Soybean
Soybean  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Variety : सोयाबीन लागवडीसाठी योग्य जातींची निवड

Team Agrowon

डॉ. एस. एन. पोतकिले, डॉ. एकता बागडे, डॉ. एच. बी. गोरमनगर.

Soybean Variety For Sowing : विदर्भातील महत्त्वाचे तेलवर्गीय पीक म्हणून सोयाबीन पीक आहे. या पिकाखाली सुमारे १७ ते १८ लाख हेक्टर क्षेत्र आहे. सोयाबीन हे द्विदलवर्गीय पीक आहे.

पिकाच्या मुळावरील गाठीतील जिवाणू हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून पिकास उपलब्ध करून देते. सोयाबीनच्या झाडाचा पालापाचोळा जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. दुबार पीक व आंतरपिक पद्धतीसाठी सोयाबीन पीक अत्यंत उपयुक्त आहे.

सोयाबीन हे मुळचे थंड व समशीतोष्ण प्रदेशातील पीक आहे. तुलनेने भारतातील वातावरण उष्ण कटिबंधीय आहे. या हवामानात जुळवून घेऊन अधिक उत्पादन देण्याचे आव्हान या पिकाच्या बाबतीत असते.

विदर्भात मॉन्सून आगमनानंतर जून-जुलैमध्ये लागवड सोयाबीन केली जाते. त्यामुळे उष्णतेपासून पिकास दिलासा मिळतो. मात्र या काळात दिवसाचा कालावधी कमी असल्याने पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने उत्पादकता कमी होते.

उत्पादन घटण्यामागील कारणे ः

- दहा वर्षांपेक्षा जुन्या प्रसारीत वाणाचा वापर.

- बीज उगवणक्षमता न तपासता पेरणी.

- जैविक व रासायनिक बीज प्रक्रिया न करणे.

- योग्य खोलीवर (३.५ सेंमी) पेरणी न करणे.

- बी.बी.एफ. किंवा पट्टा पेर किंवा सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने लागवड न करणे.

- मूलस्थानी जल संधारण, सहा किंवा तीन ओळींनंतर मृत सरी न काढणे. संरक्षित सिंचनाचा अभाव.

- रासायनिक खतांची असंतुलित वापर.

- खतांची पेरणी बियाण्यांच्या खाली ५ सेंमी व बियाण्याच्या बाजूस २ सेंमीवर न करणे.

- गंधक व सूक्ष्म मूलद्रव्यांचा वापर टाळणे.

- पिकाच्या नाजुक अवस्थेत विद्राव्य खतांचा फवारणीद्वारे वापर न करणे.

- घरगुती बियाण्यांची प्रतवारी न करता पेरणी.

- हेक्टरी झाडांची संख्या योग्य न राखणे.

- आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा अभाव.

हवामानाचा प्रभाव ः

- सोयाबीन पिकाला दिवसाचे सरासरी तापमान २० ते २५ अंश सेल्सिअस असल्यास उत्पादन वाढीस फायदा होतो. परंतु रात्रीचे तापमान १२ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास आणि दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढल्यास उत्पादनात घट येते.

पीक उगवणीच्या काळात तापमान ३० अंश सेल्सिअस, तर फुलोरा अवस्थेत २२ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान आवश्यक असते. पिकाच्या वाढीकरीता सापेक्ष आर्द्रता ७० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास पिकाची वाढ चांगली होते.

- सोयाबीन पिकाची पेरणी १५ जून ते १५ जुलै या कालावधीत केली जाते. या कालावधीत मॉन्सूनच्या आगमनामुळे तापमानात आलेली घट ही पिकासाठी अनुकूल असते. मात्र या काळात दिवसाचा कालावधी दीड ते दोन तासांनी कमी झाल्याने पिकांची शाखीय वाढ अपेक्षित होत नाही. शाखीय वाढ पूर्ण होण्याआधीच फुलोरा येण्यास सुरुवात होते.

- सोयाबीनमध्ये पेरणीच्या तारखेपेक्षा दिवसाच्या लांबीचा प्रभाव हा फुलोरा येण्याच्या कालावधीवर जास्त पडतो. फुलोऱ्यापूर्वी असलेले ३० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान वनस्पतीच्या वाढीस चालना देते.

तर फुलोऱ्यानंतर रात्रीचा लांबलेला कालावधी फुलांच्या व शेंगाच्या वाढीस चालना देते. सोयाबीन पीक हे दिवसाच्या लांबलेल्या कालावधीस संवेदनशील असते. जेव्हा दिवसाचा कालावधी ठरावीक तासापेक्षा कमी होतो, त्या वेळी पीक कळी अवस्थेत येते.

साधारणतः फुले येण्याचा कालावधी हा २ ते ३ आठवड्यापर्यंत असतो. या काळात तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान असते (फुलोरा व शेंगा भरण्यापर्यंत). त्यामुळे पिकाच्या दाण्याची प्रतवारी घटून उत्पादन कमी होते.

- लवकर लागवड केलेल्या सोयाबीन पिकामध्ये शाखीय वाढ जास्त दिसून येते. तर उशिरा लागवड केल्यास (लहान दिवसाच्या कालावधीत) पूर्ण वाढ होण्यापूर्वीच ते लवकर फुलावर येते.

पीक लवकर परिपक्वता अवस्थेत आल्यामुळे पिकाची वाढ थांबते आणि उत्पादन घट येते. सोयाबीन पिकाचा परिपक्वता कालावधी कमी झाल्यास, उत्पादकता कमी होते. त्यामुळे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी वाणांची परिपक्वता कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे.

बियाणे ः

पेरणीसाठी घरचे राखून ठेवलेले बियाणे वापरताना स्पायरल सेपरेटरमधून त्याची प्रतवारी करून घ्यावी. त्यानंतर घरगुती पद्धतीने बियाण्यांची उगवणक्षमता तपासावी. उगवणक्षमता ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास, शिफारशीनुसार एकरी २४ किलो प्रमाणे बियाणे वापरावे.

चौकट ः

सुधारित वाण ः

वाण---प्रसारण वर्ष---५० टक्के फुलोऱ्यावर येण्याचा कालावधी (दिवस)---पिकाचा कालावधी (दिवस)---सरासरी उत्पादन (क्विं./हे)

१) पीडीकेव्ही अंबा (एएमएस-१००-३९)---२०२१---४२ ते ४४---९४ ते ९८---२८ ते ३०

२) सुवर्ण सोया (एएमएस -एमबी ५-१८)---२०१९---४१ ते ४५---९८ ते १०२---२४ ते २८

३) पीडीकेव्ही यलो गोल्ड (एएमएस-१००१)---२०१८---४० ते ४४---९५ ते १००---२२ ते २६

४) पीडीकेव्ही पूर्वा (एएमएस-२०१४-१)---२०२०---४० ते ४५---१०२ ते १०५---२२ ते २६

५) जे.एस २०-११६---२०१९---४० ते ४४---९५ ते १००---२६ ते २८

६) जेएस २०-९८---२०१८---४२ ते ४४---९६ ते १०१---२० ते २४

७) जेएस २०-३४---२०१४---३५ ते ३८---८६ ते ८८---२० ते २२

८) जेएस २०-२९---२०१४---३८ ते ४०---९३ ते ९६---२० ते २४

९) जेएस ९३-०५---२००२---३५ ते ३७---९० ते ९५---२० ते २४

१०) जेएस ३३५---१९९३---४० ते ४२---९८ ते १०२---२२ ते २४

११) एमएयूएस ६१२---२०१६---३८ ते ४१---९६ ते ९८---२४ ते २७

१२) एमएयूएस-१५८---२००९---३८ ते ४२---९६ ते ९८---२२ ते २५

संपर्क ः डॉ. एस. एन. पोतकिले, ९४२२२८४८३४

(डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT