Vegetable Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Success Story : बारमाही उत्पन्न देणाऱ्या शेतीत मिळविली हातोटी

Perennial Farming : फुलंब्री- नागरे वस्ती (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील संतोष व आरती या नागरे दांपत्याने ताजे उत्पन्न व शेतीतील नफा वाढविणारे बारमाही पीक पद्धतीचे मॉडेल उभारले आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Successful Agriculture Model : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री- नागरे वस्ती येथील संतोष दत्तात्रेय नागरे यांची वीस एकर शेती आहे. पत्नी आरती यांच्यासह ते शेतीत राबतात. दिमतीला वर्षभर दोन पुरुष व तीन महिला मजूर कायमस्वरूपी असतात. शेतीतील सुमारे ७५ टक्के कामे यांत्रिकीकरणाच्या साह्याने तर २५ टक्के काम बैलांच्या साहाय्याने केली जातात. त्यासाठी आवश्यक यंत्रे आहेत. नागरे यांनी वर्षभर ताजे उत्पन्न मिळत राहील असे बारमाही पीक पध्दतीचे मॉडेल तयार केले आहे.

बारमाही पीक पद्धतीचे मॉडेल

आले हे नागरे यांचे दीर्घ कालावधीचे व दहा वर्षांपासूनचे मुख्य पीक आहे. जोडीला कपाशी तर रसवंतीसाठी आडसाली ऊस असतो. आल्याला दर चांगले असल्यास सहा महिन्यांनी किंवा डिसेंबरच्या काळात त्याची काढणी होते. त्यानंतर त्या जागी फ्लॉवर घेतला जातो. कापसाचे हार्वेस्टिंग झाल्यानंतर रिकाम्या होणाऱ्या जागेत डिसेंबरच्या अखेरीस कांदा घेण्यात येतो.

खरिपातील क्षेत्र रिकामे होईल त्यानुसार कोबीसारखी पिकेही असतात. उन्हाळ्यात पाण्याची स्थिती चांगली असल्यास काकडी व पाणी कमी असल्यास चक्री (पांढरे डांगर) घेण्यात येते. उसाचा खोडवा तुटल्यानंतर त्या शेताला दोन- चार महिने विश्रांती देऊन मेमध्ये त्या ठिकाणी फेरपालट म्हणून आले घेण्यात येते.

परिस्थितीनुसार पद्धतशीर क्षेत्र नियोजन

मार्केट पाहून सुरवातीला एक- दोन एकर असलेले आले मागील दोन वर्षांत पाच ते सहा एकरांपर्यंत नेले आहे. यंदा मात्र दर कमी असल्याने पुढील वर्षी क्षेत्र नियोजनाचा अजून विचार करावा लागणार आहे. आल्याची तोडणी, धुण्याची प्रक्रिया व्यापाऱ्यांकडे असल्याने थोडा कमी दर मिळाला तरी ते परवडते असे नागरे सांगतात.

उसाचेही अर्थकारण तसेच किफायतशीर ठरते. स्थानिक तसेच परराज्यातील व्यापारी जागेवर येऊन ऊस खरेदी करतात. जसजसा उन्हाळा वाढतो त्याप्रमाणे रसवंतीच्या कारणावरून त्यास दर चांगला मिळतो. मागील वर्षी ४४०० रुपये प्रति टन दर मिळाला. एरवी तो तीनहजारांपर्यंत दर मिळतो.

ऊस दरवर्षी पाच एकरांवर असतो. पूर्वी १० ते १२ एकरांपर्यंत केली जाणारी कपाशी अलीकडील तीन-चार वर्षात प्रचंड घटवत केवळ एक ते दोन एकरांवर आणली आहे. नैसर्गिक आपत्ती, पाऊस यांच्यामुळे नुकसान होत असल्याने हा निर्णय घेतला आहे. कांद्याचे दोन ते तीन एकर क्षेत्र असते. कोबी यंदा पहिल्यांदाच दोन एकरांत घेतला. यंदा पहिल्यांदाच घेतलेली हिरवी मिरची ‘फेल’ गेल्याने त्याच क्षेत्रात हिरवी काकडी घेतली..

मिश्र पिकांचे प्रयोग

नागरे यांनी अलीकडील वर्षांत विविध प्रयोग केले. काही वेळा ते नुकसानीत गेले. काही वेळा फायद्यातही राहिले. पण प्रयत्नवादी व प्रयोगशील वृत्ती त्यांनी सोडली नाही. कलिंगड अधिक पपई व आले पिकात पपई असे दोन प्रयोग करून पाहिले.

पैकी पहिल्या प्रयोगात त्यांना कलिंगड भरघोस मिळालेच. शिवाय पपईचेही एकरी ४० टनांच्या पुढे उत्पादन मिळाले. पपईला दर किलोला ८ ते १० रुपयांच्या दरम्यान म्हणजे अपेक्षेपेक्षा कमी मिळाला. मात्र उत्पादन जास्त आल्याने पैसे चांगले झाले. आले- पपई प्रयोगात पपई फेब्रुवारीत काढणीस आले.

त्यावेळी अन्य फळांच्या तुलनेत त्यास चांगला उठाव मिळाला नाही. यंदा पहिल्यांदाच मिरची लागवड केली. त्यावर मोठ्या प्रमाणात रोगांचे आक्रमण झाल्याने दोन- तीन तोडणी नंतर ती काढून त्याऐवजी हिरवी काकडी व त्यानंतर फ्लॉवर घेतला. प्रत्येक प्रयोग काहीतरी शिकवून, अनुभव देऊन वा फायदा देऊन जातो.

पाणी व्यवस्थापन

दोन स्वमालकीच्या, दोन काकांच्या व तीन सामाईक विहिरी अशा एकूण सात विहिरी सिंचनासाठी आहेत. सर्व विहिरी पाईपलाईनद्वारे एकमेकींशी जोडल्या आहेत. त्यामुळे पाणी उपलब्ध असलेल्या विहिरीतून कोणत्याही शेतात पाणी नेणे शक्य होत आहे. संपूर्ण क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना नेहमीच करावा लागतो. त्या अनुषंगाने सिंचनाचे नियोजन नागरे यांनी केले आहे.

डांगर देते लाखाचे उत्पन्न

नागरे सांगतात की चक्री (डांगर) आमच्या भागात शक्यतो फार घेतली जात नाही. ती बांधावरच काही प्रमाणात असते. मी पूर्वी चार एकरांत ती घ्यायचो. किलोला ३० रुपये दर असायचा. परंतु उठाव तुलनेने कमी असल्याने क्षेत्र एक एकर एवढेच मर्यादित केले.

दरही कमी करून किलोला १५ ते २० रुपये दराने विकू लागलो. छत्रपती संभाजीनगर येथे त्याचे मार्केट आहे. एकरात १३० ते १५० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. तर कमी कालावधीत दीड लाखांपर्यंत पैसा मिळवून देणारे हे उन्हाळी पीक ठरल्याने त्यात सातत्य ठेवले आहे.

संतोष नागरे ९४०३४४११११

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT