Team Agrowon
गोगलगायी जून ते सप्टेंबर या काळात अत्यंत सक्रिय असतात व रोपावस्थेतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात त्यामुळे संपूर्ण पीक नष्ट होते. शंखी गोगलगायी अतीथंड व अतिउष्ण हवामानात आपल्या कवचाचे तोंड पातळ पापुद्र्याने बंद करुन झाडाला किंवा भिंतीला चिटकून सुप्त अवस्थेत जातात.
येणाऱ्या हंगामान मागील वर्षी प्रमाणे परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्त सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. एका शेतकऱ्याने उपाययोजना करुन हा उपद्रव पुर्णपने दूर होत नाही. तर सामूहिकरित्या उपाययोजना करण्याची गरज असते.
हंगामातील पहिला पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या मोहीम राबवून नदी, नाले, ओढे, ओहळ, कालवा, पांदण किंवा पाणी साचलेला सखल भागात सुप्तावस्थेत असलेल्या गोगलगायी गोळा करुन नष्ट कराव्यात.
मे महिन्यात शेताची खोल नांगरट करावी. जेणेकरुन गोगलगायीच्या सुप्ताअवस्था नष्ट होतील. भिंती, भेगा, दगड, बांधावरुन दिवसा लपून बसलेल्या गोगलगायी शक्य तितक्या प्रमाणात जमा करुन प्लास्टिकच्या पोत्यात भरुन त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून नष्ट कराव्यात.
मागील वर्षीच्या गोगलगाय प्रादुर्भावग्रस्त भागांमध्ये शेतकऱ्यांनी शेताच्या बांधाच्या जवळ दोन्ही बाजूने १ ते २ फुटाचे चर काढावेत. शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आत ८ किलो प्रती एकर याप्रमाणे तंबाखू भुकटीचा, कोरड्या राखेचा अथवा चुन्याचा १० सेंमी रुंदीचा पट्टा गोगलगायींना शोतात जाण्यास प्रतिबंध म्हणून व नयंत्रणासाठी टाकावा.
फळबागेमध्ये झाडाच्या खोडास १ किलो मोरचूद अधिक १ किलो चुना १० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेली १० टक्के बोर्डोपेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाहीत. याव्यतीरिक्त अंड्याच्या टरफलाचा चुरा, कोरडी राख,तांब्याची पट्टी अथवा जाळी, बोरिक पावडर चा वापर गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी करता येतो.
जैविक व्यवस्थापनामध्ये एकरी ८ किलो निंबोळी पावडर, एकरी २० किलो निंबोळी पेंड, ५ टक्के निंबोळी अर्क या वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर बांधावर केल्यास गोगलगायींना शेतात येण्यापासून रोखता येईल.