प्रा. डॉ. केशव देशमुख
Parents' Expectations from their Children: अगदी सुन्न करणारी आणि सर्वांनाच अंतर्मुख करणारी ही एक भयंकर घटना! आटपाडी तालुक्यात (जि. सांगली) असलेल्या नेलकरंजी गावात शिक्षक असलेल्या बापाने बारावी विज्ञानशाखेत शिकणाऱ्या साधना या आपल्या पोटच्या लेकीला बेदम मारहाण केली, त्यात तिच्या मृत्यू झाला. कारण काय तर तिला नीट सराव परीक्षेत कमी गुण का मिळाले होते. धोंडीराम भोसले ही व्यक्ती मृत मुलगी साधना हिचा बाप आहे आणि शिक्षकही! त्यामुळे या घटनेचे गांभीर्य तसेच या घटनेतील चिंताही अधिक खोलवर जाते. वस्तुतः एकूण शिक्षण व्यवस्थाच या घटनेने चर्चेच्या मध्यवर्ती आणलेली आहे. धाव रे धाव आणि स्पर्धेत पुढे जा, हे हल्लीचे हट्ट खरे तर कोरडे, असंवेदनशील आणि भौतिक सुखाच्या वाढत्या अपेक्षेतून आले आहेत.
घोका अन् गुण ओका
आजचे विद्यार्थी टॅलेंट आहेत, यात शंका घेण्याचे मुळीच कारण नाही. मुद्दा हा आहे, की त्यांना समजून घेण्यात पालक, शिक्षक कमी पडतात. साधना भोसले हिचा मृत्यू असा एक सवाल उठविणाराही आहे. ‘घो घो घोका आणि फक्त गुण ओका’, यात मूल्यविचार नसतो. यात नीतिविचारही नसतोच. म्हणजे मुळात आपली समाजघटक म्हणून आणि कुटुंबप्रमुख म्हणून मानसिकता बिघडलेली आहे. तात्पर्य, समाजात बाप म्हणून असणारा संतापाचा पारासुद्धा वाढलेला आहे.
कारण आपल्या अपत्याला अशी बेदम मारहाण करताना तोल ढळणे आणि खुद्द बापातच असलेल्या शिक्षकांचा विसर पडणे, हे गंभीर असेच प्रकरण आहे. खरे म्हणजे शिक्षणात सामील झालेल्या लेकरांचे मानस हल्ली समजूनच घेतले जात नाही. तसेच लेकरांच्या आवडीनिवडीपण मानसिक स्तरावर समजूनच घेतल्या जात नाहीत. वयाचे, शहाणपणाचे दबाव दृढ करत आणि आम्हालाच सगळे कळते, हे पालक म्हणून असणारे जुलूम पुरेसे गंभीर असतात, याचा असंख्य पालकांना विसर पडलेला असतो. साधना भोसलेचा मृत्यू याअनुरोधाने समजून घेता येणारा दाखला आहे.
राग अन् भीक माग
एकाअर्थाने हा इशाराही आहे, की बाप असलेल्या शिक्षकाने आणि शिक्षक असलेल्या बापाने, अर्थात समाजातील पालक संस्कृतीने आपल्या मनःस्थिती संबंधी चिंतन जरूर करायला हवे. तथापि, अशा घटना या सार्वत्रिक नसतात हे खरे असले तरी समाजात बापांचे असे राग हे नवे नाहीत. ‘आई जगू देईना आणि बाप भीक मागू देईना’ अथवा ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशा स्थितीत लेकरांचे भावविश्व कोळपून, करपून निघते हे किती तरी घटनांतून आपण पहात आलो आहोतच. अचानक उसळलेले राग सामाजिक, कौटुंबिक मोठी झळ बसवत असतात. म्हणूनच ‘राग आणि भीक माग’ असे म्हटले गेलेले आहे, ते खरे आहे.
पालकांनी आपला संताप असा मोकाट सोडायला नको. अर्थात, लेकरांच्या भावस्थितीला नीट पारखायलाही हवे. धोंडीराम भोसले ही एक वृत्ती आहे. ती एक प्रवृत्ती आहे. ती समाजात अनेक घरात सुप्त असतेच. हे संतापाचे लोळ आवरता आले पाहिजेत. साधना भोसलेंच्या मृत्यूमुळे हे भान पुन्हा चर्चेत आलेले आहे, हे जरा बारकाईने समजून घेतले पाहिजे. हा विषय केवळ शिक्षणापुरता सीमित नाही. हा विषय फक्त पालकांनी ध्यानी घ्यावा एवढाच मर्यादित नाही. किंवा हा विषय लेकरांच्या मारहाणीला तेवढ्यापुरता जोडून सोडून देता येणारा नाही. तर संयमाच्या सीमा यातून स्पष्ट होत गेल्या आहेत. संतापाचे नियंत्रण करण्याचे शिक्षण मोठ्या माणसांत रुजविले जायला हवे, हेही ही घटना अधोरेखित करते.
शिक्षणात निकोप स्पर्धा हवी याबद्दल दुमत असावयाचे कारण नाही. पण स्पर्धा जीवघेणी नको. लेकरांच्या भावनांची कदर धुडकावून स्पर्धेतून मिळवलेले यश हा एक प्रकारचा फालतूपणाच म्हटला पाहिजे. लेकरांची मनं चुरगळून दबाव पेरणारे पालकत्व समाजाला कोणतीच दिशा देऊ शकत नाही, हा पण विचार सोडून देता येणार नाही. अजून एक महत्वाची बाब म्हणजे साधना ही मुलगी होती. ती इथल्या अगणित लेकीची प्रतिनिधी होती. ती चुणचुणीत अन् विलक्षण टॅलेंट होती.
तिचा विज्ञान शाखेतील गुणवत्तेचा ग्राफ उच्च श्रेणीचा होता. याचा शिक्षक असलेल्या बापाने जराही विचार केला नसावा का? खरे म्हणजे शिक्षणात मुली सतत अग्रेसर राहत आल्या आहेत आणि हेही कबूल आहे, की उत्तम शिक्षकही समाजात काम करतातच. असे असतानाही साधनाच्या मृत्यूची घटना एकूण समाजाला अंतर्मुख करते. या घटनेने समाजाला, पालकांना, शिक्षकांना अस्वस्थ केलेले आहे.
हल्ली, प्रचलित शिक्षणाचे काही ठळक असे तोटे जरूर आहेत. जसे की अभ्यासक्रमाचे आणि अपेक्षांचे अनाठायी ओझे. यामुळे साहजिकच पालकांच्या पाल्यांकरवी इच्छा वाढल्या. याशिवाय, शिक्षणाची झालेली प्रचंड महागाई ही न परवडणारी होऊन बसली आहे. घराबाहेर आणि शाळा, महाविद्यालयाबाहेर पैसा ओतून चालणाऱ्या शिकवण्या यामुळे स्पर्धेचे प्रचंड असे पेव फुटले आहे. यातून मग मेरीट या शब्दाला नको तेवढी प्रतिष्ठा देण्याचे प्रघातही वाढू लागले आहेत. म्हणजेच आनंद आणि स्पर्धा याचा सलग पण सरळ मेळ राहिलेला नाही, याकडेही समाजातील पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
थोडक्यात असे की, लेकरांच्या शिक्षणासाठी जेवढा पैसा ओतला तेवढा पैसा किंवा दुप्पट तिप्पट पैसा अर्थात केलेल्या खर्चाचा परतावा मिळाला पाहिजे अशी एकप्रकारची हाव ही लेकरांसाठी घाव ठरत आहे. हेही एक कारण सामाजिक, शैक्षणिक संतुलन बिघडवायला साह्य करत आहे. रंजन, खेळ, आनंद, व्यायाम, विपश्यना, योगा, मित्र या गोष्टी हल्लीच्या शिक्षणातून बाजूला तर गेल्या नाहीत, याचा विचार पालकांनी करायला हवा. अभ्यास आणि अभ्यास एवढाच एक मन मारून सुरू असलेल्या खेळामुळे लेकरांची दमछाक होताना दिसते.
हा सगळा प्रकार आई आणि वडील या दोघांनीही बारकाईने नीट समजून घेण्याची गरज आहे. हे चित्र घरोघरी नसले तरी अनेक घरांत दिसणारे आहे, हे समजून घ्यायला हवे. शाळा आणि समाज यांच्यात समन्वय तसेच सुसंवाद असला पाहिजे. शैक्षणिक प्रगतीसह सामाजिक भान आणि लेकरांचे मानसिक, शारीरिक उत्तम आरोग्य याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. साधना भोसले हिच्या मृत्यूमुळे हे असे सगळे प्रश्न स्वाभाविकपणे आज उचल खातात, जे प्रश्न महत्त्वाचे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वथैव हिताचे आहेत. शिक्षण, शिक्षक, शिक्षणव्यवस्था, समाज, पालक आणि स्पर्धेशी बांधून टाकलेले जणू एकप्रकारचे बंधनभारीत हे शिक्षण आता मानसशास्त्रीय पातळीवर संवेदनशीलतेने समजून घेण्याची, समजून देण्याची गरज आहे.
९४२२७२१६३१
(लेखक शिक्षणतज्ज्ञ असून, मराठी भाषेचे अभ्यासक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.