Agriculture Warehouse  Agrowon
ॲग्रो विशेष

Warehouse Construction : शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम उभारणी

Warehouse Management : गोदाम उभारणीचे विविध उद्देश असले तरी त्यानुसार गोदामाची रचना करणे गरजेचे असून वैज्ञानिक पद्धतीने गोदामाची उभारणी करणे अत्यंत आवश्यक असते.

Team Agrowon

मंगेश तिटकारे, हेमंत जगताप

Agriculture Warehouse : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या अनुषंगाने विविध योजनांची निर्मिती करून बँकांशी करार करून विक्री व्यवस्थेकरिता प्रशिक्षण, खरेदीदार-विक्रेता संमेलन इत्यादीच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्यात शासन मागील काही वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. यासाठी राज्यात कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी सुमारे २५,००० कोटी रुपयांहून अधिक प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ज्या प्राथमिक कृषी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांचे समूह अशा विविध प्रकारच्या संस्था व्यवसाय उभारणीच्या दृष्टीने या वातावरणाचा फायदा घेत आहेत. त्यांना याचा फायदा होत असून विविध पिकांच्या पुरवठा साखळीत हळूहळू सहभागी होऊन आर्थिक उत्पन्न मिळविण्याच्या दिशेने करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना यश येत आहे.

गोदामाची रचना

गोदामाची रचना पदार्थाच्या अथवा उत्पादनाच्या साठवणुकीनुसार असणे अत्यंत आवश्यक असून गोदाम व्यवस्थापनाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. यापूर्वी आपण सिमेंट, खते, साखर, गूळ, दूध पावडर, दूध साठवणुकीचे कॅन, वाळविलेली मिरची व औषधे इत्यादी पदार्थ साठवणुकीबाबत व त्यानुसार गोदामाच्या रचनेबाबत माहिती घेतली आहे. अशाच प्रकारे वर्तमानपत्राच्या कागदाचे बंडल, रासायनिक पदार्थ इत्यादी ज्वालाग्रही पदार्थांच्या साठवणुकीच्यादृष्टीने गोदामांची विशिष्ट प्रकारची रचना असते.

औद्योगिक वापरातील जड वस्तू

अ) वर्तमानपत्राच्या कागदाचे बंडल

गोदामात वर्तमानपत्राच्या कागदाचे रोल/बंडल हाताळणीसाठी न्यूमॅटिक टायरची सोय असलेल्या फोर्क लिफ्टचा वापर करण्यात येतो. त्यामुळे गोदामाचे रोलिंग शटरचे दरवाजे पारंपरिक दरवाजांपेक्षा मोठे म्हणजेच १.८० बाय २.४० मिटरपेक्षा मोठे असावेत. गोदामातील जागेचा जास्तीत जास्त वापर होण्याच्या अनुषंगाने गोदामात शक्यतो पार्टिशन न करता सरसकट संपूर्ण गोदाम वापरावे, त्याचे वेगवेगळे भाग करू नये.

ब) विज्ञान शिकविणाऱ्या कॉलेजमध्ये ब्लिचिंग पावडर आणि इतर रसायनांची गोदामामध्ये साठवणूक ः

जर रासायनिक पदार्थ जसे की हायड्रोक्लोरिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, ब्लिचिंग पावडर इत्यादी गोदामाच्या जमिनीवर सांडले तर जमिनीस खड्डे पडू शकतात. याकरिता अॅसिडचा परिणाम न होणाऱ्या फरशा गोदामातील जमिनीवर बसवाव्यात.

गोदामाचे प्रकार-(बांधकाम निहाय)

यापूर्वी गोदाम उभारणीचे आपण विविध प्रकार मागील लेखांमधून पहिले परंतु बांधकामाच्या दृष्टीने विचार केला तर गोदामाचे पाच मुख्य प्रकार आहेत.

छत नसलेले गोदाम /मोकळ्या जागेवर करण्यात येणारी साठवणूक

कव्हर अँड प्लिन्थ गोदाम (कॅप)

पारंपरिक पद्धतीने बांधण्यात येणारी गोदामे

प्रि-इंजिनियर्ड वेअरहाऊस-(पिईबी वेअरहाऊस)

बहुमजली गोदामे

छत नसलेले गोदाम

या प्रकारात मजबूत प्लॅटफॉर्म असलेल्या जागेवर वस्तू अथवा उत्पादन साठविण्यात येते. सिमेंट कॉंक्रिटचे पाइप, स्टीलचे साहित्य, ऑटोमोबाइलचे पार्ट्स व कार, ट्रक, जड साहित्य, इलेक्ट्रिकच्या जड वस्तू कोणत्याही छताच्या शिवाय साठविले जाते.

या वस्तू प्लॅस्टिकच्या कागदाने झाकल्या जातात. अशा प्रकारचे गोदाम औद्योगिक वसाहत असणाऱ्या परिसरात उभारले जाते. या प्रकारात सुरक्षेच्यादृष्टीने योग्य काळजी घेणे आवश्यक असते. चोरी होण्यापासून सुरक्षा, पाण्यापासून साठवणूक करण्यात येणाऱ्या मालाची सुरक्षा, ३.६५ मीटर उंचीचे कुंपण, सुरक्षा रक्षकासाठी केबिन, मजबूत सिमेंट कॉंक्रिटचा प्लॅटफॉर्म, विजेची सुविधा आणि साठवणूक करण्यात येणाऱ्या उत्पादनावर लक्ष ठेवणारी यंत्रणा इत्यादी काळजी या साठवणूक प्रकारात घ्यावी लागते.

कव्हर अँड प्लिन्थ गोदाम (कॅप)

जेव्हा शासनामार्फत किंवा खासगी यंत्रणांमार्फत मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची खरेदी केली जाते आणि साठवणुकीची व्यवस्था अपुरी असते, अशा वेळेस धान्य उघड्यावर सिमेंट कॉंक्रिटचा प्लॅटफॉर्म बनवून त्यावर साठविले जाते. त्यावर प्लास्टिकचा कागद टाकून धान्य झाकण्यात येते. या प्रकाराला कव्हर अँड प्लिन्थ गोदाम किंवा कॅप गोदाम असे संबोधले जाते.

या प्रकारात जमिनीवर सिमेंट कॉंक्रिटचा प्लॅटफॉर्म तयार केला जातो. याकरिता योग्य मास्टर प्लॅन तयार करणे आवश्यक असते. या मास्टर प्लॅननुसार सिमेंट कॉंक्रिटच्या प्लॅटफॉर्मच्या आजूबाजूला हवा खेळती राहण्याच्या अनुषंगाने, साठवणूक करण्यात येणाऱ्या मालाची योग्य हाताळणी करण्याच्या उद्देशाने व पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या चारही बाजूंनी जागा सोडणे आवश्यक असते.

ट्रक सारख्या अवजड वाहनांची योग्य रीतीने वाहतूक होण्याच्या दृष्टीने किमान ६ मीटर रुंदीचा रस्ता असणे आवश्यक आहे. उत्पादनांची कमी कालावधीकरिता साठवणूक करावयाची असेल

तर १० बाय ७ मीटर लांबी व रुंदीचा प्लॅटफॉर्म तयार करावा. त्याचप्रमाणे याची उंची उंदीर, घुशींपासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने किमान ८० सेंटीमीटर असावी. तसेच जास्त कालावधीची साठवणूक करण्यासाठी १५० मिलिमीटर जाडीचा सिमेंट कॉंक्रिटचा प्लॅटफॉर्म उभारणे आवश्यक असते.

(माहिती स्त्रोत : भारतीय अन्न महामंडळाची माहिती पुस्तिका आणि ‘एमसीडीसी‘ सनदी अभियंता यांची गोदाम विषयी मार्गदर्शक पुस्तिका)

पारंपरिक पद्धतीने बांधण्यात येणारे गोदाम

पारंपरिक पद्धतीने बांधण्यात येणारी गोदाम अत्यंत प्रसिद्ध आहे. लाल विटा किंवा सिमेंट ब्लॉकपासून भिंती व अॅसबेसटॉस सिमेंटचे शीट, गॅल्व्हनाइज्ड शीट अथवा अॅल्युमिनियम गॅल्व्हनाइज्ड शीट पासून गोदामाचे छत बनविण्यात येते.

या पद्धतीच्या गोदामाचा ढाचा एमएस प्लेट किंवा प्री-इंजिनिअर प्रकारात तयार करण्यात येतो. या पद्धतीच्या गोदामात भारतीय अन्न महामंडळामार्फत केवळ अन्नधान्य साठविले जाते. केंद्रीय आणि राज्य वखार महामंडळ फक्त केंद्र शासनाने सुचविलेल्या व परवानगी दिलेल्या वस्तूंची व उत्पादनांची गोदामांमध्ये साठवणूक करण्यास प्राधान्य देते.

केंद्र शासनाने सुचविलेल्या व परवानगी दिलेल्या वस्तू व उत्पादनांमध्ये मद्य व स्फोटके यांचा समावेश होत नाही. अन्नधान्ये व इतर उत्पादने ज्या अवस्थेत प्राप्त होतात त्याच अवस्थेत गोदामात साठविली जातात.

गोदामात धान्य व उत्पादने वैज्ञानिक पद्धतीने साठविण्याच्या उद्देशाने गोदामांची उभारणी करताना गोदामात हवा खेळती राहण्याच्या उद्देशाने योग्य तऱ्हेने खिडक्यांची रचना, न गळणारे व पाण्यास अवरोधक छत, उंदीर घुशींना दाद न देणारी गोदामाच्या जमिनीची रचना, गोदामाच्या पायाचे खोदकाम करताना मुंग्या व वाळवीपासून संरक्षण करण्यासाठी कीडनाशकाची फवारणीची तरतूद इत्यादीची सांगड घालून गोदामाचा अद्ययावत पाया तयार करणे अत्यंत महत्त्वाचे असते.

बांधकाम क्षेत्रात बांधकाम साहित्य व तंत्रज्ञान याबाबतीत बरीच प्रगती झाली असल्याने गोदाम उभारणीत मोठ्या बदलांसह गोदामाची उभारणी करण्यास प्राधान्य दिले जाते. यात प्रामुख्याने प्रि-इंजिनियर्ड बिल्डिंग (पिईबी स्ट्रक्चर) प्रकारच्या पद्धतीचा उपयोग करण्यास सुरवात झाली असून या पद्धतीमुळे वेळ, पैसा यात बचत होऊन साठवणुकीचे सर्व उद्देश दीर्घ काळाच्या उद्देशाने साध्य होत असल्याने या पद्धतीस गोदाम उभारणीकरिता प्राधान्य दिले जात आहे. वास्तविकपणे पारंपरिक गोदाम पद्धतीच्या पुढे जाऊन प्रि-इंजिनियर्ड वेअरहाऊस-(पिईबी वेअरहाऊस) पद्धती विकसित करण्यात आली असली तर उद्योजक किंवा शेतकरी यांची या पद्धतीबाबत वेगवेगळी मतमतांतरे आहेत. जसे काहींना पारंपरिक पद्धतीने बांधण्यात आलेली गोदामे उत्तम व टिकाऊ वाटतात तर काहींना प्रि-इंजिनियर्ड वेअरहाऊस-(पिईबी वेअरहाऊस) पद्धतीची गोदामे उत्तम व टिकाऊ वाटतात. शेवटी प्रत्येक उद्योजकाचा गोदाम उभारणीचा उद्देश महत्त्वाचा आहे.

प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०

(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष,

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT