Seeding Process  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Team Agrowon

डॉ. दत्तात्रय गावडे

Indian Agriculture : पिकांच्या दर्जेदार उत्पादनासाठी वाण निवड, सुयोग्य जमिनीची निवड, सिंचन- खत व्यवस्थापन, पीक संरक्षण आदी बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यासोबतच लागवडीपूर्वी बियाणास शिफारशीत घटकांची बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. लागवडीसाठी हलके, कीड-रोगमुक्त, आकाराने लहान बियाणांची निवड महत्त्वाची ठरते. जमिनीतून तसेच बियाण्याद्वारे पसरणाऱ्या कीड-रोगांपासून संरक्षण होण्यासाठी पेरणीपूर्वी बियाणास जैविक व रासायनिक घटकांची बीजप्रक्रिया महत्त्वाची ठरते. बीजप्रक्रियेमुळे बियाणांभोवती जैविक व रासायनिक बुरशीनाशकांचे सुरक्षित कवच तयार होते. त्यामुळे रोपांचे रोगांपासून संरक्षण होण्यास मदत होते.

बीजप्रक्रियेचे महत्त्व

बहुतांश कीड-रोगांच्या अवस्था या जमिनीमध्ये सुप्तावस्थेत असतात. पोषक वातावरण मिळताच त्यांचा पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो. पिकांवर येणाऱ्या रोगांना कारणीभूत असलेल्या बऱ्याच सूक्ष्मजीवांचा प्रसार जमिनीतून व बियाणांद्वारे होत असतो. हाच प्रादुर्भाव कमी करून पिकांची सशक्त व जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यामुळे पीक उगवणीच्या तसेच वाढीच्या प्राथमिक अवस्थेत होणारा कीड-रोगांच्या प्रादुर्भाव अटकाव करण्यास मदत मिळते.

घ्यावयाची काळजी

बीजप्रक्रिया करताना शिफारशीत जैविक तसेच रासायनिक घटकांचा शिफारशीत प्रमाणात वापर होईल याची काळजी घ्यावी. कमी किंवा जास्त प्रमाणात वापर झाल्यास त्याचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत.

बीजप्रक्रिया केलेले बियाणे लगेच हवाबंद डब्यात किंवा प्लास्टिक पिशवीत भरू नये. बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे थंड व कोरड्या जागी सावलीत किमान २४ ते ४८ तास सुकण्यास ठेवावे. त्यानंतरच पेरणी करावी.

बीजप्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीने हातामध्ये हातमोजे किंवा प्लॅस्टिक पिशवीचा वापर करावा. जेणेकरून रासायनिक घटकांचा हातासोबत संपर्क होणार नाही.

डोळ्यांवर चष्मा तसेच नाकाला रुमाल बांधावा अथवा मास्क वापरावा.

बीजप्रक्रिया केलेले आणि पेरणीनंतर शिल्लक राहिलेले बियाणे जनावरांच्या किंवा मानवी खाण्यात येणार नाही याची काळजी घ्यावी.

विकत घेतलेल्या बियाणांवर बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची बीजप्रक्रिया केली असल्यास अशा बियाणांवर फक्त जिवाणू खतांची बीजप्रक्रिया करावी.

बीजप्रक्रिया करताना तंबाखू खाणे, पाणी पिणे, सिगारेट ओढणे टाळावे.

बीजप्रक्रिया करण्याच्या पद्धती

भौतिक पद्धत

गरम पाणी उपचार पद्धत

बियाणे कापडी पिशवीत ठेवून ही पिशवी गरम पाण्यात ठेवावी. काही वेळानंतर बियाण्याची पिशवी गरम पाण्यातून काढून काही वेळासाठी थंड पाण्यामध्ये ठेवावी. त्यानंतर बियाणे सुकण्यासाठी ठेवून लगेच बीजप्रक्रिया करून पेरणी करावी.

उदा. गहू पिकातील काणी रोगासाठी ४९ अंश सेल्सिअस तापमानामध्ये ९० ते १२० मिनिटे बियाणे गरम पाण्यात ठेवावे. वाटाणा पिकातील जीवाणूजन्य करपा रोगासाठी ५५ अंश सेल्सिअस तापमानात १५ मिनिटे बियाणे गरम पाण्यात ठेवावे.

जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया

२५० ग्रॅम जिवाणू संवर्धकाचे पाकीट १० ते १५ किलो बियाण्यास वापरावे. एक लिटर गरम पाण्यात १५० ते २५० ग्रॅम गूळ टाकून द्रावण तयार करावे. द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये २५० ग्रॅम जिवाणू संवर्धक मिसळावे. त्यानंतर दहा किलो बियाणे स्वच्छ जागेवर प्लास्टिक किंवा ताडपत्रीवर बियाणांचा पातळ थर पसरून त्यावर तयार केलेले मिश्रण शिंपडावे. हलक्या हाताने बियाणांस समप्रमाणात लेप बसेल असे हळुवारपणे लावावे. बीजप्रक्रिया करताना बियाणाचा पृष्ठभाग (साल) खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यानंतर प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत स्वच्छ कागदावर सुकवावे. बीजप्रक्रिया केलेल्या बियाणांची २४ तासांच्या आत पेरणी करावी.

बियाण्यास प्रथम रासायनिक बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर दोन ते तीन तासांनी हलके बियाणे वेगळे करावे. त्यानंतर जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा, रायझोबिअम, ॲझोटोबॅक्टर तसेच स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत यांचे मिश्रण करून लावावे.

बीजप्रक्रियेकरिता ट्रायकोडर्मा वापर

सर्व रब्बी पिकांमध्ये (हरभरा, ज्वारी, गहू, ऊस, मका इत्यादी) ट्रायकोडर्मा (१ टक्के डब्ल्यूपी)

५ ते १० ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणे

बीजप्रक्रिया करावी. ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया केल्यामुळे मर व मूळकूज व खोडकूज, कॉलर रॉट, कोरडी मूळकूज या रोगांपासून पिकाचे संरक्षण होण्यास मदत होते.

विविध पिकांसाठी बीजप्रक्रिया

पीक पिकास जमिनीतून व बियाण्यापासून होणारे रोग बीजप्रक्रिया प्रमाण (प्रति किलो बियाणे)

हरभरा मर व मूळकूज व खोडकूज कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) किंवा थायरम (७५ टक्के डब्ल्यूएस) किंवा कार्बोक्सिन (३७.५ टक्के) अधिक थायरम (३७.५ टक्के डब्ल्यूपी) किंवा कार्बेन्डाझिम (२५ टक्के) अधिक मॅन्कोझेब (५० टक्के डबल्यू. पी.) ३ ते ५ ग्रॅम

ज्वारी दाण्यावरील बुरशी व करपा थायरम (७५ टक्के डब्ल्यूएस) किंवा कार्बोक्सिन (३७.५ टक्के) अधिक थायरम(३७.५ टक्के डब्ल्यूपी) ३ ते ५ ग्रॅम

केवडा/गोसावी मेटालॅक्झिल (३१.८ ई.एस) २ मिलि

गहू पानावरील करपा/काजळी किंवा काणी/ तांबेरा थायरम (७५ टक्के डब्ल्यू. एस.) किंवा टेब्यूकोनॅझोल (२ टक्के डी.एस.) ३ ते ५ ग्रॅम

बीजप्रक्रियेचे फायदे

उगवण चांगली होण्यास मदत मिळते. तसेच पिकांची मुळे सशक्त होऊन पिकाची जोमदार वाढ होते.

जमिनीद्वारे तसेच बियाणांद्वारे उद्भवणाऱ्या रोगांना अटकाव करता येतो.

पेरणीसाठी एकसारखे बियाणे उपलब्ध होते व पेरणी सुलभ होते.

रासायनिक खतांची २० ते २५ टक्के बचत होते.

जमिनीतून व बियाणांद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.

बीजप्रक्रियेमुळे बियाणाभोवती जैविक व रासायनिक बुरशीनाशकांचे सुरक्षित कवच तयार होते. त्यामुळे रोपांचे रोगांपासून संरक्षण होण्यास मदत होते.

पीक संरक्षणावर होणारा अतिरिक्त खर्च कमी होतो.

साठवणुकीदरम्यान बियाण्याचे रोगांपासून संरक्षण होते.

- डॉ. दत्तात्रय गावडे, ९४२१२७०५१०

(पीक संरक्षण विषयतज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season : सांगली जिल्ह्यात पावसामुळे गाळप हंगाम लांबण्याची शक्यता

Crop Damage Compensation : खानदेशात ‘केवायसी’अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड रखडली

Vidhan Sabha Election Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात २१.२४ लाख मतदार

Vidhan Sabha Election Beed : बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघात २१ लाखांवर मतदार

SCROLL FOR NEXT