Satara Rain : कोल्हापूरच्या पश्चिम भागातील पूरपरिस्थिती सुधारत असली, तरी शिरोळ तालुक्यातील पूरपरिस्थिती मात्र अद्याप गंभीर आहे. पंचगंगा नदीच्या पाण्यात धीम्या गतीने का होईना घट होत असताना, कृष्णा नदीच्या पाण्यात मात्र सहा इंचांपर्यंत वाढ मंगळवारी दुपारपर्यंत सुरू असल्याने, शिरोळ तालुक्याला अद्यापही दिलासा मिळाला नसल्याचे चित्र आहे.
शिरोळ तालुक्यातील अनेक गावांतील शेती अद्यापही पाण्याखालीच असल्याने मोठी अस्वस्थता पसरली. यातच कोयना धरणातून गेल्या तीन दिवसांपासून सुरू असणारा ३२००० क्युसेकचा विसर्ग मंगळवारी ४२००० क्युसेकपर्यंत वाढविण्यात आल्याने चिंतेत भरच पडली.
शिरोळ तालुक्यातील अनेक गावांना पुन्हा पुराचा वेढा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वारणा धरणातून विसर्ग कमी केला असला, तरी त्याचा फारसा परिणाम गतीने पाणी कमी होण्यावर झाला नाही.
कृष्णेच्या बॅकवाटरमुळे वारणा नदीच्या पाण्याची ओसरण्याची गतीही अतिशय मंद राहिली. यामुळे वारणा काठावरही चिंतेचे ढग कायम होते. पाणी जास्त दिवस शेतात राहिल्याने मोठ्या उसावरही या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
खरीप पिकांचे तर अवशेषही उरणार नाहीत असे चित्र असल्याने, जरी अनेक गावात पाणी नागरी वस्त्यांत आले नसले, तरी शेतीचे नुकसान मात्र अपरिमित असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
शिरोळ तालुक्यात दिवसभर कडक ऊन आणि नद्यांच्या पाण्यात मात्र वाढ असेच विरोधाभासाचे चित्र राहिले. वाढणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाण्याची वस्ती शेतात किती दिवस राहील याचे उत्तर पाटबंधारे विभागाकडेही नव्हते.
कोल्हापूरच्या पश्चिम भागात मात्र मंदगतीने का होइना पंचगंगेचे पाणी ओसरत असल्याने कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यातील नदीकाठावर दिलासादायक चित्र होते. मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत पंचगंगा नदीचे पाणी ४४.४ फूट इतके होते. या ठिकाणी धोका पातळी ७३ फूट इतकी आहे. अजूनही नदी धोका पातळीवरूनच वाहत आहे.
अलमट्टी धरणातून ३ लाख क्युसेकने असलेला विसर्ग स्थिर ठेवला आहे. धरणात पाण्याची ३ लाख २६७३ क्युसेकने आवक आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग स्थिर ठेवण्याची शक्यता असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.
अलमट्टी धरणात सोमवारी पाण्याची आवक २ लाख ७१ हजार ३८६ क्युसेकने होती. पुन्हा पाऊस वाढल्याने अलमट्टी धरणात पाण्याची आवक वाढली असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले.
कोयनातून ४२ हजार क्युसेकने विसर्ग
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असल्याने पाण्याच्या विसर्ग वाढवण्यात आला. मंगळवारी (ता. ३०) दुपारी १२ वाजता सांडव्यावरून ४० हजार व पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक असा एकूण ४२ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. यामुळे कोयना व कृष्णांच्या पाणीपातळीतही वाढ होत असल्याने कृष्णा काठी नव्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.