धनंजय सानप
Chana Crop : यंदा दुष्काळ पडल्यामुळे जमिनीतील ओलावा कमी आहे. त्यातच नोव्हेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. अशा स्थितीत हरभरा पिकाची लागवड कधी करावी, कोणते वाण निवडावेत, या पिकाचे व्यवस्थापन कसे करावे, एकूणच रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी काय निर्णय घ्यावेत या विषयावर राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कडधान्य पैदासकार डॉ. राजाराम देशमुख यांच्याशी केलेली ही खास बातचीत.
नोव्हेंबरमध्ये थंडी कमी राहील, असा हवामान शास्त्र विभागाचा अंदाज आहे. हरभरा पेरणीसाठी शेतकरी थंडीची वाट पाहत आहेत. त्यांनी पेरणी करावी की थांबावं?
- हरभरा पिकासाठी थंडी महत्त्वाची आहे. परंतु त्याहीपेक्षा जमिनीतील ओलावा अधिक महत्त्वाचा आहे. चांगला ओलावा आणि चांगली थंडी असेल तर हरभरा पिकांचं विक्रम उत्पादन मिळतं. मराठवाड्यात हरभरा पीक ५० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर घेतलं जातं. त्याखालोखाल विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. परंतु यंदा मराठवाड्यात पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे. परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. सध्या जमिनीत ओलावा कमी आहे. २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर हा कालावधी हरभरा पेरणीसाठी उत्तम असतो. राज्यात २० नोव्हेंबरनंतरच थंडी पडत असल्याने पिकाची वाढ चांगली होते. परंतु यंदा पाऊस नसल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थंडीची वाट न पाहता हरभरा पेरणी करून घ्यावी. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध असेल त्यांनी पाणी देऊन हरभरा पेरणी करावी. केवळ एका भिजवणीसाठी पाणी उपलब्ध असेल, तर अशा शेतकऱ्यांनी तातडीने पाणी देऊ नये. पाणी राखून ठेवावं.
यंदा दुष्काळचं सावट आहे. मग अशा स्थितीत हरभऱ्याचं कोणतं वाण निवडावं?
- यंदा राज्यात दुष्काळाची स्थिती आहेच. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी विजय या वाणाला पहिलं प्राधान्य द्यायला हवं. ते पाण्याचा ताण सहन करणारं वाण आहे. तसेच तापमानातील चढ-उतार सहन करण्याची क्षमता या वाणात आहे. या वाणाचं वैशिष्ट्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये पेरणी केली तरीही चांगलं उत्पादन मिळते. योग्य वेळी पेरणी केली तर हे वाण खूपच जास्त उत्पादन देते. आणि डिसेंबरपर्यंत पेरणी केली तरीही चांगलं उत्पादन मिळतं. त्यामुळे यंदाच्या हवामानाचा विचार करता विजय हे वाण फायदेशीर ठरेल. थोडीशी उशिरा पेरणी करायची असेल आणि पाण्याची सोय असेल तर दिग्विजय वाण चांगलं आहे. तसेच पाण्याची उपलब्धता असेल तर मराठवाड्यासाठी आकाश, विदर्भासाठी जॅकी वाण चांगले आहेत. पण जिथे पाण्याची सोय नाही तिथे विजय वाणाचीच निवड करावी. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून विजय, विशाल, दिग्विजय, विक्रांत, विक्रम आदी वाण प्रसारित करण्यात आले आहेत. तसेच परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाकडून आकाश, बीडीएनजी ७९७, बीडएनजी ७९८ (काबुली) वाण प्रसारित करण्यात आले आहे. तसेच अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून जॅकी, कनक, कांचन इत्यादी वाण प्रसारित केले आहेत.
विजय वाणाची वैशिष्ट्ये काय आहेत?
- विजयचं पाहिलं वैशिष्ट्ये म्हणजे हा वाण जमिनीवर पसरतो. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो. पानाचा आकार लहान आहे. त्यामुळे पानामधून पाण्याचा होणारा अपव्यय कमी होतो. दाण्याचा आकार लहान आहे. त्यामुळे विजय वाण तापमानातील चढ-उताराला सहनशील आहे. विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर हेक्टरी ४५ क्विंटल उत्पादनाचे प्रयोग करण्यात आले आहेत. तसेच पेरणी केल्यानंतर दोन ते तीन पाणी देण्याची सोय असेल, तर चांगलं उत्पादन मिळू शकतं. विजय वाण १०० ते १०५ दिवसांत काढणीस येतो.
जमिनीत ओल नाही. त्यामुळे शेतकरी शेत भिजवून हरभरा पेरणी करत आहेत. अशा शेतकऱ्यांना पेरणी कालावधी निघून जाईल याची भीती आहे. पेरणीचा कालावधी संपला आहे का?
- नाही. २० ऑक्टोबरच्या आधी पेरणी केली तर उत्पादनात घट येते. कारण पिकाला ऑक्टोबर हीट सहन करावी लागते. त्याचा हरभरा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. त्यातून घाटे कमी लागतात. थोडी उशिरा म्हणजे २५ नोव्हेंबरपर्यंत पेरणी केली, तर उत्पादनात फारशी घट येत नाही. पण पेरणी जर डिसेंबरमध्ये केली तर उत्पादनात घट येते. कारण घाटे भरण्याच्या वेळी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात तापमानात वाढ होते. त्यामुळे दाण्याचा आकार लहान राहतो. पिकांची पानं पिवळी पडतात. त्यामुळे २५ नोव्हेंबरपर्यंत पेरणी केली तरी हरकत नाही. परंतु जमिनीतील ओलावा लक्षात घेऊनच पेरणी करा. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे, त्यांनी शेतजमीन ओलवून पेरणी केली तर उत्तम. कोरड्यात पेरणी केली तर जमिनीत कडकपणा येतो. त्याचा उगवणीवर परिणाम होतो.
हरभरा पिकावरील कीड-रोगांचा प्रादुर्भाव कसा टाळता येईल?
- विजय, विशाल, विराट (काबुली), राजस, विक्रांत, दिग्विजय, विक्रम हे सर्व वाण मर रोगाला प्रतिकारक्षम आहेत. या वाणांवर मर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. पण प्रतिकारक्षम वाण नसेल तर पेरणीपूर्वी १ किलो बियाण्याला ५ ग्रॅम ट्रायकोड्रमा लावावे किंवा कॅप्टन किंवा थाईरम २.५ ग्रॅम या प्रमाणात पेरणी पूर्वी बियाण्याला लावावे. अधिक उत्पादन मिळण्यासाठी रायझोबियम आणि पीएसबी या जिवाणू खतांचा वापर करावा. त्यामुळे हरभरा पिकांच्या मुळावरील ग्रंथी वाढतात. रायझोबियम हवेतील नत्र शोषून घेतो. त्यामुळे रासायनिक खतांवरील खर्चात बचत होते. पीएसबीमुळे जमिनीतील उपलब्ध स्फुरद विरघळतो आणि त्याचा फायदा पिकांना होतो. पेरणीपूर्वी हलक्या हाताने रायझोबियम आणि पीएसबीची बीजप्रक्रिया करून घेणे फायदेशीर आहे.
पाणी कमी असल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा ओढा रब्बी ज्वारीकडे आहे. त्याबद्दल काय सांगाल?
- रब्बी ज्वारी पिकाचा पेरणी कालावधी उलटून गेला आहे. आता पेरणी केली तर उत्पादनात घट येते. पण दुष्काळाचं वर्ष असल्यामुळे चाराटंचाई राहील, त्यामुळे ज्वारीच्या कडब्याला विशेष मागणी राहील. ज्या शेतकऱ्यांना फक्त कडब्यासाठी रब्बी ज्वारीची लागवड करायची असेल ते पेरणी करू शकतात. साधारण १५ ते २० नोव्हेंबरपर्यंत रब्बी कडब्यासाठी ज्वारीची पेरणी शेतकऱ्यांनी करावी.
अलीकडे राजम्याची लागवड वाढत आहे. राजमा पीक हरभऱ्यापेक्षा अधिक फायद्याचं आहे का?
- मागील दोन-तीन वर्षांपासून मराठवाड्यात राजमा पिकाची शेतकरी लागवड करत आहेत. हरभऱ्यापेक्षा कमी कालावधीत म्हणजेच ६० ते ६५ दिवसांत राजमा काढणीसाठी परिपक्व होतो. तसेच उत्पादन चांगलं मिळतं. राजमा पीक उत्तर भारतात घेतलं जातं. कारण राजमा पिकाच्या वाढीसाठी थंडी आवश्यकता असते. परंतु अलीकडे महाराष्ट्रात राजमा पिकाचे प्रयोग शेतकरी करू लागले आहेत. यंदाच्या वर्षाचा विचार करता ज्या शेतकऱ्यांकडे पाणी कमी आहे त्यांच्यासाठी राजमा चांगला पर्याय ठरू शकतो. राजमा पिकांची पेरणी नोव्हेंबर अखेरपर्यंत केली तरी चांगलं उत्पादन मिळतं.
यंदा दुष्काळाची स्थिती पाहता शेतकऱ्यांनी गव्हाचं पीक घ्यावं का?
- गहू पीक शेतकऱ्यांना परवडत नाही. परंतु खाण्यासाठी गहू लागतो म्हणून शेतकरी पेरतात. माझं मत असं आहे की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आता गहू पेरणीला पसंती देऊ नये. शेतकऱ्यांनी खाण्यापुरता गहू विकत घ्यावा. त्याची लागवड मात्र टाळावी. कारण राज्यातील शेतकऱ्यांची हेक्टरी उत्पादकता १२ ते १४ क्विंटलच्या दरम्यान आहे. त्याच तुलनेत उत्तर भारतातील गहू उत्पादकता ४० क्विंटलच्या दरम्यान आहे. कारण उत्तर भारतातील हवामान गहू पिकासाठी अनुकूल आहे. महाराष्ट्रातील हवामान या पिकासाठी प्रतिकूल आहे. गहू पेरणीपासून काढणीपर्यंत किमान सहा ते सात वेळा पाणी द्यावं लागतं. ११० ते १२० दिवस कालावधी लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी गहू पिकावर अवलंबून राहू नये. त्यापेक्षा ज्वारी, बाजरी या पिकांचा विचार करावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.