डाळिंबाचे १५ ते २० अडते आणि तेवढेच खरेदीदार आहेत. खुले लिलाव आणि रोख पट्टी ही या बाजाराची वैशिष्ट्ये आहेत. वजनातून कोणती तूट येत नाही असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे सोलापूरसह शेजारील धाराशिव, लातूर, बीड, सांगली, पुणे आणि सातारा भागांतील शेतकरीदेखील येथील बाजारात डाळिंब विक्रीस आणतात.
सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, माढा, माळशिरस, जत, आटपाडी, इंदापूर, दौंड, बारामती येथून आवक अधिक असते. काही बागायतदार मृग, हस्त आणि आंबिया असे तीनही बहर घेत असल्याने वर्षभर आवक सुरू असते. डाळिंबात गणेश व भगवा हे दोन वाण उपलब्ध आहेत.
मात्र रंग, आकार, वजन, चव आणि टिकवणक्षमता यात भगवा वाण सरस असल्याने सर्वाधिक उत्पादन त्याचेच घेतले जाते. जाणकारांच्या मते देशातील एकूण डाळिंब उत्पादनात ८० ते ९० टक्के वाटा याच वाणाचा असावा.
नव्या वाणांचे मार्केट
डाळिंबात खोडकीड, तेलकट डाग आणि मर रोग यांसारख्या समस्यांची सातत्याने वाढत आहे. त्यामुळेच सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने काही वर्षांपूर्वी भगव्या वाणाला पर्याय म्हणून सोलापूर लाल आणि सोलापूर अनारदाना हे दोन वाण संशोधित केले.
सोलापूर लाल हा थेट विक्रीसाठी, तर दुसरा वाण खास अनारदान्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. मात्र त्यांच्या लागवडी अद्याप म्हणाव्या तशा वाढलेल्या नाहीत. यात यश मिळाल्यास या वाणांसाठीही खास ‘मार्केट’ विकसित होऊ शकते.
तमिळनाडू, ओडिशाचे व्यापारी सोलापुरात
येथील बाजार समितीत रोजच्या रोज खरेदी आणि विक्री होते. ओरिसाडिशा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागांतून खरेदीदार खास सोलापुरात येतात. अनेक व्यापारी हंगामातील ठरावीक महिने इथे ठिय्या मारून असतात. परराज्यांतील अनेक खरेदीदार डाळिंब थेट घेऊन जाण्याऐवजी इथेच प्रतवारी आणि पॅकिंग करून संबंधित ग्राहकांसोबत इथूनच व्यवहार पक्के करतात.
सहा महिन्यांतील डाळिंब आवक (प्रति क्विंटल) व दर
महिना-- आवक-- -किमान- -सरासरी---कमाल
एप्रिल--९४५७---- ७००--- ४,५००-- १५,०००
मार्च---६०७३---१०००- ५,००० २०,०००
फेब्रुवारी २०३९-- १०००---५,००००- १८,०००
जानेवारी २३२८--१०००----५,०००- २०,०००
डिसेंबर-६५०६---५००- --४०००--- २०,०००
नोव्हेंबर-१२९९--५००--- ५०००- २०,०००
संपर्क - सोलापूर बाजार समिती, ०२१७-२३७४६७८
आवक कमी असल्याने पाच-सहा महिन्यांपासून डाळिंबाचे दर किरकोळ चढ-उतार वगळता टिकून आहेत. गुणवत्तेनुसार दर मिळतात. अत्यंत चांगली गुणवत्ता आल्यास, सध्यापेक्षाही चांगला दर मिळू शकतो.फैज बागवान, अध्यक्ष, फ्रूट मर्चंट असोसिएशन, बाजार समिती आवार, सोलापूर
दोन वर्षांपासून सोलापूर बाजार समितीत डाळिंबाची विक्री करतो. इथे खुले लिलाव आणि योग्य वजन आणि पैसेही वेळेवर मिळतात हा अनुभव आहे. माझी दीड एकर बाग आहे. मार्चमध्ये ‘हार्वेस्टिंग’ झाले आहे. एकूण दहा टन उत्पादन मिळाले. किलोला सरासरी १०० रुपये आणि कमाल १५० रुपये दर मिळाला.विष्णू मारुती मुळे, खंडाळी, ता. मोहोळ
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.