Village Story : उरूस...

Village Festival : दरवर्षीप्रमाणे वातावरणात उरसाचा एक खास माहोल तयार झालेला. एक अनोखा उत्साह मनात भरलेला. आता तीन, चार दिवस उरुस चालणार, पाहुण्यांनी घर भरणार, खेळणी, तमाशा, कलापथक, पिक्चर, शर्यती, कुस्त्यांचा खैंदुळ उठणार. जाड वाकळ अंगावर घेऊन आकाश पाहात कधी झोप लागली ते समजलेच नाही.
Village Festival
Village FestivalAgrowon

जयंत खाडे

Village Fair : पौषाच्या पौर्णिमेला सालाबादाप्रमाणे साजरा होणारा पिराचा उरूस आठवड्यावर येऊन ठेपला. उरसाला गावात पोहोचलो तर घरात तयारी सुरू झालेली. दारात पडलेले जळण, शेतीची अवजारे, वैरण खालतीकडंच्या मोकळ्या जागेत नेऊन ठेवलेली. आतल्या आणि मधल्या घराच्या भिंतीला पोतेरं मारायचं चाललेलं. सगळी भुई सारवून घेतलेली. पावसाळ्यात खपल्या पडलेल्या भिंतीस सांधून घ्यायचं चाललेलं. सगळ्या घरात एक नव्याचा वास यायला लागलेला, जसा नवीन शाळा सुरू झाल्यावर पुस्तकाचा येतो तसा.

माळ्यावरचा सगळा पसारा, धान्याची पोती एका बाजूला दास्तानी लावलेली. दारात मुरूम पसरून पाणी मारून भुई धोपटलेली तर कुंभाराकडून नवीन आणलेले दोन मोठे रांजण भरून ठेवलेले. त्याच्या मातीला पण लय भारी वास सुटलेला. बाहेरच्या खोलीचा विटलेला रंग खरडून आधिकने डिस्टेंपर मारायला चालू केलेलं. दाराला आणि खालच्या पट्टीला ऑइल पेंट मारलेला. दारावर एयर इंडियाच्या महाराजाचं चित्र तर त्याच्यापुढे ‘सुस्वागतम’ लिहिल्यालं. सोप्यात खालच्या पट्टीला एक जोतिबाचे चित्र काढलेलं. सगळं घर कसं झकपक दिसायला लागलेले.

गावोगावी पिराच्या समाध्या आहेत. पीरबाबाच्या खूप विलक्षण आख्यायिका सांगितल्या जातात. कोणी गावातला दुष्काळ हटवला, कोणी रोगराई हटवली, कोणी महाप्रलय शांत केला, आणखी काय काय! आमच्या पिराची समाधी तळ्याच्या वर पीरवाडीत आहे. आमच्या पीरबाबानं गावासाठी काय केलं, कोणते चमत्कार केले, याची काही आख्यायिका माझ्यापर्यंत पोहोचली नव्हती म्हणून एकदा मी सहज माझ्या आज्जीला विचारले, ‘‘पिराने गावासाठी काय केले गं?’’

तर ती प्रश्‍न न समजून घेता वस्कन माझ्या अंगावर आली आणि म्हणाली की तो देव आहे, त्याने काय केले असे विचारू नये. अशा या गरीब, करुण व दयाळू पिराची समाधी पण तशीच. अर्धे-कच्चे बांधकाम, पायऱ्याचे दगड निसटलेले, आतमध्ये ओबडधोबड, कोपऱ्यात मोठे भसके पडलेली भुई, त्यावर जीर्ण हिरव्या आणि धुळीने माखलेल्या चादरीखाली समाधी. अंगण उखडलेले, शेळ्या, कोंबड्या फिरत्याल्या.

समाधी शेजारीच गोवऱ्या थापलेल्या, कडब्याची गंजी रचलेली, बाजूला पीरवाडीतील लोकांची शेतीची अवजारे, बैलगाड्या, जित्रापांचा गोठा, थोड्याफार मोकळ्या असलेल्या जागेत गुळभेंडीचे झाड, रस्त्याच्या कडेला असलेला सार्वजनिक आड आणि त्याच्या शेजारी उभा असलेला जुना पिंपळाचा महाकाय वृक्ष. वर्षभर ही समाधीची वास्तू अशीच दीनवाणी बसलेली असते. ती पौषाच्या पौर्णिमेची वाट पाहते. उरुस सुरू होतो आणि सगळं गाव हरकून जातं.

दुपारी पीरवाडीत निघालो. तळ्यावर आल्यावर पाहिलं तर पाणी आटत चाललेलं. बायका उरसाची पूर्वतयारी म्हणून पितळी भांडी, अंथरूण, पांघरूण, कपडे धूत बसलेल्या. तळ्यातूनच पीरवाडीला गेलो तर पीरवाडीत उरसाची खेळणी बसतात त्या जाग्यावर अजूनही वाडीतल्या लोकांचा सगळा पसारा पडलेला. मला कळेना कधी ही जागा स्वच्छ होणार? कुस्त्याचे मैदान, तमाशाची जागा, खेळण्यांची जागा तयार कधी होणार? पीरवाडीची अवस्था बघून जरासा नाराजीनेच माघारी घरात आलो‌.

जेवण उरकून अंगणात टाकलेल्या अंथरुणावर जाऊन पडलो. डोक्यावर द्वादशीचा पूर्णत्वाकडे चाललेला चंद्र उगवलेला, थंडीची चाहूल पडलेली, दरवर्षीप्रमाणे वातावरणात उरसाचा एक खास माहोल तयार झालेला. एक अनोखा उत्साह मनात भरलेला. आता तीन चार दिवस उरुस चालणार, पाहुण्यांनी घर भरणार, खेळणी, तमाशा, कलापथक, पिक्चर, शर्यती, कुस्त्यांचा खैंदुळ उठणार. जाड वाकळ अंगावर घेऊन आकाश पहात कधी झोप लागली ते समजलेच नाही.

दुसऱ्या दिवशी परत तळ्यातनं पीरवाडीत जाऊन आलो आणि पाहतो तर खेळणीवाली आलेली. मन फार हरकून गेलं. माणसं इतस्ततः पडलेले साहित्य उचलत होती तर खेळणीवाली त्यांना मदत करत होती. पाळणावाला, चक्रवाला जुनाच होता पण ती मला ओळख देत नव्हते. पिराच्या समाधीजवळचं सगळं साहित्य, घाण काढून टाकली होती, जागा स्वच्छ केली होती. कोणाला तरी बोलवून समाधीला रंग फासला होता. निसटलेले दोन तीन भिंतीचे दगड व्यवस्थित ठेवून त्यावर मातीनं लिंपून घेतलं होतं. बराच वेळ तिथे फिरून परत घराकडे निघालो.

Village Festival
Village Story : वळवाचा पाऊस...

दिवस मावळायला घरात माणसं असत्यात म्हणून उरसाची पट्टी मागायला कमिटीचे मेंबर आलेले. वाड्यात सगळ्यांनी घासाघीस करून का होईना पट्टी दिलेली. भाऊ मात्र काहीच द्यायला तयार नव्हता. माणसं त्याच्याशी तंडायला लागलेले पण तो रुपयापण द्यायला तयार नव्हता. नुसतं बारीक डोळे करत हसत, डोक्यावरून हात फिरवत भिंतीला टेकून बसलेला.

आमच्या भाऊला कोणत्याही सणासुदीचे कौतुक नसतं. अगदी दिवाळीच्या दिवशी सुद्धा तो खालच्या आडावर रोजच्या प्रमाणे चार तांबे पाणी अंगावर टाकून, जुनेच अस्वच्छ, विटलेले कपडे घालून हातात खुरपं घेऊन रानात जाताना मी कित्येक दिवाळीत पाहिलं आहे. आमच्या वाड्यातील, गल्लीतील बरेच लोक एरवी असेच वागतात; पण उरसाला मात्र ते खूपच आनंदी असतात.

