Indian Agriculture : विहीर

वस्तीवर कुणी नाही हे पाहून रानात खेळत असणाऱ्या विनूला बज्यानं तोंडात बोळा कोंबून विहिरीत कोंडलं. पायट्याचे धोंडे काढले. तो निघून आला आणि लिलावतीने पुढचे काम पार पाडलं. विनूला तिने पाण्यात बूडवून ठार मारलं. साळसुदागत ती वस्तीवर येऊन बसली. सांज होता होता विनूचा शोध घेताना एकच गलका उडाला नि बज्याला आपण किती मोठी चूक करुन बसलोय याचा अंदाज आला. त्याचं मन त्याला खाऊ लागलं. रामचंद्राचं लग्न झालं तरी बज्याच्या चेहऱ्यावर खुशी नव्हती.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon
Published on
Updated on

समीर गायकवाड

तुळसाबाई म्हणजे बज्या शेळकेची बाईल. नांगी तुटलेल्या खेकड्यागत तिरक्या चालीची बाई! त्याच्या मामाची मुलगी होती ती. तिचा रुबाब राणीसारखा होता. बज्याच्या घरी तिचा शब्द अंतिम होता. बज्याला चार भाऊ होते. तो शेवटून दुसरा होता.

बापाच्या मृत्यूनंतर वडिलोपार्जित सात एकर जमीन त्यांनी आपसांत वाटून घेतलेली. त्याच्या वाट्याला आलेलं रान मुरमाड होतं. अगदी नापीक नसली, तरी त्या मातीत कसदेखील नव्हता. बापाच्या पाठीमागे घर तुटलं, आई कोलमडून गेली. तिच्या मायेपायी असहाय झालेला बज्या तुळसाबरोबर बोहल्यावर चढण्यास नकार देऊ शकला नाही.

तुळसाने उंबऱ्यावरचं माप ओलांडल्यापासून घरातली शांतता भंग पावली होती. आईकडे बघून तो सारं सहन करायचा. मात्र एका पावसाळ्यात आई गेली आणि बज्याचा आधार गेला. त्यांच्या राहत्या वाड्याचेही हिस्से झाले. जे पदरात पडेल ते तो स्वीकारत गेला. तुळसाने मात्र मोकार तमाशा केला.

जावांशी दावा मांडला, झिंज्या उपटून काढेपर्यंत भांडणं केली. शेवटी गावातल्या थोराड मंडळींनी मामला मिटवला. आपल्या बायकोने मोठ्या भावाच्या अंगावर जाणं बज्याला रुचलं नाही. मोठ्या वहिनीचा तिने केलेला पाणउतारा तो कधीच विसरू शकला नाही. ही भांडणं त्याच्या जिव्हारी लागली. घर सोडून तो वस्तीवर राहायला गेला.

Indian Agriculture
Indian Agriculture : या तरुणांनो, परत फिरा रे!

बजरंग नावाप्रमाणेच बलदंड होता. चार गड्यांचं काम करायचा. कसलेला धिप्पाड देह होता त्याचा. मात्र व्यावहारिक जगाची फारशी समज नव्हती. सगळं आई-बापाच्या मर्जीने चालायचं. भावंडंही प्रेमळ होती. थोरल्या वहिनीने तर आईची माया दिली होती. वडिलांच्या पाठीमागे आपल्या घराची लक्तरं वेशीवर टांगण्याचं काम आपल्या बायकोनं केलं, हा डंख त्याला सुखाने जगू देत नव्हता.

त्याची तब्येत आस्ते कदम ढासळत गेली. आपल्या पोरीने भाचेजावयाचे हाल केले याचा बज्याच्या सासऱ्याला पस्तावा आला. केलेल्या चुकीचे प्रायश्‍चित्त म्हणून त्याने गावाच्या ओढ्याच्या कडेने असलेली जमीन घेण्यात बज्याला मोठी मदत केली. ती जमीन घेण्यासाठी बज्याने त्याच्या वाट्याला आलेली वडिलोपार्जित जमीन विकली. त्या जमिनीत तो रात्रंदिवस कसू लागला.

गावाकडे घरी सुरू असलेली भांडणे त्याच्या दृष्टिआड सुरूच होती, त्यात खंड नव्हता. तांबडं फुटल्यापासून तुळसाच्या तोंडाचा पट्टा सुरू व्हायचा. जावांनी घराची दारं बंद केली, की ती ओसरीवर येऊन बसायची, नाहीतर आळीच्या कोपऱ्यावर राहणाऱ्या संत्याच्या पिंपळापाशी बसून असायची. बसल्या बसल्या दातवण लावत गावाची मापं काढायची.

तुळसाची कूस उजवून तिच्या पोटी एक गोरंगोमटं पोर आणि एक गोड पोरगी झालेली. तुळसाने आपल्या पोरीवर जीव लावला नाही, पण पोराला मात्र लाडानं येडं अन् गुळानं बोबडं करून ठेवलं होतं.

पोरगं अगदी वाया गेलं. बज्याला काही कळत नव्हतं, असं नाही पण त्याचं काही चालतच नव्हतं. तो हताश होऊन पाहत राहायचा. असं करत करत बरेच दिवस लोटले. पोटापाण्याचे भागेनासे झाले तेव्हा त्याने सासऱ्याच्या मदतीने जमीन घेतली.

Indian Agriculture
Indian Agriculture : पोटासाठी शेतकरी बनला हमाल; शेतीचे प्रयोगही सुरू

आपली हक्काची जमीन विकून त्याने सौदा केला खरा, मात्र फासे उलटेच पडले. दरम्यान, मुलगी न्हातीधुती झाल्यावर तिच्या लग्नाची गोष्ट निघाली. त्यासाठी थोडा पैसा हवा होता. शिल्लक राहिलेली सगळी रक्कम मुलीच्या लग्नात खर्ची पडली.

बज्या कंगाल झाला. ओढ्यालगत घेतलेली निम्मी जमीन रस्त्याच्या कामासाठी सरकारने अगदी किरकोळीत ताब्यात घेतली नि त्याच्यावर आभाळ कोसळलं. तो खचून गेला. त्याने दत्तू पाटलाच्या वस्तीवर सालगड्याचं काम धरलं.

पण त्याचं गणित काही केल्या मेळ खात नव्हतं. हप्त्यातून एका दिवसासाठी जरी गावातल्या घरी गेलं तरी भूतकाळ त्याला खायला उठायचा. दरम्यान, पोरीचं बाळंतपण जवळ आलं.

खर्च मोठा दिसत होता. खिसा मोकळा होता. त्याचा पोरगा रामचंद्र हा लग्नाला येऊन निबार दिसू लागला होता. त्याच्या लग्नावरून तुळसा रोज टोमणे मारू लागली होती. तिच्या रोजच्या किरकिरीला कंटाळून बज्याच्या भावंडांनी दुसरीकडे राहण्याची सोय केली, वाडा विकून टाकला.

तुळसाला भांडायला माणूस उरलं नाही आणि तिचे वडीलही वार्धक्याने गेले. बज्या खऱ्या अर्थाने अनाथ भणंग झाला होता. पोराचं लग्न करायला नि पोरीचं माहेरपण करायला त्याच्याकडे फुटका मणी नव्हता.

त्याची नड दत्तूची बायको लिलावती हिने अचूक हेरली. तिने एक भयानक सौदा केला. त्याला बज्या आधी तयार नव्हता, मात्र त्याची मती कुंठित झाली होती, त्याचा विवेक लोप पावला होता.

Indian Agriculture
Indian Agriculture : प्रत्यक्ष काम करणारे होऊयात...

रामचंद्राच्या वयाचा काशिनाथ हा लिलावतीचा एकुलता एक पोर होता नि तिला तीन पोरीही होत्या. पोरींची लग्नं झाली होती. दत्तूच्या पहिल्या बायकोपासून झालेल्या मुलाचं खटलं देखील तिथंच होतं. त्याचं नाव शिवा. त्याच्या जन्मानंतर काही दिवसांतच दत्तूची पहिली पत्नी मरण पावली होती.

पुढे जाऊन लिलावतीने सावत्र मुलाचं म्हणजे शिवाचं लग्न लावून दिलं; मात्र तिच्या मनात असूया होती. लग्नानंतर शिवाचा पाळणा लगेच हलला नि त्याला देखणं पोर झालं. विनू त्याचं नाव! नितळ मनाचा दत्तू नातू झाल्याने हरखून गेला, इकडे काशिनाथाच्या बायकोला मूल होत नव्हतं म्हणून लिलावती तळमळत राहिली.

द्वेषाने ग्रासलेल्या लिलावतीच्या डोक्यात कुटीलतेचं जहर फणा काढून होतं. तिनं त्यासाठी बज्याला निवडलं. काम ऐकताच त्याचा चेहरा काळाठिक्कर पडला, ओठ कोरडे पडले, नरडं आत ओढू लागलं. आधी त्यानं नकार दिला, मात्र लिलावतीने आमिषं दाखवली; त्याला तो भुलला.

Indian Agriculture
Indian Agriculture : नवे वर्ष, नवी उमेद

वस्तीवर कुणी नाही हे पाहून रानात खेळत असणाऱ्या विनूला त्यानं तोंडात बोळा कोंबून विहिरीत कोंडलं. पायट्याचे धोंडे काढले. तो निघून आला आणि लिलावतीने पुढचे काम पार पाडलं. विनूला तिनं पाण्यात बूडवून ठार मारलं.

साळसुदागत ती वस्तीवर येऊन बसली. सांज होता होता विनूचा शोध घेताना एकच गलका उडाला नि बज्याला आपण किती मोठी चूक करून बसलोय याचा अंदाज आला. त्याचं मन त्याला खाऊ लागलं.

रामचंद्राचं लग्न झालं तरी बज्याच्या चेहऱ्यावर खुशी नव्हती. या लग्नानंतर काही दिवसांतच तुळसाने अंथरून धरले. आजारानं अवघ्या काही दिवसांत गंभीर रूप धारण केलं नि त्यातच तिचा मृत्यू झाला. तुळसा मेली तेव्हा बज्या रडला नाही!

इकडे दत्तू पाटीलही हाय खाऊन मरण पावला. त्याच्या पाठीमागे वंशाची वेल काही केल्या वाढली नाही. काशिनाथला मूलबाळ झाले नाही. लिलावती टाचा रगडून रगडून खंगून गेली. चार दशकांहून अधिक काळ पाटलांच्या शिवारात सालगडी म्हणून राबणारा बज्या उतारवयात लागीर झाल्यागत वागू लागला.

पाटलाच्या शेतांत आणखी आक्रित घडलं. ज्या विहिरीत विनू मेला तिचं पाणी दत्तू जाताच एकाएकी आटलं. त्यानंतर दोन वर्षे सलग दुष्काळ पडला. रान निव्वळ पडीक पडलं. शिवार ओसाड झालं. काशिनाथ बायकोला घेऊन नोकरीच्या गावी गेला. शिवा आणि लिलावती दोघेच त्या भकास वस्तीवर राहू लागले. बज्या त्यांच्या जोडीला येऊन बसायचा.

शेतात काम नव्हतं. त्याने कामावर जाऊ नये म्हणून रामचंद्र त्याला खूप अडवायचा; पण कितीही मिनतवाऱ्या केल्या तरी बज्या काही केल्या ऐकायचा नाही. तो पाटलाच्या वस्तीवर यायचाच. आटून गेलेल्या विहिरीच्या ढलाणीपाशी जांभळाच्या झाडाखाली येऊन बसायचा. तहानभूक हरपून तासन् तास बसून राहायचा.

त्याला आता वेगळीच चिंता लागली होती. रामचंद्राच्या लग्नाला वीस वर्षे झाली, तरी तान्हुली पावलं अंगणात उमटली नव्हती. आपण पाटलाच्या वंशाचा दिवा विझवण्यात मदत केली म्हणून देवानं आपला वंश बुडवला, असंच त्याला वाटायचं. आभाळाकडं बघत पुटपुटत राहायचा. कधी कधी कोरड्या विहिरीत उतरून साफसफाई करायचा. नेणत्या लेकरागत हमसून रडायचा.

सांज होताच रामचंद्र येऊन त्याला घेऊन जायचा. बज्या रोज उठून पश्‍चात्ताप करायचा आणि आपल्या रामचंद्राला मूलबाळ व्हावं म्हणून देवापाशी गाऱ्हाणं करायचा. हेच त्याचं आयुष्य झालं होतं.

आणि एका दिवाळीत बज्याची प्रार्थना सुफळ झाली. थोराड झालेली त्याची सून मंदाबाई पोटुशी राहिली. तिचे पाय भारी झाल्याचं कळताच तो ढसाढसा रडला. इतकी आनंदाची बातमी कळली तरी पाटलाच्या वस्तीवर विहिरीपाशी यायला तो काही चुकला नाही.

त्या दिवशी त्याला विहिरीतून प्रतिध्वनी आल्याचे भास झाले. विहिरीच्या तळाशी विनू हाका मारत असल्याचा त्याला भास झाला. ते भास वाढतच राहिले. तो पुरता भ्रमिष्ट झाला. बज्याला वेड लागलंय, असं गाव चारी तोंडाने बोलू लागलं.

जख्ख म्हाताऱ्या झालेल्या लिलावतीला तर अपार दुःख झालं. तिलाही पश्‍चात्ताप होत होता; मात्र सांगणार कुणाला? ज्याचं पोर आपण मारलं त्या शिवाच्या हातून सेवा करवून घेताना ती रोज तीळतीळ मरत होती.

एव्हाना पावसाळा तोंडावर आला होता. सुनेचं बाळंतपण कधीही होईल, हे बज्याला एव्हाना उमगलं होतं. आषाढ भरावर आला होता. वारं मुकं झालं होतं. काळ्याकुट्ट ढगांनी एकच गर्दी केली होती. सुकून गेलेली झाडं माना टाकून उभी होती. दूरवर कुठं चिटपाखरू दिसत नव्हतं. अंगातून घामाच्या धारा लागलेल्या अवस्थेत बज्या विहिरीच्या तोंडापाशी बसून होता. त्याचं अंग आता थरथरत होतं. भास वाढले होते. डोक्यात विनूच्या किंकाळ्या घुमत होत्या.

इतक्यात, रामचंद्राच्या हाका त्याच्या कानी पडल्या. तो लांबूनच आरडत धावत येत होता, “आबा, तुला नातू झालाय! आबा, तू आज्जा झालाय! मी बाप झालोय, मंदाला पोरगं झालंय! आबा मंदाला पोरगं झालंय, पोरगं... पोरगं...!’’

काही सेकंदांसाठी बज्याच्या चेहऱ्यावर हसू झळकलं. पण निमिषार्धात त्याचा चेहरा भावव्याकुळ झाला. रामचंद्राच्या हाका वाढत गेल्या, पण बज्याला त्याचा आवाज क्षीण वाटू लागला. विहिरीतला विनूचा आवाज मात्र वेगाने वाढला होता. त्यातच पावसाची रीपरीप सुरू झाली. धावत येणाऱ्या रामचंद्राचे पाय ढेकळात अडकू लागले.

असेच काही क्षण गेले. बांधावरून धावत येणारा रामचंद्र बज्याच्या नजरेच्या टप्प्यात येऊनदेखील त्याची नजर शून्यात होती. त्याच्या डोळ्यात विहीर दिसत होती. खोल खोल कोरडी ठाक विहीर. रामचंद्र बज्याच्या जवळ पोहोचला आणि त्याने आनंदाने बापाच्या नावाने आरोळीच मारली. त्याला हात लावून हलवून पाहिलं.

त्याचं अंग एकाएकी थंड पडलं होतं. सर्रकन त्यानं हात मागे घेताच निष्प्राण झालेला बज्याचा देह कठड्यावरून कलून विहिरीत पडला. दहा परस खोल घडीव विहीर होती. धोंड्यांवर पडून बज्याचं डोकं फुटलं. विहिरीचा तळ लाल झाला. त्या रात्रीच त्याचं मर्तिक झालं.

काही दिवसांनी काशिनाथ गावी येऊन गेला. लिलावतीने त्याच्यासोबत शहरात जाण्यास नकार दिला. आपल्या थोरल्या लेकीचा मुलगा तिने शिवासाठी दत्तक घेतला. दत्तू पाटलाचं शिवार त्या लहान मुलाच्या आवाजानं पुन्हा डवरलं.

आताशा लिलावती वस्तीवर शांत बसून असते. तिला वेध लागलेत मरणाचे, मुक्तीचे! तिला शिवाच्या मांडीवर आपले प्राण सोडायचेत. बज्याच्या मरणाने तिथे आणखी एक बदल झाला.

दत्तू पाटलाच्या आटलेल्या विहिरीतले झरे पुन्हा पाझरू लागले. पाटलाची विहीर त्या पावसाळ्यात काठोकाठ भरून गेली. त्याच विहिरीचे पाणी तुळसाच्या डोळ्यातून वाहत असते; ज्याला विनूचा देहगंध आहे!

(लेखक प्रसिद्ध साहित्यिक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com