Shaktipeeth Mahamarg : मुंबई : राज्य सरकार पवणार ते पत्रादेवी असा शक्तिपीठ महामार्ग करणार आहे. पत्रादेवीतून हा मार्ग गोव्यात जाणार आहे. त्यामुळे नेमका कशासाठी हा मार्ग केला जात आहे हे कळत नाही. देवाच्या नावाने रस्ता करून यांना देवाच्या आळंदीला नव्हे तर चोराच्या आळंदीला जायचे आहे, अशी घणाघाती टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी (ता. १२) आझाद मैदान येथे आंदोलकांसमोर बोलताना केली.
शेट्टी म्हणाले, की रत्नागिरी ते नागपूर रस्त्याची सध्याची अवस्था पाहिली तर २५ टक्केही टोल वसूल होत नाही. केंद्र सरकारचा हा रस्ता तोट्यात असताना या रस्त्याचा घाट घातला जात आहे. हे करताना शेतकऱ्यांचे समर्थन आहे अशा अफवा पसवरल्या जात आहेत. शेतकऱ्यांची एकजूट होऊ नये असे त्यांना वाटत आहे. ज्यांनी समर्थन दिले आहे त्यांच्या शेतातून रस्ताच जात नाही.
‘डबल ढोलकी वाजवला तर तुडवून काढू’
राजू शेट्टी यांनी सोयीची भूमिका घेणाऱ्या नेत्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, की आंदोलकांसमोर विरोध करणारे नेते सरकारसमोर मवाळ होऊन शेतकऱ्यांची समजूत काढतो असे सांगत आहेत. ही डबल डोलकी वाजवायची नाही. असे केलात तर तुडवून काढू, असा इशारा त्यांनी दिला.
प्रति किलोमीटरचा खर्च १०७ कोटी कसा?
या रस्त्यासाठी प्रति किलोमीटर १०७ कोटी रुपये खर्च येणार आहे. वास्तविक ३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित असताना वरील ७१ कोटी रुपये कोणत्या चोराच्या खिशात घालणार? असा सवाल शेट्टी यांनी केला. समृद्धी महामार्ग हा दर ७८ कोटी रुपये होता. त्यामुळेच एक आमदार ५० कोटींना विकत घेता आला असा आरोप त्यांनी केला.
रस्ता शेजारून जातो
म्हणून किंमत वाढणार नाही
अनेक शेतकरी शक्तिपीठ महामार्ग शेजारून जात आहे म्हणून समर्थन देत आहेत. मात्र, त्याचा काहीही फायदा होणार नाही असे सांगताना शेट्टी म्हणाले, की या महामार्गाला ३० किलोमीटरवर जोडरस्ते आहेत. तर हा रस्ता २० ते २५ फुटांवर असेल. त्यामुळे नैसर्गिकरित्या पाण्याचा निचरा ठप्प होऊन पाणी साचून राहणार आहे. एका पुणे-बंगळुरू महामार्गामुळे कोल्हापूर, सांगली महापूरात अडकते. समृद्धी महामार्गाशेजारचे शेतकरी काय भोगत आहेत हे पहा, असा सल्ला त्यांनी दिला.
फडणवीस मिस्टर क्लिन कसे?
शेट्टी यांनी फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हणाले, की फडणवीस मिस्टर क्लिन म्हणवून घेता मग ३६ कोटी प्रति किलोमीटरचा रस्ता १०७ कोटींवर कसा गेला ते सांगा असे म्हणाले. तसेच पैसे खाण्याचा भस्म्या झाला आहे. तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आम्ही झोळ्या घेऊन पैसे जमा करून देतो. तुम्हाला भाविकांशी देणेघेणे नाही, असा आरोपही त्यांनी केला. जर कुणी अरे केले तर का रे करा, कुणी आडवा आला तर तुडवा असे सांगत ते म्हणाले, १९५६ च्या कायद्यानुसार पोलिस बंदोबस्तात मोजणी होईल, मात्र ती करू द्यायची नाही. कुणी खुणा केल्या तर त्या उपसून टाका. जर ते जमत नसेल तर जमिनी देऊन टाका असेही ते म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.