Chana Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Cultivation : हरभरा लागवडीसाठी निवडा सुधारित वाण

Team Agrowon

डॉ. सुधीर माने, अमोल ढोरमारे

Chana Farming :

जमीन

मध्यम ते भारी (४५ ते ६० सें.मी. खोल) पाण्याचा - उत्तम निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत जमीन आवश्यक.

उथळ, हलकी चोपण अथवा पाणथळ, क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी वापरू नये.

साधारणतः ६.५ ते ८.० सामू असणाऱ्या जमिनीत हरभरा पीक चांगले येते.

हवामान

हरभऱ्यास थंड व कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो.

विशेषतः पीक २० दिवसांचे झाल्यानंतर किमान तापमान सर्वसाधारणतः १० ते १५ आणि कमाल तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअस असेल तर पिकाची वाढ चांगली होऊन भरपूर फांद्या, फुले आणि घाटे लागतात.

वार्षिक ७०० ते १००० मी.मी पर्जन्यमान असणाऱ्या भागात जिरायत हरभरा पीक चांगले येते.

पूर्वमशागत

हरभऱ्याची मुळे खोल जात असल्याने जमीन भुसभुशीत असणे आवश्यक असते. खरीप पीक निघाल्याबरोबर जमिनीची खोल (२५ सें.मी.) नांगरट करावी आणि त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात.

खरिपात शेणखत किंवा कंपोस्ट खत दिले नसल्यास हेक्टरी ५ टन कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत नांगरणीपूर्वी जमिनीवर पसरावे.

कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर काडीकचरा वेचून जमीन पेरणीसाठी स्वच्छ करावी.

पेरणीची वेळ व पद्धत

जिरायत हरभऱ्याची पेरणी जमिनीत पुरेसा ओलावा असताना ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. त्याच्या उगवण आणि वाढीसाठी परतीच्या पावसाचा फायदा होऊ शकतो. जिरायत क्षेत्रात बियाणे खोलवर (१० सें.मी.) पेरणी करावी.

बागायत क्षेत्रात पाणी देण्याची सोय असल्यामुळे हरभऱ्याची पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरच्या दरम्यान करता येते. बागायतीमध्ये कमी खोलीवर (५ सें.मी.) हरभरा पेरणी केली तरी चालते. पेरणीस जास्त उशीर झाल्यास किमान तापमान खूपच कमी होऊन उगवण उशिरा आणि कमी होते. पिकाची वाढ कमी होऊन फांद्या, फुले व घाटे कमी लागतात. यासाठी जिरायत तसेच बागायत हरभऱ्याची पेरणी वेळेवर करणे आवश्यक आहे.

पेरणी करताना दोन ओळींतील अंतर ३० सें.मी. आणि दोन रोपांतील अंतर १० सें.मी. राहील अशा पद्धतीने पेरणी पाभरीने किंवा तिफणीने करावी. म्हणजे प्रतिहेक्टरीअपेक्षित रोपांची संख्या मिळते.

काबुली हरभऱ्याची पेरणी सिंचनाची सोय असेल तरच करावी. काबुली हरभऱ्यासाठी दोन ओळींतील अंतर ४५ सें.मी व दोन रोपांतील अंतर १० सें.मी ठेवून पेरणी करावी.

बियाण्याचे प्रमाण

हरभऱ्याच्या विविध दाण्यांच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण वापरल्याने हेक्टरी रोपाची संख्या अपेक्षित मिळते.

विजय या मध्यम दाण्याच्या वाणाकरिता ६५ ते ७० किलो, तर विशाल, दिग्विजय आणि विराट या टपोऱ्या दाण्यांच्या वाणाकरिता १०० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे.

कृपा आणि पी. के. व्ही. ४ या जास्त टपोऱ्या काबुली वाणांकरिता १२५ ते १३० किलो प्रतिहेक्टर बियाणे वापरावे

हरभरा सरी - वरंब्यावरही चांगला येतो. ९० सें.मी. रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात व वरब्यांच्या दोन्ही बाजूंना १० सें.मी. अंतरावर बियाणे टोकावे.

बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ६ ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. यानंतर १० किलो बियाण्यास रायझोबिअम व पीएसबी या जिवाणू संवर्धकाचे प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे गुळाच्या थंड द्रावण तयार करून ते बियांना चोळावे. बियाणे तासभर सावलीत सुकवल्यानंतर त्याची पेरणी करावी. यामुळे पिकाचे रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होते. मुळावरील नत्राच्या ग्रंथी वाढून नत्राची उपलब्धता वाढते.

खत मात्रा

सुधारित हरभरा वाण संतुलित खत मात्रा आणि पाण्याला चांगला प्रतिसाद देतात.

अ) सेंद्रिय खते : चांगले कुजलेले ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट प्रति हेक्टर शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे.

ब) रासायनिक खते : हरभऱ्याला हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश खताची आवश्यक. यासाठी हेक्टरी १२५ किलो डायअमोनिअम फॉस्फेट (डीएपी) आणि ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश पेरणीच्या वेळी बियाण्यालगत पडेल या पद्धतीने दुचाडी पाभरीने पेरून द्यावे. खत विस्कटून टाकू नये.

पीक फुलोऱ्यात असताना आणि घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये किंवा या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास युरियाची (२ टक्के) म्हणजेच २० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे पहिली फवारणी करावी. त्यानंतर १० ते १५ दिवसांनी दुसरी फवारणी पोटॅशिअम नायट्रेटची २ टक्के (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी. यामुळे पीक उत्पादनात वाढ होते.

आंतरमशागत

पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरुवातीपासूनच तणविरहित ठेवावे. पीक २० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वाफशावर करावी. कोळपणीमुळे तणांचा बंदोबस्त होऊन जमिनीत हवा चांगली खेळती राहते. पिकाची वाढ चांगली होते. कोळपणीनंतर एक खुरपणी करावी. कोरडवाहू क्षेत्रांमध्ये कोळपणीमुळे जमिनीत पडत असलेल्या भेगा बुजून जातात आणि ओल टिकून राहते. तणनियंत्रणासाठी तणनाशक वापरायचे असल्यास, पेरणीनंतर लगेच परंतु पीक उगवणीपूर्वी वाफशावर पेंडीमिथॅलीन २.५ लिटर प्रति हेक्टर प्रमाणे ५०० लिटर पाण्यातून फवारावे. फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा.

आंतरपीक

हरभरा पीक करडई, मोहरी, ज्वारी, ऊस या पिकांसोबत घेता येते.

आंतर पिकाचा प्रकार (ओळींचे प्रमाण) ः हरभरा + करडई (२:१), हरभरा + मोहरी (२:१), हरभरा + रब्बी ज्वारी (६:१).

उसामध्ये सरीच्या दोन्ही बाजूंस किंवा वरंब्याच्या टोकावर १० सेंटिमीटर अंतरावर हरभऱ्याची एक ओळ टोकण केल्यास हरभऱ्याचे चांगले उत्पादन मिळतेच, पण त्याचा बेवड ऊस पिकासाठी उपयुक्त ठरतो.

पाणी व्यवस्थापन

हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे २५ सेंटिमीटर पाणी लागते. प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर ७ ते ८ सेंटिमीटर देणे गरजेचे असते. जास्त पाणी दिले, तर

पीक उभळण्याचा धोका असतो. स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या

भेगा पडण्याच्या आतच पिकास पाणी द्यावे. पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी, अन्यथा मूळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते.

अ) जिरायत क्षेत्रासाठी

जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे.

ब) बागायती क्षेत्रासाठी

बागायत हरभरा शेताची रानबांधणी करताना दोन सरींतील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी सुद्धा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी, त्यामुळे पिकाला प्रमाणशीर पाणी देणे सोयीचे होते. हरभरा पिकास तुषार सिंचन अतिशय उपयुक्त आहे, त्यामुळे पाण्याची ३३ टक्के बचत होते आणि उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.

पीक अवस्था बागायती (दिवसांनी) दोन पाणी (दिवसांनी) एक पाणी (दिवसांनी)

वाढीच्या अवस्थेत २० ते २५ ०० ००

फुलोऱ्यात असताना ४५ ते ५० ३० ते ३५ ३५ ते ४०

घाटे भरताना ६५ ते ७० ५५ ते ६०

पीक संरक्षण

एकात्मिक किड व्यवस्थापनाच्या दृष्टीने सध्या करावयाच्या उपाययोजना :

पेरणीच्या वेळी हेक्टरी २०० ग्रॅम ज्वारी शेतामध्ये पेरावी. त्यामुळे मित्रकीटक व पक्षी आकर्षित होतात. त्याचा पक्षी थांब्याप्रमाणे होतो. पक्ष्यांना बसायला जागोजागी तूर काटक्याची मचाणी लावावीत. त्यावर कोळसा, चिमण्या, साळुंख्या असे पक्षी येऊन अळ्या वेचतात.

हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत. त्यामुळे किडीचे नेमके प्रमाण कळते.

मर रोगाचा प्रादुर्भाव ‘फ्युजारियम ऑक्सिस्फोरम’ या बुरशीमुळे होतो. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ६ ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम या जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. तसेच पुढे लक्षणे दिसल्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची २० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी.

अधिक उत्पादनासाठी सुधारित जाती

जात पक्वतेचा कालावधी (दिवस) उत्पादन

(क्विं./ हेक्टर) वैशिष्ट्ये

विजय जिरायती ८५ ते ९०, बागायती १०५ ते ११० जिरायती १४, बागायती २३, उशिरा १६ अधिक उत्पादन क्षमता, मररोग प्रतिकारक्षम, जिरायती बागायती, तसेच उशिरा पेरणी योग्य, अवर्षण प्रतिकारक्षम, गुजरात राज्यासाठी प्रसारित.

दिग्विजय जिरायती ९०-९५, बागायती १०५-११० जिरायती१४, बागायती २३, उशिरा २१ पिवळसर तांबूस टपोरे दाणे, मर रोगप्रतिकारक, जिरायती बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, महाराष्ट्रासाठी प्रसारित.

फुले विक्रम १०५-११० जिरायती १६ बागायती २२, उशिरा २१ घाटे जमिनीपासून १ फुटाच्या वर लागतात, वाढीचा कल उंच असल्यामुळे यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यास उपयुक्त, मररोग प्रतिकारक्षम, अधिक उत्पादन क्षमता, जिरायती, बागायती तसेच उशिरा पेरणीस योग्य, पीक पक्व झाल्यावर घाटे गळत नाहीत.

फुले विक्रांत १०५-११० २० पिवळसर तांबूस मध्यम आकाराचे दाणे, मररोग प्रतिकारक्षम, बागायती पेरणीस योग्य.

फुले विश्वराज ९५-१०५ १५-१६ मररोग प्रतिकारक्षम, पश्चिम महाराष्ट्रात जिरायती पेरणीस योग्य.

जाकी - ९२१८ १०५ -११० १८-२० टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक्षम, जिरायती तसेच बागायत पेरणीस योग.

साकी - ९५१६ १०५-११० १८-२० मध्यम आकाराचे दाणे मर रोगप्रतिकारक जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य.

पीडीकेव्ही कांचन १०५-११० १८-२० टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक्षम, जिरायती तसेच बागायती पेरणीस योग्य,विदर्भ विभागासाठी प्रसारित.

बीडीएनजी - ७९७ (आकाश) १०५-११० जिरायती १५, बागायती २० मध्यम आकाराचे दाणे, मररोग प्रतिकारक्षम, अवर्षण प्रतिकारक्षम, मराठवाडा विभागासाठी प्रसारित.

काबुली जाती

कृपा १०५-११० १८ जास्त टपोरे दाणे, १०० दाण्याचे वजन ५९.४ ग्रॅम असलेली जात, सफेद पांढरे दाणे, सर्वाधिक बाजारभाव.

विराट ११०-११५ जिरायती ११, बागायती १९ अधिक टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक्षम, महाराष्ट्रासाठी प्रसारित.

पीकेव्ही-२ १००-१०५ १२-१५ अधिक टपोरे दाणे, मररोग प्रतिकारकक्षम, अधिक बाजार भाव.

पीकेव्ही -४ १००-११० १२-१५ अधिक टपोरे दाणे, मररोग प्रतिकारकक्षम, अधिक बाजारभाव.

- डॉ. सुधीर माने, (कृषी विद्या विभाग), ९५०३५८२५९६

- अमोल ढोरमारे, (कृषी कीटकशास्त्र), ९६०४८३३७१५

(सहाय्यक प्राध्यापक, सौ. के. एस. के काकू कृषी महाविद्यालय, बीड)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2025 : तेलबिया पिकांसाठी भावांतरचा पर्याय तर कडधान्याची खरेदी वाढवा; कृषी मूल्य व किंमत आयोगाची शिफारस

Soybean Market : सोयाबीनच्या ‘शेतीमाल तारण’ला ओलाव्याची अडचण

Crop loan Distribution : रब्बीसाठी पीक कर्जवितरण आढावा बैठकच नाही

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन नरमले; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आले दर?

Flood Damage Compensation : २०२० चा पीक विमा बीड जिल्ह्याला मिळालाच नाही; खंडपीठाचे राज्य शासनासह बीडचे जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावण्याचा आदेश

SCROLL FOR NEXT