Village Story Agrowon
ॲग्रो विशेष

Village Story : खडीसाखर...

Team Agrowon

समीर गायकवाड

Sameer Gaikwad Article : तान्हीबाई चाफ्यासारखी जगली होती. तिच्या पूर्वायुष्यामुळे तिच्याकडे घरच्यांनी नंतर आस्थेने पाहिलं नाही. जणू तिच्या देहावरच्या पानांनीही साथ सोडली होती, तरीही एकट्यानेच ती बहरत राहिली. मनातला सोनचाफा खुलवत गावाला अर्पित राहिली. आता तान्हीबाईला जाऊन बरेच दिवस झालेत. ती गेल्यापासून बारा गल्ल्या फिरून येणाऱ्या इब्लिस पोरांच्या हातावर खडीसाखर ठेवणारं कुणी उरलेलं नाही.

तान्हीबाईला जाऊन आता काही महिने लोटलेत. ती गावातली अखेरची बालविधवा होती. वयाच्या नव्वदीनंतर तिला देवाचं बोलवणं आलं. तिचं खरं नाव सरस्वती. सगळं गाव तिला तान्हीबाय म्हणे. मार्तंड जगदाळे हे तिचे वडील. एकनाथ आणि सरस्वती ही त्यांची दोनच अपत्ये जगलेली. सरस्वती जेमतेम बारा वर्षांची असतानाच तिचं लग्न झालेलं, अक्षता पडल्यानंतर गावी परतलेला किशोरवयीन दादला काही दिवसांतच शेतात साप चावून मृत्युमुखी पडला होता. सरस्वतीच्या कपाळी वैधव्य आलं तेव्हा मार्तंडरावांनी तिला कायमचं सांभाळण्यासाठी माहेरी आणलं. यावर गावानं विचारल्यावर म्हणाले, ‘‘माझी सरस्पती अजून तान्ही आहे, ती जाईची कवळी वेल आहे. तिला आमच्या अंगणातच फुलवेन, गावानं तिची फिकीर करू नये.’’

त्या दिवसापासून सरस्वतीची तान्हीबाई झाली. काही वर्षांनी घरात एकनाथाच्या लग्नाचा विषय चर्चेस आला. एकनाथाच्या लग्नाची चर्चा कानी पडताच तान्हीबायचं मस्तक भणभणून यायचं. एकनाथाचं लग्न होणार या विचारानेच तान्हीबाय बेचैन झाली. सहा पोरींची लग्नं कशी लावायची या वंचनेत असलेल्या रामा धायरेनं मार्तंडकडून सगळ्या पोरींच्या लग्नात मदतीचा शब्द घेऊनच आपली थोरली पोर निर्मलाचा हात एकनाथाच्या हाती दिला. लग्न मात्र थाटामाटात झालं. एकनाथाच्या लग्नात नट्टापट्टा करणाऱ्या तान्हीबाईचं जेंव्हा लग्न झालं होतं तेव्हा तिला त्यातलं काहीच कळलं नव्हतं. तिच्यासाठी तो भातुकलीचाच खेळ होता, जो नियतीलाही बघवला नव्हता. यौवनसुलभ भावना, नटणं मुरडणं, शृंगाराचा अर्थ, प्रेमाची अनुभूती, देहाचं आकर्षण आणि संसारचक्र यातलं काहीच तिला अनुभवता आलं नव्हतं.

एकनाथाचं लग्नानंतरचं देव देव करून झालं, गावदेवाची पूजाअर्चा झाली. यथावत सोळकं उरकून निर्मलाची पाठराखीण माघारी गेली आणि खऱ्या अर्थाने तिच्या पाठीशी कुणी उरलं नाही. कारण त्या दिवसापासून तान्हीने एकनाथाचे कान भरण्यास सुरुवात केली. जिवापाड प्रयत्न करूनही एकनाथ आणि निर्मला यांच्यात कायमचं वितुष्ट आणण्यात तिला यश आले नाही. त्यांच्यात रोज किरकोळ भांडणे होत, पण निर्मलाच्या सोशिक स्वभावामुळे निभावून नेलं जायचं. पुढच्या काही दिवसांत निर्मलाची पावलं जड झाली, घरात नव्या पाहुण्याची चाहूल लागली. तान्हीबाईचा चडफडाट टोकाला गेला. आपल्याला जी सुखे मिळाली नाहीत ती गरीब घरातून आलेल्या निर्मलेला मिळताहेत या असूयेनं तिला पुरतं ग्रासलं. निर्मलेचा गर्भपात व्हावा म्हणून तिने हरतऱ्हेने प्रयत्न केले, पण शेवटी ती एका गोंडस मुलाची आत्या झालीच ! निर्मलेची अपत्ये झाली. मोठी होत गेली. तान्हीबाईने निर्मलाची मुलं कधी मांडीवर घेतली नव्हती, त्यांचा दुस्वास केला. वय जसजसे वाढत गेले, तसे मुलांचे कान भरण्याचा प्रयत्नही करून पाहिला, पण व्यर्थ ! दरम्यान, एकनाथालाही तिचा स्वभाव उमगला होता. पण त्यानेही तिला कधी दुखवले नाही.

दशके निघून गेली. एकनाथाने आधी पोरीचे लग्न उरकून एकाच मांडवात दोन्ही पोरांचा बार उडवला. मोठ्या घरच्या लेकी घरात आल्या आणि निर्मलेचं जगणं कालचक्रात अधिकच गुरफटत गेलं. दोन्ही बाजूनं मुस्कटदाबी होऊ लागली. तान्हीबाईला मात्र आनंद झाला. शेत असो व घर, छद्मी तान्हीबाई सगळी कामं करू लागत असल्याने तिच्याविरुद्ध बोलायला जागा नव्हती. एकनाथाला सगळं दिसत होतं, पण तान्हीबाईला तो अडवू शकत नव्हता. मार्तंडरावांच्या दृष्टीआड सगळा खेळ सुरू असल्यानं ते अनभिज्ञ होते. नातवंडे झाली तरी निर्मलेच्या मागचे कष्ट सरले नाहीत. इथूनच एकनाथ आणि तान्हीबाई यांच्यात खटके उडू लागले. तरीदेखील तान्हीबाई सगळ्यांना जोपारून न्यायची. काबाडकष्टाने थकलेल्या निर्मलेसोबत एक दुर्घटना घडली. औतावरून निसटलेल्या बैलानं तिच्या पोटात भोसकलं. अतिरक्तस्रावाने तिचा मृत्यू झाला. सुखाचे दिवस आल्यानंतर निर्मलेच्या एकाएकी निघून जाण्याने एकनाथाला धक्का बसला. या घटनेनं तान्हीबाई जमिनीवर आली. निर्मलेच्या मृत्यूनंतर तिच्या सुनांनी आत्येसासूवर डूख धरला, पण म्हातारा मार्तंडराव अजूनही तान्हीबाईच्या बाजूनं खंबीर उभा होता.

एकनाथाच्या मुलांची एकेक करून लग्ने झाली. इकडे मार्तंडरावाचा इहलोकीचा प्रवास संपला. तर थकलेला एकनाथ दिवसभर निर्मलेच्या समाधीशेजारी बसून असायचा. कंबरेत वाकलेली तान्हीबाई आयुष्याच्या अखेरच्या वळणावर आली. तिला पैलतीर खुणावू लागला. एकनाथाची मुलं तिने कधीच छातीशी धरली नव्हती, पण आता नातवंडे उराशी घट्ट धरावीत असं तिला मनापासून वाटू लागलं. पण बेरकी सुनांनी तान्हीबाईचा पाणउतारा सुरू केला. पोरांच्या बारशातही येऊ दिलं नाही. तेव्हापासून तान्हीबाईला आपल्या वागणुकीचा पस्तावा होऊ लागला. तिनं गावात जायचा शिरस्ता धरला. दिवसभर देवळापाशी, पिंपळाखालच्या कट्ट्यावर बसून राहू लागली. येत्याजात्या लेकरांच्या हातावर खडीसाखर ठेवू लागली. न्याहारी आटोपून काठीच्या आसऱ्यानं पावलं मोजीत जाणारी कंबरेत झुकलेली म्हातारी तान्हीबाई बारोमास नजरेस पडायची. बघता बघता ती जख्ख वृद्धा होऊन गेली. एकनाथानेही राम म्हटला, तशी ती आणखीच वाकली.

तिच्या कपाळावरच्या रेषांची नक्षी जाळीदार होत गेली. अंगावरची कातडी ढिली झाली. डोईची चांदी विरळ झाली. हनुवटी लोंबू लागली, निस्तेज झालेले डोळे आर्त झाले, चेहऱ्यावर सुरकुत्यांची लिपी उमटली, चालताना हातपाय लटपटू लागले, आवाज खोल गेला, तळहातावरची साय मखमली होत गेली. ती काही फार मोठी भाविक वा श्रद्धाळू होती अशातला भाग नव्हता, पण तिला वस्ती सोडून गावात जायची ओढ लागलेली असायची. देवळाचं निमित्त होतं. तिथं भेटणारी माणूसवेडी म्हातारीकोतारी आणि लोभस पोरंठोरं यांची आस असायची. पोरांनाही तिची सवय जडली. तिच्या मऊशार सायमाखल्या हाताचं, खडबडीत खडीसाखरेचं त्यांना अप्रूप होतं. तिच्या हातून खडीसाखर खाल्लेल्या पोरांची पोरं देवळात येऊ लागली तरीदेखील तिच्या दिनचर्येत फरक पडला नाही. ती नित्यनेमाने येत राहिली. नंतर चालणं जिवावर येऊ लागलं तशी दिवसभरात जितकं जमेल तितकंच जाऊ लागली. वाटेनं भेटणाऱ्यास, अगत्याने बोलणाऱ्यास थांबवून खडीसाखर द्यायची. तिच्या कंबरेला असलेल्या चंचीत खडीसाखरेच्या पुड्या ठासून भरलेल्या असत. अखेरच्या दिवसापर्यंत तिच्या देहाचं सागवानी लाकूड टकाटक होतं. वस्तीवर पाय घसरून दगडावर डोकं आपटल्याचं निमित्त होऊन तिचा अंत झाला. हा घटनाक्रम जलदगतीनं घडला. गावातल्या पोक्त पिढीला, पिकल्या पानांना याचं वाईट वाटलं.

एकीकडे आपल्या संसारिक जीवनाचं कुठलंही सुख उपभोगू न शकलेल्या तान्हीबाईचं सुरुवातीचं वागणं नक्कीच वाईट होतं, तर दुसरीकडे तिने देहधर्मावर ताबा ठेवला होता, कधी पाऊल ढळू दिलं नव्हतं. तिचं स्वतःचं विश्‍व तोडून ती गावाशी एकरूप झाली होती तेव्हा ती गावकुसाच्या कृष्णाची मीराबाई झाली होती. आपली दुःखं पोटात ठेवून गावाच्या सुखात आनंद मानत होती, आपल्या परीने सुखाच्या फुलवाती लावत होती. तिचं जाणं गावातल्या अनेक बायकांना चटका लावून गेलं; कारण तिनं पुष्कळदा अनेकींना चोरून मदत केली होती. तिचा हा पैलू ती गेल्यानंतर समोर आला तेव्हा गाव खूप हळहळलं होतं. तान्हीबाई चाफ्यासारखी जगली होती. तिच्या पूर्वायुष्यामुळे तिच्याकडे घरच्यांनी नंतर आस्थेने पाहिलं नाही. जणू तिच्या देहावरच्या पानांनीही साथ सोडली होती, तरीही एकट्यानेच ती बहरत राहिली. मनातला सोनचाफा खुलवत गावाला अर्पित राहिली.

आता तान्हीबाईला जाऊन बरेच दिवस झालेत. ती गेल्यापासून बारा गल्ल्या फिरून येणाऱ्या इब्लिस पोरांच्या हातावर खडीसाखर ठेवणारं कुणी उरलेलं नाही. त्यामुळे देवळापाशी आली की ही सगळी पोरं हिरमुसून जातात. कालपरवाचीच गोष्ट. पिंपळाच्या कट्ट्यावर जिथं तान्हीबाई बसून असायची तिथं काळ्या मुंग्यांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्या होत्या, जणू काही काळं चवाळंच अंथरलंय. जमा झालेल्या पोरांच्या हाती चिल्लर टेकवून त्यांना खडीसाखर आणायला लावली. पोरांनी आणलेल्या खडीसाखरेचे तुकडे टाकताच निमिषार्धात सगळ्या मुंग्या पांगल्या! आता काळ्या मुंग्यांच्या रांगा तिथं रोजच लागतात. पोरंही आवर्जून खडीसाखर टाकतात, मग त्या मुंग्या झटक्यात नाहीशा होतात. गाव म्हणतंय, की जोवर पिंपळाच्या कट्ट्यावरती काळ्या मुंग्या आहेत तोवर तान्हीबाई जिती आहे!

- समीर गायकवाड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Sowing : हरभरा पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार

Pesticide residues found in farmer's urine : धक्कादायक! तेलंगणाच्या काही शेतकऱ्यांच्या लघवीत कीटकनाशकांचे अंश?

Agriculture Department : कृषी कार्यालयाचा कारभार कुबड्यांवर

Hilsa Fish Export : बांगलादेशने हिलसा माशाच्या निर्यातीवरील बंदी उठवली; भारतला ३ हजार टन मासा करणार निर्यात

Irrigation Subsidy : सिंचन अनुदानाच्या वाटपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच

SCROLL FOR NEXT