डॉ. अनिल दुरगुडे, डॉ. संतोष काळे
Production Update : पहिला पाऊस पडल्यावर येणारा मातीचा सुगंध हा उन्हाळ्यात सुप्तावस्थेत असलेल्या ॲक्टीनोमायसिट्स या सूक्ष्म जिवाणूंना पावसाची ओल मिळल्यामुळे येतो. हे जिवाणू जमिनीतील सेंद्रिय पदार्थाच्या कुजविण्याची क्रिया सुरू करतात.
त्यातून जिओस्मिन २ मिथिल आयसोबोर्निओल (Geosmin and २ methyl isoborneol) हा सुगंधित वायू बाहेर पडतो. अशाच प्रकारे जमिनीत असंख्य प्रकारचे सूक्ष्म जिवाणू वेगवेगळे काम करत असतात. त्यातील महत्त्वाचे काम म्हणजे वनस्पतींना किंवा पिकांना मातीतील अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणे होय.
मात्र अधिक उत्पादनाच्या लालसेने आपण रासायनिक खते, पाणी यांचा असंतुलित वापर करतो. जमिनीमध्ये आवश्यक तितके सेंद्रिय आणि जैविक घटकांची पूर्तता आपण करत नाही. सेंद्रिय पदार्थ हेच सूक्ष्म जिवाणूंचे अन्न आहे. तेच नसल्यामुळे अनेक जमिनी या जिवाणूरहित म्हणजे मृतप्राय अवस्थेकडे जात आहेत.
सेंद्रिय खतांची उपलब्धता न करताच केवळ रासायनिक खतांचा वापर वाढवणे अतिशय चुकीचे आहे. रासायनिक खते ही सेंद्रिय खतांना कधीच पर्याय होऊ शकत नाहीत.
सेंद्रिय खतामध्ये सर्व अन्नद्रव्ये ही अल्प प्रमाणात असतात. मात्र त्यात सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात असते. उदा. एक टन शेणखतापासून नत्र ५.६ किलो, स्फुरद ३.५ किलो, पालाश १७.८ किलो, गंधक १ किलो, मंगल २०० ग्रॅम, जस्त ९६ ग्रॅम, लोह ८० ग्रॅम, बोरॉन २० ग्रॅम, १५.६ ग्रॅम तांबे, २.३ ग्रॅम मोलाब्द इ. अन्नद्रव्ये असतात.
मात्र त्यापासून अनेक महत्त्वाची विकरे (एन्झाइम्स), संप्रेरके आणि जीवनसत्त्वे मिळत असल्याने पीक उत्पादनाचा दर्जा वाढतो. उदा. गोडी, रंग, रोग आणि कीड प्रतिकारक शक्ती वाढते. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मामध्ये लक्षणीय सुधारणा होते. जमिनीची सुपीकता आणि जमिनीची उत्पादकता या दोन्ही गोष्टी वाढतात.
जमिनीची सुपीकता : त्या जमिनीची पिकांना आवश्यक असणारे अन्नद्रव्ये पुरवण्याची क्षमता.
जमिनीती उत्पादकता : जमिनीने दिलेले उत्पादन.
एक बाब लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे उत्पादक जमीन ही निश्चितच सुपीक असते, मात्र सुपीक जमीन उत्पादक असेलच असे नाही. याचे कारण म्हणजे जमिनीने अन्नद्रव्यांचा पुरवठा केला म्हणून अपेक्षित उत्पादन मिळत नाही.
तर त्यासाठी जमिनीचे पायाभूत गुणधर्म, समस्यायुक्त जमिनी, पाणी, तण, रोग आणि कीड अशा अन्य व्यवस्थापनाचीही तितकीच गरज असते.
जमिनीच्या सुपीकतेचे तीन प्रकार आहेत.
रासायनिक सुपीकता : सामू, क्षारांचे प्रमाण व पिकासाठी उपलब्ध अन्नद्रव्ये (मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये)
भौतिक सुपीकता : जमिनीची जलधारणशक्ती, घनता, घडण, सच्छिद्रता, पाण्याचे वहन आणि निचरा इ.
जैविक सुपीकता : जमिनीतील उपयोगी सूक्ष्म जिवाणूंची संख्या इ.
वरील तिन्ही सुपीकतेची काळजी घेतल्यास कोणत्याही पिकाचे उत्पादन आणि दर्जा चांगलाच मिळतो. रासायनिक सुपीकतेमधील काही घटक (अन्नद्रव्ये) आपण बाहेरून पुरवू शकतो. मात्र जैविक आणि भौतिक सुपीकतेसाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे हा एकमेव रामबाण उपाय आहे.
जमिनीत असणारा सेंद्रिय कर्ब हा सुपीकतेचा निर्देशांक मानला जातो.
महाराष्ट्रातील हवेचे तापमान अधिक असल्याने वापरलेल्या सेंद्रिय खतांचे/ पदार्थांचे विघटन खूप जलद गतीने होते. दरवर्षी सेंद्रिय खते वापरूनही अनेक वेळा सेंद्रिय कर्ब वाढल्याचे दिसत नाही. सेंद्रिय खतांचे विघटन हे तापमान, जमिनीतील ओलावा, प्राणवायू व जिवाणूंची संख्या यावर अवलंबून असते. जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी वाढण्यासाठी व जिवाणूंची वाढ होण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा पुरेसा पुरवठा गरजेचा आहे.
१) सेंद्रिय खते शेतात टाकल्यानंतर ती बराच काळ उघड्यावर राहिल्यास त्यातील नत्राचा ऱ्हास होतो.
२) खड्ड्यात सेंद्रिय खत तयार करताना खड्डा मातीने न झाकल्यासही नत्राचा ऱ्हास होतो.
३) वापरलेल्या सेंद्रिय खतांचे जैविक आणि रासायनिकदृष्ट्या विघटन होते. त्याचा फटका त्यावर अवलंबून असलेल्या सूक्ष्म जिवाणूंना बसतो. त्यांची वाढ आणि संख्या कमी राहते. परिणामी, अशी खते वापरूनही अनेक वेळा अपेक्षित परिणाम दिसत नाहीत.
जमिनीतील सूक्ष्म जिवाणू हे पिकांना अन्नद्रव्ये उपलब्ध करून देण्याचे काम करतात. म्हणजेच आपण वापरलेली रासायनिक खतातील अन्नद्रव्ये पिकांना पुरविण्याचे काम करतात. उदा. शेतामध्ये वापरलेल्या युरियामधील नत्राचे रूपांतर जोपर्यंत नायट्रेट (NO3)मध्ये होत नाही, तोपर्यंत तो पिकांना शोषता येत नाही.
हे रूपांतराचे काम नायट्रोसोमोनास आणि नायट्रोबॅक्टर हे जिवाणू करतात. त्याच प्रमाणे वनस्पती स्वतःला लागणारी अन्नद्रव्ये हे सेंद्रिय स्वरूपात घेत नाहीत. सूक्ष्म जिवांकडून सेंद्रिय घटकाचे विघटन करून त्याचे रूपांतर खनिज (रासायनिक) स्वरूपात केल्यानंतरच त्यातील सर्व अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.
जमिनींच्या सुपीकतेसाठी खालील प्रमाणे मातीचे गुणधर्म असावेत.
अ) भौतिक गुणधर्म
१. जमिनीची घनता १.१ ते १.४ ग्रॅम/घन सेमी यादरम्यान असावी, त्यामुळे घट्टपणा कमी होऊन मातीच्या कणाकणांतील पोकळी वाढवून हवा खेळती ठेवते.
२. जमिनीचा पोत हा पोयटायुक्त (गाळाची) किंवा चिकन पोयटायुक्त असावी.
३. जमिनीची जलधारण शक्ती चांगली असावी परंतु भारी काळ्या जमिनीत अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला असावा.
४. मातीची रवाळ संरचना किंवा घडण मऊ/चांगली असावी. त्यामुळे मातीची धूप कमी होते.
(ब) जैविक गुणधर्म
सेंद्रिय कर्बाच्या जमिनीतील अस्तित्वामुळे सूक्ष्मजीव व जिवाणूंच्या जननक्रियेस गती प्राप्त होऊन त्यांच्या संख्येत वाढ होते. त्यांना जमिनीमध्ये उपलब्ध सेंद्रिय कर्बाद्वारे ऊर्जा पुरवली जाते. त्यांची कार्यक्षमता वाढून अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. कर्ब : नत्र गुणोत्तर २०:१ असणाऱ्या जमिनीमध्ये साधारणपणे
जिवाणूंची संख्या = ७० × १० --- चा ७ वा घात --- सीएफयू/ ग्रॅम मृदा
बुरशीची संख्या = १२ × १० --- चा ५ वा घात --- सीएफयू/ ग्रॅम मृदा
अॅक्टीनोमायसीट्स संख्या = २५ × १० --- चा ५ वा घात --- सीएफयू/ ग्रॅम मृदा
सेंद्रिय कर्बामुळे विकरांचे (उदा. युरीएज, सेल्युलोज, हेमीसेल्युलोज, लीग्निनज, फॉस्फटेज, सल्फेटेज, प्रोटो पेक्टीनेज इ.) प्रमाण वाढून अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो.
(क) रासायनिक गुणधर्म
१. जमिनीचा सामू तटस्थ (६.५ ते ७.५) असावा. विद्युत वाहकता (क्षारता) ०.१० ते ०.५० डेसीसायमन प्रति मीटरपर्यंत असावी.
२. मुक्त चुनखडीचे प्रमाण ५ ते १० % पर्यंत (मध्यम) असावे.
३. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.६ % पेक्षा जास्त असावे.
४. सर्वसाधारणपणे जमिनीमध्ये नत्र (२८० किलो/हे. पेक्षा जास्त), स्फुरद (१५ किलो/हे. पेक्षा जास्त), पालाश (१५० किलो/हे. पेक्षा जास्त) तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये उपलब्ध लोह (४.५ मिलिग्रॅम/किलोपेक्षा जास्त), उपलब्ध जस्त (०.६ मिलिग्रॅम/किलोपेक्षा जास्त), उपलब्ध बोरॉन (०.५ मिलिग्रॅम/किलोपेक्षा जास्त) असावे.
पुढील भागामध्ये खतांचे नियोजन करताना ऱ्हास टाळण्यासाठी काय काळजी घ्यावयाची, ते पाहू.
संपर्क - डॉ. अनिल दुरगुडे (मृद् शास्रज्ञ), ९४२०००७७३१, डॉ. संतोष काळे (कनिष्ठ संशोधन सहकारी), ९७६४८८१७९९ (मृद् विज्ञान विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.