Chana Crop Management : हरभरा पिकाचे करा समस्यांनुसार योग्य व्यवस्थापन

Rabi Season : हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वपूर्ण दाळवर्गीय पीक आहे. हे पीक कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही पद्धतीने घेतले जात असल्यामुळे भारतात या पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे.
Chana Crop
Chana Crop Agrowon
Published on
Updated on

जितेंद्र दुर्गे

Chana Crop Information : हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वपूर्ण दाळवर्गीय पीक आहे. हे पीक कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही पद्धतीने घेतले जात असल्यामुळे भारतात या पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे.

या पिकाच्या अडचणींवर आधारित योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास नुकसानीची पातळी किमान राखता येते. उत्पादनात अपेक्षित वाढ मिळते. कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही पद्धतीने घेतल्या हरभरा पिकातील मुख्य समस्या व अडचणी पुढील प्रमाणे आहेत.

या अडचणींचा विचार पेरणीपूर्वीपासून करून त्यावरील उपाययोजना वेळीच अवलंबल्यास भविष्यातील नुकसान कमी होते.

१) कमी उगवण :
कोरडवाहू अथवा बागायती लागवडीमध्ये हरभऱ्याची उगवण कमी होते. परिणामी, झाडांची संख्या कमी राहिल्यामुळे मोठे नुकसान संभवते. कोरडवाहू परिस्थितीत ट्रॅक्टरद्वारे पेरणी करताना बियाणे कमी जास्त खोलीवर पेरले जाते.

बियाणे उथळ पडल्यास वरच्या थरातील कमी ओलीमुळे अंकुरणात अडचणी येतात. अर्धवट अंकुरण प्रक्रिया होऊन कमी उगवणीचा धोका संभवते. त्यामुळे पेरणीची खोली योग्य म्हणजेच ६ ते ८ सें.मी. राखावी.


ओलिताची व्यवस्था असल्यास, स्प्रिंकलरच्या साह्याने संपूर्ण शेत ओलावून घ्यावे. योग्य प्रकारे वाफसा आल्यानंतर ट्रॅक्टरद्वारे अथवा बैलजोडी चलित पेरणीयंत्राने पेरणी करावी. बहुतांश वेळा शेत तयार केल्यानंतर शेतकरी कोरड्यात हरभऱ्याची पेरणी करतात. नंतर स्प्रिंकलरच्या माध्यमातून ओलित करतात.

अशा वेळी कमी अथवा जास्त पाणी दिले गेल्यास दोन्ही परिस्थितीत बियाण्याला बुरशी चढते व कमी उगवणीचा धोका संभवतो. त्यामुळे योग्य व एकसमान उगवणीसाठी आधी ओलित द्यावे. योग्य प्रकारे वाफसा येऊ द्यावा.

त्यानंतरच हरभऱ्याची पेरणी करावी. पिकाची पूर्ण उगवण झाल्यानंतर, पीक रोपटे अवस्थेच्या सुरुवातीच्या अवस्थेत असताना हलके ओलित द्यावे. म्हणजेच तुषार सिंचन संचाद्वारे पाणी देण्याचा कालावधी दोन ते तीन तासांपेक्षा जास्त असू नये. याद्वारे जमिनीतील राहिलेले बियाणेसुद्धा उगवून येईल. पिकाला रोपटे अवस्थेच्या सुरुवातीला पाण्याचा ताण बसणार नाही, याची काळजी घ्यावी.

Chana Crop
Sugarcane Management : उसाचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे...

२) उगवणीच्या वेळी होणारी कतरण :
हरभऱ्याचे पीक उगवणीच्या अवस्थेत असताना उडद्या कीड/ भुईकिडा/ काळी म्हैस यांचा प्रादुर्भाव होतो. याला शेतकरी ‘कतरण’ म्हणून संबोधतात. कोरडवाहू हरभरा पिकाचे मोठे नुकसान दरवर्षी होताना आढळते. याकरिता ज्या शेतामध्ये कतरणची समस्या दर हंगामात आढळत असलेल्या शेतांमध्ये पुढील उपाययोजना कराव्यात.

-ओलिताची सोय असल्यास आधी ओलित करावे. त्यानंतर वाफसा आल्यावर हरभऱ्याची पेरणी करावी. आधी केलेल्या ओलितामुळे मातीच्या ढेकळाआड लपलेले कीडे ओल्या थराखाली गाडले जातात. त्यांचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी राहण्यास मदत होते.

-पेरणी करताना अथवा शेतात रोटाव्हेटर करण्यापूर्वी दाणेदार क्लोरपायरीफॉस अथवा कारटॅप हायड्रोक्लोराइड ४ ते ५ किलो प्रति एकर यापैकी एकाचा उपलब्धतेनुसार वापर करावा.

Chana Crop
Chana Pest Management : घाटे अळी हरभरा पिकासाठी किती नुकसानकारक? या अळीचे व्यवस्थापन कसे कराल?

-हरभरा पिकाची पेरणी झाल्यानंतर उगवणीपूर्वी साधारणत: २ ते ३ दिवस आधी अथवा पीक रोपटे अवस्थेत असतानाची सुरुवातीची अवस्था या काळात नॅपसॅक पंपाने क्लोरपायरिफॉस अथवा क्विनॉलफॉस २० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे द्रावणाची नोझलला प्लॅस्टिकचे हूड लावून जमिनीलगत दाट फवारणी करावी. याद्वारे उगवणीच्या अवस्थेत कोवळ्या कोंबाची कतरण करणाऱ्या किडींचा बंदोबस्त शक्य होऊन संभाव्य नुकसान टाळता येते.

Chana Crop
Ginger Crop Management : आले पिकाचे कमी खर्चात व्यवस्थापन गरजेचे

३) मूळसडमुळे रोपावस्थेतील झाडे सुकणे :
हरभऱ्याचे पीक रोपावस्थेत (साधारणत: १२ ते १५ पानांच्या अवस्थेत) असताना (म्हणजेच १७ ते २२ दिवसांचे पीक असताना हरभऱ्याची झाडे सुकू लागतात. अशी रोपे उपटून पाहिल्यानंतर मुळे कुजलेली आढळतात. मुळांवर जमिनीलगत पांढरी बुरशी वाढलेली दिसते, रोपे वाळतात, सुकतात व जागच्या जागी जिरून नष्ट होतात.

यालाच ‘मूळसड’ असे संबोधले जाते. रोपटे अवस्थेतील झाडे सुकल्यामुळे, हरभरा पिकाचे मोठे नुकसान होताना प्रत्येक हंगामात
आढळते. ज्या शेतात मूळसडची समस्या उद्‍भवत असेल, तिथे पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.

- पेरणीपूर्वी साधारणत: अर्धा ते एक तास आधी ट्रायकोडर्मा ५ ते १० मि.लि. प्रति किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी. किंवा कार्बेन्डाझिम १ ते २ ग्रॅम प्रति किलो बियाणे या रासायनिक बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.

- खोल नांगरट करून जमीन तयार केल्यानंतर स्प्रिंकलरच्या साह्याने ओलित करणे.

-जमीन वाफसा स्थितीत आल्यानंतर पेरणी करणे.

-पीक रोपावस्थेत असताना सुरुवातीच्या काळात हलके ओलित द्यावे. अशा प्रकारे क्रमवार नियोजन करावे.

-अनेक शेतकरी पेरणीची घाई करण्याच्या नादामध्ये जमिनीच्या खोल नांगरट करण्याकडे दुर्लक्ष करतात. विशेषतः शेतात रोटाव्हेटर अथवा तत्सम वरवर मशागत करून लगेच पेरणी करतात. परिणामी, हरभरा पिकात मूळसडचा प्रादुर्भाव दरवर्षी वाढताना दिसत आहे.

- कतरण किडींसाठी क्लोरपायरिफॉसची फवारणी करत असताना त्यासोबतच कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम अथवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम अथवा मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर करावा.

४) हरभरा मोसोंडणे :-
पाणथळ अथवा पानबसन जमिनीत हरभरा पिकाची लागवड, ओलिताचे चुकीचे व्यवस्थापन, बागायती हरभरा पिकात युरियाचा अवाजवी वापर, यामुळे हरभरा पिकाची अवास्तव वाढ होते. परिणामी, उत्पादनात घट संभवते. याकरिता पुढील बाबींवर लक्ष द्यावे.

- ओलिताचे व्यवस्थापन करताना पेरणीपूर्वीचे ओलित व त्यानंतर वाढीची अवस्था आटोपल्यानंतर वाणनिहाय कळी अवस्थेच्या सुरुवातीला ओलित द्यावे. या वेळी स्प्रिंकलरचा वापर करताना जमिनीच्या प्रकारानुसार ओलिताचे प्रमाण व तुषार सिंचनाचा कालावधी ठरवावा. अन्यथा, बुरशीजन्य मुळसड रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.

यानंतर गरज भासल्यास वाणनिहाय घाट्यांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेला ओलित द्यावे. या वेळी सुद्धा जमिनीतील ओलिताच्या स्थितीनुसार निर्णय घ्यावा. जमिनीला भेगा पडताना आढळल्यास त्यानुसार ओलिताचा निर्णय घ्यावा लागेल.

हरभरा पिकात निंदणीच्या वेळी महिला मजूर घरच्या भाजीसाठी झाडांची शेंडे खुडत असल्यास खुडू द्यावेत. किंवा पेरणीपासून साधारणत: २७ ते ३२ दिवसांनी छोट्या शेंडे छाटणी यंत्राद्वारे पिकाचे शेंडे छाटून घ्यावेत. यामुळे पिकाची अवास्तव उंची वाढणे टाळता येते.

५) घाटे अळीचा प्रादुर्भाव :
हरभरा पिकावर घाटे अळीच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान होते. प्रादुर्भाव झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा सुरुवातीपासूनच घाटे अळी ( शास्त्रीय नाव - हेलिओवर्पा आर्मिजेरा) पासून हरभरा पिकाचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करावेत. घाटे अळीचा पतंग शेतात अंडी घालणार नाही, यासाठी पुढील पैकी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात.

- हरभऱ्याचे पीक कळी अवस्थेत येण्यापूर्वी पिकाच्या उंचीपेक्षा ४ ते ५ फूट अधिक उंचीचे एकरी साधारणत: १२-१५ पक्षिथांबे उभारावेत. यासाठी ५.५ ते ६ फूट लांबीच्या काठीला एका बाजूने टोक करावे. म्हणजे ते जमिनीत एक फुटापर्यंत चांगले खुपसता येते. त्यावर १.५ ते २ फूट लांबीची काठी आडवी पक्की बांधावी. त्यावर पक्षी बसून शेतातील घाटे अळी व त्याच्या पतंगाचा फडशा पाडतात.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

-पीक फुलोरा अवस्थेत येण्यापूर्वी साधारणत: ७ ते १० दिवस आधी शेतात कामगंध सापळे लावावेत. यामध्ये घाटे अळीचा हेलील्युअर लावावा. ल्युअर खाचेमध्ये लावताना त्याला बोटांचा स्पर्श होऊ देऊ नये. पाऊच फोडून ल्युअरचा नरम भाग अंगठा व पहिल्या दोन बोटांच्या चिमटीत पकडून खाच्यात लावावा. खाली पाऊचसुद्धा कामगंध सापळ्याच्या प्लॅस्टिक बॅगेमध्ये टाकावा.

- पीक कळी अवस्थेत येण्यापूर्वी ७ ते १० दिवस आधी हरभरा पिकावर निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टीन (१५०० पीपीएम) ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. याद्वारे घाटेअळीचा पतंग शेतात अंडी घालण्यासाठी येणे टाळतात.

-घाट्यामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत इमामेक्टीन बेन्झोएट ४ ते ६ ग्रॅम किंवा क्लोरॲन्ट्रानिलीपोल २.५ ते ३ मि.लि. प्रति १० लिटर पाणी यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी करता येईल.

६) घाटे पक्वतेच्या अवस्थेत पिकात खरगे पडणे ः
हरभऱ्याचे पीक घाटे अवस्थेत असताना ठराविक भागातील झाडे अचानकपणे कोमेजून सुकायला लागतात. यालाच शेतकरी ‘खरगे पडले’ असे म्हणतात. ही समस्या मुळसड या रोगामुळे होते. हा रोग फ्युजारियम, रायक्टोनिया किंवा स्केरोशिअम यापैकी एखाद्या बुरशीमुळे मुळे सडतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब २५ ग्रॅम अथवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम अथवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे एका बुरशीनाशकाचा वापर करावा. हे घटक वरील घाटेअळीच्या नियंत्रणासाठी करावयाच्या प्रत्येक फवारणीसोबत वापरणे शक्य आहे.
----------------
जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७
(सहयोगी प्राध्यापक - कृषी विद्या, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com