Women Worker Agrowon
ॲग्रो विशेष

Diwali Article : महिलांची कमाई अन् श्रमिक बाजारातील उत्कृष्ट प्रगती

Team Agrowon

डॉ. दत्तात्रय सानप, डॉ. संजय सपकाळ, डॉ. सुजित मोहोळकर

या वर्षीचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेत्या क्लॉडिया गोल्डिन यांचे ‘महिलांची कमाई अन् श्रमिक बाजारातील उत्कृष्ट प्रगती’ विषयीचे संशोधन नेमके काय आहे, याची माहिती घेऊ. आपल्या संस्कृतीमध्ये लक्ष्मीचेच रूप मानल्या जाणाऱ्या महिलांची स्थिती व कमाईविषयी अधिक माहिती मिळू शकेल.

क्लॉडिया गोल्डिन या हावर्ड विद्यापीठात

अर्थशास्त्राच्या प्राध्यापक असून, १९८९ ते २०१७ या काळात त्या अमेरिकेतील राष्ट्रीय अर्थशास्त्र संशोधन संघटनेच्या अमेरिकेतील अर्थव्यवस्थेचा विकास या प्रकल्पाच्या संचालकही होत्या. त्यांनी केलेल्या विविध संशोधनांमध्ये प्रामुख्याने महिलांची श्रमशक्ती, कमाईतील लिंग अंतर, उत्पन्नातील असमानता, तांत्रिक बदल, शिक्षण आणि इमिग्रेशन यांसह विविध विषयांचा समावेश आहे.

व्यक्तीच्या लिंगानुसार कमाईमध्ये होणाऱ्या फरकाचा अभ्यास करताना त्यांनी अगदी १७ व्या शतकापासून २० व्या शतकापर्यंत उपलब्ध माहिती आणि नोंदी तपासल्या. त्यांच्या माहितीनुसार, १७ व्या शतकाच्या सुरुवातीला स्त्री व पुरुष यांची कमाई समान होती. प्रामुख्याने कृषी क्षेत्राशी निगडित असा रोजगार होता. मात्र जसजशी औद्योगीकरणाला चालना मिळत गेली तसा महिलांची कमाई कमी होत गेला. त्यातच महिला कौटुंबिक बंधनात अडकत गेल्यामुळे त्यांची उत्पन्न निम्नस्तरावर गेले. काही भागांमध्ये तर ते जवळपास शून्य झाले. मात्र २० व्या शतकामध्ये महिला शैक्षणिकदृष्ट्या अधिक जागृत होऊ लागल्या. जागतिक स्तरावर लोकसंख्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे त्यांच्याकडे वेळही अधिक शिल्लक राहू लागला. त्यांच्यामध्ये महत्त्वाकांक्षा निर्माण होऊ लागली. परिणामी, त्यांचा उत्पन्नातील वाटा वाढला. स्त्री व पुरुष यांच्या कमाईतील लिंग फरक हा कौटुंबिक जबाबदारी एवढ्यापुरताच मर्यादित राहिला.

निष्कर्ष

श्रमिक बाजारपेठेतील महिलांच्या सहभागामध्ये या संपूर्ण कालावधीत वाढ झाली नाही. परंतु त्याऐवजी आलेखामध्ये एक U आकाराचा वक्र तयार झाला. हा U आकार अमेरिकेसाठी विशेष नसला, तरी त्यातून अन्य अनेक देशांमधील सद्यपरिस्थिती दिसून येते. या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रमिक बाजारपेठेतील महिलांचे स्थान अधिक चांगल्या प्रकारे मांडता येते. (चित्र १) जागतिक श्रम बाजारात महिलांचे प्रतिनिधित्व अधिक आहे.

जगाला आर्थिकदृष्ट्या उच्च स्तरावर नेण्यासाठी मजुरीमध्ये लिंग फरक करणे टाळले पाहिजे. त्यातून महिलांच्या क्षमतेचा एकूणच उत्पादन प्रक्रियेत पुरेपूर वापर होऊ शकतो. ही क्षमता सध्या फारच कमी प्रमाणात वापरली जाते. वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनातील अनेक जबाबदाऱ्यांमुळे अनेकदा विवाहित महिलांना उद्योगामध्ये किंवा बाहेर काम करण्यापासून वंचित ठेवले जाते. त्यात एकूणच उद्योगांमध्ये असलेल्या पुरुषप्रधान मानसिकतेचा प्रभाव दिसून येतो. खरेतर अनेक कौशल्यपूर्ण व एकाग्रता आवश्यक असलेल्या श्रमिक बाजारपेठेतील कामांमध्ये महिलांची मागणी अधिक आहे. तरिही त्यांना दुर्लक्षित करण्यात आल्याचे चित्र आहे.

बहुतांश सर्व मंदीच्या काळात पहिली कुऱ्हाड ही महिलांच्या कामांवर पडते. ही बाब १९३० च्या महामंदी आणि त्यानंतरच्या कालावधीत महिलांना कामावरून कमी करण्याचे प्रमाणावरून आपल्या लक्षात येऊ शकते. मात्र त्यानंतरही महिलांच्या विकासामध्ये शिक्षण, महत्त्वाकांक्षा आणि कुटुंब नियोजन प्रबंधन यांचा चांगला परिणाम अधोरेखित झाला. या तिन्ही बाबींमुळे श्रमिक दरातील लिंगभेद कमी करण्यास मदत झाली.

कौटुंबिक जबाबदारी

उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये समान वेतन कायदा व स्त्रिया उच्च शिक्षणाचे प्रमाण अधिक आहे. तरीदेखील पुरुष आणि स्त्री यांच्या कमाईचे अंतर १० ते २० टक्क्यांच्या दरम्यान आहे. त्याचे एकमेव कारण पालकत्वाची स्त्रीकडे असलेली जबाबदारी हेच दिसते. पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील उत्पन्नातील फरक कालांतराने कसा बदलत गेला, याचा अभ्यास गोल्डिन आणि सहकाऱ्यांनी २०१० मध्ये केला. त्यांच्या अभ्यासानुसार, तारुण्यानंतर लग्न होईतो सुरुवातीच्या काळात कमाईतील फरक कमी आहे. तथापि, पहिल्या मुलाचे आगमन होताच हा कमाईचा कल बदलतो. महिलांची कमाई ताबडतोब घसरते. शिक्षण आणि व्यवसाय समान असूनही पुढे मूल असलेल्या स्त्रियांसाठी कमाई ही समान दराने वाढ होत नाही. अन्य देशांतील अभ्यासांमध्येही याच निष्कर्षाला पुष्टी मिळते. आता जवळ जवळ संपूर्णपणे उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये महिला आणि पुरुषांमधील उत्पन्नातील फरक हा केवळ पालकत्वामुळे असल्याचे स्पष्ट होते.

हा मातृत्वाचा प्रभाव अंशतः समकालीन श्रमिक बाजाराच्या स्वरूपाद्वारे स्पष्ट करता येतो. अनेक उद्योग क्षेत्र हे त्यांचे कर्मचारी सतत उपलब्ध आणि कामांच्या मागण्यांना तोंड देण्यासाठी लवचिक असले पाहिजेत, अशी अपेक्षा ठेवतात. बहुतांश कुटुंबांमध्ये मुलांच्या संगोपनासाठी स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त जबाबदारी घेत असल्यामुळे त्यांची कामाच्या मागणीबाबतची लवचिकता कमी होते. करिअरची प्रगती होत असली, तरी त्यांच्या कमाईचा आलेख कमीचाच कल दर्शवितो. (चित्र २) महिलांकडूनही अर्धवेळ कामांना प्राधान्य दिले जाते. मात्र समान शिक्षण घेतलेले असून, करिअरचा आलेख चढता ठेवणे महिलांसाठी अधिक आव्हानात्मक बनते. अशा सर्व घटकांचा महिलांच्या कमाईवर दूरगामी परिणाम होतो.

- डॉ. दत्तात्रय सानप, ९४०४५०४४६८

(कृषी अर्थशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

भविष्याचा वेध

कोणतीही महिलाविषयक धोरणांची निर्मिती करताना गोल्डिन यांचे संशोधन महत्त्वाचे ठरते. ऐतिहासिक आणि आधुनिक माहिती संकलन व संशोधनातून त्यांनी काढलेले निष्कर्ष नावीन्यपूर्ण आणि अनेकदा आश्‍चर्यकारक ठरतात. अनेकदा लग्न आणि कुटुंबाच्या जबाबदारीमुळे स्त्रियांच्या संधींवर मर्यादा येतात. ही बाब लक्षात घेऊन त्यांच्या संधीमध्ये वाढ करण्यासाठी धोरणे आखण्याची आवश्यकता आहे. श्रमिक बाजारपेठेतील महिला आणि पुरुषांमधील फरक सामाजिक विकासाच्या विविध कालावधींत विविध घटकांद्वारे निर्धारित केला जातो. त्यामुळे श्रम लिंगभेद समानतेचे धोरण बनविताना धोरणकर्त्यांनी प्रथम ते का अस्तित्वात आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यानंतरच महिलांसाठी योग्य माहिती, शिक्षणातील गुंतवणूक किंवा एकूणच संस्थात्मक अडथळे दूर करणारे कायदे तयार करता येतील. अशा सातत्यपूर्ण अभ्यासातून तयार झालेल्या धोरणांमुळे लिंगभेद कमी होण्यास मदत होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहे हरभरा दर?

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचे वाढण्याचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

GIS System : ‘जीआयएस’ देऊ शकते नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

SCROLL FOR NEXT