विलास चव्हाण, कु. सिंधू राठोड
Indian Agriculture : बहूपीक श्रेडर ही ट्रॅक्टरचलित मशिन शेतात विविध पिकांच्या लाकडे व अन्य अवशेषांचे लहान तुकडे तुकडे करते. ड्युअल-क्लचसह कोणत्याही ४५ एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे मशिन चालवता येते. ३ पॉइंट लिंकेजशी जोडून आणि ड्राइव्ह शाफ्टद्वारे ५४०/१००० आरपीएमसह चालविले जाऊ शकते.
शक्तिमान मल्टी क्रॉप श्रेडरमध्ये फीडिंग आणि श्रेडिंग प्रणाली असते. प्रथम, फीडिंग सिस्टिममध्ये पऱ्हाटी कापण्यासाठी डिस्क कटरसह दोन फीडर ड्रम आणि दोन प्रेशर रोलर ड्रम आहेत. त्यात अवशेष ओढून पुढे ढकलण्यासाठी एक स्प्रिंग-लोडेड स्विंग प्रकारही उपलब्ध आहे.
श्रेडिंग प्रणालीमध्ये सहा ब्लेड असलेले फ्लायव्हील असून, ते १६०० फेरे प्रति मिनीट या वेगाने फिरते. फ्लायव्हीलच्या परिघावर बसवलेले पॅडल कापलेल्या पिकाला अतिरिक्त लिफ्ट देतात. तो भुगा शेतात समप्रमाणात पसरला जातो.हेवी-ड्यूटी फ्लायव्हील विशेषतः सील आणि वंगणांनी संरक्षित केलेले बेअरिंग ओलावा, घाण आणि कचरा बाहेर ठेवतात. ४ ते ५ लिटर डिझेलमध्ये १.५ ते २ तासात एक एकर कापसाचे क्षेत्र कापता येते.
फायदे
कमीत कमी इंधनामध्ये पऱ्हाटीचे लहान तुकडे, भुगा केला जातो. हेक्टरी २ टन पऱ्हाटीपासून जमिनीला १२.४ ते २० किलो नत्र, १.६ किलो स्फुरद, आणि १२.२ ते १३.६ किलो पालाश मिळू शकतो. पऱ्हाटी जमिनीत गाडल्यानंतर जमिनीची सुपीकता आणि पाणी धारणक्षमता वाढते.
पऱ्हाटीचा भुगा केला जात असल्यामुळे त्यातील विविध किडींच्या सुप्तावस्थाही नष्ट होतात सध्या कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीच्या तीव्र प्रादुर्भावामागे पिकांच्या अवशेषामध्ये अळीचा जीवनक्रम पूर्ण होणे ही मोठी समस्या दिसते. तीही यामुळे कमी होते.
या पिकांच्या भुश्शांचा वापर नैसर्गिक आच्छादनाप्रमाणे विविध पिकामध्ये करता येतो. त्यामुळे मातीची धूप कमी करणे, मातीचे तापमान नियंत्रित करणे आणि विघटनानंतर मातीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढणे असे अनेक फायदे होताना दिसून येतात.
पीक अवशेषांचा वापर जनावरांसाठी चारा म्हणून करता येतो.
लगदा व कागद, हार्ड बोर्ड, फलक व पेटी, सूक्ष्म स्फटिकीय सेल्युलोज आणि अळिंबीच्या उत्पादनासाठी विविध उद्योगामध्ये या पीक अवशेषांचा वापर करता येतो.
पर्यावरणपूरक पऱ्हाटी व्यवस्थापनासाठी उपलब्ध यंत्रे
दोन रांगांतील पऱ्हाटी खेचण्याचे यंत्र
ट्रॅक्टरचलित अपरूटर
ट्रॅक्टरचलित स्लॅशर
ट्रॅक्टर ओढलेले व्ही-ब्लेड (V पास)
डिस्क नांगर/डिस्क हॅरो (पऱ्हाटी कापून शेतात पसरणे)
रोटाव्हेटर (पऱ्हाटी बारीक करून शेतात पसरविणे)
विलास चव्हाण, ९४२२३५६६६८ ,
कु. सिंधू राठोड, ८६९८४८०८७७,
(पी.एच.डी. विद्यार्थिनी, मृद् व कृषी रसायन विज्ञान विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.