Water Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Water Conservation : चंद्रावर पाणी शोधण्यापेक्षा उपलब्ध पाण्याचे संवर्धन करा

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

विनोद इंगोले

Conserve available water : अंतराळ मोहिमेच्या माध्यमातून आपण चंद्रावर तसेच मंगळावर पाणी शोधायला निघालो आहोत. परंतु आपल्याकडे उपलब्ध पाण्याचे संवर्धन करण्याकडे मात्र अपेक्षित लक्ष दिले जात नाही. अशीच स्थिती राहिली, तर आगामी काळात जलसंकट गंभीर होईल. वेळीच सावध झाले पाहिजे. जलसंवर्धनाच्या उपायांवर भर दिला पाहिजे. त्यासाठी सर्व स्तरांवर त्यासाठी जाणीवजागृती केली पाहिजे. शालेय अभ्यासक्रमातही पाणी या विषयाचा समावेश करण्याची आवश्यकता आहे, असे मत वर्धा येथील जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने यांनी व्यक्‍त केले.

राज्यात आणि विशेषतः विदर्भात पाण्याची समस्या गंभीर आहे. परंतु त्याबद्दल सगळ्याच पातळ्यांवर अनास्था दिसते. त्याविषयी काय सांगाल?
- आपण अंतराळ मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर आणि मंगळावर पाणी शोधायला निघालो आहोत. परंतु आपल्याकडे उपलब्ध पाण्याचे संवर्धन करण्याकडे मात्र अपेक्षित लक्ष दिले जात नाही. वातावरणातील बदलामुळे टोकाचे परिणाम दिसत आहेत. अशीच स्थिती राहिली, तर पृथ्वीवर जलसंकट गंभीर होईल. परिणामी, वेळीच सावध होत जलसंवर्धनाच्या उपायांवर भर देण्याची गरज आहे. सर्व स्तरांवर त्यासाठी जाणीवजागृती केली पाहिजे. शालेय अभ्यासक्रमातही पाणी या विषयाचा समावेश करण्याची आवश्यकता आहे.

जलसंवर्धनाचे काम करण्यासाठी स्रोत काय?
- जलसंवर्धनाची शास्त्रोक्‍त कामे होऊन त्या माध्यमातून भूगर्भातील पाणीपातळी वाढली तरच गावशिवाराला फायदा होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन आम्ही जलसंवर्धनाचे उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याकरिता पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्था, वर्धा या नोंदणीकृत संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत. उपाध्यक्ष भय्यासाहेब मुंडले असून, मी संस्थापक सचिव आहे. खुद्द नितीन गडकरी जलसंवर्धनाच्या उपचाराकरिता आग्रही आहेत. जलसंवर्धनाशिवाय समृद्धी नांदूच शकत नाही, असा विचार ते मांडतात. त्यामुळेच अशा कामांसाठी आमदार, खासदार निधी इतकेच नाही, तर कंपन्यांचा सामाजिक दायित्व निधी (सीएसआर फंड) उपलब्ध करून देण्यासाठी ते पुढाकार घेतात. निधीच्या उपलब्धतेपर्यंतच त्यांची भूमिका मर्यादित नाही, तर ते सातत्याने जलसंवर्धनाच्या कामांचे मॉनेटरिंगही करतात.

जलसंवर्धनामध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे?
- भूजलाचे पुर्नभरण हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवत आम्ही विदर्भात काम सुरू केले आहे. त्याकरिता टोपोग्राफी (निसर्गाची स्वाभाविक रचना) तसेच हायड्रोलॉजी (भूजल विज्ञान), जिओग्राफी (भौतिक संरचना), सिव्हिल इंजिनियरिंग (स्थापत्य अभियांत्रिकी) अशा सर्व बाबी अभ्यासल्यानंतरच गावात काम सुरू केले जाते. त्या भागातील मृत नदी, नाले प्रवाहित करुन पाण्याची गती नियंत्रित ठेवण्यासाठी नेमक्या कोणत्या उपचारांची गरज आहे, हे त्याआधारे ठरवले जाते. त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू केले जाते.

तुम्ही राबविलेले प्रकल्प कोणते?
- तामसवाडा नाला (वर्धा), महाकाळ नाला, धानोरा नाला, मोती नाला (वर्धा-आर्वी), जामनेरा नाला (आर्वी), खरडा नाला (उमरेड, नागपूर), गोंडी नाला (काटोल, नरखेड) परिसरात १५०० फुटांवर पाणी गेले होते. जलसंवर्धनाचे उपचार आणि उपायांच्या बळावर प्रकल्प क्षेत्रात हे पाणी आता ३० ते ४० फुटांवर आले आहे. राजनी तलाव (काटोल, नरखेड), कोहळा नाला (उमरेड), डवा खापरी (ता. उमरेड), उमरा कोल्हापुरी बंधाऱ्याचे रूपांतर साठवण बंधाऱ्यात करण्यात यश आले. कोटंबा (सेलू) या ठिकाणी २० लाख रुपये खर्चून बंधारा घेण्यात आला. बोर नदीचे बॅक वॉटर पाच किलोमीटर थांबायला लागले. दहेली नाला (उमरेड), वाशीम जिल्ह्यात मंगरूळपीर परिसरात तलावाचे पुनरुज्जीवन, आदिवासी पाड्यांमध्ये नाले पुनरुज्जीवनाचे काम करण्यात आले. त्या भागातील भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून ही कामे करण्यात आली. भूजल आणि भूपृष्ठीय साठा या दोन्हींत वाढ झाल्याने या गावांमध्ये संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे.

संस्थेला आतापर्यंत कोणते पुरस्कार मिळाले आहेत?
- आमच्या पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेला पाणलोटाच्या कामासाठी २०२० मध्ये ग्लोबल ॲवॉर्ड मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाचे जलसंपदामंत्री व भारतीय राजदूत यांची या सोहळ्याला ऑनलाइन उपस्थिती होती. ऊर्जा, पर्यावरण प्रतिष्ठाण, दिल्ली यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. २०१५ मध्ये वसंतराव नाईक कृषी संशोधन प्रतिष्ठानचा (मुंबई) पुरस्कार संस्थेला मिळाला. तर २०१८ मध्ये अटल सन्मान जलसंधारण पारितोषिकाने संस्थेला गौरविण्यात आले. तसेच २०१९ मध्ये मोती नाल्याच्या कामासाठी संस्थेला सद्‍भावना संस्थेचा नावीन्यपूर्ण कामासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

तामसवाडा मॉडेलबद्दल काय सांगाल?
- कोरडवाहू शेती हा आपला मुख्य प्रश्‍न आहे. देशातील जवळपास ८२ टक्‍के क्षेत्र कोरडवाहू आहे. फक्त पावसाच्या पाण्यावर ही शेती अवलंबून आहे. ज्याला कुठल्याही सिंचन प्रकल्पाचा लाभ होत नाही, अशा कोरडवाहू क्षेत्रासाठी तामसवाडा गावचे मॉडेल विकसित करण्यात आले आहे. भूजल मंथन-तीन या राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे आयोजन नागपुरात २०१८ मध्ये करण्यात आले होते. त्यानिमित्ताने काढण्यात आलेल्या पुस्तिकेत तामसवाडा प्रकल्पाचा विशेष उल्लेख करण्यात आला असून, तामसवाडा पॅटर्न (टीपी) म्हणून याला मान्यता देण्यात आली. त्यासोबतच गौरवाची बाब म्हणजे या कार्यशाळेला उपस्थित तत्कालीन राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी तामसवाडा प्रकल्पाला भेट देत कौतुकही केले होते.

तामसवाडा नाल्यात पूर्वी प्रति वर्ष ४७६ कोटी लिटर भूजलाचा संचय होत असे. आता भूजल संचय ६७५ कोटी लिटरवर पोहोचला आहे. त्यामुळे परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढली असून त्याचा उपयोग शेतीसाठी होत आहे. प्रति कुटुंब उत्पन्न ४९०६ रुपयांवरून आता १७ हजार २१७ रुपयांवर पोहोचले आहे. पिकांची उत्पादकता वाढ, शेतीपूरक व्यवसायासाठी घेतलेला पुढाकार यामुळे हे शक्‍य झाले आहे. पूर्वी गावात दहा कृषिपंपाद्वारे पाणी उपसा व्हायचा. आता हे प्रमाण २७ वर पोहोचले आहे. खरीप क्षेत्रात १९० हेक्‍टरवरुन ३०५ हेक्‍टर अशी वाढ नोंदवली गेली. या गावात रब्बी क्षेत्र शून्य होते, आता हे क्षेत्र ४० हेक्‍टरवर विस्तारले आहे. पुराच्या पाण्यामुळे २४ हेक्‍टर क्षेत्र पडिक राहत होते. आता पाण्याचा निचरा होत असल्याने हे क्षेत्र वहितीखाली आले आहे. गावात यांत्रिकीकरणासाठी शेतकरी पुढे येत आहे. पूर्वी गावात एकच ट्रॅक्टर होता. आता गावात चार ट्रॅक्‍टर झालेत. या प्रकल्पामुळे असे अनेक बदल घडून आले आहेत.

संपर्क ः माधव कोटस्थाने, ९४२२१४२७८१

सचिव, पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्था, वर्धा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT