Onion Nursery Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Nursery Damage : कांदा रोपवाटिकांची मोठी हानी

Heavy Rain Crop Damage : नाशिक जिल्ह्यात ११ ते १९ ऑक्टोबर दरम्यान कांदा उत्पादक पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे एक हजार हेक्टरवर रोपवाटिकांचे नुकसान झाले आहे.

मुकुंद पिंगळे

Nashik News : कांद्याच्या दरात सुधारणा झाल्याने व समाधानकारक पर्जन्यमान असल्याने शेतकऱ्यांचा यंदा कांदा लागवडीकडे कल आहे. त्यासाठी कांदा रोपवाटिकांची निर्मिती करून लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र जिल्ह्यात ११ ते १९ ऑक्टोबर दरम्यान कांदा उत्पादक पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे एक हजार हेक्टरवर रोपवाटिकांचे नुकसान झाले आहे. रोपांची मोठी हानी झाल्याने उत्पादन खर्चात वाढ होण्यासह संभाव्य कांदा लागवडीवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

मागीलवर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे व्यक्तिगत पातळीवर कांदा बीजोत्पादन घटले. परिणामी कांदा बियाण्याच्या उपलब्धतेसाठी परावलंबित्व बियाणे उत्पादक कंपन्यांवर होते. मध्यंतरीच्या काळात काही ठिकाणी कांदा बियाण्यांचा काळाबाजार झाला. तर काही विक्रेत्यांनी चढ्या दराने बियाणे विक्री केली. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कांदा रोपवाटिका उभ्या केल्या मात्र मॉन्सूनोत्तर पावसाने शेतकऱ्यांचा घात केला आहे.

शेतकऱ्यांच्या कांदा रोपवाटिकांचे ११२६ हेक्टरवर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाच्या अहवालावरून समोर आले आहे. मात्र त्यात अजूनही वाढ दिसून येते. जवळपास १४ ते १५ कोटी रुपयांचे महागडे बियाणे वाया गेले आहे. तर एकूण रोपेनिर्मितीसाठी बियाणे, मशागत, वाफेनिर्मिती, मजुरी यावर शेतकऱ्यांनी केलेला २५ ते ३० कोटींवर खर्च वाया गेला आहे. यंदाचा पाऊस व कांदा रोपवाटिका निर्मितीच्या अनुषंगाने शिफारशींकडे दुर्लक्षाचा फटका बसल्याचे समोर आले आहे.

आता पुन्हा कांदा बियाण्यांसाठी शोधाशोध करून, त्यात महागडे बियाणे खरेदी करून दुबार रोपवाटिका तयार कराव्या लागणार आहेत. मात्र बियाणे तुटवडा, त्यात होणारा काळाबाजार अशी आव्हाने शेतकऱ्यांसमोर आहेत. त्यातच ‘जितके रोप उशिरा तितकाच उत्पादनावर परिणाम’ असाही धोका शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे कांदा दर वाढल्यानंतर हस्तक्षेप करणाऱ्या केंद्र सरकारला व दराची ओरड करणाऱ्या ग्राहकांना हा फटका दिसणार का? असाही सवाल शेतकऱ्यांमधून आहे. मात्र सणासुदीच्या काळात कांदा उत्पादक अडचणीत सापडले आहे.

या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने नुकसान

मालेगांव, सटाणा, देवळा, कळवण, निफाड, येवला, चांदवड, सिन्नर.

नुकसान स्थिती
- अतिवृष्टीमुळे पाणी साचून बुरशीचे प्रमाण वाढले.
- सपाट वाफ्यावरच रोपनिर्मिती झाल्याने रोपांची मर.
- काही ठिकाणी रोपवाटिकांचे पूर्णतः नुकसान.
- दव पडत असल्याने रोपे पिवळी पडण्यासह करपा.

काय आहेत तज्ज्ञांनी सुचविलेल्या शिफारशी...

- पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची रोपवाटिकेसाठी निवड.
- बियाणे पेरणीपूर्वी जमिनीत ट्रायकोडर्मासारखा जैविक बुरशीनाशकांचा वापर.
- रोपवाटिकांमध्ये कांदा बियाणांची गादी वाफ्यावरच पेरणी.
- बियाणे गुणोत्तर निश्चित करून बियाणे पातळ टाकून रोपे विरळ राहतील असे नियोजन.

हानिकारक बुरशी वाढल्याने नुकसानीत वाढ

जमिनीत हानिकारक बुरशींचे प्रमाण वाढले आहे. कोलेटोट्रिकम, स्कलेरोशिअम, पिथिअम यांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे. अतिरिक्त ओलावा व निचरा न होणे, आर्द्रता वाढ जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी व जिवाणूंची संख्या कमी झाल्याने हानिकारक बुरशी वाढल्या आहेत. पावसामुळे नुकसान आहेच, परंतु शास्त्रीय पद्धती सांगूनही शेतकरी अंमलबजावणी करत नसल्याने हे नुकसान आहे. शिफारशीनुसार गादीवाफ्यावर रोपवाटिका तयार कराव्यात,असे कांदा पीक शास्त्रज्ञ व माजी अतिरिक्त संचालक, राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान (एनएचआरडीएफ)चे माजी अतिरिक्त संचालक डॉ. सतीश भोंडे यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले.

नवरात्र कालावधीत टाकलेले कांदा बियाणे रोपवाटिका बऱ्याच ठिकाणी खराब झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी बुरशीनाशकांच्या फवारण्या घेऊनसुद्धा रोप सुधारत नाहीत. त्यामुळे खर्च करूनही रोप वाया गेले आहेत.
पंडित वाघ, कांदा उत्पादक, बार्डे, ता. कळवण
रोपांची मर होऊन पूर्ण रोपवाटिका खराब झाल्या. पुन्हा बियाणे घेऊन रोप टाकावे लागेल. पण बाजारात पाहिजे ते बियाणे उपलब्ध नाही.
ज्ञानेश्वर कांगुणे, कांदा उत्पादक, दरसवाडी, ता. चांदवड
शेतकऱ्यांचे कांदा रोपांचे नुकसान ७० टक्के झाले आहे. दुबार कांदा बियाणे टाकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे. मात्र बाजारात कंपनीचे कांदा बीज महाग झाले आहे.
गजानन साळवे, कांदा उत्पादक, ताहाराबाद, ता. सटाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हळद सोयाबीनचे भाव टिकून; कापसात चढ उतार, हरभरा भाव दबावातच तर गव्हाची आवक वाढली

Gramrozgar Sevak Strike: ग्रामरोजगार सहायकांचा बेमुदत संप सुरू

Water Levels Drop: जलसंकटाची चाहूल! देशातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा ४५ टक्क्यांच्या खाली

Mango Farmer Demands: आंबा बागायतदारांना हेक्टरी दोन लाख रुपये द्या

Water Projects Issues: पाझर तलावाची दुरुस्ती निधीअभावी रखडली

SCROLL FOR NEXT