Rural Life Agrowon
ॲग्रो विशेष

Gotawala: आधाराच्या भिंती पोखरणाऱ्या वाळवीची गोष्ट!

"आपल्या छकुलीच्या लग्नात लोकं असंच म्हणले असते त कसं झालं असतं. बाबूमामाचा सुरेश घरचं कार्य असल्यागत उभा होता छकुलीला वाटं लाऊस्तोर."

Dhananjay Sanap

हाताच्या कोपऱ्यातून एक कळ मेंदूपर्यंत ठसठसत जाते. पायाच्या मेचकीत वात घिरट्या घालतो. पाठीच्या बरगड्या खिळखिळ झाल्यात. कासवगतीनं शरीर थंडावत चाललंय. आणि घशाला कोरड जाणवायला लागलीय. चहूबाजूला गोंधळ होता.

पण त्यातला एकही आवाज त्याच्या कानावर पडत नव्हता. अजून एक वार आणि सगळं झटक्यात संपणार. टोकदार तीर आपल्याच दिशेनं सुसाट वाऱ्याच गतीनं येणार या भीतीनं त्यानं रणांगणावरची सुरक्षित जागा शोधायची धडपड सुरू केली.

रणांगणात उतरल्यावर घायाळ शत्रूवर वार करायचा नाही, ती नियमावली त्याला आठवली. पण नियमावलीचा काहीही उपयोग आत्ता होणार नव्हता. संतत्वाचा हा विचार सोडून दिला पाहिजे, याची त्याला जाणीव झाली.

आपणच एक हजार सहाशे दोन शूरविरांच्या संगतीत सुरू केलेल्या या भीषण युद्धसंग्रामात आपलाच पराभव निश्चित आहे, याची चुणूक एव्हाना लागली होती. शत्रूपक्षातून वार करणारा कसलीही दयाभावना दाखवणार नाही.

रणांगणावरचा एक नियम हाही असतो, की शत्रूनं समर्पणाची तयारी दाखवल्यानंतर त्यावर दया करायची. आणि त्याला बंदिस्त करून विजय जल्लोष साजरा करायचा. अशावेळी एका पाठोपाठ नीतीच्या गोष्टी आपल्याला का आठवतायत याची त्याला लाज वाटली. कंठात जीव ओतून त्यानं एक मोठी आरोळी ठोकली.

तशी बाजूच्या दहा सैनिकांनी अर्धवर्तुळाची रचना तयार करत त्याला संरक्षण द्यायला सुरुवात केली. त्या आरोळीनं मात्र थकवा अधिकच वाढला होता. सैनिकांनी संरक्षण देत त्याला रणांगणावरच्या एका बुरुजाच्या आडोशाला नेलं.

आपलं मरण पक्कं आहे, या भावनेनं तो बिथरला होता. त्यानं पुन्हा एकदा सर्वत्र नजर फिरवली. चहूबाजूनं मढी अंथरून ठेवलेलीत. कुणाचा हात तुटून पडलाय तर कुणाचं धड शिरा वेगळं. नजर फिरवून तो रणांगण न्याहळत तशाच अवस्थेत पडून राहिला. संकट काळातही आपली तंद्री लागते, याचं काही क्षण त्याला नवल वाटलं.

नवल वाटाव्यात अशा कित्येक गोष्टी घडत राहतात. अचानक पाठीला ओलसरपणा जाणवायला लागला म्हणून जखडलेल्या पाठीकडे हात न्यायचा प्रयत्न केला, तशी खांद्यावर जोराची कळ उठली.

मधूनच त्यानं तेही सोडलं. सैनिकांमधला एकजण त्याच्याकडे एकटक पाहत होता. तो मात्र नजर फिरवण्यात गढून गेला होता. सर्रकन एक तीक्ष्ण तीर सैनिकांचं वलय छेदत त्याच्या पाठीतून आरपार निघाला. पापणीची उघडझाप होईपर्यंत त्याला मृत्यूनं कवटाळलं.

तो डोळे उघडण्याचे प्रयत्न करत होता. पण डोळे उघडत नव्हते. श्वासोच्छ्वास वाढत होता. मेंदूला श्वास कमी पडायला लागला की जीव गुदमरतो. अशावेळी माणसांची चांगली वाईट स्वप्न भंग पावतात. आता त्याला दचकून जाग आलेली नव्हती. किंवा नेहमीसारखा त्याचा घसाही कोरडा पडलेला नव्हता.

पुन्हा एकदा कोरं स्वप्न त्याला पडलं होतं. त्या स्वप्नानं जाग तेवढी आली. त्यानं अर्ध झोपेत गोधडी ओढून चेहरा झाकला. डाव्या अंगावरून उजव्या अंगावर होत डावा पाय आधी सरळ केला. मग तोच पाय तिरका केला. आणि उजवा पाय अर्ध दमडून गादीवर पालथा पडला. दोन्ही हातानं उशीला आवळत त्यानं दीर्घ श्वास सोडला.

कुलर केव्हाच बंद झाला होता. कदाचित बाईनं बंद केला असावा. पुढचा काही वेळ तशाच अवस्थेत सुन्या पडून होता. अशी स्वप्न पडणं त्याला दचकवणारं राहिलं नव्हतं. हा फक्त स्वप्नांचा अर्थ लागत नव्हता.

काल दुपारी पडलेल्या स्वप्नात नदीच्या लालसर पाण्यात एक स्त्री वाहून गेली होती. आज तो स्वतः एका विचित्र युध्दात मृत्यूला कवटाळून पडला होता.

आयुष्याशी कसलाच संबंध नसणाऱ्या या स्वप्नांची त्यानं दखल घ्यायची नाही, असं मनोमन ठरवलेलं होतं. पण स्वप्न का पडतात याची त्याला पुसटशी कल्पना होती.

त्यावरही तो खोलवर जाऊन विचार करणं टाळत होता. अतृप्तीची भावना कायम ठसठसत राहते. भावनांचा कोंदट संचार संदिग्धता निर्माण करत राहतो. अपूर्णत्वाची भावना स्वप्नांच्या वाटेनं अनुभूतीच्या पातळीवर येते. आणि मग पाहिलेल्या न जगलेल्या क्षणांची एक शृंखला आकारास येत जाते.

मागे कधीतरी याबद्दल युट्युबवर ऐकलं होतं. पुन्हा तेच स्वप्न सुरू करावं, म्हणून त्यानं घट्ट डोळे मिटले. पण आता डोळ्यासमोर नुसत्या काळ्या, लालसर, निळ्या, करड्या रंगांच्या पट्ट्या दिसत होत्या. आपल्या मरणानंतर पुढे काय याची थोडीशी उत्सुकता मनात घर करू लागली होती. पण काही केल्या डोळा लागत नव्हता.

पोट गच्च झालं होतं. लघवीला जावंस वाटत होतं. अजून थोडं वेळ असंच पडून राहावं. डोळा लागला तर स्वप्नात पुन्हा शिरता येईल असा विचार करत तो निपचित पडून राहिला. पण चलबिचल स्थिर पडू देत नव्हती. म्हणून मग त्यानं तोंडावरचं पांघरून बाजूला सारत डोळे उघडले.

तसा एकदम लख्ख प्रकाश खोलीभर पसरलेला दिसला. पापणीला ताणून आळस दिला. आणि उशीच्या खालचा मोबाईल हातात घेत वेळचा अंदाज घेतला. आठ वाजून बावीस मिनिटं झाली होती.

पटकन व्हाटसअँप उघडून त्यानं मेसेजवर नजर फिरवली. स्टडी ग्रुपचे मेसेज तेवढे आलेले. मग इंस्टा ओपन करून एक दोन स्टोरीज चाळल्या. आणि शेवटी युट्युबवर कुमार सानुचं गाणं प्ले केलं. आवाज कमी करतI मोबाईल उशीजवळ ठेवला. सुरुवातीचं कडवं असंच जाऊ दिलं.

जबसे तुझे देखा दिल को कहीं आराम नहीं

मेरे होठों पे एक तेरे सिवा कोई नाम नहीं

या ओळीनं त्याला जरासं मोकळं वाटायला लागलं. कडक उन्हाळ्याच्या दिवसाची सुरुवात कुमारच्या आवाजनं अल्हाददायक झाली होती. तो पुढं स्वतः गुणगुणत राहिला. गाणी ऐकताना त्याला एक धुंद चढत जायची.

स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरू केल्यापासून त्याची सकाळ बऱ्याचदा गाणी ऐकून व्हायची. त्या गाण्यांच्या मदतीनं त्याचा दिवस धावायला लागायचा. त्याला गाण्यातलं संगीत कळायचं नाही, त्याचा फोकस असायचा तो शब्दांच्या खेळाकडे. कुमारचा आवाज त्याला कायम झुलवत राहायचा.

बाईनं तोवर खोलीच्या बाहेरून आवाज दिला. "बबलू उठ बरं! दुपारलोक झोपत असतेत काय." त्यानं बाईला अजून कसलंच उत्तर दिलं नव्हतं. हं म्हणावं असंही त्याला वाटलं नाही. रात्री शऱ्याला घरापर्यंत सोडून त्यानं थेट घर गाठलं होतं. दिवसभराचा थकवा अंगावर धिंगाणा घालत होता.

ररात्री पडल्या पडल्या कधी झोप लागली तेही कळालं नव्हतं. आता बाई खोलीत येऊन म्हणाली, "उठ बरं बिगीनं. उरक. कव्हरक लोळत पडणारेस. लोकाची दुपार झाली तरी आपलं लोळणच चालुय. उठ साडेगावला जायचंय. बाबू मामाच्या नातीचं लग्नय.

तोह्या बापानं मोटारसायकल घरीच ठेवलीय आपुन जाणारेत म्हणून!" बोलत बोलत बाईनं झर्रकन सुन्याच्या अंगावरची पांघरुन घेतलेली गोधडी ओढली. "पाच मिनिटं लोळू दी" म्हणत सुन्यानं पुन्हा गोधडी ओढली. तशी बाई म्हणली,

"आरं ही काय येळय झोपायची! लग्न लागायचं आपुन इथंच राहायचो. उठ आता!" सुन्यानं "जाता येईन मंग एवढं कुठं व्हीआयपी लग्नय." "आपल्या छकुलीच्या लग्नात लोकं असंच म्हणले असते त कसं झालं असतं.

बाबूमामाचा सुरेश घरचं कार्य असल्यागत उभा होता छकुलीला वाटं लाऊस्तोर." तसा सुन्या म्हणला, "बई, तुला ना, उगाच ज्याचं नाई त्याचं कवतुक असतंय.

त्या सुऱ्याला छकुलीच्या पहिल्या सोयरिकीच्या येळला हुंड्यासाठी पैसे मागितले होते तव्हा त्यानं दादाचा कसला पानउतारा केलता इसरलीस काय? म्हणला होता, सगळं सोईला लावता येत नसन त खदरावळ जन्माला घालायचीच कशाला!" सुन्यानं जुनं कुदांड उकरून काढलं तसं बाई म्हणाली,

"आरं आता झालं गेलं सोडून द्यावं लागतं बाबा! त्येव काय आपला दुष्मनय का? त्यानंच त दुसरं ठिकाण आणलं. सोयरीक जुळून देली ना." सुन्या तसं रागानं बाईकडं बघत म्हणला, "आत्ता त्येव इशय काढू नकु. लईच भारी ठिकाण आणलेलं."

आणि सुन्या ताडकन उठला. माय लेकराच्या संवादात बॅकग्राउंडला कुमारची गाणी सुरूच होती. त्यानं मोबाईल हातात घेत गाणी बंद केली. कुमारचा आवाज आता त्याला नकोसा वाटू लागला होता.