महिनाभर अगोदरच सगळी तयारी करतील, नवीन कपडे शिवतील, पाहुण्यांना अगत्याने निरोप देतील, घरात वाद घालणार नाहीत आणि कोणतीही कसर राहू नये असे नियोजन करतील आणि यासाठी गरज पडलीच तर जमिनी सुद्धा गहाण ठेवतील. यांची पीरबाबावर श्रद्धा आहे असं म्हणावं तर ते कधीच समाधीकडे जाताना मी बघितलं नाही. कधी पीरबाबाकडे त्यांनी काही मन्नत मागितलेलं सुद्धा ऐकिवात नाही. पण उरूस साजरा करण्याचा त्यांचा उत्साह विलक्षण असतो.

आज ताजी जत्रा. घरात मलिदा केलेला. बऱ्याच लोकांचा रोजा आज ठरलेला. दुपारपर्यंत आत्या, मामा बरेच पाहुणे जमले. सकाळी जत्रेत जाईपर्यंत बरीच खेळणी मांडून झालेली. पाळणावाला, घोडेवाले, तीन-चार जण चक्रावर, पाकिटातून चित्र काढणारे व पाच पैशाला चाळीस पैसे देणारे जुगारवाले, गावतलाच इमामुद्दीन शेव, चिवडा, चिरमुरे, भत्ताशी, गोडीशेव, जिलेबी कनात बांधून लाकडी फळ्यावर रचत बसलेला, बंदुकीने फुगे टिपण्यास देणारे दोघेजण होते तर नेहमीप्रमाणे रिंग टाकून साबण, वाटी, प्लेट, घड्याळ, चष्मा, चेंडू सारख्या वस्तूवर अडकल्यास बक्षीस देणारा पण हजर होता. गारेगारवाला, सरबतवाला, बॉम्बे मिठाईवाला, खेळणीवाला यांनी मधली जागा घेतलेली. या खेळणीवाल्यांचे छकडे त्यांच्या कनातीमागेच उभे केलेले.

पिराच्या समाधीत दोघे-तिघे फकीर मोराची पिसे, टोकरी, पुस्तकं घेऊन, लुंगी, टोपी घालून त्यांच्या नेहमीच्या पारंपारिक पोशाखात येऊन बसलेले. त्यांनी येऊन समाधी स्वच्छ केली होती. ही सगळी मंडळी जुन्या ओळखीची, मागच्या जत्रेत आलेलीच, फक्त चक्रावर जुगार चालवणारी मुस्लिम बाई मात्र नव्याने आलेली. सोबत तिचे छोटे बाळ व डोळे तांबरलेला, वयाने तिच्यापेक्षा खूप मोठा असणारा एक सोबतीचा माणूस. आल्यापासून तो माणूस झोकांड्याच देत होता आणि त्या बाईशी भांडत होता; परंतु ती बाई त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आपले काम करत होती.

माझ्याकडे चाळीस पैसे आहेत, फिरून झाल्यावर काय घ्यायचं ते ठरेना. खरं तर मला एक रबराला बांधलेला चेंडू, एक रंगीत चष्मा घ्यायचा आहे आणि गारेगार, बॉम्बे मिठाई खाऊन इमामुद्दीनची गोडी शेवही घ्यायची आहे. पण एवढे पैसे पुरणार नाहीत, मग पाचला चाळीस पैसे मिळतील या आशेवर चक्रावरच्या जुगारावर पाच पाच पैसे लावले पण दोन्ही वेळेला माझे चित्र आलेच नाही. बराच वेळ तिथे बसलो.

शेवटी मोराचे चित्र बराच वेळ आलेले नाही म्हणून मोरावर शेवटचं म्हणून पाच पैसे लावले आणि तेही गेले. मी उठून परत जत्रेतून फिरुन आलो. आता पाळण्यात आणि घोड्यावर बसलो. पैसे संपले, भूक पण लागलेली म्हणून परत आलो. मलिदा खाऊन बाहेर पडेपर्यंत मामाने प्रत्येकाला चार चार आणे दिले. परत पळत जत्रेत आलो आणि पाकिटवाल्या जुगाराच्या चित्रावर पैसे लावले. दोन-तीन वेळा लावून पैसे गेल्यावर आता परत जुगाराकडे जायचे नाही असे ठरवून जत्रेत फिरलो. दुपारपासून रात्रीच्या शिड्यांची आणि कलापथकाची तयारी चाललेली. कलापथकवाल्यांच्या गाडीभोवती पोरं उगीच फिरायला लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी कुस्तीचे मैदान भरलेलं. बरेच बाहेरचे लोकं पण कुस्त्यासाठी आलेले. गावातली माणसं, सगळी पाहुणे मंडळी गळ्याला टॉवेल गुंडाळून कुस्ती मैदानात बसलेली.

Village Festival
Village Story : हरवलेली सांज

मी पण बाजूला बसलेलो. तोपर्यंत ढोकळ्याचा शिवा मला म्हणाला, ‘चल कुस्ती खेळूया, मी लगीच पडतो आणि तुला पैसे मिळतील. मग आपण अर्धे-अर्धे घेऊया.’ मी तयार झालो, कपडे काढून मैदानात गेलो. बरीच बारकी पोरं मैदानात कुस्ती खेळत होती, कुस्ती खेळणाऱ्याला पाच पाच पैसे पंचमंडळी देत होती.

अजून मुख्य कुस्ती सुरू व्हायला वेळ होता, शिवाने एका पंचाला आम्ही दोघ कुस्ती खेळणार आहे म्हणून सांगितले. पंच बाजूला एका ठिकाणी आम्हाला घेऊन गेला आणि चालू करा म्हणला. आम्ही दोघांनी हातात हात दिले आणि मला काही समजायच्या आतच शिवा माझ्या पायात घुसला आणि त्याने मला अर्ध्या सेकंदात उताणा केला.

तो जिंकलेला कुस्तीगीर करतो तसं एक पाय उचलून नाचायला लागला. बाजूला बसलेली सगळी लोकं टॉवेल उडवून हसायला लागली. मला खजिल झाल्यासारखं वाटलं. मी पुढच्या कुस्त्या बघायला थांबलो नाही आणि तिथून तडक निघालो.

घरात त्या दिवशी कंदुरी होती. दुपारपासूनच पाहुणे मंडळींचा जेवणाचा रतीब सुरू झाला. दुपार, संध्याकाळ सगळ्या पाहुण्यांना जेवायला वाढायला थांबलो. रात्री परत उरसात जोतिबाचा नवस पिक्चर दाखवला होता. रात्रीचे जेवण आटपून पोरांच्या बरोबर पिक्चर बघायला येऊन थांबलो. बऱ्याच वेळा हा पिक्चर पाहिलेला असल्याने मी मध्यानंतर हळूच गर्दीतून बाहेर पडलो. पौर्णिमेचा चंद्र आकाशात होता आणि त्याचा प्रकाश सगळ्या पीरवाडीत पसरला होता.

मी त्या रात्री शांत झाल्येल्या उरउसाच्या संसारात फिरायला सुरवात केली. खेळणीवाल्याने पालापुढे मांडलेले साहित्य एकत्र गोळा केले होते आणि पुढेच पथारी पसरून त्यात त्याची म्हातारी बायको आणि सून दोन मुलांसह झोपली होती. म्हातारी जागसुद झोपली होती. माझी चाहूल लागताच तिने मान वर करून पाहिले व उशाच्या खाली काही तरी तपासले. पालाच्या पाठीमागे त्यांचा छकडा होता.

जवळ बैल निवांत रवंथ करीत होता. चंद्रप्रकाशात छकड्याची बैलासह सुंदर कलात्मक सावली बाजूला पडली होती. त्याच्या खाली नुसत्या वैरणीवर म्हातारा आणि त्याचा मुलगा गाढ झोपले होते. बाजूला चूल मांडलेली होती. त्यात त्यांनी जेवण शिजवले असावे. जेवलेली भांडी चुलीजवळ वाळत घातली होती.

मुंबई दर्शनवाला त्याचं साहित्य तिथेच टाकून निघून गेला होता तर एक मिठाईवाला त्याची चिवडा, शेव, चिरमुऱ्याची बोचकी वर ठेवून त्याच फळीवर घोरत होता. त्याच्या घोरण्याचा आवाज सिनेमाच्या आवाजात सुद्धा स्पष्ट ऐकू येत होता. त्याचे सुटलेले पोट किल्ली दिल्यासारखे एका लयीत वरखाली होत होते. दुसरा मिठाईवाला जाग्यावर नव्हता. कदाचित तो सिनेमा पाहायला गेला असावा.

पलीकडे चक्राच्या जुगारवाली बाई स्वतःच्याच साडीत मुरकटून धुळीतच झोपली होती. तिचे लहान बाळ तिने छातीशी घट्ट कवटाळले असणार. दिवसभर ती बाळाला बिलकुल सोडत नसे. कधी खांद्यावर, कधी कमरेशी तर कधी मांडीवर त्या बाळाला ती ठेवत असे. तिने जेवण तयार केले नसावे. दिवसभरसुध्दा ती मुलाला चिवडा, चिरमुरे भरवताना दिसे. ती तसेच काहीबाही खाऊन झोपली असावी. गोलचक्रात पाळणे फिरवणारे चार पुरुषच होते व त्यात एक तरुण मुलगा होता. चौघे त्यावेळी चुलीभोवती शेकत, गुडघ्याला मिठी मारून पुढे पाठीमागे कलत गप्पा मारत होते. एक एक काटकी, वाळलेले गवत टाकून ते धग जिवंत ठेवत होते. चुलीवरच त्यांनी केवळ भात शिजवून खाल्‍ल्याचे दिसत होते.

गूळभेंडीच्या झाडाखाली दोन पोलिस कंटाळून बसले होते. मला फिरताना पाहून एक टोपी झटकत म्हणाला, ‘कुठवर आलाय रे सिनेमा?’ मी म्हणालो, की जोतिबाच्या यात्रेतून सर्जा आत्ता पळाला, अजून अर्धा हाय! त्याने बरं म्हणून परत जांभई दिली आणि झाडाला टेकून बसला.

समाधीत चार-पाच फकीर होते. एकच झोपला होता, बाकीचे काही न बोलता भिंतीला टेकून गप्प बसले होते. हे कुठून आले असावेत, यांना जवळचे कोणी आहेत का असे प्रश्‍न मला पडले. दिवसभर तोंडावर मोरपीस फिरवून पैसे मागणारे ते सर्व त्या वेळी मात्र काही बोलण्याच्या मानसिकतेत नसावेत. त्यांचे निस्तेज चेहरे आणि खंगलेले शरीर पाहता त्यांच्या वाट्याला पोटभर नैवेद्य आला असेल असे वाटत नव्हते. मी फिरून परत गर्दीत जाऊन बसलो पण नंतर माझे लक्ष सिनेमात लागले नाही.

तीन, चार दिवसांत उरुस संपायला लागला. घरातले पाहुणे, उरसातले फिरस्ती, फकीर, खेळणीवाले परत गेले. हळूहळू जागा रिकामी झाली पण त्यांच्या खुणा काही दिवस तशा राहील्या. पौर्णिमेनंतर कमी कमी होत जाणाऱ्या चंद्राप्रमाणे उरसाचा माहोल मनातून पुढील वर्षी पुन्हा साजरा होण्याचा आशेसह उतरत राहिला‌.

९४२१२९९७७९

(लेखक जलसंपदा विभागात कार्यकारी अभियंता आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com