Pune News : जोरदार पावसाचा आडसाली ऊस लागवडीला फटका बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उसाच्या उशिराने लागवडी सुरू केल्या आहेत. आतापर्यंत राज्यात आडसाली उसाच्या एक लाख ९३ हजार ५७२ हेक्टर म्हणजेच सरासरी १८ टक्के लागवडी झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी ७६ हजार ७६५ हेक्टरने आडसाली लागवडीत घट झाली आहे. येत्या काळात पूर्व हंगामी आणि सुरू ऊस लागवडी झाल्यास क्षेत्रात आणखी वाढ होईल.
राज्यात उसाचे सरासरी १० लाख ९५ हजार ७५ हेक्टर एवढे क्षेत्र आहे. त्यासाठी मागील पाच वर्षाचे लागवडीचे क्षेत्र गृहित धरण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या वर्षी याच काळात दोन लाख ७० हजार ३३७ हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत राज्यातील अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला होता.
काही ठिकाणी कमी कालावधीत अधिक पाऊस पडला. पश्चिम महाराष्ट्रात व घाटमाथ्यावर पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे पुणे, नाशिक, कोल्हापूर विभागातील कोयना, मुळा, भंडारदरा, कुकडी, भाटघर, उजनी अशी लहान मोठी असलेली बहुतांशी धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणाच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी शाश्वत पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
राज्यात अनेक शेतकरी इतर पिकांच्या तुलनेत ऊस पीक हे शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून ऊस पिकांकडे पाहतात. त्यामुळे दरवर्षी बहुतांशी शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाच्या लागवडी करतात. यंदा जूनच्या सुरुवातीलाच दमदार हजेरी लावली. त्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाचा काही प्रमाणात खंड पडला होता. परंतु त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाऐवजी सोयाबीन, तूर, मूग आदी कमी पाण्याच्या पिकांवर भर दिला असला तरी पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पावसामुळे वाफसा न झाल्याने ऊस लागवडीत घट झाल्याचे चित्र होते. परंतु वाफसा झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात आडसाली उसाच्या लागवडीला चांगलाच वेग आला. त्यामुळे उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
दरवर्षी शेतकरी आडसाली, पूर्वहंगामी, सुरू अशा तीन हंगामात उसाच्या लागवडी करतात. दरवर्षी बहुतांशी शेतकरी आडसाली उसाच्या लागवडी १५ जुलै ते १५ ऑगस्ट या दरम्यान करतात. पूर्वहंगामी उसाच्या १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेबर या कालावधीत करतात. तर १५ जानेवारी १५ फेब्रुवारी या काळात सुरू उसाच्या लागवडी शेतकरी करतात. लागवड केल्यानंतर साधारणपणे पंधरा ते सतरा महिन्यानी ऊस साखर कारखान्यास तोडणीस देतात.
पुणे विभागात उसाचे एकूण सरासरी तीन लाख ४३ हजार ३९२ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ९८ हजार १८६ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. विभागातील नगर जिल्ह्यात शेवगाव, कोपरगाव, अकोले, श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, पाथर्डी, राहाता, श्रीरामपूर या तालुक्यात लागवडी झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौड, बारामती, इंदापूर, हवेली, जुन्नर, आंबेगाव, पुरंदर या तालुक्यांत लागवडी झाल्या आहेत. मुळशी, भोर, मावळ, वेल्हे, खेड या तालुक्यात अजूनही उसाच्या लागवडी झालेल्या नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, माळशिरस, बार्शी, पंढरपूर, करमाळा, माढा, सांगोला, करमाळा या तालुक्यात कमीअधिक स्वरूपात उसाच्या लागवडी झाल्या आहेत.
नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत अत्यंत कमी क्षेत्रावर ऊस लागवडी झाल्या आहेत. कोल्हापूर विभागातील सातारा जिल्ह्यात सर्वाधिक आडसाली उसाच्या लागवडी झाल्या आहेत. विभागात ४ लाख २० हजार ५८९ हेक्टरपैकी सुमारे ६४ हजार ३१८ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर विभागातील धाराशिव, परभणी, हिगोली, अमरावती विभागातील बुलडाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांत अत्यल्प प्रमाणात ऊस लागवडी झाल्या आहेत.
विभागनिहाय आडसाली उसाच्या झालेल्या लागवडी (क्षेत्र, हेक्टरमध्ये)
जिल्हा सरासरी क्षेत्र आडसाली ऊस लागवड टक्के
पुणे ३,४३,३९२ ९८,१८६ २९
नाशिक ४८,२४५ ५३६३ ११
कोल्हापूर ४,२०,५८९ ६४,३१८ १५
छ. संभाजीनगर ९६,९१९ ५७४६ ६
लातूर १,६८,८९० १२,०९४ ७
अमरावती ८१७१ ७३५० ९०
नागपूर ७२५८ ४९२ ७
कोकण १६११ २४ १
एकूण १०,९५,०७५ १,९३,५७२ १८
माझ्याकडे एकूण ५५ एकर शेती आहे. दरवर्षी जुलै महिन्यात उसाची लागवड करतो. चालू वर्षी जास्त पाऊस झाल्याने वेळेवर वाफसा झाला नाही. त्यामुळे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये उसाची ३० एकरांवर लागवड केली आहे. अति पावसामुळे उसाची वाढ कमी, फुटवे कमी, पानथळ क्षेत्रामध्ये दुबार लागवड करावी लागली. आता पिके वाफसा स्थितीत येत आहे. त्यामुळे रब्बी पिकांचे नियोजन केले आहे.धनंजय आटोळे, राजेगाव, ऊस उत्पादक शेतकरी, ता. दौंड
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.