सुनील पाटकर
Mahad News : आंबा म्हटला की डोळ्यांसमोर येतो हापूसच! असे असले तरी कोकणी माणसांचे हापूस आंब्याइतकेच रायवळच्या रसावर जास्त प्रेम असते. स्वाद आणि रस अशा गुणवैशिष्ट्यांनी नटलेला आंबा म्हणजे रायवळ आंबा. रायवळ चोखून खाण्यातली मजा सांगता येत नाही; तर ती अनुभवावी लागते.
कोकणात ज्यांनी रायवळ चाखला नाही, असा आंबाप्रेमी सापडणे विरळच. रायवळ खाताना त्याचा रस तोंडभर पसरलाच पाहिजे, हाताच्या कोपरापर्यंत रस आला नाही तर रायवळची लज्जत पूर्ण होत नाही. ही लज्जत हापूसच्या गर्दीत आता हरवून गेली आहे. अंगणामध्ये लगडणारा रायवळ आता बाजारातूनही दिसेनासा झाला आहे.
भारतात देशी आंब्यांच्या अनेक जाती आहेत; परंतु हापूस आंब्याचे व्यावसायिकरण झाल्यानंतर अनेक आंब्यांना ग्रहण लागले. कोकणातील रायवळही असाच हरवून गेला. कुठल्याही जमिनीवर सहज वाढणारा हा आंबा, त्याची फार काही जोपासनाही करावी लागत नाही.
ग्रामीण भागात वाडी-वस्तीत, अंगणात, परसात, बांधांवर रायवळ आंब्याची अनेक झाडे दिसायची. कोकणात अजूनही कित्येक कुटुंबांत एक झाड महापुरुषाचा आंबा म्हणून पूजले जाते. रस्त्यावरून जाताना झाडावर लगडलेले आंबे दगडाने नेम धरून पाडून खाण्याची मजा काही औरच असते.
आकार, चवीनुसार विविध नावे
हापूस आंबे जसे चव व आकाराने सारखेच असतात तसे रायवळचे नाही. प्रत्येक झाडावरील आंब्याची चव, रंग व आकार वेगवेगळे असतात. काही खूपच गोड असतात; तर काही आंबट. यावरूनच त्यांची नावे ठेवली जातात.
साखऱ्या, बाटल्या, लिट्टी, खोबरी, बिटक्या आंबा अशी शेकडो नावे असतात. गावातील सीमाही रायवळ आंब्याच्या नावावरून ओळखल्या जात; परंतु आता हे आंबे दिसेनासे झाले आहेत. हापूसचा रुबाब व भाव वाढल्याने रायवळ दुर्लक्षित झाला आहे.
झाडे होताहेत नष्ट
इमारतींसाठी व जळणासाठी रायवळ आंब्याच्या झाडांची तोड वाढल्याने झाडे कमी होऊ लागली आहेत. फार्म हाऊस, रस्ता रुंदीकरण, तसेच आंबा पेटीसाठी व वापरासाठी रायवळ झाडांची कत्तल होऊ लागली. त्यातच रायवळ झाडांवर हापूसचे कलम करण्याचे प्रकार वाढल्याने झाड रायवळचे राहिले, पण फळ हापूसचे. शिवाय फलोत्पादन योजनेने हापूस लागवडही वाढली. अशा अनेक कारणांमुळे रायवळचे उत्पादन घटले. त्यामुळे कोकणातल्या मातीतील हा अस्सल रायवळ आता जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
अनेक उपयोग
हिंदू धर्मात शुभकार्याला आंब्याची डहाळी लागतेच, ती कलमी आंब्याची वापरली जात नाही. धार्मिक विधींमध्येही आंब्याची पाने, फळे, मोहोर यांचेही महत्त्व असते. उन्हाळ्यात रायवळचा रस पोटात थंडावा देतो. रायवळ कैरी तयार झाली की कैरीचे लोणचं, टक्कू, पन्हे, आंबाडाळ असे अनेक पदार्थ तयार केले जातात. लोणचे, फोडी सुकवून केलेली आंबोशी, आंबापोळी, आमचूर पावडर तयार करणे असे अनेक उपयोग रायवळ आंब्याचे आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.