Water Pollution : पाणी प्रदूषणाला चालना देणारा घनकचरा

Solid Waste Problem : वाढत्या शहरीकरणासोबत ग्रामीण माणसांचीही जीवनशैली बदलत आहे. प्रति माणशी तयार होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याची विल्हेवाट लावण्याची चांगली पद्धतीही माणसाला आजवर मिळालेली दिसत नाही.
Water Pollution
Water PollutionAgrowon

सतीश खाडे

Solid Waste : ग्रामीण असो की शहरी भाग घनकचऱ्याची समस्या वेगाने वाढत आहे. कचरा टाकण्यासाठी प्रामुख्याने ओढ्याचा काठ, नदीचा काठ किंवा तळ्याचा काठ अशा पाण्याजवळच्या जागा निवडल्या जातात. काही शहरांमध्ये आता कचरा काठावरच राहिला नाही, तर नदीमध्येही ढकलला जात आहे.

नद्यांची अनेक ठिकाणी कचराकुंडीसारखी स्थिती झालेली दिसते. पाण्याचे स्रोत, पाण्याची ठिकाणे शुद्ध आणि स्वच्छ ठेवण्यापेक्षा ती अधिकच घाण, प्रदूषित करण्याचा पण केल्याप्रमाणे माणसाचे सारे वागणे आहे. खरेतर आटलेले आड, विहिरी, दगडाच्या बंद पडलेल्या खाणींमध्ये पावसाचे पाणी साठवता येऊ शकते.

पण आपण त्याचा उपयोग कचरा टाकण्यासाठी करतो. या कचऱ्यामुळे गाव, शिवार आणि शहरांचे केवळ सौंदर्यच नष्ट होते असे नाही, तर या जमीन, हवा आणि पाणी यांच्या प्रदूषणात वाढ होते.

भारतातील प्रत्येक माणूस सरासरी सातशे ग्रॅम इतका कचरा रोज तयार करतो. शहरी- ग्रामीण व गरीब- श्रीमंत या वर्गीकरणात हा आकडा थोडा कमी जास्त होतो. दोन हजार लोकसंख्येच्या छोट्या गावात रोजचा दीड हजार किलो (दीड टन) तर वर्षाला साडेपाचशे टन कचरा तयार होतो.

तर ७० लाख लोकसंख्येच्या पुण्यासारख्या शहरात रोजची कचरा निर्मिती सव्वा पाच हजार टन आहे. जगाची आकडेवारी पाहिली तर जगात दरवर्षी १००० कोटी टन कचरा तयार होतो. म्हणजेच तो एव्हरेस्टच्या उंचीइतका कचऱ्याचा पर्वत माणूस दरवर्षी तयार करतो आहे.

Water Pollution
Water Pollution : बंधाऱ्यातील गळती, दूषित पाण्यामुळे शेतकरी त्रस्त

कचऱ्याचे दुष्परिणाम

या घन कचऱ्यात अन्नपदार्थापासून ते प्लॅस्टिकपर्यंत, चामड्यापासून काचेपर्यंत, औषधांपासून ते हानिकारक रसायनापर्यंत विविध घटक असतात. यातील सेंद्रिय घटकांचे विघटन तुलनेने लवकर होते. काही असेंद्रिय घटकांचे विघटन होण्यास काही महिने तर काहींचे विघटन होण्यासाठी काही शतके लागतात. आधी पडलेला कचरा विघटन होऊन निसर्गात मिसळून जाण्याआधीच पुढील कचरा त्यात वाढत राहतो.

या कचऱ्याच्या अर्धवट विघटनात किंवा सडण्यातून विषारी द्रव्ये तयार होतात. त्यांना ‘लिचेट’ असे म्हणतात. हे लिचेट ॲसिडिक द्रव्य असल्यामुळे गुणधर्मही ॲसिडप्रमाणेच असतात. काळेकुट्ट असणारे लिचेट पावसाच्या पाण्यात मिसळून ते जमिनीत मुरते. परिणामी भूजलही विषारी होते. ते वाहून नाल्यात, नदीत, तलावात येते.

