Cultivation Of Mulberry
Cultivation Of Mulberry Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Farming : शेतकरी नियोजन : रेशीमशेती

Team Agrowon

हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे (ता.वसमत) येथे दीपक शिंदे आणि त्यांचे बंधू गोविंद यांची १६ एकर शेती आहे. त्यापैकी सव्वा दोन एकरावर तुती लागवड (Cultivation Of Mulberry) आणि उर्वरित क्षेत्रामध्ये कपाशी, सोयाबीन, हळद या पिकांची लागवड आहे. सिंचनासाठी दोन विहिरी, बोअरमधील उपलब्ध पाण्याचा वापर केला जातो.

गावातील अनेक अल्पभूधारक शेतकरी गटाद्वारे एकत्र येऊन रेशीमशेती करत आहेत. त्यांना रेशीमशेतीतून अन्य पिकांच्या तुलनेत खात्रीशीर उत्पन्न मिळते आहे. या शेतकऱ्यांच्या सोबतच दीपक शिंदे यांनीही २०१६-१७ मध्ये मनरेगा अंतर्गत २ एकरावर तुती लागवड करून रेशीम शेतीस सुरुवात केली.

तुती लागवड ः

व्यवसायाच्या सुरुवातीला दोन एकर क्षेत्रावर ५ बाय ३ बाय २ फूट अंतरावर तुतीच्या व्ही-१ या वाणाची २०१६ मध्ये लागवड केली होती. परंतु या पद्धतीमुळे तुती लागवडीत मशागतीची कामे करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे लागवड अंतरात बदल करत सुधारित पद्धतीने लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

त्यानुसार एक एकरावरील तुती लागवड काढून टाकली. आणि २०२१ मध्ये सव्वाएक एकर क्षेत्रामध्ये ६ बाय ३ फूट अंतरावर तुती लागवड केली. सध्या त्यांच्याकडे एकूण सव्वा दोन एकरावर तुती लागवड आहे. पानांची छाटणी केल्यानंतर शिफारशीप्रमाणे रासायनिक खतांच्या मात्रा आणि सिंचनाचे नियोजन केले जाते. प्रत्येक बॅच घेण्यापूर्वी कीटकांना दर्जेदार तुती पाला उपलब्ध होण्यासाठी योग्य नियोजन केले जाते.

संगोपनगृहाची उभारणी ः

तुती लागवडीशेजारी २५ बाय ५० फूट आकाराच्या कीटक संगोनपनगृहाची उभारणी केली आहे. संगोपनगृहाच्या छतावर सिमेंट पत्रे लावले आहेत. उन्हाळ्यात संगोपनगृहातील तापमान योग्य राखण्यासाठी छतावर मिनी स्प्रिंकलरद्वारे पाणी सोडले जाते. त्यासाठी स्वतंत्र पाण्याची टाकी उभारली आहे. थंड, उष्ण वाऱ्यापासून रेशीम कीटकांचे संरक्षण करण्यासाठी निवाऱ्याभोवती नॉयलॉनचे कापड, बारदाने लावले जातात. त्यामुळे संगोपनगृहात योग्य तापमान राखणे शक्य होते.

बॅच नियोजन ः

रेशीम उत्पादनासाठी बायव्होल्टाईन जातीच्या रेशीम कीटकांचा वापर केला जातो. एक बॅच साधारण २२ दिवसांची असते. अशा वर्षभरात साधारण ६ ते ७ बॅच होतात. एका बॅचमध्ये १५० ते २०० अंडीपुंज असतात. साधारण १०० अंडीपुंजांपासून ८० ते ९० किलो कोष उत्पादन मिळते. कीटकांना आवश्यकतेनुसार पाल्याची उपलब्धता केली जाते. थंडीच्या दिवसांत कीटक दिवसा जास्त आणि रात्री कमी खातात. त्यानुसार पाला दिला जातो. वर्षभरात म्हणजेच १० महिन्यांच्या कालावधीत साधारण ८०० ते ९०० किलो रेशीम कोष उत्पादन मिळते.

विक्री नियोजन ः

रेशीम शेतीस सुरुवात केल्यानंतर सुरुवातीच्या काळात बेंगळुरू जवळील रामनगरम येथील मार्केटमध्ये कोषाची विक्री करत होतो. मात्र, मागील दोन वर्षांपासून पूर्णा (जि.परभणी) किंवा जालना येथील मार्केटमध्ये कोष विक्री करत आहेत. आजवरच्या अनुभवातून विविध प्रयोग करत तसेच व्यवस्थापनात सुधारणा केल्यामुळे दर्जेदार रेशीम कोष उत्पादन मिळत आहे. कोषाची गुणवत्ता चांगली असल्यामुळे त्यास दरही चांगले मिळत असल्याचे दीपकराव सांगतात.

मागील कामकाज ः

२८ सप्टेंबरला २०० अंडीपुंजांची बॅच सुरु केली होती. या बॅचमधील कोष काढणीस १७ ऑक्टोबरला सुरुवात केली. साधारण २ दिवसांत कोष काढणी पूर्ण झाली. साधारण २०० अंडीपुंजापासून १४२ किलो कोष उत्पादन मिळाले. उत्पादित कोषाची विक्री जालना येथील रेशीम कोष मार्केटमध्ये ५६५ रुपये प्रतिकिलो दराने केली. बॅच गेल्यानंतर संगोपनगृहाची स्वच्छता करून निर्जंतुकीकरण केले. पुढील बॅचसाठी तुती पाला उपलब्ध होण्यासाठी तुती बागेत छाटणी आणि मशागतीची कामे केली. त्यानंतर मिश्र खते एकरी ६० किलो प्रमाणे दिली.

आगामी नियोजन ः

२० नोव्हेंबरपासून नवीन बॅच घेणार आहे. त्यासाठी भेंडेगाव (ता.वसमत) येथील कपिल सोनटक्के यांच्याकडे १५० चॉकीची (बाल्य कीटक) मागणी केली आहे. सध्या कोष उत्पादनासाठी पोषक वातावरण आहे.

आठवडाभरापासून थंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे संगोपनगृहाच्या बाजूने नॉयलॉन कापड आणि बारदाने लावले आहेत. जेणेकरून संगोपनगृहाचे तापमान योग्य राखले जाईल. रोग प्रतिबंधासाठी संगोपनगृहात धुरळणी करणार आहे. बॅचच्या नियोजनानुसार रेशीम कीटकांना दर्जेदार तुती पाला दिला जाईल.

- दीपक शिंदे, ९५४५०७६४५९

(शब्दांकन ः माणिक रासवे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT