Agriculture Technology : शेती क्षेत्रातील खते पेरणीच्या यंत्रणा

Article by Dr. Sachin Nalawade : या लेखामध्ये आता खत पेरणी करण्याच्या विविध यंत्रणा, फणांचे प्रकार यासोबतच टोकण यंत्र, शून्य मशागत पेरणी यंत्रे यांची माहिती घेऊ. त्याच प्रमाणे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पेरणी यंत्राचे समायोजन कशा प्रकारे करायचे याची माहिती घेऊ.
Agriculture Sowing Implement
Agriculture Sowing ImplementAgrowon

Fertilizer Sowing Technology :

खते पेरणीसाठी साधारणतः चार प्रकारच्या यंत्रणा वापरल्या जातात.

दातेरी तबकडी : ही खत पेरणी यंत्रणा वापरल्यामुळे खत गुरुत्वाकर्षणाने खाली पडते. यात एक कमी - अधिक करता येणारी खाच असून, त्यावर तबकडी फिरते. त्यामुळे खत ढवळले जाऊन खाली जोडलेल्या नळ्यांमध्ये पडते. यातील फिरत्या तबकडीमुळे खताचे गाठी फुटून बारीक होतात. मात्र, यातील एक समस्या म्हणजे पेरणी यंत्र चालू नसतानासुद्धा खत पडत राहते.

स्पर व्हील : वरील यंत्रणेमध्ये यंत्र सुरू नसतानाही खत पडत राहण्याची समस्या टाळण्यासाठी यामध्ये गिअरप्रमाणे दाते असणारे चाक वापरले जाते. या चाकाची जाडी खाचेच्या लांबीपेक्षा जास्त असते.

स्टार व्हील : ताऱ्यांप्रमाणे दिसणारे हे चाक आडवे फिरवले जाते. डब्यातील खत बाजूला जाऊन नळ्यांमध्ये पडते. त्यामुळे ठराविक अंतरावर समप्रमाणात खताचे वितरण केले जाते. परंतु, यासाठी बिव्हिल गिअरची यंत्रणा वापरावी लागते.

कप व्हील : गोल तबकडीवर चमच्यासारख्या खाचा असून, त्याद्वारे खत उचलले जाते. नळ्यात सोडले जाते. या यंत्रणेचा वापर दाणेदार खते पेरणीसाठी केला जातो. ही यंत्रणा खताचे वितरण चांगल्या प्रकारे करण्यास सक्षम आहे.

नळे :

काही शेतकरी टिकाऊ म्हणून लोखंडी पाइपच्या नळ्यांचा वापर पेरणीसाठी करतात. मात्र या नळ्यातून पडणारे बी दिसत नाही. त्यामुळे फणाच्या टोकाला माती चिटकून बिया नळीतच अडकून पडल्याचे अनेक वेळा लक्षात येत नाही. त्यामुळे पारदर्शी अशा प्लॅस्टिक पाइपचा वापर फायदेशीर ठरतो.

त्यामुळे बिया खाली पडताना दिसतात. तसेच बियाणे पेटी आणि फण यांच्यामधील मार्ग सरळ नसला तरी लवचिकपणामुळे बिया मातीपर्यंत वाहून सहज नेल्या जातात. अर्थात, नळे लावताना जास्तीत जास्त सरळ आणि कमी लांबीचे असेल, तितके चांगले. बियाणे वितरण यंत्रणेपासून बी पडल्यानंतर जमिनीपर्यंत पोहचताना नळीच्या भिंतीवर

इकडून-तिकडे आपटून मातीमध्ये पडण्यासाठी तुलनेने अधिक वेळ लागतो. हा वेळ प्रत्येक बी साठी वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे दोन रोपांमध्ये अंतर कमी जास्त होण्याची शक्यता असते. सामान्यतः बहुतांश पेरणी यंत्रांमध्ये बियाणे पेटी ही जास्तीत जास्त जमिनीजवळ ठेवली जाते.

Agriculture Sowing Implement
Agriculture Technology : सुधारित तंत्रातून वाढले उत्पादन ; अन् दर्जाही

फण :

पेरणी यंत्राचे फण हे खूपच महत्त्वाचे अंग आहे. याचे काम जमिनीत चर काढणे, बियाणे आणि खत योग्य खोलीवर आणि एकमेकांपासून योग्य अंतरावर टाकणे हे आहे. पुढील प्रकारचे फण पेरणी यंत्रांमध्ये वापरले जातात. जमिनीचा प्रकार आणि पूर्वीची धस्कटे इ. नुसार फणाचा योग्य प्रकार निवडावा.

कोळप्यासारखे फण - यामध्ये बदलता येणारे एक टोक असणारे किंवा दुतोंडी फावडे वापरले जाते. या फणामध्ये कल किंवा दुभाजित पायथा वापरतात. दुभाजित पात्यामुळे बिया आणि खत एकमेकांपासून काही अंतरावर पडतात. खत हे बी पासून साधारणतः ५ सें.मी. लांब आणि ५ सें.मी. खाली टाकले जाणे, ही शास्त्रीय दृष्ट्या योग्य पद्धत आहे. अशा प्रकारचे फण हलक्या आणि पालापाचोळा विरहित जमिनीत वापरता येतात. हे फण खोलवर जातात. जर यात स्प्रिंग लावून स्वयंचलित उचल यंत्रणा केली असल्यास खडकाळ आणि झाडांची मोठी मुळे असणाऱ्या जमिनीतही वापरता येतात.

बुटाप्रमाणे असणारे फण - या प्रकारामध्ये फण बारीक चर उकरतो. त्याच वेळी त्याच्या तळाची जमीन दाबून घट्ट करतो. याचे मुख्य फायदे म्हणजे कमीत कमी माती हलवतो, ढेकळे फोडतो. परिणामी या कामासाठी ओढशक्तीसुद्धा कमी लागते.

एका तव्याचा फण - ज्या ठिकाणी धस्कटे आहेत आणि खोल पेरणीची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी एका तव्याचा फण वापरतात.

दोन तव्यांचा फण - यामध्ये दोन तवे एकमेकांना लागून विशिष्ट कोनात फिरत असतात. यावेळी मध्यभागी एक छोटा वंखा तयार होतो त्यामुळे बिया आणि खत एकमेकांपासून साधारणतः १ इंच अंतरावर पडते. या प्रकारचे फण खोलवर आणि जास्त वेगाने पेरणी करण्यासाठी वापरतात. हे फण लहान आकाराच्या बिया आणि धस्कटे असणाऱ्या जमिनीत पेरण्याकरिता सर्वोत्तम आहेत.

पहारेचे फण - खूप कडक आणि ढेकळे असणाऱ्या जमिनीत पेरणीसाठी फणाच्या खालच्या टोकाला टोकदार पहारेचा वापर केला जातो.

शून्य मशागत पेरणी यंत्र (झिरो टिलेज) :

परंपरागत मशागतीमध्ये अगोदर खोल नांगरणी, मग कुळवणी, त्यानंतर पेरणी आणि आंतरमशागत अशा प्रक्रियांचा अंतर्भाव होतो. या सर्व कामासाठी शेतात चार वेळा यंत्रे फिरतात. त्यात इंधन, वेळ, पैसा खर्च होतो. तसेच जमिनीची तुडवण मोठ्या प्रमाणात होत असल्याने मातीमध्ये हवा खेळती राहत नाही.

पाण्याच्या निचऱ्यामध्ये अडचणी येतात. मोठ्या यंत्रांची उपलब्धता झाल्यामुळे जमिनीची सातत्याने खोलवर मशागत केल्याचे तोटे अलीकडे जाणवू लागले आहेत. जमिनीची सुपीकता आणि मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी पूर्वीच्या पिकांचे अवशेष, मुळे इ. जागेवरच कुजविण्याला मोठे महत्त्व आहे. त्याचे मृद संधारण, ऊर्जेची बचत आणि वेळेची बचत असे तीन फायदे होते.

शून्य मशागतीमध्ये फक्त पेरणीचे काम केले जाते. त्यामुळे पूर्वीचे पीक काढल्यानंतर त्वरित पुढील पिकाची पेरणी शक्य होते. यात मशागतीचा वेळ, पैसा दोन्ही वाचतात. परिणामी कमीत कमी किंवा शून्य मशागतीच्या तंत्राकडे जगभरातील शेतकरी वळत आहेत. शून्य मशागत पेरणी यंत्र विकसित करण्यात आले असून, त्याचा वापर भारी चिकण माती, पाणथळ (पाणी साठणारी) जमीन जोडून अन्य सर्व प्रकारच्या जमिनीत करता येतो.

खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर जमिनीत असणाऱ्या ओलाव्यावरच पुढील पीक उगवते. मातीमध्ये मुळांचे अंश, पृष्ठभागावर धस्कटे आणि पालापाचोळा शिल्लक राहतो. त्यामुळे जमिनीची धूप होत नाही. ओलाव्याचे बाष्पीभवन ही फारच कमी होते. अर्थात, या पद्धतीने पेरणी केल्यास तणांचे प्रमाण वाढते. तणांच्या नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या लागतात. उदा. तणनाशकाची फवारणी इ.

Agriculture Sowing Implement
Agriculture Technology : रोटाव्हेटरला पर्याय पॉवर हॅरो

टोकण यंत्रे :

पेरणी यंत्राची सुधारित आवृत्ती म्हणजे टोकण यंत्र होय. या यंत्रामुळे आपणास रोपांच्या ओळीमधील अंतराबरोबरच एकाच ओळीतील दोन रोपांमधील अंतर सुद्धा एकसमान ठेवता येते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले ज्योती टोकण यंत्र, सोलापूर शेती यंत्र इ.

बैलचलित यंत्रे टोकणीसाठी उपयोगी आहेत. या टोकण यंत्रामध्ये वेगवेगळ्या बियांसाठी उभ्या तबकड्या वापरल्या जातात. या यंत्राने दिवसभरात एक हेक्टरपर्यंत पेरणी करणे शक्य आहे. बैल जोडीने ओढता येणाऱ्या टोकण यंत्राचा प्रति हेक्टरी खर्च रु. ४०० इतका येतो.

केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ येथे अनेक प्रकारची पेरणी यंत्रे आणि टोकण यंत्र विकसित केले आहेत. यामध्ये लहान बियांसाठी बैलचलित तिफण, दुफण, दोन फणाचे बियाणे व खत पेरणी यंत्र, तीन फणाचे टोकण यंत्र, पॉवर टिलरचलित तिफण, ट्रॅक्टरचलित सहा ओळींमध्ये टोकण यंत्र यांचा समावेश आहे.

पेरणी यंत्रणेची पूर्व तपासणी आणि समायोजन :

पेरणी यंत्र शेतात वापरण्यापूर्वी बियाणे हेक्टरी योग्य प्रमाणात पडण्यासाठी यंत्रणेचे समायोजन करणे गरजेचे आहे. कारण प्रत्येक बियाण्याची जाडी, वजन व त्याचे पेरणीनंतर एकमेकांपासूनचे अंतर हे शिफारशीनुसार वेगवेगळे असू शकते. पिकाच्या शिफारशीमध्ये हेक्टरी बियाणांचे प्रमाण दिलेले असते. त्यानुसार हेक्टरी मात्रेनुसार बियाणे मोजणी आणि वितरण यंत्रणेचे समायोजन करावे लागते. यंत्र खरेदी करतानाच शेतकऱ्यांनी हे सर्व व्यवस्थित समजून घ्यावे.

या प्रक्रियेमध्ये प्रथम पेरणी यंत्रातून बाहेर पडणारे बियाणे मोजावे लागते. ही मोजणी करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे करावी.

प्रथम पेरणी यंत्राची रुंदी मोजावी. त्यासाठी एकूण फण किती आहेत, ते मोजावे. दोन फणातील अंतर मोजावे.

फणांची संख्या - ‘अ’

दोन फणातील अंतर - ‘ब’ (मीटर)

पेरणी यंत्राची रुंदी - ‘अ’ x ‘ब’ (मीटर)

पेरणी यंत्रातील बियाणे वितरण यंत्रणा फिरवणाऱ्या चाकाचा व्यास मोजावा. (त्याला ‘क’ म्हणू.) म्हणजे त्यावरून परीघ काढता येतो.

चाकाचा व्यास - ‘क’ (मीटर)

चाकाचा परीघ - ३.१४ ( म्हणजे पाय) x ‘क’

चाकाचा परीघ मोजला म्हणजे चाक एक वेळा पूर्ण फिरल्यास पेरणी यंत्र किती पुढे जाईल, हे आपणांस समजते.

चाकाचा परीघ मोजल्यामुळे १०० मीटर अंतर जाण्यासाठी पेरणी यंत्राच्या चाकाचे किती फेरे (त्याला ‘फ’ म्हणू.) लागतील, हे समजते.

या नंतर पेरणी यंत्र विटा/लाकडी ठोकळ्याच्या साहाय्याने जमिनीच्यावर उचलावे. त्यामुळे भूचक्र सहज फिरवता येईल. चाकावर एका ठिकाणी खडूने/रंगाने खूण करावी. तशीच खूण चौकटीवर करावी. म्हणजे चाकाचे फेरे मोजता येतील.

नंतर बियाणे पेटीमध्ये बियाणे भरावे. बिया वितरण यंत्रणेचे संयोजन करावे. नंतर प्रत्येक फणांच्या खाली बिया गोळा करण्यासाठी लहान घमेले, भांडे किंवा पिशवी लावावी. भूचक्राचे ‘फ’ इतके फेरे सामान्य गतीने फिरल्यानंतर प्रत्येक फणातून खाली पडणाऱ्या बियांचे वजन करावे. सर्व फणातून एक समान बी पडणे गरजेचे आहे.

या सर्व बियांचे एकत्रित वजन म्हणजे १०० X रुंदी इतक्या क्षेत्रासाठी लागणारे बियाणे होय. त्याला ‘ड’ म्हणू.

यावरुन प्रति हेक्टरी लागणारे बियाणे काढता येते.

प्रती हेक्टरी बियाणे = 10000 X ड /(100 X रुंदी) = 100 X ड / रुंदी

जर हे प्रमाण प्रमाणित केलेल्या प्रती हेक्टरी बियाण्याच्या दरापेक्षा कमी किंवा जास्त असेल तर बियाणे यंत्रणेतील समायोजन करावे. वरील प्रमाणे ‘ब’ भूचक्राचे ‘फ’ इतके फेरे फिरवून फणातून पडलेल्या बियांचे वजन करावे. जेव्हा पडणाऱ्या बियांचे प्रमाण हे प्रमाणित बियाणे दराइतके होईल, तेव्हा बिया मोजणी/वितरण यंत्रणेच्या तरफेवर खूण करून ठेवावी. पेरणी यंत्र शेतात वापरताना या समायोजनेचा वापर करावा. म्हणजेच शेतात पेरले जाणारे बियाणे प्रमाणित शिफारशीइतकेच असेल.

डॉ. सचिन नलावडे, ९४२२३८२०४९

(प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com