Rural Story Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Story : भाऊसाहेब

Sameer Gaikwad Article : तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील सगळे भाऊसाहेबाला टरकून असत. कोणत्या योजनेतून निधी आणायचा, कुठे बंडल ढिले करायचे, कुठं कोंबडीबाटलीचा नैवेद्य द्यायचा, कुठं हात आखडता घ्यायचा, कुणाला अजिबात भीक घालायची नाही आणि कुठं साष्टांग दंडवत घालायचा याबद्दलचं त्याचं गणित एकदम पक्कं होतं.

Team Agrowon

- समीर गायकवाड

Village Story : तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील सगळे भाऊसाहेबाला टरकून असत. कोणत्या योजनेतून निधी आणायचा, कुठे बंडल ढिले करायचे, कुठं कोंबडीबाटलीचा नैवेद्य द्यायचा, कुठं हात आखडता घ्यायचा, कुणाला अजिबात भीक घालायची नाही आणि कुठं साष्टांग दंडवत घालायचा याबद्दलचं त्याचं गणित एकदम पक्कं होतं. चाळीस वर्षात एकही सरपंच त्याच्या मदतीशिवाय काम करू शकला नाही, इतकं त्यानं गावाला आपल्यावर विसंबून ठेवलं होतं. गावाला त्याचं भारी कौतुक वाटे.

भाऊसाहेबाला जाऊन एक दशक होत आलंय पण अजूनही गावात त्याचं नाव निघतं. एक काळ होता की भाऊसाहेबाशिवाय गावाचं पान हलत नव्हतं. भाऊ दशरथ रास्ते हे त्याचं पूर्ण नाव. रास्ते मंडळी जितकी कामसू होती तितकीच बेरकी होती. पाण्यावर लोणी काढायची कला त्यांना अवगत होती. लोकांच्या विळ्याचा खिळा होई पण रास्त्यांची मंडळी खिळ्याचा फाळ करत आणि आडवं येणाऱ्याला तोच फाळ लावत! घरची बेताची परिस्थिती आणि अंगचे बेरकी गुण यामुळे भाऊसाहेबाचं रूपांतर एका अजब गजब रसायनात झालेलं. चार गोष्टींची अक्कल येण्याआधी आपलं पान आपण पिसलं पाहिजे याचं ज्ञान त्याला आधी प्राप्त झालं. पाटीपेन्सिल एकाची, वह्या दुसऱ्याच्या, पुस्तक तिसऱ्याचं आणि गुंड्यांच्या जागी पिनटाचण्या लावलेला विरायला झालेला गणवेषाचा सदरा चौथ्याचा असं करत त्यानं शिक्षण घेतलेलं.

कशीबशी तो सातवी उत्तीर्ण व्हायला आणि गावात एसटी बस सेवा सुरु व्हायला एकच गाठ पडली. त्यानंतर पाचेक वर्षे त्यानं मॅट्रिक शिकतो आहोत असं गावाला सांगितलं. त्यासाठी त्यानं रोज गावातून सोलापूरला येजा सुरु केली. भाऊसाहेबचं रोजचं येणंजाणं होऊ लागल्यामुळे लोकांनी आधी दबत तर नंतर हक्कानं त्याला आपली कामं सांगायला सुरुवात केली. रामभाऊ पाटलांचा पोर जयवंत हा त्याचाच चेला होता. तो खरंच मॅट्रिक पास झाला की नाही हे फक्त भाऊसाहेबाला ठाऊक होतं. भाऊसाहेब सातवीनंतर शाळा शिकत होता की फक्त गावकीची कामं करून आपल्या कुटुंबाचा खर्च त्यातून काढत होता हे जयवंताला माहिती होतं. त्यामुळे ह्या दोघांत घट्ट मैत्री होती. जयवंत सरपंच झाल्यावर ती अजूनच घट्ट झाली. भाऊसाहेबाला त्याच्या निकालाबद्दल कुणी विचारलंच नाही; कारण त्याच्या शिक्षणाचं कुणाला सोयरसुतक नव्हतं. त्याच्या व्यवहारज्ञानाच्या कुबड्या प्रत्येकाला हव्या होत्या. विशिष्ट परिघापुरता मर्यादित असलेला भाऊसाहेब नंतर सुसाट सुटला. जिल्हा परिषद, तहसील, प्रांत, समाजकल्याण समिती, महामंडळांची कार्यालयं यातलं काहीच त्यानं बाकी ठेवलं नाही. कुणी काहीही सांगितलं तरी तो होकार द्यायचा. भाऊसाहेब सोबत आहे म्हणजे काम फत्ते होणारच हे समीकरण रूढ झालं. हे सर्व उद्योग करताना त्याच्या व्यक्तिमत्वाचा विलक्षण फायदा त्याला झाला.

डोक्याला सुगंधी तेल पचपचीत चोपडलेलं, एका रेषेत पडलेला टोकदार भांग, रुंद गोऱ्यातांबूस कपाळावरती ठळकपणे लावलेला गोपीचंदन अष्टगंधाचा गोल गरगरीत टिळा, जाड भुवयांखालचे पाणीदार डोळे, तरतरीत नाक, कानाच्या लंबोळक्या पाळ्या, वर आलेले सफरचंदी गाल, टकटकीत बत्तीशी, खर्जातला भारदस्त आवाज, गळ्यातली रुद्राक्षाची माळ (जिची तो वारंवार आण घेत असे), दोन्ही हातांच्या बोटातल्या खऱ्या वाटणाऱ्या खोट्या खड्यांच्या अंगठ्या, मनगटाला गुंडाळलेले लालकाळे धागे, पांढरा शुभ्र सदरा पायजमा, केसांतलं तेल पिऊन काळीपिवळी होऊ नये म्हणून डोक्यावर अलगद टेकवलेली कडक इस्त्रीची पांढरी शुभ्र टोपी असा त्याचा अवतार. बखोटीला मारलेल्या चामडी काळ्या हॅन्डबॅगेत शेकड्याने कागद कोंबलेले असत, खेरीज खांद्यावरच्या शबनम बॅगेत फायलींचे बाड असे. भाषा एकदम रासवट निब्बर. बोलणं नम्रतेचं नसलं तरी समोरचा 'धपकला' पाहिजे असं त्याचं गणित. डोळ्यात डोळे घालून अधिकारवाणीनं बोलण्याची सवय. या सगळ्यामुळे भाऊसाहेबाची कामं सहज होत.

हळूहळू पंचक्रोशीतली माणसंही त्याच्याकडं येऊ लागल्यावर झेडपीतल्या लोकांसाठी तो दैनंदिन घबाड आणून देणारा मध्यस्थ झाला होता. त्यामुळे तिथंही त्याची खातीरदारी होऊ लागली. एखाद्या
नव्या माणसानं त्याचं काम अडवलं की गावच्या लोकांना तो सरळ सांगून टाके, “ह्याची अमुकतमुक भानगड होती. ह्याला बदली करून घेण्यासाठी माझी मदत हवी होती; पण आपण खोट्याचं काम करत नाय. काय करणार ? मग असा वाईटपणा घ्यावा लागतो !”

समोरच्या माणसाला प्रभावित करण्यासाठी वाट्टेल ती थाप ठोकणारा, इकडची टोपी तिकडं करणारा, कुठल्याही कामात नकळत आपला हिस्सा राखून ठेवणारा भाऊसाहेब एका गोष्टीत खूप पक्का होता. त्यानं इकडची काडी तिकडं कधीच लावली नाही. सगळी टेबलं आणि तिथले सगळे बाबू त्याला सारखे होते. गावातही अनेक राजकीय पक्षांचे शंभर कारभारी होते; पण त्यानं कधी कुणाची बाजू घेतली नाही की कधी कुणाच्या विरोधातही गेला नाही. जो सत्तेत असेल त्यानं आपल्याकडे यायला पाहिजे याची तजवीज तो करून ठेवी. तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील सगळे त्याला टरकून असत. कोणत्या योजनेतून निधी आणायचा, कुठे बंडल ढिले करायचे, कुठं कोंबडीबाटलीचा नैवेद्य द्यायचा, कुठं हात आखडता घ्यायचा, कुणाला अजिबात भीक घालायची नाही आणि कुठं साष्टांग दंडवत घालायचा याबद्दलचं त्याचं गणित एकदम पक्कं होतं. चाळीस वर्षात एकही सरपंच त्याच्या मदतीशिवाय काम करू शकला नाही, इतकं त्यानं गावाला आपल्यावर विसंबून ठेवलं होतं. गावाला त्याचं भारी कौतुक वाटे.

भाऊसाहेबाचं लग्न होऊन त्याचा संसार सुखाचा झालेला. बापासारखा केळीचा घड त्यानं पैदा केला नाही, दोन पोरांवरच थांबला. बायकोच्या सुखदुःखात सामील झाला. कामाचं निमित्ताने तो तिलाही मुंबई पुण्यास फुकटात फिरवून आणे. पोरांना शिकवून मोठं केलं, म्हाताऱ्या बापाचा दवाखाना केला. बहिणींची लग्नं केली. भावंडांना हात दिला. शेतीवाडी वाढवली. खऱ्या अर्थाने तो सगळ्यांचा 'भाऊ' झाला आणि 'साहेब'ही झाला. सतराशेसाठ लोकांना गुपचूप ‘काठी घालत’ गावदेवळाचा जीर्णोद्धार करताना सगळं श्रेय स्वतःला घ्यायला विसरला नाही. हरहुन्नरी, हजरजबाबी भाऊसाहेबाचे गावात तीन ठिय्ये होते. गावातली एकुलती एक असलेली म्हादबाची कँटीनवजा पानटपरी. इथं तो फुकटात चहानाश्ता उरके. त्यानंतर वेशीबाहेर पिंपळाखाली जिथं एसटी बस उभी राहायची तिथं असलेल्या दोन मोठाल्या दगडावर बसून दात टोकरत गावातल्या भानगडींची खबरबात घेत त्याचा पुरेपूर वापर करे. तिसरा ठिय्या संध्याकाळचा होता, तो म्हणजे गावातला पार. वडाच्या भल्या मोठ्या झाडाभवतालच्या जुनाट पारावर बसून तो बारमाही पतंग उडवे. त्याने कितीही ढील दिली तरी लोक आ वासून ऐकत राहत. एकदोघांना त्यातली अतिशयोक्ती कळे, त्याची चलाखी उमजे, त्याचा वकूब समजे; पण त्यांनी तोंड उघडलं तरी लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत नसत. ‘‘भाऊसाहेबावर जळतो लेकाचा'' असं म्हणत त्याचीच भंबेरी उडवत. पण जेव्हा जेव्हा भाऊसाहेब पारावर बसलेला असे तेव्हा पार गच्च भरून गप्पांचा फड एकदम रंगात येई. जागा न मिळालेली गडीमाणसं आशाळभूतागत उभी राहत. गुरं घेऊन माघारी आलेली पोरंठोरं म्हशीच्या गळ्यातला कासरा धरून त्या गप्पांना कान देत, मावळतीला आलेला सूर्य त्या गप्पात सामील होई, वडाच्या पारंब्या कान टवकारून दक्ष होत, पानाच्या चंच्या नकळत मोकळ्या होऊन त्यातून पानविडे रंगत, टाळ्यांना उधाण येई, पाणचट शेरेबाजी झाली की हास्याची फिदिफिदि कारंजी उडत. भाऊसाहेबाचं बोलणं सगळे मंत्रमुग्ध होऊन ऐकत. अंधार पडला की मैफल पांगे, दिवसेंदिवस मोठी होत चाललेली भाऊसाहेबाची प्रतिमा डोक्यात घेऊन लोक आपआपल्या घरी जात.

काळ आपल्या गतीने जात राहिला, जमाना बदलला, लोकशिक्षणाचं प्रमाण वाढलं. नवनवीन साधने आली. दळणवळण सहजसुलभ झालं. दरम्यान भाऊसाहेबही थकून गेला आणि एका पावसाळ्यात त्यानं ‘राम’ म्हटला. मोठ्या शहरात नोकरीला असलेली त्याची पोरं चितेस अग्नी देताना ढसाढसा रडली. गावानेही शोक केला. गावकरी आता सरकारी कामं स्वतःच करतात. गावात मोबाइलही आलाय. संध्याकाळी पारावर फारसं कुणी बसत नाही. चुकून गप्पांची मैफल भरलीच तर गावकीच्या कामाचा, राजकारणाचा, विकासाचा विषय हमखास निघतोच. मग पारावरची जुनी खोंडं हटकून भाऊसाहेबाचं नाव काढतात. एकाचं दहा करून भाऊसाहेबाचं गुणगान गातात, "अरे कुठं लागाव्यात तुमच्या ओळखी ? काय त्यो तुमचा मोबाइल ? काय ती तुमची टेंडरं? आमचा भाऊसाहेब नुसता टेबलावर फाईल ठेवी, समोरचा साहेब चळाचळा कापायचा. काय दरारा होता गड्याचा! त्यानं केलं नाही असं कुठलं काम नव्हतं." लोकांचे हे उद्गार कानी पडताच वय झालेल्या वडाच्या पारंब्यांना गहिवरून येतं.

भाऊसाहेबाच्या गप्पा ऐकताना तिथं थबकलेली गुरं माघारी घेऊन निघालेली पोरं त्यांच्या भादरलेल्या डोक्यावरची मळकट गांधी टोपी हातात घेऊन झटकतात, नकळत तिचं टोक बाहेर काढून अगदी टेचात डोक्यावर चढवतात. तिथून निघताना त्यांच्या अंगात भाऊसाहेबाच्या अस्मितेची ऊर्जा संचारलेली असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT