Village Story Agrowon
ॲग्रो विशेष

Village Story : पावसाळी सूर्यफुलं...

Team Agrowon

समीर गायकवाड

Rainy Sunflower Story : गावाकडं आता नाही म्हणलं तरी पाऊस काहीसा सुरु झालाय. भरभरून पडावं की कोसळूच नये हा त्याचा गुंता मात्र अजून पुरता सुटलेला नाही. जेवढा पाऊस पडून झालाय तेवढ्यावरच काळ्या आईनं कोवळ्या बीजांना आपल्या कुशीत जागा मिळण्यासाठी बळीराजाच्या मनावर गारुड घालायला सुरुवात केलीय.

शेतातल्या बांधाजवळून पुढच्या आडरानात जाणारा बैलगाडीचा रस्ता आता हिरवा होऊ लागलाय. रस्त्याच्या दोन्ही कडेला चौफेर तण माजलंय तर झाडांची पालवी हिरवीकंच झालीय. पाऊलवाटेतल्या ज्या भागातून बैलगाडीची चाकं जातात तो भाग अजूनही टणक मातीचाच आहे. त्यामधून आता एक नागमोडी हिरवाई त्या चाकांच्या साथसोबतीला आहे.

खांद्यावर जू असणारे बैल मात्र या रानगवताला तोंड न लावता आपल्याच एका तंद्रीत पुढे जाताहेत. बैलांच्या गळ्यातल्या घंटांचा लयबद्ध आवाज झाडातल्या पाखरांना मोहून टाकतोय. पावसाचे थेंब पानापानावर हलकसं ओझं टाकून गेलेत. त्यावरची नक्षी आता जास्त गडद जांभळी झालीय. निरनिराळ्या रंगाच्या, वाणाच्या बारीक किड्या-अळ्यांना म्हणावा तसा जोम अजून आलेला नाही. एव्हाना म्हशीच्या पाठीपासून वडाच्या शेंड्यापर्यंत त्यांची मैफल भरलेली असायची.

नाकतोडे पानामागे निवांत दडून अंग मोडून पडलेत. पिचकलेल्या ओल्या लिंबोळ्याचा खच पडवीत पडलाय. त्यावर माशा घोंगावतायत. परसातलं सारवण ओल्या-कोरड्या चिखलात, मातीत एकजीव होऊन गेलंय. शेणानं सारवल्याच्या खाणाखुणा शेणकुटाच्या खपल्यातून कुठेकुठे नजरेस पडताहेत. गोठ्याभवतालच्या दगडी कुंबीतनं ओलसर ओशट वास येऊ लागलाय. भिंतींवर वेगवेगळे वाटोळे आकार काढणारी ओलही आता हळूहळू नजरेस येईल. छताच्या पत्र्यातून गळणाऱ्या थेंबाचे एकसुरी संगीत मात्र सुरु झालंय.

पूर्वी दरवर्षी येणारा आणि ‘’पेर्ते व्हा, पेर्ते व्हा’’ असं सांगणारा पावशा मात्र आता आडसाली येतोय; यंदा तो आलेला नाही, तरीही लोकांची पेरणी जोमात आहे. टिटव्या आणि भोरड्यांना मात्र ऊत आलाय. आभाळाकडं तोंड वर करून पडलेली ढेकळं हिरमुसून मान आत खुपसून बसलीत. थोड्याशा पावसानं त्यांची धग मात्र चांगलीच वाढलीय. ओढ्यातले लहानमोठे खडक अजूनही कोरडे खडंग आहेत. त्यांच्या तळाशी थोडी ओल आहे पण कधी काळी खेकडे असायचे ते दिसत नाहीत. दयाळ आणि वटवटे अख्ख्या माळावर दिसत नाहीत.

पाणी रानातनं ओढ्यात खळाळत वाहत येण्याइतका धुवाधार पाऊस अजून झालेला नाही. त्यामुळं वाफसाच नसल्यानं पुढं तिफण कशाची धरायची हा नेहमीचा प्रश्न यंदाही ठाण मांडून आहे. औतं लावून पाळी घालून कुळकुळीत झालेलं रान अजून म्हणावं तसं भिजलेलं नाही, हे तेच तेच गाऱ्हाणं कायमचं जन्माला लागलं की काय अशी भीती आता वाटतेय.

पावसाची वाट पाहताना काढून ठेवलेली इरली, घोंगडी कोनाड्यात पडून आहेत कारण एकसलग आभाळ येतच नाही. त्यामुळं बोडक्या डोक्यानंच येणंजाणं सुरु आहे. ओढ्याला पाणी येऊन त्यात जागोजागी ‘’येरुळे’’ दिसू लागतील तेव्हाच खरा पावसाळा आला असं गावातलं सर्वमान्य सूत्र. आता पडणारं हे असलं भूरंगट किती जरी पडलं तरी त्याचा काही उपयोग नाही, हे गावकऱ्यांचे पावसाचे आडाखे. त्याला अजून तरी कोणी छेद देऊ शकले नाही.

पाझर तलावाच्या डाव्या अंगाला असलेलं मुरमाड रान मात्र अजून थोडंफार तापत्या अंगाचेच आहे. गावाच्या पांदीत असलेली वडापिंपळाची झाडं एकमेकाला विळखा घालून सदैव झिम्मा खेळत असतात. पण दरसाली कमी होत चाललेल्या पावसानं त्यांचे चेहरे पिवळट होताहेत. त्यांच्या बुंध्यावरनं पळणाऱ्या खारुताई आजकाल थोड्या बावरल्यात. कमी जास्त बरसणाऱ्या पावसानं झाडावरची साल निम्मीअर्धी ओलीसुकी झालीय.

त्याच सालींवर सूरपारंब्या खेळणारे तिखट मुंगळे अजूनही एकाच रांगेत चालताहेत. मान ताठ करून बसलेले हिरवेपिवळे सरडे भक्ष्यासाठी केव्हाचे दबा धरून आहेत. बेडकांचे घसे अजून म्हणावे तितके भरदार ओले झालेले नाहीत. सुगरणीचे विहिरीतले खोपे अर्धे बांधून झालेत मात्र त्यापुढची तयारी तिनं बंद केलीय. काही विहिरी अर्ध्यामुर्ध्या भरल्यात तर काही विहिरीतल्या कड्याकपाऱ्या काहीशा ओसाड झाल्यात.

तळाला गेलेलं तिथलं पाणी मात्र बरंच वर आलंय. उनाड साळुंख्यांना कळेनासं झालंय की पावसाची वीण उसवलीय का त्यांचा हंगाम चुकलाय? कावळ्यानं बांधलेलं घरटं मात्र अजून शाबूत आहे तर बाभळींनी माना टाकल्यात. चिलारीची मात्र चंगळ झालीय. धोतरासुद्धा दरदरून फुटलाय. बिनकामाचं तण जागोजागी आलंय. अर्धवट वाफसा होऊन आलेलं पीक मात्र अजूनही पिंडरीतच अडकलंय. उंदरांची बिळं मात्र पहिल्यांदाच बांधाच्या कानाकोपऱ्यात झालीत. पूर्वी शेतात घुबडं यायची, आता तीही दिसत नाहीत. परिणामी उंदरांचा मात्र दणकून सुकाळ झालाय.

शेरडांच्या केसात अडकणारे केचवे वाढलेत. गायी-म्हशींच्या पाठीवर गोचिडांचा आट्यापाट्याचा खेळ सुरु आहे. डोबीतल्या चिखलातून जेव्हा म्हशी बाहेर यायच्या तेव्हा हळूच येऊन त्यांच्या अंगावर बसणारे बगळे यंदा गत सालापेक्षा घटलेत. श्रावणात वारेमाप उगवणारं हिरवंकंच कमालीचं कोवळं घास अजूनही तगून आहे. दर्ग्याच्या घुमटाभवती, मिनाराभोवती फिरणारे पारवे अजून अबोलच आहेत.

शिवाराच्या वाटेला असलेलं चिरे निसटलेलं, विजनवासातलं नागोबाचं एकाकी देऊळ मस्तकावर अविरत पडणाऱ्या पावसाच्या सलग धारा अजून कशा बरसल्या नाहीत म्हणून फणा काढून ताठून गेलंय. तिथल्या अरुंद, अंधाऱ्या गाभाऱ्यातल्या पाकोळ्या कधीच निघून गेल्यात, त्या फिरून परतल्याच नाहीत. रातसारी विहिरीजवळच्या अंधारओल्या रानात फिरणारे काजवेही अजून फिरकले नाहीत. रातकिड्यांनी मात्र यंदाही विश्रांती घेतलेली नाही. साप विच्चूकाट्यांना नेहमीचं उधाण यायचंय. पहाटं नजरेस पडणारे पिंगळे काहीसे नरम पडलेत.

मला खात्री आहे की यंदाच्या मौसमात एक तरी दिवस असा येईल की मन लावून पाऊस पडेल. अगदी आलाप लावून गाणाऱ्या पट्टीच्या गवयासारखा तोदेखील जलधारांचा सूर धरेल, ज्यावर वसुंधरा नृत्य करेल. असं पाहुण्यागत अधून-मधून पडणाऱ्या या पावसाचं नेमकं काय दुखणं आहे ते तोवर निदान सर्वांच्या कानीकपाळी होईल. बहुतेक त्यालाही आपल्याला काही तरी सांगायचंय. तो अजूनही शिवाराच्या मधोमध ढगांची जमवाजमव करतो, क्षणात आसमान अंधारून आणतो, पाने शहारून उठतात.

पाखरं कल्ला करतात, गायीम्हशी कातडं थरथरवून उभ्या राहतात, बांधाबांधातून सुसाट वाहणारं वारंसुद्धा त्याच्यासाठी चिडीचूप होतं, सगळ्यांच्या नजरा वर आभाळाकडे खिळतात अन् तो मात्र साऱ्या गावगाड्याची चेष्टा केल्यागत भुरूभुरू पडून जातो. पावसाच्या भेटीसाठी आतुर झालेलं कडकडीत ऊन मुकाटपणे निघून जातं, मान खाली घातलेली निस्तेज शिरवळ तशीच राहते.

हे असंच चालू आहे. गावातली म्हातारी माणसं म्हणतात, “माणसाची नियत बदलली मग परमेश्वराने तर का बदलू नये ? पेराल तेच उगवणार !” ते असलं काही बोलले की सगळेच कासावीस होतात. ढेकळात उगवलेले अर्धेमुर्धे कोंब हिरमुसून पिवळे होऊन जातात. माणसांची मात्र पावसाळी सूर्यफुलं होतात; जिकडं आभाळ गोळा होईल तिकडं तोंड करून बसतात!

शेतात अंधारून येताना बापूकाका मावळतीकडं तोंड करून बसत. बहुधा ते त्यांच्या जन्मदात्यांचे स्मरण करत असावेत. अंधार अंगावर येताच ते मन लावून कंदिलाची काच पुसून लख्ख करून ठेवत. तुळशीच्या देवळीत कृष्णाई मंद वातीचा दिवा लावायची. गोठ्यातली हालचाल हळूहळू मंदावत जायची. आता ती अनुभूती उरली नाही. आता सगळं अर्धवट वाटतं. बाजेवर पडून आभाळातल्या चांदण्या मोजताना नक्षत्रंसुद्धा आता तुटक दिसतात.

पहाटेचं स्वप्न आता मध्यरात्रीच डोळ्यापुढं येतं. ज्यात दिसतं की, काळ्या ढेकळात पांडुरंग मूर्च्छा येऊन पडलाय आणि काकड आरतीला उधाण आलंय! काय करावं काही सुचत नाहीये. अर्ध्याकच्च्या अर्ध्यापिकल्या, थोड्या गाभूळल्या- थोड्या सुकल्या, थोड्या गोड थोड्या आंबट चिंचंसारखं आयुष्य झालंय सगळंच बेभरवशाचं!

अशा वेळेस दिगंताच्या माथ्याशी तरळत असणाऱ्या तांबूस जांभळ्या आभाळात स्वर्गस्थ वडिलांची छबी दिसते. चेहऱ्यावर नकळत समाधान पाझरते. डोळे कधी मिटतात काहीच कळत नाही. उद्याचा दिवस काय घेऊन उगवणार आहे हे विज्ञानाला अजून कळलं नाही हे बरेच आहे. कारण आशेच्या लाटांवर तरंगून वैफल्याचे किनारे पार करणं अजूनही शक्य आहे. तोवर तरी माणसांची सूर्यफुलं जपली पाहिजेत.

समीर गायकवाड ८३८०९७३९७७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Sowing : हरभरा पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार

Pesticide residues found in farmer's urine : धक्कादायक! तेलंगणाच्या काही शेतकऱ्यांच्या लघवीत कीटकनाशकांचे अंश?

Agriculture Department : कृषी कार्यालयाचा कारभार कुबड्यांवर

Hilsa Fish Export : बांगलादेशने हिलसा माशाच्या निर्यातीवरील बंदी उठवली; भारतला ३ हजार टन मासा करणार निर्यात

Irrigation Subsidy : सिंचन अनुदानाच्या वाटपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच

SCROLL FOR NEXT