Silk Cocoon Production Agrowon
ॲग्रो विशेष

Non Spinning Crisis : रेशीम कोष उत्पादकांसमोर ‘नॉन स्पीनिंग’चे संकट

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : रेशीम कोष उत्पादकांसमोर फ्लेचरी, ग्रासरी या रोगांपाठोपाठ आता ‘नॉन स्पिनिंग’चे (कोष न बांधणाऱ्या अळ्या) संकट डोके वर काढताना दिसते आहे. या संकटाने काही भागातील रेशीम कोष उत्पादक हैराण झाले आहेत. यामुळे मराठवाड्यातीलच नव्हे तर देशभरातील पारंपरिक, अपारंपरिक रेशीम कोष उत्पादकांना हा प्रश्‍न सतावत असल्याची माहिती जाणकारांनी दिली.

मराठवाड्यात रेशीम उद्योगाचा विस्तार जवळपास १० हजार एकरांवर झाला आहे. परंतु अलीकडच्या दोन-तीन वर्षांत रेशीम कोष उत्पादकांसमोर नॉन स्पीनिंगचे संकट घोंघावते आहे. त्याचा थेट परिणाम रेशीम कोष उत्पादनावर होतो आहे. कोषाचे उत्पादन काही टक्के कमी होण्यासह काही शेतकऱ्यांची एक बॅच, तर काही शेतकऱ्यांच्या दोन, तीन बॅच नॉन स्पीनिंगमुळे हातच्या गेल्या असल्याची माहिती उत्पादकांनी दिली.

ऑगस्ट अखेर व सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यादरम्यान या संकटाचा परिणाम प्रकर्षाने जाणवत असल्याचे शेतकरी व तज्ज्ञांनी सांगितले. अलीकडे जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यांतील काही शेतकऱ्यांना नॉन स्पीनिंगमुळे उत्पादनात हाती भोपळा आला. केवळ मराठवाडा किंवा महाराष्ट्रातच नव्हे तर आंध्र प्रदेश, तमिळनाडू यांसह देशातील इतर राज्यातही नॉन स्पीनिंगचा धोका प्रचंड वाढला असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.

महाराष्ट्रात संशोधन नाही...

महाराष्ट्र रेशीम उद्योगात झपाट्याने पारंपरिक राज्याच्या दिशेने वाटचाल करते आहे. मात्र रेशीम उद्योग विस्तारासाठी प्रचाराचे काम केले जात असलेल्या महाराष्ट्रात संशोधन मात्र शून्य आहे. केंद्रीय रेशीम बोर्डांतर्गत केंद्रीय रेशीम संशोधन प्रशिक्षण संस्थेकडे पुणे व छत्रपती संभाजीनगर येथे रिजनल संशोधन केंद्र देण्यासाठी प्रस्ताव गेला. परंतु दोन वर्षांपासून त्यावर निर्णय नसल्याची माहिती आहे. ‘सीएसबी’ने (सेंट्रल सिल्क बोर्ड) या दोन्ही ठिकाणी विस्तार केंद्र दिली, मात्र संशोधनाची सोय केली नाही.

केंद्रीय रेशीम बोर्डाचे तज्ज्ञ बांधावर

रेशीम कोष उत्पादकांच्या नॉन स्पीनिंग प्रश्नावर प्रत्यक्ष माहिती आणि जाणून घेण्यासह त्यांना शास्त्रोक्त व्यवस्थापन व त्यामुळे अशा संकटांना कशा प्रकारे रोखता येऊ शकते याची सविस्तर माहिती देण्याचे काम केंद्रीय रेशीम बोर्डाचे शास्त्रज्ञ डॉ. हुमायू शरीफ यांनी पैठण तालुक्यातील देवगाव, रजापूर तसेच बीड जिल्ह्यातील रुई येथे शुक्रवारी (ता. ४) रेशीम कोष उत्पादकांशी संवाद साधत केले. या वेळी डॉ. शरीफ यांनी रेशीम कोष उत्पादन घेण्यासाठी तुती व्यवस्थापन ते कोष काढणीपर्यंत नेमक व्यवस्थापन कसे असावे कोणती खबरदारी घ्यायला हवी त्यातून अशी संकट कशी टाळता येतील याविषयी सविस्तर माहिती दिली. देवगाव येथे शास्त्रज्ञ डॉ. अंकुश गाडगे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी. डी. डेंगळे, अभिमान हाके व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

तज्ज्ञांच्या मते...

‘नॉन स्पीनिंग’ची समस्या टाळण्यासंदर्भात उपाययोजनांची माहिती देताना रेशीम विकास अधिकारी संजय फुले यांनी सांगितले, की तुती बागेमध्ये दर्जेदार पाला मिळण्यासाठी संचलनालयाने प्रमाणित केलेल्या सूक्ष्मअन्नद्रव्यांचाच वापर शेतकऱ्यांनी करावा. अन्य कोणत्याही फवारण्या टाळाव्यात. शेतीतील तुती बागेव्यतिरिक्त अन्य पिकांमध्ये फवारणी करताना त्या रसायनांचे अंश तुतीकडे येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. त्याच प्रमाणे कीटक संगोपनगृहात रेशीम कीटकांच्या अवस्थेनुसार योग्य तितके तापमान व आर्द्रता राखण्यास प्राधान्य द्यावे. यातून ही समस्या कमी होण्यास मदत होईल.

‘नॉन स्पीनिंग’च्या प्रश्नामुळे गत दोन-तीन वर्षांत आमच्या गावातील जवळपास २०० एकर तुती क्षेत्र कमी झाले. अलीकडेच जवळपास ५० शेतकऱ्यांच्या एक ते दोन बॅच या संकटाने फेल झाल्या आहेत. यावर संशोधन व परिणामकारक उपाय हवा.
सुधाकर पवार, शेतकरी, रुई, जि. बीड
मी दर वर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान बॅच घेत नव्हतो. यंदा २०० अंडीपुंजची बॅच घेतली. त्यावर २० हजार रुपये खर्च झाले आणि नॉन स्पीनिंगमुळे अळ्या नष्ट करण्याची वेळ आली. आमच्या गावातील इतर अनेक शेतकऱ्यांच्या दर वर्षी एक-दोन बॅच किंवा काही टक्के कोष उत्पादन कायम घटते आहे.
राजू कचरे, शेतकरी, कचरेवाडी जि. जालना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Story : खपली

Processing Industry : प्रक्रिया उद्योगाला मिळाली महिलांची साथ

Weekly Weather : राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Retreating Monsoon : परतीचा पाऊस थांबायचे नावच घेईना

Khandesh Rain : पावसामुळे खानदेशातील प्रमुख नद्या झाल्या प्रवाही

SCROLL FOR NEXT