Hornbill Bird  Agrowon
ॲग्रो विशेष

Bird Conservation : पर्यावरण, धनेश पक्षी संवर्धनाचा ‘संकल्प’

Team Agrowon

प्रतीक मोरे

Environmental Updates : सह्याद्री डोंगर रांग आणि कोकणपट्टीतील पर्यावरण,जैवविविधता, पशू-पक्षी आणि विशेषतः धनेश पक्ष्याच्या संवर्धनासाठी देवरूख (जि. रत्नागिरी) येथील सह्याद्री संकल्प सोसायटी या स्वयंसेवी संस्थेने दुर्मीळ वृक्षांचे संवर्धन, संरक्षण आणि रोपांच्या लागवडीकडे लक्ष दिले आहे. तसेच संस्थेतील तज्ज्ञ दुर्मीळ प्रजातींवर संशोधन करत आहेत. संस्थेने शालेय विद्यार्थी आणि लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाला गती दिली आहे.

सह्याद्री डोंगररांग तसेच कोकणातील जंगल परिसरात आंबा, काजू, अननस, रबर लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. याचबरोबरीने शेकडो वर्षांपासून टिकून राहिलेला जंगल पट्टा आणि देवराया अलीकडच्या काळातील विकास प्रकल्प, रस्ते आणि मंदिर जीर्णोद्धार, खाणकाम, महामार्ग निर्मितीमध्ये नष्ट होत आहेत. त्याचा मुख्य परिणाम जंगल वैविध्य, पाणीसाठा आणि गावशिवारातील शेतीवर झाला आहे. पर्यावरणाचा झपाट्याने होणारा ऱ्हास लक्षात घेऊन सह्याद्री संकल्प सोसायटी या स्वयंसेवी संस्थेने वनीकरण, देवराया संवर्धन आणि दुर्मीळ वृक्षांच्या लागवडीकडे लक्ष दिले आहे. पर्यावरण, पशू-पक्ष्यांच्या संवर्धनाबाबत लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे. लोकसहभागातून विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

संस्थेतील तज्ज्ञ कोकणातील सड्यांचा शास्त्रीय अभ्यास करत आहेत. यासाठी दीपकाडी महोत्सव, जनजागृती कार्यशाळा, क्षेत्र भेटी आयोजित केल्या जातात. सडा संवर्धनासाठी शाळा, महाविद्यालय आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने संस्था काम करत आहे. या सड्यांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्याचे काम संस्थेने केले आहे. देवरुख जवळील कुंडी परिसरात फुलपाखरांच्या विविधतेचा अभ्यास करून संस्थेद्वारे फुलपाखरू उद्यान तयार केले आहे. सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती, सेंद्रिय खत निर्मितीबाबत प्रशिक्षण दिले जाते.

महाधनेश, पर्यावरणाचे संवर्धन

संस्थेच्या माध्यमातून २०१७ पासून ‘प्रोजेक्ट हॉर्नबिल'चे काम सुरू आहे. धनेश (हॉर्नबिल) ही पक्ष्यांची एक संकटग्रस्त प्रजाती आहे. धनेश पक्ष्याला स्थानिक भाषेत ककणेर, काकण, गरुड, माडगरुड नावाने ओळखतात. महाराष्ट्रात मुख्यतः कोकण परिसरातील जंगल, देवराया, फळबागा आणि सह्याद्रीच्या उतारावरील जंगलामध्ये महाधनेश (ग्रेट हॉर्नबिल), कवड्या धनेश किंवा मलबारी धनेश (मलबार पाइड हॉर्नबिल), मलबारी राखी धनेश (मलबार ग्रे हॉर्नबिल) आणि राखी धनेश (इंडियन ग्रे हॉर्नबिल) या प्रजाती आहेत. यातील महाधनेश, कवड्या धनेश आणि मलबारी राखी धनेश या संकटग्रस्त प्रजाती आहेत. धनेश पक्षी फलाहारी असून काही प्रमाणात लहान पक्षी, उंदीर, कीटक देखील खातात. सर्व प्रजाती वड, पिंपळ, उंबर, धेंड उंबर, करवत, पिंपरी, नांदरुख वृक्षांची फळे खातात. याव्यतिरिक्त काजरा, जायफळ, मायफळ, बकुळ, लिंबारा, चांदफळ, जंगली बदाम, कुकर, रान जायफळ, जांभूळ, करवंद अशा अनेक फळांचा आहारात समावेश आहे. धनेशपक्षी वृक्षांची फळे खाऊन त्यांच्या बिया विष्ठेतून सर्वदूर पोहोचवतात.

धनेश खाद्य झाडांची रोपवाटिका, खाद्य झाडांचे पुनर्रोपण, अधिवास पुनर्निर्मिती, कृत्रिम घरट्यांचा वापर आणि जनजागृती यामधून धनेश संवर्धनाचा जागर सुरू झाला आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असणारी वीस गावे, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये धनेशमित्र निसर्ग मंडळांची स्थापना करून त्याद्वारे जनजागृती आणि संवर्धनाचे कार्य होत आहे.

कृत्रिम ढोल्यांचा वापर

मोठ्या झाडांवर वेली वाढणे, वादळाने फांदी तुटणे अशा कारणाने धनेश ढोलीचा वापर थांबतो. कायमस्वरूपी उपाय जरी अधिवास पुनर्निर्मिती आणि झाडे वाढवणे हा असला तरी यासाठी लागणारा कालावधी फार मोठा आहे. म्हणून तात्पुरती कृत्रिम घरटी वापरून धनेश पक्ष्यांना तात्पुरता सहारा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही घरटी झाडाच्या बुंध्याला साधारण तीस ते पन्नास फुटावर बांधली जातात. घरटे स्वीकारल्यानंतर फळे, विष्ठा यांचा वापर करून हा पक्षी घरट्याचे छिद्र बुजवत असल्यामुळे त्यांच्या नैसर्गिक प्रजनन प्रक्रियेत कोणताही बदल होत नाही. धनेशाची ढोली असणारी झाडे आणि राया लोकसहभागातून दत्तक घेऊन दीर्घ मुदतीचे करार करून तोडीपासून संरक्षित केली जात आहेत. खासगी जंगले संरक्षित करून धनेश पक्ष्यांसाठी संरक्षित राखीव जंगल घोषित व्हावे, यासाठी विविध पातळीवर संशोधन करून त्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे देण्यात येत आहे.

धनेश पक्ष्यांच्या ढोल्यांचे निरीक्षण करताना संस्थेतील तज्ज्ञांना कोकणातील अनेक ढोल्या या मोठ्या, मादीने अनेक प्रयत्न करूनही पूर्णपणे बंद न होऊ शकणाऱ्या, तुटलेल्या, योग्य आकार नसणाऱ्या आणि यामुळे पिल्लांना पूर्णपणे संरक्षण न देऊ शकणाऱ्या आढळल्या. यांचे निरीक्षण करता यावे म्हणून संस्थेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून चोवीस तास मानवविरहित निरीक्षणाचा प्रयोग केला. यामुळे पिल्ले आणि अंड्यांचे उदमांजर, माकडांपासून संरक्षण झाले आहे. त्याचबरोबर पिलांना आणि मादीला खाद्य भरवण्याचा कालावधी, खाद्याचा प्रकार, ढोलीला भेट देण्याच्या वेळा अशी शास्त्रीय माहिती गोळा केली जाते. ज्या ठिकाणी भ्रमणध्वनी सेवा नाही, तेथे गावातील धनेश रक्षक या नोंदी ठेवतात.

संमेलनातून जागर

पश्चिम घाटातील आणि लगतच्या भागातील दहा जिल्ह्यांतील निसर्ग प्रेमी, पर्यावरण आणि संवर्धन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांच्या एकत्रित सहभागातून महाराष्ट्रातील पहिले धनेशमित्र संमेलन मार्च २०२४ मध्ये देवरुख (जि.रत्नागिरी) येथे झाले. धनेश पक्ष्यांची सद्यःस्थिती, त्यांना असणारे धोके आणि त्यावरील उपाययोजना यांचे एकत्रीकरण करून संवर्धन आराखडा तयार करण्यात आला. हा आराखडा राज्य शासन, प्रशासन, सर्व स्थानिक संस्था आणि वन विभाग यांना सुपूर्द करण्यात येत आहे.या आराखड्यावर आधारित कृती आणि संवर्धन मोहीम राबवली जाणार आहेत. दुसरे धनेश मित्र संमेलन वानोशी (जि. सिंधुदुर्ग) येथे झाले. वातावरण बदलामुळे धनेश पक्ष्यांच्या विणीवर होणाऱ्या परिणामाचे संस्थेतर्फे संशोधन केले जात आहे. त्याचबरोबर धनेश पक्ष्यांच्या जनुकीय विविधतेबाबतही संशोधन सुरू आहे.

देशी बियाणे लागवड

कोकणातील जंगलांना लागणाऱ्या वणव्यांचे प्रमाण कमी करता यावे आणि राब करण्यासाठी केली जाणारी वृक्षतोड टाळता यावी यासाठी देशी बियाणे लागवड आणि सेंद्रिय शेती प्रकल्प राबवला जात आहे. भात आणि नाचणीच्या स्थानिक जातीची लागवड करून सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून भाजवळ मुक्त शेतीचे प्रयोग गावांमध्ये केले जात आहेत.

रोपवाटिका उपक्रम

पक्षितज्ज्ञ संशोधक रोहित नानिवडेकर यांच्या मार्गदर्शनानुसार संस्थेने धनेश खाद्य झाडांच्या रोपवाटिकेस सुरुवात केली. अनेक झाडांच्या बिया धनेशाच्या पचन संस्थेतून वहन होऊन वेगाने रुजत असल्या तरी त्या सुकण्याआधी रुजविणे गरजेचे असते. कीटकाच्या आहारी जाऊन खराब होण्याआधी उचलून त्या रोपवाटिकेपर्यंत आणल्या जातात. संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि चिपळूण परिसरात धनेश मित्रांच्या सहकार्याने धनेश पक्ष्यांची घरटी शोधून तिथून बिया गोळा करण्यासाठी धनेश बीज संकलन समूहाची निर्मिती करण्यात आली. सध्या काजरा, कडू कवठ, जंगली बदाम, जायफळ, मायफळ, सुरमाड, पिंपळ, उंबर, वड, करवत, चारोळी, चांदफळ, कुकर, सरडोळ अशा धनेशाच्या खाद्य वृक्ष्यांच्या वनस्पती आणि बेहडा, सातवीन, गुळांबा, शेवर यासारख्या ढोलीसाठी उपयुक्त प्रजातींची रोपे रोपवाटिकेत तयार होत आहेत. ढोली असणाऱ्या झाडांच्या चार ते पाच किमीच्या परिसरात खाद्य झाडांची घनता वाढवली असता त्याचा परिणाम पिल्लांना झटपट खाद्य मिळण्यासाठी होऊन धनेश प्रजातींच्या संवर्धनासाठी मदत होणार आहे. धनेश आणि इतर पक्ष्यांच्या विष्ठेतून या बिया पुन्हा दूरवर पसरून खंडित झालेले बीज प्रसाराचे चक्र पुनर्प्रस्थापित होईल अशी अपेक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Rate : आमची पीकं तुमचे दर, हे नाही चालणार, सोयाबीन दरावरून राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा; सोमवारी काढणार ट्रॅक्टर मोर्चा

Goat Sheep Subsidy : मिल्किंग मशिनसह शेळी-बोकड गट मिळणार अनुदानावर

Authentic Seeds : पंदेकृवीत रब्बीसाठी हरभरा, गहू, ज्वारीचे सत्यप्रत बियाणे उपलब्ध

Sunflower Sowing : पुणे विभागात आठ हजार हेक्टरवर सूर्यफुलाची लागवड

PM Kisan : पीएम किसान सन्मान निधी लाभातील अडचणी दूर करा

SCROLL FOR NEXT