Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Rate : कापसाचे दर वाढण्याची चिन्हे?

Cotton Market : १ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या नव्या हंगामात २०२३-२४ मधील शिल्लक स्टॉक खूपच कमी आहे, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले.

Anil Jadhao 

Cotton Market Update : १ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या नव्या हंगामात २०२३-२४ मधील शिल्लक स्टॉक खूपच कमी आहे, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते देशात यंदा जवळपास २३ लाख गाठी कापूस शिल्लक आहे. मागील हंगामात जवळपास २९ लाख गाठी कापूस शिल्लक असला तरी मागणीमुळे दर वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

देशात यंदा कापसाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. यंदा कापसाची लागवड कमी झाली. त्यातच पाऊस आणि बोंड अळीमुळे पिकाचे नुकसान होत आहे. मागील हंगामातील कापसाचा स्टॉक कमी आहे. यामुळे देशात कापसाचा पुरवठा कमी होऊन दरात सुधारणा होण्याचा अंदाज गृहीत धरून आयातदार आधीपासूनच आयातीसाठी सौदे करून ठेवत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव नीचांकी पातळीवर असतानाच ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतून कापूस आयातीचे वायदे झाले आहेत. देशात नेमके उत्पादन किती होईल, हे आताच सांगता येत नाही. पण सध्या नव्या कापसाचे भाव ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. उत्पादनात जास्त घट आल्यास दर आणखी वाढू शकतात. त्यामुळे आयातदार आगाऊ सौदे करत आहेत, असे कापूस उद्योगातून सांगण्यात येते.

देशातील काही बाजारांमध्ये नवा कापूस दाखल होत आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील काही बाजारांमध्ये नवा कापूस विक्रीसाठी येत आहे. पण या कापसात ओलावा जास्त येत आहे. तर नव्या कापसाला सध्या सरासरी ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सरकारने यंदा मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार १२१ रुपये तर लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार ५२१ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. म्हणजे सध्या तरी हमीभावाच्या दरम्यान दर आहेत.

देशात मागील हंगामातही कापसाचे उत्पादन घटले होते. कापसाचे भाव कमी झाल्याने कापसाचा वापरही वाढला होता. त्यामुळे मागील हंगामातील कापसाचा शिल्लक स्टॉक कमी आहे. १ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या नव्या हंगामात २०२३-२४ मधील शिल्लक स्टॉक खूपच कमी आहे, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते देशात यंदा जवळपास २३ लाख गाठी कापूस शिल्लक आहे. मागील हंगामात जवळपास २९ लाख गाठी कापूस शिल्लक होता.

यंदा देशातील कापूस लागवड तब्बल ११ टक्क्यांनी कमी झाली. उत्तर भारतातील कापूस लागवड मोठ्या प्रमाणात कमी झाली. उत्तर भारत, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही भागात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावही झाला. पावसामुळे गुजरात आणि महाराष्ट्रातील पिकाला मोठा फटका बसला. इतर राज्यांमध्येही पावसाने पिकाचे नुकसान केले. तेलंगणातही फटका बसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे उत्पादन यंदाही कमी राहण्याचा अंदाज आतापासून व्यक्त केला जात आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा भारतातील कापूस उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा ७ टक्क्यांपर्यंत कमी राहील.

देशात यंदा अनेक भागात कापूस लागवड उशिरा झाली. पावसाळ्याच्या सुरवातीला पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्रात कापसाची लागवड जवळपास एक महिना उशिरा झाली. त्यामुळे बाजारातील कापूस आवकही काहीशी उशिराच वाढण्याची शक्यता आहे. देशातील ही परिस्थिती पाहता कापूस आयातदार कापसाचे सौदे करून ठेवत आहेत. देशात कापूस आयातीवर ११ टक्के आयात शुल्क लागू आहे. मात्र मधल्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ६६ ते ६७ सेंट प्रति पाउंडपर्यंत कमी झाले होते. त्यावेळी आयातदारांनी ११ टक्के आयात शुल्कासह कापूस आयातीचे सौदे करून ठेवले आहेत. नोव्हेंबर ते मार्च महिन्यासाठी ७ ते १० लाख गाठी कापूस आयातीचे सौदे झाल्याची शक्यता आहे.

देशातील उद्योगांचा कापूस वापर वर्षागणिक वाढत आहे. पण उत्पादन मात्र कमी होत आहे. त्यामुळे अगदी तीन वर्षांपूर्वी कापूस निर्यातदार भारताला कापूस आयात वाढवावी लागत आहे. मागील २०२३-२४ च्या हंगामात १६ लाख ४० हजार गाठी कापूस आयात केला. तर यंदा उत्पादनातील घट, गेल्या हंगामातील कमी साठा यामुळे भारत यंदा विक्रमी ३५ लाख गाठी कापूस आयात करू शकतो, असा अंदाज अतुल गणात्रा यांनी व्यक्त केला.

ब्राझीलच्या २८ एमएम कापसाचे डिसेंबरच्या आयातीसाठीचे सौदे ११ टक्के आयात शुल्कासह ६४ हजार ८८० रुपये प्रतिखंडीने झाले. ऑस्ट्रेलियाच्या २९ एमएम कापसाचे सौदे मार्च २०२५ च्या शिपमेंटसाठी ६९ हजार रुपयाने तर आफ्रिकेच्या २८.७ एमएम कापसाचे सौदे ६४ हजाराने झाल्याची माहिती आहे. तर आज देशातील बाजारात कापसाचे वायदे ५७ हजार रुपये खंडीने झाले होते. देशात यंदा कापूस उत्पादन कमी राहण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजेच उत्पादनातील घटीचा अंदाज. त्यामुळे देशातील कापूस आयातदार आतापासून आयातीचे सौदे करून ठेवत आहेत. पण कापूस उत्पादनाची परिस्थिती पुढील एक-दोन आठवड्यांमध्ये स्पष्ट होईल. त्यावेळी देशातील बाजारातील भावाची स्थिती काय राहू शकते, याचाही अंदाज येईल.

आवक सरासरीच्या तुलनेत कमी

यंदा उत्तर भारतात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे. उत्तर भारतातील कापूस लवकर लागवड होत असल्याने लवकर बाजारात येत असतो. यंदा लागवड घटल्याने मात्र बाजारात दाखल होणाऱ्या कापसाचे प्रमाणही कमी आहे. उत्तर भारतातील व्यापाऱ्यांनी सांगितले की, सध्या कापसाची आवक ३० टक्क्यांपर्यंत कमी आहे. उत्तर भारतासोबतच गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांतही काही ठिकाणी नव्या कापसाची आवक सुरु झाली. पण उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील आवक काहीशी जास्त आहे. आवक कमी असल्याने बाजारभावही टिकून आहेत.

शेतकऱ्यांकडे नगण्य साठा

मागील हंगामात शेतकऱ्यांना आधीच्या हंगामात कापूस चांगल्या भावाच्या अपेक्षेने ठेवलेला होता. म्हणजेच २०२२-२३ च्या हंगामातील कापूस चांगल्या भावाच्या अपेक्षेने ठेवला जो २०२३-२४ च्या हंगामात बाजारात विक्रीसाठी आला. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांकडे ३० लाख गाठींच्या दरम्यान कापूस होता. त्यामुळे उत्पादन कमी होऊनही हंगामातील एकूण पुरवठा जास्त दिवस होता. कारण आधीच्या हंगामातील कापूस शेतकऱ्यांनी बाजारात आणला. पण सलग दुसऱ्या वर्षी कापूस जास्त काळ ठेवूनही तोटाच झाल्याने नुकत्याच सरलेल्या हंगामात शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला नाही. म्हणजेच यंदा उद्योग आणि व्यापारी यांच्याकडे असलेला कापूस, उत्पादन आणि आयात यावरूनच पुरवठा ठरेल. कारण शेतकऱ्यांनी गेल्या हंगामातील कापूस मागे ठेवला नाही, असे व्यापारी आणि उद्योगांचे म्हणणे आहे.

हमीभाव खरेदीचा आधार

सीसीआयने नुकतेच न्यायालयात सांगितले, की राज्यात ऑक्टोबरमध्येच हमीभावाने कापसाची खरेदी सुरु होईल. त्यासाठी कापूस पट्ट्यात ११० खरेदी केंद्रे सुरु होतील. आधीच कमी उत्पादन, कमी शिल्लक साठा आणि त्यात सीसीआयने हमीभावाने खरेदी सुरु केल्यास निश्चितच बाजाराला आधार मिळेल. एरवी सीसीआय उशिरा खरेदी सुरु करते. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी भावात माल खुल्या बाजारात विकावा लागतो. पण यंदा जर सीसीआयने ऑक्टोबरमध्येच खरेदी सुरू केली तर एफएक्यू दर्जाच्या कापसाचा भाव हमीभावावर राहण्यास मदत होईल.

आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती

सध्या अमेरिकेच्या कापसाचे भाव एका पातळीदरम्यान दिसत आहेत. मागील आठवड्यात निर्यातीचा आकडाही वाढलेला दिसला. पण डॉलर मजबूत झाल्याने बाजारावर त्याचा अपेक्षित असा परिणाम दिसला नाही. मात्र दुसरीकडे ब्राझीलच्या कापसाला चांगला उठाव मिळत आहे. अमेरिकेतील काही भागात कापूस पिकाला वादळ आणि पावसाचा फटका बसला. दुसरीकडे चीनची मागणी आतापर्यंत थंडावली. भारताचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या बांगलादेशची मागणी अपेक्षेप्रमाणे नसल्याचे काही निर्यातदारांनी सांगितले. पण चीनकडून कापसाला मागणी येत असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे इस्राईल आणि इराणमधील तणावामुळे इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही बाब कापसासाठी पूरक असली तरी युद्धामुळे कापडाच्या मागणीवर परिणाम दिसत असतो. या सर्व कारणांचा जागतिक आणि देशातील कापूस बाजारावर परिणाम दिसून येईल.

(लेखक अॅग्रोवन डिजिटलमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर-मार्केट इण्टेलिजन्स स्पेशालिस्ट आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

Daytime Electricity : शेतीला दिवसा वीज द्या, महावितरणला दिले निवेदन

Maharashtra Election Results 2024 : मुख्यमंत्री शिंदे, फडणीस, अजित पवार, मुंडे आघाडीवर, भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT