Crop Protection : पक्षी-प्राण्यांपासून पीक वाचविण्याच्या यंत्रणा

Crop Security : आधुनिक काळात पिकाची राखण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यासाठी कृषी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये नवीन संशोधन होत असून, त्यातून तयार झालेल्या यंत्रणांची माहिती या लेखात घेऊ. त्यातील काही यंत्रणा अगदी घरगुती साहित्यातून तयार करता येतात.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon
Published on
Updated on

डॉ. सचिन नलावडे

Agriculture Technology :

आली-आली रे सुगी आली,

शेतकऱ्यांची लगबग झाली!

कणसा-कणसांत भरले दाणे,

तसे वाढले पाखरांचे गाणे ।

घेई गोफण हातात,

तेव्हा येईल धान्य ते घरात ।।

बाजरी, ज्वारी आणि इतर धान्य पिकांत दाणे भरत असल्याचे सर्वात आधी समजते ते पक्ष्याप्राण्यांना. अन्नाच्या शोधात असणारे या सजीवांचा मोर्चा या पिकांकडे वळतो. कणसांमध्ये तयार झालेले धान्य खाण्यासाठी पाखरे, मोर, हरीण, रानडुकरे आणि उंदीर, घुशी यांचा हल्लाच शेतावर होतो. ही बाब शेतकऱ्यांनाही चांगलीच माहिती असल्यामुळे पीक वाचविण्यासाठी त्यांचीही धडपड सुरू होते. शेतात बुजगावणे लावण्यापासून शेतात मचाण उभारून हातात गोफण घेऊन पिकाची राखण करण्यांची सर्वत्र धांदल उडते.

पक्षी प्रतिबंधक हे सामान्यतः पक्ष्यांना विशिष्ट भागात येण्यापासून रोखण्यासाठी वापरले जाणारे उपकरण किंवा पद्धती असतात. यामध्ये पक्षी घाबरवणारे पतंग, शिकारी डेकोय, ऑडिओ उपकरणे यांचा समावेश असू शकतो. शेताचा परिसर अन्नाच्या उपलब्धतेमुळे पक्ष्यांना आकर्षित करत असला तरी आवाज, प्रकाश व अन्य घटकांद्वारे तो परिसर पक्ष्यांसाठी अनाकर्षक किंवा अस्वस्थ बनविणारा केला जातो. आपल्या शेत परिसराचा अभ्यास करून विशिष्ट परिस्थितीनुरूप अनुकूल अशा उपकरणाची निवड करावी.

पक्ष्यांना घाबरविणारे पतंग :

बहिरी ससाण्यासारख्या मोठ्या शिकारी पक्ष्यांना छोटे पक्षी नैसर्गिकरीत्या घाबरतात. शेत परिसरामध्ये असे शिकारी पक्षी फिरत असल्यास पक्षी त्या भागामध्ये येण्याचे टाळतात. परदेशामध्ये अशा मोठ्या पक्ष्यांना शेताच्या संरक्षणासाठी पाळले जाते. अलीकडे या भक्षकांचे स्वरूप आणि हालचालींचे अनुकरण करणारे पतंग तयार करून उडवले जातात. त्यांच्या भीतिदायक स्वरूपाव्यतिरिक्त हे पतंगदेखील वाऱ्यानुसार अनपेक्षितपणे फिरतात. या हालचालींमुळे भ्रम वाढून पक्षी शेतापासून दूर राहतात. पक्ष्यांना घाबरविणाऱ्या या पतंगामध्ये मोठा आवाज, रसायने किंवा अन्य पर्यावरणात प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी नसतात. त्यामुळे त्यांना पर्यावरणास अनुकूल मानले जाते.

Agriculture Technology
Crop Protection : उपयुक्त बुरशींद्वारे पर्यावरणपूरक पीक संरक्षण

बुजगावणे :

हे दृश्य पक्षी प्रतिबंधकांचे आणखी एक उदाहरण आहे. त्यात घुबड, ससाणा, कोल्हे आणि लांडगे यांसारख्या पक्ष्यांची शिकार करणाऱ्या नैसर्गिक भक्षकांचा नक्कल करणाऱ्या घटकांचा समावेश होतो. आपल्याकडे माणसांच्या आकाराचे स्थिर बुजगावणे पारंपरिकरीत्या उभारले जाते. मात्र, त्यात हालचाल, आवाज नसल्याने काही काळात पक्षी स्थिर स्थावर होतात. हे टाळण्यासाठी सर्वांत कार्यक्षम शिकारी बुजगावण्यामध्ये काही हालचालींचा समावेश केलेला असतो. अशी बहुतेक मॉडेल्स ही वाऱ्यावर चालणारी असतात. त्यात वाऱ्याच्या झुळुकेने होणाऱ्या हालचाली त्यांना अधिक भयप्रद बनवितात.

काही पक्ष्यांच्या बाबत त्याच्याच प्रजातीच्या पक्ष्यांची नक्कल केली जाते. त्यामुळे ते क्षेत्र आधीच व्यापले असल्याचे समजून अन्य ठिकाणांकडे पक्षी मोर्चा वळवतात. उदा. सुतार पक्षी, बगळ्यांना रोखण्यासाठी असे अधिक कार्यक्षम ठरतात.

आवाज करणारी तोफ :

गॅसवर चालणाऱ्या या तोफेतून बाहेर पडणाऱ्या मोठ्या आवाजामुळे वन्यजीव आणि पाखरे पळून जातात. ही तोफ सहज उपलब्ध असणाऱ्या आणि किफायतशीर एलपीजी सिलिंडरद्वारे चालते. यामध्ये गॅसचा छोटा स्फोट घडवून त्याचा आवाज ध्वनिक्षेपक नळीद्वारे व्यापक क्षेत्रापर्यंत पसरवला जातो. त्यामुळे कबूतर, पोपट या सारखे थव्याने येणारे पक्षी, माकडे, हरणे, रानडुक्कर असे अनेक वन्यजीव घाबरून पळून जातात.

- हे यंत्र एलपीजी वायूवर २० बार दाबापर्यंत कार्य करते. एका घरगुती एलपीजी सिलिंडरद्वारे साधारणतः २४,५०० स्फोट करणे शक्य आहे.

- दोन स्फोटांदरम्यानचे अंतर हे ३० सेकंदापासून २० मिनिटापर्यंत गरजेनुसार बदलता येते.

- या तोफेद्वारे तयार झालेला १२०-१२५ डीबीएस आवाज ५००० वर्गमीटर क्षेत्रामध्ये प्रभावी ठरतो.

- ही खराब हवामानात सुद्धा चालते. याचे प्लॅस्टिकचे भाग अतिनील किरणरोधक असतात, आणि धातूच्या भागांवर जस्ताची कलई केलेली असते. त्यामुळे शेतात उन्हापावसात राहून खराब होत नाही.

Agriculture Technology
Agriculture Technology : एअर असिस्टेड स्प्रेअरचा वापर

प्राण्यांचे आवाज करणारा लाउड स्पीकर :

ऑडिओ उपकरणे पक्ष्यांना शेतापासून दूर ठेवण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. ही उपकरणे पक्ष्यांना अप्रिय किंवा धोकादायक वाटणारे आवाज उत्सर्जित करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. त्यामुळे पक्षी त्यांच्या जवळपास येण्याचे टाळतात. काही ध्वनी शिकारी प्राण्यांच्या आवाजाची किंवा पक्ष्यांच्याच धोक्याच्या सूचनांची नक्कल करतात. त्यातून पक्ष्यांना ते क्षेत्र असुरक्षित असल्याचे संकेत देतात. काही यंत्रामध्ये ‘अल्ट्रासोनिक फ्रिक्वेन्सी’ उत्सर्जित करत असतात. यातील काही आवाज पक्ष्यांना अप्रिय असले तरी माणसांना ऐकू येत नसल्याने त्यांचा त्रास होत नाही. तसेच ध्वनी प्रदूषणही होत नाही. घरगुती छोट्या बागांसाठी लहान, तर शेतासारख्या मोठ्या क्षेत्रासाठी मोठी प्रतिबंधक यंत्रे उपलब्ध आहेत. लहान यंत्रे स्वस्त वाटली तरी ती मोठ्या क्षेत्रावरील पक्ष्यांच्या मोठ्या कळपांना रोखण्यासाठी कार्यक्षम नसतात. त्यांच्या क्षमतांचा व आपल्या शेतक्षेत्राचे अंदाज घेऊनच खरेदीचे निर्णय घ्यावेत. खास मोठ्या कृषी क्षेत्रात वापरण्यासाठी अधिक शक्तिशाली ऑडिओ उपकरणे आरेखित केलेली असतात.

विविध शिकारी प्राण्यांचे रेकॉर्ड केलेले आवाज टेप रेकॉर्डर आणि लाउड स्पीकरच्या साह्याने वाजवले जातात. अशा यंत्रणेद्वारे कुत्रे, वाघ आणि तत्सम शिकारी प्राण्यांचे आवाज ऐकताच पाखरे, वानर आणि रानडुकरे यांसारखे प्राणी घाबरून पळून जातात.

वाऱ्याने फिरणाऱ्या पंख्याद्वारे आवाज निर्मितीची यंत्रणा :

घरगुती किंवा शेत पातळीवर उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून पक्ष्यांना पळवून लावण्यासाठी स्वस्तातील यंत्रणा तयार करता येते. त्यासाठी साधारणतः १० फूट उंच बांबू किंवा लाकडी खांब किंवा दीड इंची पाइप, टेबलफॅन किंवा खराब रॅडिएटरच्या पंख्याचे पाते, शाफ्ट (लोखंडी रॉड १६-२० मिमी पंख्यानुसार), एक लोखंडी थाळी किंवा पत्र्याचे झाकण, एक साखळी/ दोरी आणि लोखंडी नट इतकी यंत्रणा पुरेशी होते.

पाइपच्या एका टोकाला बेअरिंगवर शाफ्ट टाकून त्याच्या एका टोकाला पंख्याचे पाते बसवून घ्यावे. दुसऱ्या टोकाला साखळी/दोरी जोडावी. साखळीच्या रिकाम्या टोकाला लहान नट, लोखंडी वजन बांधावे. थाळी पाइपवर अशी बसवावी की फिरणारी साखळी थाळीपर्यंत पोहोचावी. तयार झालेली ही यंत्रणा शेतात चांगल्या फाउंडेशनवर उभी करावी.

वाहत्या वाऱ्यासोबत पंख्याचे पाते फिरू लागते. त्यामुळे साखळी व त्याला जोडलेला नट गोल फिरू लागतो. तो थाळीवर आपटल्यामुळे आवाज होतो. वाऱ्याचा वेग, साखळीची लांबी आणि थाळीचा आकार या सर्व बाबींप्रमाणे या आवाजाची तीव्रता कमी-अधिक होते. या यंत्रणेतून तयार होणारा आवाज कधीही सारखा नसतो, त्यामुळे पाखरांना या आवाजाची सवय होत नाही. वारा कमी असताना आवाज कमी होऊ शकतो. जिथे वाऱ्याची दिशा कायम बदलती असते, अशा ठिकाणी पंख्याच्या खाली वातकुक्कुटासारखी यंत्रणा उभारावी. त्यामुळे पाते सतत फिरते राहून आवाज तयार होण्यास मदत होते.

डॉ. सचिन नलावडे, ९४२२३८२०४९

(प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com