सकाळची सुरुवात एका चिघळलेल्या जखमेचं ठसठसणं घेऊन आली होती. बाई कपाळावर घड्या पाडत उरक म्हणाली आणि खोलीतून स्वयंपाक खोलीत गेली. सुन्यानं आवराआवर केली. मोबाईल चार्जिंगला लावला.

खोलीतून बाहेर येत बाथरूमच्या खिळ्याला अडकवलेल्या आरश्यात जरावेळ चेहरा न्याहाळला. चेहऱ्यावरचे काळे बारीक डाग ठळकपणे दिसते होते. भुवया फुगीर झाल्या होत्या. डोळे लालसर दिसत होते. नुकत्याच फुटू लागलेल्या मिशीच्या आणि दाढीच्या केसावर हात फिरवत डोक्यावरचे केस मागे सारले.

जांभई देत बाथरूमकडे गेला. बाई स्वयंपाकात गुंगली होती. सुन्याला नेहमीप्रमाणं आवरून झाल्यावर चहाची तल्लफ झाली होती. बाईनं चहाचं आधण उतरवत त्याला चहा दिला. दादा घरात दिसत नाहीत म्हणजे बाहेर गेले असावेत, असा त्यानं मनाशीच अंदाज बांधला. चहाचा कप घेताना त्याच्या लक्षात आलं, हाताची नखं वाढलीत.

नखात मळ साचलाय. त्याला स्वतःच्याच बोटांची किळस आली. शाळेत असताना त्यानं करंगळीचं नख वाढवलेलं म्हणून शारीरिक शिक्षणाच्या तासात कोवळे मास्तरनं त्याला बदडून काढलं होतं. तेव्हापासून तो आठवड्याला नखं कापयचा. चहा पिऊन नखं कापली पाहिजेत, असा विचार करत तो बाईला म्हणला,

"बई, नेलकटर कुठं ठेवलंय?" बाई लसूण सोलत म्हणली, "मागल्या खोलीतल्या देवळीतल्या हिरव्या कलरच्या डब्ब्यात आसन बघ." चहा पिऊन त्यानं नखं कापली. मग अंघोळ करून त्यानं अंगात पांढरं बनियन घातलं. कमेराला अंडरपॅन्टवर फिकट गुलाबी चौकडी टॉवेल गुंडाळला.

केसाला तेल लावत मागच्या खोलीतून पुढच्या खोलीत चकर मारली. एक-दोन वेळेस आरशात पाहून मरगळ झटकली. स्वयंपाक घरात जाऊन बाईकडून पुन्हा एकदा चहा घेतला. तिनं परत लग्नाला लवकर पोहचलं पाहिजे याची आठवण करून दिली. इच्छा नसली तरी लग्नाला जावं लागणार होतं.

मग त्यानं इस्त्री करून ठेवलेला आकाशी शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स घातली. दादानं गाडीची चावी कुठं ठेवली ते काही त्याला सापडत नव्हतं. म्हणून दादाला फोन करून चावी कुठं ठेवली त्याचा ठावठिकाणा घेतला.

दादा नांगरटीसाठी सोन्याचं ट्रॅक्टर घेऊन रानात गेले होते. बाईनं दादासाठी भाकरी थापून कालवण करून ठेवलं होतं. आवराआवरीत दहा कधी वाजले तेही कळालं नव्हतं.

सुन्यानं एकदा पत्रिका पाहून लग्नाची वेळ कन्फर्म करून घेतली. पत्रिकेत अभिजित मुहूर्त १२ वाजून २८ मिनिटं लिहिलेलं होतं. साडेगावला जायचं म्हणजे पाठ खिळखिळ होणार, त्यात सूर्य आग ओकत असणार या विचारात त्यानं दादांचा पांढरा बागायतदार त्यानं गळ्यात अडकवला. बाईनं छकुलीच्या लग्नात घेतलेली जांभळ्या कलरची साडी नेसली.

गळ्यात एक मंगळसूत्र, पोत आणि नेहमीप्रमाणं अंगठाभर कुंकु कपाळावर लावलं होतं. तिचं कुंकू लावणं कधी चुकायचं नाही. बाई तेवढ्यानचं खुलून दिसायची. आजही तिचा चेहरा खुलून दिसत होता.

सुन्याला अनेकदा वाटायचं, च्यायला आपल्या माईनं या काळ्याढूस गड्याशी लग्न करायला कसं काय होकार दिला असेल काय माहीत! तो बाईला अलीकडे अनेकदा म्हणायचा 'बई तूयस म्हणून बरंय नाइतर मपला बाप निवळ वाया गेला असता. त्वा लग्नाला होकार कसंकाय दिला तेच कळत नाइ.'

त्यावर बाई म्हणायची, 'लै चांभऱ्यागत बोलू नकु. सभावानं फटकळ असला तरी तोहा बाप चांगला माणूसय. मोह्या अक्कीनं बरोबरनं ओळखलं होतं. म्हणून तर लग्न लावून देलं.' बाई तिच्या आईला अक्की म्हणायची.

बाईचा बाप ती लहान असतानाच निजामाच्या विरोधात लढला आणि शहीद झाला. पण त्याचा कधी कुणाला पत्ताच लागला नव्हता. त्याची स्टोरी पण अक्कीनं सुन्याला सांगितली होती.

आता हळूहळू ऊन तापायला लागलं होतं. बाईनं निघायची गडबड केली. मागच्या खोलीतल्या खिडक्या बंद केल्या. लाईटचे बटन बंद केले. गॅस सिलेंडरचं मेन स्विच बंद केल्याची खात्री केली. तोवर सुन्यानं दरवाज्याच्या मागची चप्पल पायात घातली आणि जीन्सच्या खिशावर हात फिवरत बाहेर पडला.

दाराच्या बाहेर साईड स्टॅण्डवर लावलेल्या बजाज सिटी हंड्रेडच्या टाकीजवळचं फडकं काढून मोटारसायकलची सीट झटकली. मग टाकीजवळ कान नेत मोटरसायकल हलवून पेट्रोल तपासलं. चाकाकड नजर फेकत टायरला पाय लावत हवा तपासली. बाई एका हातात स्कार्फ, दुसऱ्या हातात स्टीलचा डब्बा आणि कुलूपचावी घेऊन आली. सुन्याच्या हातात कुलूपचावी देत बाईनं स्टीलचा डब्बा मोटरसायकल हँडलच्या मधे ठेवला.

कुलूप लाव म्हणत स्कार्फ डोक्यावर घेतला. सुन्या डब्ब्याकडं पाहत म्हणला, "कव्हरक लग्नात डब्बकेच देणारस काय माहीत." "मंग काय द्यायचं व्हतं?" बाईनं प्रश्नार्थक नजरेनं विचारलं. कुलूप हातात घेऊन दरवाजा ओढून घेत कडी कोड्यात घालून सुन्यानं कुलूप लावलं. जाऊदी म्हणत मोटारसायकलवर बसला.

बाई मागच्या सीटवर बसली. त्यानं डब्बा बाईकड दिला. बाई मोटरसायकलवर बसली. गिअर पायानं न्यूटरल करत त्यानं किक मारून मोटरसायकल सुरू केली. बसली का नीट विचारत चलायचं का म्हणत गिअर टाकला.

आणि गाडी सावरत तो मोटरसायकल चालवू लागला. मोटरसायकल मंदिराच्या दिशेनं हळूहळू निघाली. पहिला, दुसरा आणि मग पुन्हा पहिला, दुसरा, तिसरा गिअर करत मंदिर ओलांडून आता डांबरी रस्त्यावर मोटरसायकल धावू लागली होती.

क्रमशः

#गोतावळा_८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT