डॉ. सचिन राऊत, डॉ. गजेंद्र खांडेकर
Animal Diet :
पावसाळी वातावरणात आर्द्रता जास्त प्रमाणात वाढते. त्याचा परिणाम जनावराच्या पचन प्रक्रियेवर दिसून येतो. या काळात विषाणू, जिवाणूंचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतो. त्याच प्रमाणे शरीरात आणि शरीरावर अनेक परजीवी वाढतात. यामुळे जनावरांचे आरोग्य बिघडते, त्याचा विपरीत परिणाम उत्पादनावर दिसून येतो. सतत ओले राहिल्याने जनावरांच्या खुरांमध्ये संसर्ग होण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे आठवड्यातून एक किंवा दोनदा जनावरांचे खूर जंतुनाशक औषधाच्या द्रावणाने स्वच्छ करावेत. जास्त ओलाव्यामुळे जनावरांच्या चाऱ्यावर बुरशी वाढण्याची शक्यता वाढते. असा चारा खाल्ल्याने जनावरे आजारी पडू शकतात.
पशुपोषण व्यवस्थापन
पावसाळा सुरू होताच जनावरे भरपूर हिरवा चारा खातात, त्यामुळे त्यांना अतिसार होतो. त्याचा दूध उत्पादनावर परिणाम होतो. हगवण लागण्याचे मुख्य कारण म्हणजे आहारात अचानक बदल होणे हे आहे. कारण उन्हाळ्यात जनावरांना कोरडा चारा मिळतो आणि अचानक पूर्ण हिरवा चारा मिळाल्याने त्याच्या पोटातील सूक्ष्मजीव किण्वन प्रक्रियेवर परिणाम करतात. यामुळे जनावराला अपचन होऊन जुलाब होतात. ही समस्या टाळण्यासाठी जनावरांना हिरवा चारा ताबडतोब न देता त्यांना थोडा हिरवा चारा द्यावा आणि नंतर हळूहळू हिरवा चारा वाढवावा.
कोरड्या चाऱ्यात ओलावा किंवा बुरशी नसल्याची खात्री करावी, अन्यथा जनावरांना अफलाटॉक्सिकोसिस, अपचन, जुलाब यांसारखे आजार होऊ शकतात. हिरवा चारा स्वच्छ असावा, त्यात चिखल नसावा. जनावरांना शुद्ध पाणी द्यावे. पाण्याच्या गुणवत्तेचा जनावरांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो.
पाण्यात जास्त प्रमाणात खारेपणा आणि विषारी संयुगे जनावरांच्या वाढीवर नकारात्मक परिणाम करतात. या प्रकारच्या पाण्याच्या वापरामुळे कोरड्या पदार्थांच्या सेवनावर परिणाम होतो. हौदातील सर्व पाणी काढून टाकावे. आतून आणि बाहेरून चुना लावावा. हौद कोरडा करावा. नंतर स्वच्छ ताजे पाणी भरावे.
पावसाळ्यात जनावरांना पचण्याजोगा संतुलित आहार द्यावा. ज्यामध्ये ६० टक्के हिरवा चारा आणि ४० टक्के सुका चारा असावा. एक लिटर दूध देण्यासाठी गाईला ३०० ग्रॅम धान्य मिश्रण आणि म्हशीला एक लिटर दूध देण्यासाठी ४०० ग्रॅम धान्याचे मिश्रण द्यावे. यासोबत रोज ३० ते ४० ग्रॅम साधे मीठ आणि २५ ते ३५ ग्रॅम खनिज क्षार मिश्रण खाऊ घालावे.
पावसाळ्यात हिरव्या गवताचे उत्पादन जास्त होते परंतु या गवतामध्ये जास्त पाणी व कमी पोषक व तंतुमय घटक असतात. जे जनावरांच्या पचनास योग्य नसतात. त्यामुळे या हंगामात जनावरांना जुलाब होतो. या हंगामात आपण अन्न साठवण्याकडे लक्ष दिले पाहिजे, अन्यथा धान्य आणि चारा ओला झाल्याने ते कुजण्यास सुरुवात होऊ शकते ज्यामुळे जनावरे आजारी पडू शकतात.
दूध दोहन व्यवस्थापन
पावसाळ्यात कासेच्या आजाराचा प्रादुर्भाव जास्त होतो. जनावरांना कासेच्या आजाराचा धोका निर्माण होतो. याचे कारण म्हणजे स्वच्छतेचा अभाव. पावसाळ्यात जनावरांचा गोठा ओला आणि सूक्ष्मजीवांनी भरलेला असतो. दूध काढल्यानंतर लगेच सडाची छिद्रे काही काळ उघडी राहतात. या वेळेत दुभती जनावर खाली बसल्यास कासेचे आजार होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे हे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वच्छता ठेवावी.
ज्या ठिकाणी दूध काढले जाते त्या ठिकाणची फरशी स्वच्छ ठेवावी. दुभत्या जनावराला दूध काढल्यानंतर लगेच खाली बसू देऊ नये. दूध काढण्यापूर्वी आणि नंतर, कोमट पाण्याने कास स्वच्छ करण्यासाठी जंतूनाशकाचे काही थेंब टाकावेत. त्यात स्वच्छ कापड भिजवावा आणि कास स्वच्छ पुसावी. यामुळे कासदाह होण्याची शक्यता कमी होते.
सामान्य देखभाल
पावसाळ्यात जेव्हा सतत पाऊस पडतो, तेव्हा मुसळधार पावसापासून जनावरांचे संरक्षण करावे आणि त्यांना कुरणातच चारावे. त्यांना पावसात जास्त वेळ भिजू देऊ नये. अन्यथा जनावरांना सर्दी आणि न्यूमोनिया होऊ शकतो.
चाऱ्याची गव्हाण स्वच्छ करावी. पावसाळ्यात जनावरांना घाणेरड्या पाण्यात लोळू देऊ नये. कारण त्याच्या कानात सूक्ष्म जंतू जाऊ शकतात. योनिमार्गात सूक्ष्म जीव प्रवेशीत झाल्यामुळे गर्भाशयदाह होऊ शकते.
दुभत्या जनावराच्या शेपटी, कासेभोवतीचे केस कात्रीने कापून स्वच्छ करावेत. जेणेकरून तेथे पावसाळ्यात चिखल राहणार नाही. गोठ्याच्या प्रवेशद्वारावर खूर धुण्यासाठी टाकी बनवावी ज्यामध्ये चुना आणि जंतुनाशक औषध टाकावे,जेणेकरून जनावरांना खुरांची लागण, खूर सडणे, खूर कुजणे इत्यादी आजार होणार नाहीत.
गोठा व्यवस्थापन
जनावरांसाठी गोठ्यामध्ये आरामदायी वातावरण असते तेव्हा दुग्धोत्पादन चांगले होते. जनावर तणावाखाली असेल तर दूध उत्पादन कमी होते. त्यामुळे पावसाळ्यात उघड्यावर बांधलेल्या जनावरांपासून दूध उत्पादन कमी होते.
गोठ्यातील फरशी उखडली असेल, तर चुना किंवा सिमेंट टाकून योग्य पातळी बनवा, जेणेकरून पावसाचे पाणी साचणार नाही. भिंतीला भेगा पडल्या असतील तर चुना किंवा सिमेंट किंवा पुटी लावून समतल कराव्यात जेणेकरून कीटक त्या भेगांमध्ये आश्रय घेणार नाहीत. कारण किडे खाण्यासाठी बेडूक गोठ्यात येऊ शकतात आणि बेडूक खाण्यासाठी साप येऊ शकतात. हे साप जनावराला चावू शकतात.
सर्व जनावरांना काही काळासाठी गोठ्यातून बाहेर काढा, थोडे वाळलेले गवत, थोडी कडू कडुलिंबाची पाने, तुळस आणि तमालपत्र इत्यादी एका ड्रममध्ये ठेवा आणि त्याचा धूर करावा. या धुरामुळे गोठ्यातील सर्व कीटक, माश्या आणि डास दूर होतील.
गोठ्याचे छत तुटले असेल तर ते दुरुस्त करावे, जेणेकरून पावसाचे पाणी तेथून आत जाणार नाही. पावसाचे पाणी गोठ्याभोवती साचणार नाही आणि त्याचा त्वरित निचरा होईल याची व्यवस्था करावी. जर कुठे पाणी साचले असेल तर त्यामध्ये फिनाईल टाकावे म्हणजे त्यात डासांची उत्पत्ती होणार नाही. गोठ्याच्या आजूबाजूला स्वच्छता राहील याची काळजी घ्यावी.
आरोग्य व्यवस्थापन
पावसाळ्यात दुभत्या जनावरांचे आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे आहे. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनावरांना लसीकरण करावे. कारण त्यांची तब्येत चांगली नसेल तर त्यांचा चारा खाण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे त्यांचे दूध उत्पादन कमी होते.
पावसाळ्यापूर्वी घटसर्प, फऱ्या, देवी, लाळ्या खुरकूत आदी आजारांच्या नियंत्रणासाठी लसीकरण करून घ्यावे.
पावसाळ्यात जनावरांच्या पोटात जंत होतात, त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांना जंतनाशक योग्य प्रमाणात खायला द्यावे.
पावसाळ्यात जनावरांच्या शरीरावर उवा, पिसू, गोचीड या बाह्य परजीवींचा संसर्ग होतो. नियंत्रणासाठी शिफारशीत गोचिडनाशकाची फवारणी करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.