Agriculture Technology Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Technology: गायींचे आरोग्य सांभाळणारे सेन्सर; आधुनिक पशुपालनाची क्रांती!

IoT In Agriculture: नेदरलॅंडसारख्या देशांमध्ये पशुपालनात माहिती तंत्रज्ञान, सेन्सर तंत्रज्ञान आणि रोबोटिक्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ‘हर्ड मॅनेजमेंट सिस्टीम’ आणि ‘आयओटी’च्या मदतीने गायींचे आरोग्य, आहार, दूध उत्पादन आणि गोठ्याचे हवामान स्वयंचलितरीत्या व्यवस्थापित केले जाते. यामुळे दूध उत्पादन वाढते, गुणवत्ता सुधारते आणि मजूरटंचाईवरही उपाय सापडतो.

अमित गद्रे

Agriculture Innovation: ‘‘आमच्या गोठ्यांमध्ये सरासरी ५० ते १००० गायींचे संगोपन होते. होल्स्टिन फ्रिजियन गाय सरासरी प्रति दिन ३५ ते ४० लिटर दूध देते. साधारणपणे १०० गायींच्या गोठ्यातील दैनंदिन व्यवस्थापन फक्त दोन माणसे करतात. दूध काढणीचे काम दोन रोबो वेळेत पूर्ण करतात. खाद्य देणे, गोठा स्वच्छतेसाठी रोबो कार्यरत आहेत. पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने पशुपालन केले जाते. शेती असो वा पशुपालन माहिती तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही’’... हे बोल आहेत नेदरलॅंडमधील ‘पीयूएम’ या संस्थेतील पशुतज्ज्ञ ॲड मार्क यांचे.

फलटण (जि. सातारा) येथील गोविंद डेअरीच्या आमंत्रणावरून राज्यातील पशुपालकांना मार्गदर्शन करण्यासाठी ॲड मार्क आले होते. त्यावेळी त्यांच्याशी आधुनिक पशुपालनाविषयी चर्चा करण्याची संधी मिळाली. विशेषतः माहिती तंत्रज्ञानाच्या वापराबाबत ॲड मार्क म्हणाले की, मजूर टंचाई, दुधाची गुणवत्ता आणि अर्थकारण सुरळीत ठेवायचे असेल तर माहिती तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही.

आमच्याकडे गायीच्या रेतनापासूनच माहिती तंत्रज्ञानाचा वापर सुरू होतो. जातिवंत वळूची निवड ही वेगवेगळ्या निकषांवर होते. त्यासाठी पेडिग्री, त्याच्यापासून तयार झालेल्या गायींचे दूध उत्पादन, रोग प्रतिकारशक्ती, शारीरिक ठेवण, रोग आणि ताण प्रतिकारशक्ती असा वेगवेगळा डेटा इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तपासला जातो. गोठ्यातील गायीपासून जन्मणाऱ्या कालवडीची ठेवण, दुग्धोत्पादन कसे पाहिजे हे लक्षात घेऊन रेतमात्रा निवडली जाते. आमच्या होल्स्टिन फ्रिजियन गायी प्रति वेत सरासरी ९००० ते १०,००० लिटर दूध देतात. काही गाई, वळू मांस उत्पादनासाठी सांभाळतो.

मजूरटंचाई आणि वेळेची बचत करण्यासाठी यांत्रिकीकरण तसेच सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. जनावरांच्या व्यवस्थापनासाठी ‘हर्ड मॅनेजमेंट सिस्टीम’चा वापर होतो. यामध्ये वासरू जन्मल्यापासून ते दूध उत्पादन, दैनंदिन व्यवस्थापन, आहार आणि आरोग्य व्यवस्थापन आदी नोंदी ठेवल्या जातात. विस्तार तज्ज्ञ तसेच पशूखाद्य उत्पादक कंपन्यांनी वेगवेगळे ॲप तयार केले आहेत. यातून जनावराची शारीरिक ठेवण, दूध उत्पादनानुसार प्रत्येक जनावराचा आहार, आरोग्य व्यवस्थापन, खाद्य फॉर्म्यूला आदी सल्ले तत्काळ दिले जातात.

प्रत्येक गोठ्यात दूध काढणीसाठी स्वतंत्र मिल्क पार्लर आणि रोबो आहेत. त्यावर दैनंदिन दुधाची नोंद होते. प्रत्येक गायीच्या गळ्यात सेन्सर बेल्ट असल्याने दैनंदिन हालचाल, शरीर तापमानातील चढ-उतार, खाद्य खाण्याचे प्रमाण, माजावर आल्याची वेळ, रवंथपणा आणि दुग्धोत्पादनाची नोंद होऊन मोबाइलवर मेसेज येतो. त्यानुसार गायींच्या व्यवस्थापनात बदल केले जातात. तापमान, आर्द्रता बदलातील ताण टाळण्यासाठी प्रत्येक गोठ्यात स्वयंचलित हवामान केंद्र आहे. बदलत्या हवामानानुसार सेन्सर कार्यरत होऊन गोठ्यात अनुकूल तापमान ठेवले जाते. स्वच्छ दूध उत्पादनाच्या बरोबरीने त्यातील फॅट, प्रोटिन, लॅक्टोज, सोमॅटिक सेल काउंट तपासले जातात. याबाबत आमच्याकडे कडक नियमावली आहे, असे मार्क यांनी सांगितले.

अमित गद्रे ९८८१०९८२०१ (लेखक ‘ॲग्रोवन’चे मुख्य उपसंपादक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : नांदेडला ज्वारी, उडीद, मुगाच्या पेरणीत यंदाही घट

Solar Power : सांगली जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये होतेय सौर ऊर्जेवर वीजनिर्मिती

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात १४ हजार हेक्टरवर उसाची लागवड

Dairy App: जनावरांचं संपूर्ण नियोजन कसं करावं?

Varkhede Barrage : शेळगाव, वरखेडे प्रकल्पांत जलसंचय यंदाही १०० टक्के अशक्य

SCROLL FOR NEXT