Ringan Book Agrowon
ॲग्रो विशेष

Book Review : जगण्याचा आदीम तळ धुंडाळणारी रिंगाण

Ringan Book : काय गोंधळ, अनागोंदी माजेल याचा विचार करून पाहा बरे! तोच विचार कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीतून अगदी संयतपणे मांडलेला दिसतो.

Team Agrowon

Book Update : आपण सगळेच डार्विनने सांगितलेली आणि पुढे विकसित होत गेलेली उत्क्रांतीची एक सरळ प्रक्रिया नक्कीच जाणतो. प्रत्येक सजीवाची जगण्याची तीव्र आसक्ती, कोणत्याही विपरीत परिस्थितीत तग धरण्याची धडपड आणि आपला स्वतःचा वंश वाढविण्याची नैसर्गिक आदीम इच्छा ही या जीवनाच्या मुळाशी राज्य करत असल्याचे आपल्याला दिसून येईल. ही सारी एकरेशीय प्रक्रिया कधी उलटीपालटी झाली तर... काय गोंधळ, अनागोंदी माजेल याचा विचार करून पाहा बरे! तोच विचार कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीतून अगदी संयतपणे मांडलेला दिसतो.

माणूसही उत्क्रांत होत गेला. वैयक्तिक एकेकटा माणूस म्हणून विकसित होताना आणि कळप (किंवा त्याचे सभ्य स्वरूप समाज) म्हणूनही त्याची वेगळी उत्क्रांती होत गेली. पूर्वी जंगलामध्ये जगण्याच्या प्रक्रियेत आदीम माणसे कळपांनी शिकार करत फिरत. या प्रक्रियेत त्यांच्याजवळ आलेला कुत्रा, मांजर यांसारखे लहान, तर बैल - गाय, रानगवे किंवा म्हैस यांसारखे मोठे प्राणी माणसाळविण्यात यश आले. हे प्राणी आता इतके माणसाळले आहेत, की प्रत्येक गोष्टीसाठी माणसावर अवलंबून आहेत.

आज त्यांचा माणसाशिवाय जगण्याचा विचारही आपल्याला करता येणार नाही. अशीच एक देवाप्पाची म्हैस. थोडीशी उधळीमाधळी, रागीट आणि तरीही त्याच्या आईला माया लावणारी आणि लावून घेणारी. लाडाची म्हणून मुदी घातल्याने मुदीवाली म्हणूनच ओळखली जाणारी. पण धरणांच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये अन्य गावांसोबतच देवाप्पाचे गाव सरकार बळजबरी उठवते. विस्थापिताचे जगणे माथी आलेल्या देवाप्पाला नव्या ठिकाणी जाण्याच्या किंवा जगण्याच्या धांदलीत अनेक गोष्टी मागे सोडून जाव्या लागतात, त्यात ही वांझ म्हैसही सोडून नव्या गावात जावे लागते.

नव्या गावात विस्थापितांचे जगणे जगण्याच्या नादातही देवाप्पाचा मुलगा नव्या मार्गाने पुढे जाऊ पाहतो. पण देवाप्पा आणि त्याची म्हातारी आई दोघांना आपल्या जुन्याच जंगली रितीभाती, पद्धती, जगणे यातून फारसे बाहेर पडता येत नाही. त्याच आठवणीत रमलेली आई देवाप्पामागे आपली मुदीवाली घेऊन ये म्हणून टुमणे लावते. अन्य लोकांकडून तिची दूम काढताना तिला रेडकू झाल्याचे समजल्यावर तर आई घोषाच लावते. मग गावातल्याच दोन पोरांना देवाप्पा तयार करतो- एखादी म्हस दावं लावून आणली, तर पाच पन्नास हजार सहज मिळतील, या लालुचीवर तीही तयार होतात. आणि सुरू होतो देवाप्पासोबत वाचक म्हणून आपणही जंगलच होण्याचा अनोखा प्रवास. या दोन्ही मुलांची नावे कोठेही येत नसल्यामुळे असेल कदाचित, पण देवाप्पा आपल्याशीच बोलतोय असा भास होत राहतो. ही खरी कृष्णात खोत यांच्या लेखणीची ताकद आहे. छोटी, छोटी असली तरी अडनीड, कुठेही थांबणारी, कर्ता, क्रियापद, कर्म यांची सरमिसळ करणारी ही आदीवासी भाषा ते प्रचंड ताकदीने उभी करतात. त्यामुळे देवाप्पाच्या भावविश्वात आपण वाचक म्हणून पोचतो.

पण मुदीवाली आता संपूर्ण जंगली झालीय. तिनेच काय पण राहिलेल्या साऱ्या म्हशी रेडकांनी माणसाचा पाळीवपणा टाकून जंगलात जगणे शिकून घेतलेय. पूर्वी छोट्या शिकारी प्राण्याला घाबरून उधळून येणारा म्हशींचा कळप आता त्यांच्याशी सावधपणे लढायला, त्यांना हुसकायला शिकलाय. म्हणून उत्क्रांतीने थोडा उलटा प्रवास केलाय. ही जनावरे त्यांच्या मूळ पिंडावर गेलीत. आता त्यांना पुन्हा माणसांत आणायला निघालेल्या देवाप्पाला ती कितीशी दाद देणार?

ही कादंबरी एकाच वेळी जंगली माणसांच्या जगण्याचा किंवा विश्‍वाचा एक स्तर दर्शवते. दुसऱ्या बाजूला त्यांना त्यांच्या गावातून उठावे लागल्याने परक्या गावात जगताना विस्थापितांचा लागणारा कस (जगण्याचा दुसरा स्तर) दर्शवत राहते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सजीव म्हणून माणूस, प्राणी यांच्या जगण्यातील मूलभूत आणि आदीम अशा तिसऱ्या स्तराला सतत स्पर्श करत राहते. परक्यांशी लढताना सावधपणा म्हणून रिंगाण करून बसण्याची जंगली म्हशींची प्रतिमा ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कादंबरीतील तिन्ही स्तरांमध्ये सतत आपल्याला जाणवत राहते. सरकारशी विस्थापन रोखण्यासाठी केलेले रिंगाण, विस्थापनानंतर परक्या गावात परक्या माणसांसोबत सतत करावे लागणारे रिंगाण, आणि शेवटही म्हशींनी देवाप्पाला जंगलाबाहेर हुसकावून केलेल्या रिंगाणापाशी व्हावा, इतक्या सर्वत्र रिंगाण प्रतिमा आपल्याला जाणवत राहते. कादंबरीचे रिंगाण हे नाव सार्थ करत! तिची अर्पणपत्रिका - तुटलेल्या मुळांच्या कोंबाना... ही तितकीच सार्थ!

एकदा वाचायला सुरू केल्यावर ही कादंबरी तुम्ही खाली ठेवू शकत नाही. ही लेखकाची ताकद आहे. मराठी साहित्यातील अनेक लेण्यांमध्ये या कादंबरीचा समावेश करावा लागेल. तिला २०२३ चा साहित्य अकादमी पुरस्कारही मिळालेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT