Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department: उपसंचालकाला हटविण्याची शिफारस

Deputy Director Removed: कृषी विभागातील उपसंचालक किरण जाधव यांच्यावर कृषी निविष्ठा कंपन्यांशी संबंध असल्याचे गंभीर आरोप झाले असून प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्यानंतर त्यांना दक्षता पथकातून हटवण्याची शिफारस कृषी आयुक्तांनी केली आहे.

मनोज कापडे

Pune News: वादग्रस्त कृषी उपसंचालक किरण जाधव यांना दक्षता पथकातून तात्काळ हटवण्याची शिफारस कृषी आयुक्तालयाने केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांनी श्री. जाधव यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. तसेच काही निविष्ठा उत्पादक कंपन्यांशी लागेबांधे असल्याचे आरोपही त्यांच्यावर आहेत. यासंदर्भात कृषी संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याने केलेल्या प्राथमिक चौकशीत श्री. जाधव दोषी आढळल्याचे सांगण्यात आले.

आमदार सुरेश धस यांनी कृषी खात्यातील काही अधिकाऱ्यांची निविष्ठा उत्पादक कंपन्यांमध्ये गुंतवणूक असल्याची लेखी तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यात श्री. जाधव यांचेही नाव होते. तसेच श्री. जाधव दक्षता पथकातील अधिकाराचा वापर करीत कृषी विभागाच्या इतर अधिकाऱ्यांना धमकावत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्‍या होत्या.

‘‘किरण जाधव यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. कृषी आयुक्तालयातील संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून त्यांची चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीत या आरोपांत तथ्य आढळले. दक्षता पथकाचे संवेदनशील कामकाज लक्षात घेता श्री. जाधव यांना तिथे उपसंचालकपदी कार्यकारी स्वरूपाचे काम करू देणे योग्य ठरणार नाही. त्यांची इतरत्र अकार्यकारी स्वरूपाच्या पदावर बदली करणे गरजेचे आहे, अशी शिफारस कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी कृषी खात्याचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना केली आहे,’’ असे सूत्रांनी सांगितले.

श्री. जाधव यांनी कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण विभागात दीर्घकाळ मोक्याच्या पदावर काम केले. राज्यातील बियाणे, खते, कीटकनाशके उद्योगातील लॉबीशी असलेले घनिष्ठ संबंध आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी या जोरावर त्यांनी या विभागात जोरदार बस्तान बसवल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू होती. त्यानंतर दक्षता पथकातील वरिष्ठ पदाची लॉटरी लागल्यानंतर त्यांच्या कामकाजाचे क्षेत्र विस्तारले.

त्यांना कृषी विभागातील अनेक स्तरांवरील अधिकाऱ्यांची, योजनांची चौकशी करण्याचे अधिकार मिळाले. त्यांनी या अधिकाराचा वापर करीत राज्यातील काही अधिकारी व निविष्ठा उद्योगातील छोट्या व्यावसायिकांना सळो की पळो करून सोडल्याची चर्चा सुरू होती. यासंदर्भात आ. सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केल्यानंतर चौकशीची चक्रे फिरली आणि कृषी आयुक्तालयाला कारवाई करावी लागली, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सौम्य कारवाई

दक्षता पथकाचे प्रमुख गोविंद मोरे चौकशीत दोषी आढळल्यामुळे त्यांची काही महिन्यांपूर्वी उचलबांगडी करण्यात आली होती. त्या पाठोपाठ आता किरण जाधव यांनाही पथकातून हटवण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच कृषी आयुक्तांनी काही काळापूर्वी दक्षता पथकाचे अधिकारदेखील कमी करून नवी नियमावली लागू केली. परंतु श्री. मोरे व जाधव यांच्या सारख्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणे अपेक्षित असताना त्यांना तुलनेने सौम्य शिक्षा देण्यात आली. कृषी खात्यातील मलईदार पदांवर अधिकारी अर्थपूर्ण व्यवहार करून वर्णी लावून घेत असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे टाळले जात आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT