Cotton Variety : देशात कापसाच्या कमी उत्पादकतेची चर्चा मागील दशकभरापासून आहे. कापसाच्या कमी उत्पादकतेने शेतकऱ्यांबरोबर कृषी शास्त्रज्ञही चिंतित आहेत. कापसाची कमी उत्पादकता पर्यायाने कमी उत्पादन आणि कापसास मिळणारा कमी भाव यामुळे देशभर कापसाची शेती तोट्याची ठरत आहे.
अशावेळी कापसाचे वाण नाही, तर जमीन आरोग्याबरोबर सिंचनाचा अभाव हे कमी उत्पादकतेस कारणीभूत असल्याचे मत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे यांनी व्यक्त केले आहे. शेतजमिनीत शेणखताचा कमी झालेला तर रासायनिक खतांचा वाढता वापर आणि एकाच जमिनीत एकापाठोपाठ एक पीक घेण्याच्या स्पर्धेने जमिनीचा पोत खालावला आहे.
त्यामुळे कापूसच नाही तर सर्व पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवावा लागणार आहे. शिवाय जिरायती शेतीत मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या कापसाला सिंचन, किमान संरक्षित सिंचनाची सोय करावी लागेल. परंतु देशात कापूस उत्पादकता वाढीस खीळ बसण्यास पूरक वाणांबरोबर सुधारित लागवड तंत्राचा अभाव हे घटकही कारणीभूत आहेत, हे मान्यच करावे लागेल.
देशात बीटी वाणांचे आगमन झाल्यानंतर आता वाण संशोधनात आपल्याला फारसे काही करायचे नाही, अशीच मानसिकता जवळपास सर्वच कापूस संशोधन संस्थांची होती. बीटीच्या आगमनानंतर चार ते पाच वर्षे हिरव्या बोंड अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहून उत्पादकता वाढली. त्यानंतर मात्र गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि मागील दशकभरापासून कापसाची उत्पादकता सातत्याने घटत आहे.
एकतर जनुकीय सुधारित तंत्राचा अवलंब करताना जगातील बहुतांश कापूस उत्पादक देशांनी सरळ वाणांत बीटी आणले. आपण मात्र संकरित वाणांत बीटी आणून सर्व बियाणे बाजारच खासगी कंपन्यांच्या हवाली करून दिला. आज जगात सर्वाधिक कापूस उत्पादकता असलेला देश चीन आहे. चीनने आपल्या पाच वर्षे आधी कापसात जनुकीय तंत्राचा अवलंब केला.
हे करीत असताना त्यांनी कापूस उत्पादक विभागांप्रमाणे बीटी वाण विकसित केले. हे वाण तेथील पर्जन्यमान, हवामान अनुकूल असतील ही काळजी त्यांनी घेतली. शिवाय बीटी कापूस लागवडीचे प्रगत तंत्र विकसित करून ते शेतकऱ्यांना दिले. अमेरिका, ऑस्ट्रेलिया या कापूस उत्पादकतेत आघाडीवरच्या देशांनी कापूस शेतीत यांत्रिकीकरणाच्या वापरासाठी कमी कालावधी, कमी उंची आणि एकाच वेळी काढणीला येणारी वाण विकसित केली.
असे आपल्याकडे काहीच झाले नाही. कापूस लागवडीच्या बाबतीत तर देशात शेतकरीनिहाय पद्धतीत बदल आढळून येतो. यांत्रिकीकरणाच्या वापरात केवळ पूरक वाणांच्या अभावाने देशात सर्वांत पिछाडीवर कापसाचे पीक आहे. एचटीबीटीला देशात परवानगी नसताना आज ३० ते ३५ टक्के क्षेत्र या अनधिकृत कापसाने व्यापले आहे.
हे सर्व पाहता कापूस उत्पादकता वाढीसाठी नवे वाण संशोधनावर किती व्यापक काम करावे लागणार आहे, हे लक्षात यायला हवे. कापूस उत्पादकता वाढविण्याकरिता सुधारित, संकरित वाण विभागनिहाय देण्याचा प्रयत्न केला जाणार, अशी ग्वाही संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यावर डॉ. वाघमारे यांनी देशभरातील कापूस उत्पादकांना दिली, त्यास मुहूर्त कधी लागणार, हेही स्पष्ट व्हायला हवे.
सरळ वाणांचा वापर करून सघन, अतिघन लागवड पद्धतीने उत्पादकतेत २० ते ५६ टक्के वाढ हा केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचाच प्रयोग आहे. असे असताना याचा कापूस उत्पादकांमध्ये झपाट्याने प्रसार-प्रचार का होत नाही, यावरही विचार व्हायला हवा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.