प्रवाहाचे पाणीही विषारी करते. पावसाच्या पाण्याबरोबर केवळ लिचेटच नाही तर कचराही मोठ्या प्रमाणात वाहून येतो. नदीकाठी कचरा टाकण्यामागील एक उद्देशच हा असतो की पावसाच्या पाण्याने कचरा आपोआप वाहून जाईल. मात्र या कचऱ्याद्वारे आपल्या स्वतःच्याच पिण्याच्या पाण्यात विष ओतत असल्याचे भान कोणालाच नाही.

घनकचऱ्यामुळे रोगजंतूंची वाहतूक करणाऱ्या माश्या, डास, झुरळे आणि उंदीर यांची पैदासही मोठ्या प्रमाणात होते. यातून रोगराईसाठी कायम अनुकूल वातावरण राहते. कचऱ्याच्या विघटनातून परिसरातील वातावरणात मिथेन, CO२, H२S या आणि अशा अनेक वातावरणाला हानिकारक, हवेला प्रदूषित करणाऱ्या वायू मिसळत राहतात.

परिणामी दुर्गंधीसोबतच श्‍वसनविषयक आरोग्यांच्या समस्यात भर पडते. सामान्य कचऱ्यासोबतच अनेक दवाखाने, हॉस्पिटल यांच्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट ही मोठी समस्या आहे. त्याबाबत अनेक कडक नियम आणि निकष असले तरी त्याची पूर्तता किती होते, हाही खरा प्रश्‍न आहे. त्यातून होणारे पाण्याचे प्रदूषण मानवी आरोग्यासाठी किती हानिकारक असेल, याची कल्पनाही करता येत नाही.

सामान्य कचऱ्याच्या ढिगामध्ये कारखान्यांचाही विषारी कचरा त्यात मिसळला जाऊ शकतो. उलट त्यांना त्याबाबत नकळत प्रोत्साहन मिळते. या सर्वांमुळे आपले पिण्याचे व शेतीचे पाणी विषारी होत जाते. जमिनीत उतरलेले पाणी शेतांच्या विहिरीत बोअरवेलमध्ये पण उतरते. नदीच्या पाण्याचा झिरपा विहिरीत व बोअरवेलमध्ये येतो.

त्यामुळे प्रवाहातले प्रदूषित पाणी आणि जमिनीवरचे प्रदूषित पाणी हे पिकांना दिले जाते. यामुळे ती शेतजमीन आणि पिके दोन्ही विषारी होतात. हेच विष चारा पिकात जाऊन ते जनावरांच्या शरीरात जाते. पुढे त्यांचे मांस, अंडी किंवा दुधातून परत आपल्या पोटात जातात. पाण्यातील मासे आणि अन्य जलचराच्या पोटातून ही विषारी द्रव्ये अंतिमतः आपल्याच शरीरात परत येतात.

Water Pollution
Water Pollution : घरगुती सांडपाण्यातून होणारे प्रदूषण

प्लॅस्टिकचा भस्मासूर

पॅकिंगच्या दृष्टीने प्लॅस्टिकचे गुणधर्म उत्तम आणि स्वस्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रमाणात वापर होतो. आजवर किती वेळा प्लॅस्टिकच्या पातळ पिशव्यांवर बंदी आली असेल, पण त्या पुन्हा पुन्हा आपल्या हातात येत असतात. म्हणजेच सोय ही एकच गोष्ट प्लॅस्टिक पिशव्यांना जिवंत ठेवत आहे. खरे तर प्लॅस्टिकच्या पुनर्वापर करता येतो.

त्यासाठी इंधन बनवण्यापासून रस्ते बनविण्यापर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जगात सर्वत्रच प्लॅस्टिक रिसायकलिंग करण्याची समस्या आहे. ती म्हणजे वापरून झाल्यावर आपण प्लॅस्टिक फेकून देतो. त्याचे हलके वजन व त्याच्या विक्रीतून मिळणारे खूपच जुजबी पैसे. एका अहवालानुसार जगातील फक्त पाच ते नऊ टक्के प्लॅस्टिक रिसायकलिंगला दिले जाते, बाकी प्लॅस्टिक हे कचऱ्याचे रूपात जमिनीवर पडते.

एव्हरेस्ट शिखरापासून ते समुद्राच्या तळापर्यंत प्लॅस्टिक विखुरलेले आहे. त्याच्या जोडीला थर्मोकोल व कागदी वस्तूही येत आहेत. आपण गाई, कुत्र्यांच्या पोटातून प्लॅस्टिक काढण्याचे व्हिडिओ पाहून हळहळतो. त्याच प्रमाण अप्रत्यक्षरीत्या, आपल्या नजरेला दिसत नसले तरी केवळ प्लॅस्टिकच नव्हे, तर असे अनेक विषारी पदार्थ आपल्या शरीरातही जात आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

प्लॅस्टिकची बेटे...

अनेक उपग्रहांनी समुद्रात तरंगत असलेल्या प्लॅस्टिकचे फोटो दिले आहेत. त्यानुसार एकट्या अमेरिकेच्या बाजूला असलेल्या प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलिया खंडाच्या क्षेत्रफळाएवढे प्लॅस्टिक तरंगते आहे. इतर सागरांमध्येही थोड्या फार फरकाने हीच परिस्थिती आहे.

जागतिक पर्यावरणाच्या अभ्यासकांनी हा इशारा दिला आहे की २०४० पर्यंत इतके प्लॅस्टिक समुद्रात गोळा होईल. चक्क समुद्रामध्ये प्लॅस्टिकचे पर्वत तयार होत असून, त्याचे लवकरच बेटांमध्ये रूपांतर होईल. समुद्राच्या पाण्यात जेवढे मासे असतील त्याच्यापेक्षा अधिक प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील.

असाच घनकचरा ओढा, नदीतील जलचरांच्या जीवनात अडथळा आणतो. त्यांच्या पोटातही जातो. त्यातून त्यांचा मृत्यू ओढवतो. यामुळे जलस्रोतातील व त्याच्या भोवतीच्या सजीवांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत. उरल्यासुरल्या प्रजातीही हळूहळू नष्ट होत जातील.

या राक्षसाला रोखायला हवे...

घनकचऱ्याचे डोंगर आमच्या जीवनशैलीमुळे वाढतच आहेत. गावच्या उघड्या व बंद गटारी याही प्लॅस्टिक वस्तूंमुळेच तुंबलेल्या असतात. त्यातूनच गावात दुर्गंधी आणि रोगराई पसरलेली पाहतो. या कचऱ्यामुळेच अनेक ठिकाणी ओढ्यांच्या नद्यांच्या प्रवाहात अडथळे येऊन पूर परिस्थिती ही निर्माण झालेली आपण पाहतो.

आज ग्रामपंचायत असो की महानगरपालिका त्यांचा पन्नास ते साठ टक्के कर्मचारी वर्ग हा स्वच्छता विभागाचाच आहे. पण तरीही कचरा समस्या वाढतच आहे. इथून पुढे स्वच्छतेचे काम करणारे कर्मचारी मिळणे दिवसेंदिवस कठीण होत जाणार आहे. त्यामुळे कचरा हाताळणे त्याची वाहतूक अधिकाधिक अवघड होत जाणार आहे.

याचा सर्वांत मोठा परिणाम पाणी प्रदूषणावरच होत राहणार आहे. तलाव आणि धरणांचे पाणी साठेही आता घनकचऱ्याच्या तावडीत सापडत आहेत. मानवाने स्वतःच्या बरोबरच सृष्टीच्या नाशासाठी लावलेल्या सापळ्यापैकी पाणी प्रदूषण हा सर्वांत मोठा सापळा आहे, असे मला वाटते. या पाणी प्रदूषणात घनकचऱ्याचा वाटा मोठा आहे. या राक्षसाला घरापासूनच थांबविण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

- सतीश खाडे, ९८२३०३०२१८

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com