Rice Varieties Agrowon
ॲग्रो विशेष

Rice Varieties : पूर्व विदर्भासाठी विकसित भात जाती

Kharif Season : खरिपामध्ये नागपूर विभागातील भात उत्पादकता २५ क्विंटल/हेक्टरपर्यंत वाढविण्याचे ध्येय ठेवलेले आहे. भाताची उत्पादकता वाढविण्यासाठी दर्जेदार बियाणे फार महत्त्वाचे आहे.

Team Agrowon

डॉ. जी. आर. श्‍यामकुवर, डॉ. एम. आर. वांढरे, डॉ. ए. व्ही. कोल्हे, ए. ए. नागदेवे

Rice farming : भात हे जागतिक पातळीवरील प्रमुख अन्नधान्य पीक असून, महाराष्ट्रामध्येही एक प्रमुख पीक आहे. खरीप २०२२-२३ मध्ये राज्यात एकूण १५.५५ लाख हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली होते. त्यापैकी सर्वाधिक क्षेत्र पूर्व विदर्भ विभागात ८.३६ लाख हेक्टर (५३.७६ टक्के) होते.

विदर्भातील एकूण ११ जिल्ह्यांपैकी गोंदिया, भंडारा, गडचिरोली चंद्रपूर व नागपूर या पाच जिल्ह्यांत भात हे खरिपातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. या विभागांमध्ये सरासरी १२३१ मि.मी. पाऊस ५५ ते ६० पावसाळी दिवसांत जून ते ऑक्टोबर महिन्यांत पडतो.

असा असंतुलित पाऊस, संरक्षित ओलिताची अपुरे साधने, शिफारशीत भात जातीचा वापर न करणे, रोग व किडींचा वाढता प्रादुर्भाव, रासायनिक खतांचा असंतुलित वापर यामुळे भात पिकाची उत्पादकता महाराष्ट्राच्या (२२.३८ क्विंटल/हेक्टर) तुलनेमध्ये नागपूर विभागात कमी (म्हणजेच १९.६३ क्विंटल /हेक्टर) आहे.

या खरिपामध्ये नागपूर विभागातील भात उत्पादकता २५ क्विंटल/हेक्टरपर्यंत वाढविण्याचे ध्येय ठेवलेले आहे. भाताची उत्पादकता वाढविण्यासाठी दर्जेदार बियाणे फार महत्त्वाचे आहे.

खास या विभागासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या अंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही व कृषी संशोधन केंद्र, साकोली येथे नव्या जाती विकसित करण्याचे सुरू आहे. त्यांनी विकसित केलेल्या एकूण १५ विविध भात जाती प्रसारित केल्या आहेत.

१) सिंदेवाही-१ :

सोना व एसवायई ४४-३ जातींच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित केलेली ही जात १९८६ मध्ये कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही येथून प्रसारित केली आहे. वैशिष्ट्ये - हळवी (११५-१२० दिवस), कमी उंच वाढणारी (९८ सें.मी.) व अधिक उत्पादन देणारी (४०-४५ क्विंटल/हेक्टर) आहे. तांदूळ आखूड बारीक, करपा रोगास साधारण प्रतिकारक. वरकस जमिनी व उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त. खाण्यासाठी उत्तम आहे.

२) साकोली-७ :

तायचुंग स्थानिक -१ व बासमती-३७० या जातींच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित केलेली ही सुवासिक जात कृषी संशोधन केंद्र, साकोली येथून सन १९८८ मध्ये प्रसारित केली. वैशिष्ट्ये - १००-११० सें.मी. उंची, निमगरवी / मध्यम कालावधी (१३५-१४० दिवस), अधिक उत्पादन देणारी (४०-४५ क्विंटल/हेक्टर). तांदूळ सुवासिक, लांब बारीक व खाण्यास अत्यंत चांगली. न लोळणारी असल्याने तांदूळ उतारा ७० ते ७५ टक्के. करपा रोगास साधारण प्रतिकारक.

) पीकेव्ही एचएमटी :

ही जात निवड पद्धतीद्वारे एचएमटी सोना स्थानिक जातीमधून विकसित केली असून, १९९८ मध्ये विद्यापीठाद्वारे प्रसारित केली आहे. वैशिष्ट्ये - कमी उंचीची (८५-९० सें.मी.), निमगरवी /मध्यम कालावधी (१३५-१४० दिवस) व अधिक उत्पादन देणारी (४०-४५ क्विंटल/हेक्टर). न लोळणारी, न झडणारी अशी मळणीस चांगली व कडा करपास साधारण प्रतिकारक जात. तांदूळ आखूड बारीक, शिजण्यास व चवीस अति उत्कृष्ट आहे.

पूर्व विदर्भ विभागात लागवड होत असली तरी जवळची राज्ये उदा. आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, छत्तीसगड व मध्य प्रदेश यामध्ये जास्त लोकप्रिय झाली आहे.

४) सिंदेवाही-२००१ :

ही जात एसवायई-७५ व आयआर-५२ जातींच्या संकरातून निवड पद्धतीने कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही येथून २००२ मध्ये विकसित केली आहे. वैशिष्ट्ये - कमी उंचीची (९०-१०० सें.मी.), न लोळणारी, मध्यम कालावधीची (१३०-१३७ दिवस), जाड दाण्याची (आखूड ठोकळ) असून, सरासरी ४५-५० क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देते. ही जात करपा, कडा करपा, तपकिरी तुडतुडे आणि गादमाशीससुद्धा साधारण प्रतिकारक आहे.

ही जात अखिल भारतीय स्तरावर बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यातील ओलिताच्या क्षेत्रासाठी शिफारशीत. दिवसेंदिवस या भात जातीखाली क्षेत्र वाढत आहे.

५) पीकेव्ही मकरंद :

इंद्रायणी व एसवायई ३-४३-५७ जातींच्या संकरामधून निवड पद्धतीने कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही येथून विकसित. २००३ मध्ये प्रसारित केलेल्या या जातीची वैशिष्ट्ये - ही जात मध्यम कालावधीची (१२३-१२६ दिवस), बुटकी (८५-९० सें.मी.), मध्यम बारीक दाणा, दाण्यावर लहान कुसळ असणारी, सुवासिक तांदूळ, अधिक उत्पादन (३५-४० क्विंटल/हेक्टर), करपा, कडा करपा रोगास व गादमाशी किडीस साधारण प्रतिकारक. तांदूळ खाण्यास उत्तम.

६) पीकेव्ही गणेश :

दया व साकोली-६ जातींच्या संकरामधून निवड पद्धतीने विकसित. कृषी संशोधन केंद्र, साकोली येथून २००३ मध्ये प्रसारित. वैशिष्ट्ये - मध्यम कालावधी (१२६-१२८ दिवस), मध्यम उंची (१००-१२० सें.मी.), आखूड बारीक दाण्याची व अधिक उत्पादन (४०-४५ क्विंटल/हेक्टर), करपा, कडा करपा रोगास व गादमाशी, तपकिरी तुडतुड्यास साधारण प्रतिकारक. माफक नत्र खतास प्रतिसाद देणारी जात.

७) पीकेव्ही खमंग :

एसवायई ३४-५-४० व बासमती-३७० जातींच्या संकरातून निवड पद्धतीने कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही येथे विकसित. २००७ ला प्रसारित. वैशिष्ट्ये - बुटकी (९१ सें.मी.), मध्यम कालावधी (१३५ दिवस), आखूड बारीक दाण्याची, सुवासिक तांदूळ, अधिक उत्पादन (४०-४५ क्विंटल/हेक्टर), करपा, मानमोडी, कडा करपा रोगास आणि तपकिरी, हिरवे व पांढऱ्या पाठीचे तुडतुडे व खोडकिडीस साधारण प्रतिकारक. तांदूळ खाण्यास उत्तम.

८) पीडीकेव्ही किसान

एसकेएल ६-१-२३ व एसवायई ३-१७ जातींच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित. कृषी संशोधन केंद्र, साकोली येथून २०१२ मध्ये प्रसारित. वैशिष्ट्ये - बुटकी (९१-९४ सें.मी.), मध्यम कालावधी (१३०-१३५ दिवस), मध्यम बारीक दाणे, अधिक उत्पादन (४०-४५ क्विंटल/हेक्टर), गादमाशी तसेच करपा, मानमोडी, कडा करपा रोगास साधारण प्रतिकारक.

९) साकोली-९

पीकेव्ही एचएमटी व किशोर या जातीच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित. कृषी संशोधन केंद्र, साकोली येथून २०१७ मध्ये प्रसारित. वैशिष्ट्ये - मध्यम कालावधी (१३० ते १३५ दिवस), मध्यम उंच (१०८ ते ११४ सें.मी.), मध्यम बारीक दाणे, सरासरी उत्पादन ४२ क्विंटल/हेक्टर, पानावरील करपा, मानमोडी, पर्णकोष कुजव्या, तपकिरी ठिपके, टुंग्रो व्हायरस, खोडकिडीला व गादमाशीला साधारण प्रतिकारक. कमी नत्र मात्रेतही चांगले उत्पादन देते. तांदूळ खाण्यास उत्तम.

१०) पीडीकेव्ही तिलक

दया व एसवायई ६३२००३ या जातींच्या संकरातून निवड पद्धतीने कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही येथे विकसित आणि २०१८ ला प्रसारित. वैशिष्ट्ये - ही जात ठेंगणी, उशिरा तयार होणारी (१४०-१४५ दिवस), आखूड बारीक दाणे, न लोळणारी व खाण्यास उत्तम. स्थानिक बाजारपेठेसाठी उत्तम, अधिक उत्पादन (४०-४२ क्विंटल/हेक्टर), खोडकीड, गादमाशी, तुडतुडे किडीस तसेच मानमोडी रोगास साधारण प्रतिकारक.

जय श्रीराम या प्रचलित वाणापेक्षा २० ते २५ टक्के जास्त उत्पादन देणारी एकरी रु. ५००० ते ६००० अधिक नफा देते. या जातीस शेतकऱ्यांची पसंती मिळाली असून, क्षेत्रामध्ये वेगाने वाढ होत आहे.

११) पीडीकेव्ही साकोली रेड राइस १

निवड पद्धतीने विकसित ही जात कृषी संशोधन केंद्र, साकोली येथून २०२० मध्ये प्रसारित. वैशिष्ट्ये - हा लाल तांदळाचा वाण, ठेंगणा (९७ सेंमी) आणि मध्यम कालावधीचा (१३५ ते १४० दिवस), दाणे आखूड बारीक, पानावरील करपा, लिफ स्कॉल्ड आणि खोड किडीला साधारण सहनशील. विदर्भात सरासरी धान्य उत्पादन ४० ते ४५ क्विंटल/हेक्टर. पॉलीश न केलेल्या तांदळामध्ये लोहाचे प्रमाण १५.९६ मायक्रोग्रॅम प्रति ग्रॅम, जस्ताचे प्रमाण २३.१९ मायक्रोग्रॅम प्रति ग्रॅम व प्रथिने ७.७९ टक्के अशी उत्कृष्ट पोषणमूल्य असलेला वाण, तांदूळ खाण्यास उत्तम.

११) पीडीकेव्ही साधना

मुगद सुगंधा व एसकेएल-८ या जातीच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित. कृषी संशोधन केंद्र, साकोली येथून २०२१ मध्ये प्रसारित. वैशिष्ट्ये - ठेंगणा वाण (९१ ते १०६ सेमी), मजबूत बांधा, न लोळणारा, दाणा लांब व बारीक, हलका म्हणजे कमी कालावधीचा ११८ ते १२० दिवस, पानावरील करपा व खोडकिडींना साधारण प्रतिकारक.

विदर्भ विभागात सरासरी धान्य उत्पादन ५० क्विं./हे. आहे. तांदूळ उतारा ५५.७४ टक्के, अमायलोज मध्यम (२४.२८ टक्के) असून, तांदूळ खाण्यास उत्तम आहे.

संपर्क : डॉ. जी. आर. श्‍यामकुवर, ९४०३०४९४७२, (वरिष्ठ भात पैदासकार, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही, जि. चंद्रपूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT