Water Pollution Agrowon
ॲग्रो विशेष

Water Pollution : थोड्या बदलातून होऊ शकतात प्रवाह प्रदूषणमुक्त

Article by Satish Khade : साध्या साध्या बदलातून आपण वैयक्तिक पातळीवर कशा प्रकारे पाण्याचे किंवा प्रवाहांचे प्रदूषण रोखू शकतो, याची माहिती या लेखातून घेऊ.

Team Agrowon

सतीश खाडे

Pollution Management : आपल्या अंघोळीपासून घराच्या स्वच्छतेपर्यंत अन्य अनेक कारणांसाठी वेगवेगळी रसायने वापरली जातात. उदा. अंगाचा साबण, कपडे धुण्याचा साबण, डिटर्जंट, शाम्पू, फरशी पुसण्याच्या पाण्यात फिनाइल, टाॅयलेट स्वच्छतेसाठी ॲसिड इ. सांडपाण्यामध्ये मिसळल्या जात असलेल्या अशा इनऑरगॅनिक (अकार्बनी) रसायनांमुळे ओढे, नाले, नद्या, तलावातील जलचरांवर गदा येत आहे.

अनेक जलस्रोत आज पूर्ण मृत झाले आहेत. मुळातच अनेकांना आपल्या सांडपाण्यामुळे प्रदूषणात भर पडते, हेच माहिती नसते. त्यामुळे सांडपाण्यावरील प्रक्रियेबाबत गंभीरताही खूप कमी आहे. आपल्या गाव, शहरांचे सांडपाणी सरळ ओढा वा नदीत सोडले जाते. काही शहरात सांडपाणी प्रक्रिया केंद्रे असली तरी त्यांची संख्या गरजेपेक्षा कमी आहे आणि असलेली केंद्रेही तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने चालवली जातातच असे नव्हे!

सांडपाण्याची समस्या वाढण्याची अनेक कारणे आहेत, पण त्यातील मुख्य कारण आहे ते आपण स्वच्छतेसाठी वापरत असलेली रसायने! ही रसायने मैल्यातील जिवाणू मारून टाकतात. वास्तविक मैल्यातील नैसर्गिक जिवाणू हे मैल्याच्या विघटनामध्ये मोलाची भूमिका निभावत असतात. तेच नष्ट झाल्यामुळे मैला व अन्य सेंद्रिय पदार्थांचे विघटन थांबते. हीच अडचण सांडपाणी प्रक्रिया संयंत्रात ही (सुवेज ट्रीटमेंट प्लांट) येते. त्यातून या केंद्राची कार्यक्षमता खूप कमी होते. परिणामी, सांडपाणी आवश्यक तितके स्वच्छ होण्याआधीच नदीमध्ये सोडले जाते.

स्वच्छतेसाठी जैविक रसायनांचा वापर :

काही वर्षांपूर्वीपर्यंत ओढे, नद्यामध्ये स्वच्छ पाणी वाहत होते. तेव्हाही आधीच्या गावाचे सांडपाणी त्यात मिसळले गेले तरी पुढील गावापर्यंत वाहत जाईतो ते स्वच्छ होत असे. कारण पाण्यात ऑक्सिजन, सूर्यप्रकाश मिसळला जाऊन, त्यातील सूक्ष्मजीव सक्रिय राहत. पूर्वी साबण किंवा अन्य बाबी या प्रामुख्याने जैविक घटकांच्या बनलेल्या असल्याने त्यांचे वाहत्या पाण्यात विघटन होत असे.

आपल्या नद्या, ओढे अधिक शुद्ध स्वरूपात राहण्यासाठी आपण वापरत असलेली दैनंदिन स्वच्छतेचे घटक हे पूर्णपणे विघटनशील असतील, जैविक असतील याची काळजी घ्यायला हवी. औद्योगिक क्षेत्रामध्ये त्यांचा वापर गेली दहा, पंधरा वर्षांपासून यशस्वीरीत्या सुरू आहे.

काही शहरी भागामध्ये त्यांची उपलब्धताही पारंपरिक रसायनांच्या किमतीमध्येच होत आहे. मागणी केल्यास गावोगावीही उपलब्ध होऊ शकतील. मात्र शहरी किंवा ग्रामीण भागामध्ये त्याविषयी जागरूकतेचाच अभाव आहे.

या जैविक घटकांमध्ये एन्झाइम्स, जिवाणूंचे वेगवेगळे प्रकार यांचा समावेश असतो. त्यापासून तयार केलेली कपडे, भांडी, टॉयलेट, फरशी इ. सफाईची द्रावणे उपलब्ध आहेत. ही मैला आणि सांडपाण्यातील चांगल्या जिवाणूंसाठी हानिकारक नसतात, उलट सेंद्रिय पदार्थांच्या विघटनाची प्रक्रिया वेगाने घडविण्यास मदत करतात. पाण्यातील जिवांच्या व एकूणच जैवविविधतेला (इकोसिस्टिम) बाधा न आणता सुदृढ करण्यास मदतच होते.

या घटकांमध्ये असलेली विकरे (एन्झाइम्स) हे जिवाणूंचे खाद्य असते. सांडपाणी किंवा मैल्यातून जिवाणूंची संख्या व वसाहती वाढविण्याचे काम करतात. वाढलेल्या जिवाणूंच्या कार्यक्षमताही वाढते. परिणामी त्यांच्या श्‍वसनातून व लगतच्या हवेतून विरघळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाणही वाढत जाते.

त्याचा जलचरांनाही फायदा होतो. हेच पाणी पुढे जेव्हा शेतीला दिले जाते, त्यातून प्रदूषकांऐवजी जैविक खते जमिनीला मिळतात. त्यामुळे विषमुक्त अन्न निर्मितीला मदत होते. अशा जैविक आणि संपूर्ण विघटनशील घटकांचा वापर नक्कीच वाढवला पाहिजे. खरेतर त्यासाठी पूर्वीपेक्षा कोणताही अधिक खर्च येत नाही. पण आपल्या एका छोट्या बदलाने, जैविक घटकांच्या आग्रह धरल्यामुळे पाण्याचे प्रवाह स्वच्छ राहू शकतात.

दुर्गंधी व डासमुक्त गटारी :

गटारांमध्ये सांडपाणी वाहते असते, तोपर्यंत त्याला फारसा दुर्गंध येत नाही. पण जेव्हा गाळ किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे सांडपाणी तुंबते, त्यातून दुर्गंधी पसरते. तुंबलेले पाणी बाहेर पडून अस्ताव्यस्त पसरते. त्यात डास व अन्य कीटकांची पैदास होते. आता हा गाळ तयार होऊन साठण्याची प्रक्रिया थांबवणारी काही उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत.

त्यात मोठ्या संख्येने असलेले उपयुक्त जिवाणू मैला व इतर घटकांचे विघटन वेगाने घडवून आणतात. गाळ निर्मिती टळल्याने पुढील दुर्गंधी व रोगराईसारखे सर्व दुष्परिणाम टळतात. ही सांडपाण्यावर सहजासहजी होणारी, वैयक्तिक पातळीवर करता येण्याजोगी स्वस्त प्रक्रिया आहे. ही उत्पादने सर्वसामान्यांना खिशाला परवडणारी आहेत.

सार्वजनिक शौचालयांसाठी तर ही उत्पादने वरदान ठरू शकतात. प्रत्येकाने आपल्या घरात वापरल्यास, वसाहती किंवा सोसायट्यामधील सांडपाणी प्रक्रिया केंद्रे ही कमी ऊर्जेमध्ये, दुर्गंधीविना चालतील. ही उत्पादने यशस्वीपणे काम करत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. विविध सूक्ष्मजीव सांडपाणी प्रक्रियेमध्ये मोलाची भूमिका निभावतात, फक्त आपण त्यांची मदत घेतली पाहिजे. हाच पाणी प्रदूषण मुळातून कमी करण्याचा रामबाण उपाय ठरू शकतो.

‘बायोडायजेस्टर’चा वापर :

काही वर्षांपूर्वीपर्यंत घर, बंगला किंवा इमारतीच्या बांधकामांची सुरुवातच मुळी ‘सेप्टिक टॅंक’ खोदण्यापासून व्हायची. सेप्टिक टॅंक म्हणजे काय घरातील मैल्यासह सर्व सांडपाण्याची साठवण, विघटन करणारी टाकी. मात्र जागेचे भाव गगनाला भिडल्यानंतर व अज्ञानापोटी सेप्टिक टॅंकचा वापर कमी झाला. हे सांडपाणी थेट गटारीत सोडले जाते. सेप्टिक टॅंकच्या बांधकामातही शास्त्रीय विचार आणि पद्धतीचा अभाव दिसतो.

इमारतीतील लोकांची संख्या, सांडपाण्याची निर्मिती आणि सेप्टिक टॅंकची क्षमता यांचे प्रमाण व्यस्त असते. सेप्टिक टॅंकमध्ये सांडपाणी गेल्यावर त्याचे पूर्ण विघटन होण्यास ७२ तास लागतात. त्यात तयार झालेला गाळ त्याच्या तळाशी बसतो आणि विरघळलेल्या घटकांसह पाणी टाकीबाहेर पडते. यामध्ये गाळ नंतर उपसून टाकणे हे एक जिकिरीचे काम होऊन बसते. परिणामी, सेफ्टिक टॅंक बांधण्याचे प्रमाण कमी होत गेले आहे.

या सर्व बाबीमुळे ग्रामीण व अर्धशहरी भागात पाणी प्रदूषणाची समस्या मोठी आहे. यावर उपाय काय, तर बायोडायजेस्टर! ही सेप्टिक टॅंकच्या तुलनेत छोटी, तीन ते चार कप्पे असलेली टाकीच असते. त्यात विशिष्ट प्रकारचे जिवाणू भुकटीस्वरूपामध्ये सोडले जातात. त्यामुळे मैल्यासह सर्व सांडपाण्याचे विघटन चोवीस तासांत होते. तसेच मुख्य म्हणजे यात विघटनानंतरची गाळ निर्मिती अगदीच नगण्य असते. यातून बाहेर पडणारे पाण्यात प्रदूषकांचे प्रमाणही खूप कमी झालेले असते. बायोडायजेस्टर हे पाणी प्रदूषण थांबविण्यासाठी वा कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरत आहेत. गेल्या चार- पाच वर्षांत शहरी व ग्रामीण भागात याचा वापर वाढत आहे.

- सतीश खाडे, ९८२३०३०२१८

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ पुस्तकाचे लेखक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT