Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सद्यःस्थितीत ११.८७ लाख टन चारा जिल्ह्यात उपलब्ध आहे. तो आगामी तीन ते चार महिने पुरेल,अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी दिली.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शनिवारी (ता. २७) खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दुष्काळी परिस्थितीतील चारा उपलब्धता व नियोजन याबाबत आढावा घेतला. या वेळी पशुसंवर्धन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात ६ लाख ३३ हजार २ इतके पशुधन असून, त्यात लहान जनावरे १ लाख ५८ हजार २५१, मोठी जनावरे ४ लाख ७४ हजार ७५२ आहेत, तर ५ लाख १९ हजार ४२६ शेळी मेंढ्यांची संख्या आहे.
लहान जनावराला एका दिवसाला ३ किलो वाळलेला, तर मोठ्या जनावराला ६ किलो चारा द्यावा लागतो. या आवश्यकतेनुसार लहान जनावरांना जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार २५१ लहान जनावरांना ४७५ टन, ४ लाख ७४ हजार ७५२ मोठ्या जनावरांना २८४९ टन तर ५ लाख १९ हजार ४२६ शेळ्या मेंढ्यांसाठी ५१९ टन चारा असा एकूण ३ हजार ८४३ टन चारा दैनंदिन लागणार आहे.
प्रति महिना १ लाख १५ हजार २८१ टन चारा आवश्यक आहे. जिल्ह्यात सध्या ११ लाख ८७ हजार टन चारा उपलब्ध आहे. जिल्ह्यात चाराटंचाई भासू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याबाहेर चारा नेण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. टंचाईच्या काळात पशूंचे आरोग्य सांभाळण्यासाठीही पशुसंवर्धन विभागाला पशूंना वेळीच औषधोपचार देण्याच्या सूचना निर्गमित केल्या असून, सतर्कता बाळगण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ३ पशुपालकांकडे १३८० टन, फुलंब्री तालुक्यात एका पशुपालकाकडे ३५० टन, गंगापूर तालुक्यात ९ पशुपालकांकडे ५१ टन, खुलताबाद १३ पशुपालकांकडे ७४ टन, सिल्लोड तालुक्यात एका पशुपालकांकडे ५०० टन अशा एकूण २७ जणांकडे २३५५ टन चारा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे पशुसंवर्धन विभागाने कळविले आहे.
चारा उत्पादन आणि उपलब्धता
११ लाख ८७ हजार टन चारा २०२३-२४ च्या खरीप व रब्बी हंगामात उत्पादित झाला आहे. जिल्ह्यात २ लाख ८४ हजार ८५६ हेक्टर क्षेत्रावर १२ लाख ६८ हजार टन खरिपात, तर ४ लक्ष ४ हजार टन चारा रब्बी हंगामात उत्पादन झाला आहे. या शिवाय नैसर्गिक स्रोतांतून २ लाख १७ हजार टन वैरण उपलब्ध झाली.
शिवाय पशुसंवर्धन विभागाने राबविलेल्या वैरण विकास कार्यक्रमातून १ लाख ४१ हजार टन चारा उपलब्ध झाला. असा जिल्ह्यात एकूण २३ लाख ४२ हजार टन चारा निर्माण झाला. वर्षभर तो वापरून सध्या ११ लाख ८७ लक्ष टन चारा उपलब्ध आहे, असे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.