Book Update :
पुस्तकाचे नाव : आधारस्तंभ : शरद पवार यांचे साखर धंद्यातील योगदान
प्रकाशक : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित, मुंबई.
संपादकीय मंडळ : डॉ. सुधीर भोंगळे, अनंत बागाईतकार, व्यंकटेश केसरी, उल्हास सावंत
पाने : ३४०
किंमत : ४०० रुपये
महाराष्ट्रामध्ये ऊस शेती आणि साखर उद्योग वाढला तो प्रामुख्याने सहकाराच्या आधारावर. ही सहकाराची अखंडपणे कार्यरत राहण्याच्या उद्देशाने कार्यरत विविध लोकांचे योगदान मोलाचे ठरले. त्यातही साखर उद्योगाच्या जडणघडणीमध्ये माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘आधारस्तंभ : शरद पवार यांचे साखर धंद्यातील योगदान’ हे पुस्तक २१ मे २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले. त्याच्या संपादक मंडळामध्ये डॉ. सुधीर भोंगळे, अनंत बागाईतकार, व्यंकटेश केसरी व उल्हास सावंत यांचा समावेश होता. या पुस्तकामध्ये राजकीय नेतेमंडळी, विविध खाजगी व सहकारातील संस्थांचे अध्यक्ष, कृषी व विज्ञान क्षेत्रातील व्यक्ती, पत्रकार, अर्थतज्ज्ञ व खास करून साखर व्यवसायातील दिग्गज मंडळी अशा सुमारे ४३ लेखकांनी शरद पवार यांच्या योगदानाविषयी लिहिले आहे. आणि सी. रंगराजन यांच्या अहवालाने शेवट केला आहे.
एकेकाळी ऊस हे पीक साखर, गूळ अशा दोन उत्पादनांसाठी प्रामुख्याने ओळखले जात होते. मात्र आता विविध प्रक्रियेतून बगॅस, वीज, खत निर्मिती, आसवणी प्रकल्प, इथेनॉल, बायोसीएनजी यासह भविष्यवेधी अशा हायड्रोजन, ऑक्सिजन निर्मितीपर्यंत अनेक उपउत्पादने पुढे आली आहेत. म्हणजेच ऊस पीक ऊर्जा पीक म्हणून पुढे येणार असल्याचे अधोरेखित होत आहे. शरद पवार यांच्या योगदानाविषयी भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या लेखात ‘अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणारा नेता’ असा गौरव करतानाच त्यांच्या एकूणच शेती संबंधीच्या प्रागतिक विचाराला व्यावसायिक जोड देण्याची वृत्ती उल्लेखलेली आहे.
तर केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आपल्या लेखात ब्रिटिश कालापासून महाराष्ट्राच्या सिंचनाचा आढावा घेत ब्रिटिश गॅजेटियर मध्ये १९३० मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे ऊस पिकावर संशोधन करणाऱ्या केंद्राचा उल्लेख करून १९६५ नंतर खऱ्या अर्थाने पहिल्यांदा नागपूर पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळाच्या निर्मितीनंतर विदर्भात सिंचन प्रकल्प झाल्याचा उल्लेख केला. त्यांनी साहेबांच्या साखरविषयक कामांतून प्रभावित होऊनच २००४ मध्ये आपण साखर कारखाना काढल्याचे नमूद करतात. त्यानंतर जयंत पाटील यांनी डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटचे नामकरण वसंतदादांच्या नावाने करण्यासंबंधी माहिती दिली आहे. या संस्थेच्या ऊस विषयक ‘संशोधनेन समृद्धी’ घोष वाक्यानुसार शेतकऱ्यांसाठी सतत प्रयत्न केल्याचे ते सांगतात. त्यानंतर दिलीप वळसे-पाटील, बाळासाहेब पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, हरिभाऊ बागडे, मोहन मराठे, डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. किरण कोकाटे, डॉ. रघुनाथ माशेलकर, पत्रकार सुधीर भोंगळे व अनंत बागाईतकार यांचे लेख वाचनीय आहेत.
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शरद पवार यांची संपादक मंडळाने घेतलेली विशेष मुलाखत. त्यातील उत्तरे ही सर्वसामान्य नागरिकांना गांभीर्याने विचार करायला लावणारी, त्यांच्या दूरदृष्टीची प्रचिती देणारी आहेत. या पुस्तकात साहेबांसंबंधीच्या रंगीत छायाचित्रांचा समावेश असल्यामुळे मोलाची भर पडते. त्याचबरोबर लेखांची सुटसुटीत मांडणी, वाक्यांची क्लिष्टता टाळून केलेली शब्दरचना यांना व्याकरणदृष्ट्या तपासणीची (प्रूफिंग) जोड मिळाली असती तरी फार चांगले झाले असते. त्यातून मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेतील लेखात किरकोळ टाळण्यासारख्या चुका राहून गेल्या आहेत. शेवटी सी. रंगराजन यांच्या समितीच्या शिफारशीतील महत्त्वाच्या बाबींचा इंग्लिशमध्ये उल्लेख करून पुस्तकाचा शेवट केला आहे.
(लेखक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी येथे वैज्ञानिक अधिकारी आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.